सासुरवास मला दिलाया गोविंदानं

जाते सासरी आनंदानं

सासुसासर्‍याचा आशिरवाद घ्यावा सुने

पोटी फळाला काय उणे ?

सासु नि सासरा, सोन्याची पाखरं

त्येच्या हाताखाली आम्ही लोकांची ल्येकरं.

सासू ग सासरा, दैवाच्या ल्येकी तुला

नित्य जायाचं माहेराला

दानधर्म केला माझ्या गं सासर्‍यानं

गोठा भरला वासरानं

आईपरायास सासुबाईचा उपकार

सासुमालनीनं दिला पीरतीचा चंद्रहार

सासुरवास मला कसला ठावा न्हाई

सासु नव्ह त्या माझ्या बयाबाई

सासू नि सासरा दोन तुळशीची आळं

त्येंच्या साऊलील भरतार राजसबाआळं

सासुसासर्‍यानं कीर्त केल्याती एकदोन

माडी बांधलीया चौदा खन

१०

मायबाप काशी सासूसासरा तुळशीबेट

त्येंच्या दरसनानं , तिथं घडली तीनशेंसाठ

११

काळी कपिला गाय भिंगारी तिचा पाडा

माझ्या मामंजींनी बांधला राजवाडा

१२.

सासू नि सासरा माझे देव्हार्‍याचे देवु

आम्ही जोडीन फुलं वाहूं

१३

सासू नि सासरा, दोन सोनियाच्या तारा

त्येंच्या साऊलीला मला लागेना ऊनवारा

१४

बहिणीचा सासुरवास बंधु ऐकतो सान्यावाटं

गंगा लोटती डोळ्यावाटे

१५

बहिणीचा सासुरवास कडू कारल्याचे येल

आपुल्या बहिणीसाठी, बंधु रवंदळी चाल

१६

बंधुजी बोलती, बहिणा सासुरवास कसा

चित्तांगाचा फासा, उकलून दावूं कसा

१७.

बाप्पाजी पुसती, लेकी सासुरवास कसा

मिरीयांचा घास तिखट म्हणू जसा

१८

सासुरवासणीला नका बोलूं छिडीछिडी

माऊलीची याद तिला होतीया घडीघडी

१९

सासूचा सासुरवास, जसा लोखंडाचा घाना

सोसल्यानं येतुंया देवपना

२०

सासूचा ससुरवास, करूं नये त्यांनी केला

चुडियाचा रंग गेला.

२१

सासुरवास एवढा नका करूं सासूबाई

हारगुंफनी सरूं काई ? वास घ्येनारं राजी न्हाई ?

२२

सासुरवासनीला बोलतो सारा वाडा

हाय कैवारी तिचा चुडा

२३

सासुरवासनीला बोलती सारीसारी

कंथ हौशा साल सारी

२४

सासुरवासनीला इसावा कुनाचा

कंथ देवाच्या गुनाचा

२५

सासूचा सासुरवास जिर्‍यांमिरीयाचा घास

तान्हे अशिलाची सोस

N/A

References : N/A
Last Updated : December 09, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP