पार्वण श्राद्ध तयारी

पार्वण श्राद्ध पितृ पंधरवड्यात करतात.यात मागील तीन पितृ देवतांचा समावेश होतो.


श्राद्धाचा कालावधी

दिनमानाच्या (स्थानिक वेळेनुसार सूर्योदय ते सूर्यास्त ह्या कालखंडाच्या ) पंधराव्या भागास 'मुहूर्त' असे म्हणतात. तीन मूहूर्ताचा एक भाग धरल्यास सूर्योदयापासून पहिला भाग 'प्रातःकाल', दुसरा भाग 'संगवकाल', तिसरा 'मध्याह्न', चौथा 'अपराण्हकाल' व पाचवा 'सायाह्नकाल' म्हणून ओळखला जातो. ज्या तिथीचे श्राद्ध असते ती तिथी अपराण्हकाली असावी असा शास्त्रसंकेत आहे. दिनमानाच्या आठव्या मूहूर्तास 'कुतुपकाल' म्हणतात आणि तो श्राद्धासाठी सर्वोत्तम असतो. कारण कुतुपकाली श्राद्धाद्वारे पितरांना अर्पण केलेले दान अक्षय ठरते. ढोबळमनाने सांगावयाचे झाल्यास दुपारी बारानंतर सुमारे एक-दीड तासाच्या कालावधीत श्राद्धकर्म करावे.

श्राद्धाचे अधिकारी

पुत्रः पौत्रश्च तत्पुत्रः पुत्रिकापुत्र एव च ।

पत्‍नी भ्राताच तज्जश्च पिता माता स्नुषा तथा ।

भगिनी भगिनेष्यश्च सपिंडः सोदकस्तथा ।

असन्निधाने पूर्वेषामुत्तरे पिंडदाः स्मृता। याज्ञवल्क्य

पुत्र, पौत्र, त्याचा पुत्र, पुत्रिकापुत्र, पत्‍नी, भ्राता, भातृपुत्र, पिता, माता, स्नुषा, भगिनी, भागिनेय (भगिनीपुत्र) सपिंड आणि सोदकपिंड - सात पिढ्यांच्या आतले, सोदक - सात पिढ्यांच्या पलिकडचे सोदक, समानोदक यांचे अभावी कन्येने अथवा जावयाने विधी केला तरी चालेल. यात आणखी पुढील एकाची भर. पती-पत्‍नी दोघेही पुनर्विवाहित असतील आणि त्या उभयताना प्रथम विवाह संबंधात अपत्य झाले असेल आणि ते त्यांच्या जवळ असेल तर त्या अपत्याला आई-वडिलांचे श्राद्ध करू द्यावे. उदा. स्त्रीला प्रथम पतीपासुन मुलगा झाला असेल आणि तो तिच्या बरोबर रहात असेल आणि तिने पुनर्विवाह केला तर तो मुलगा नवीन पित्याचे व प्रथम पित्याचे श्राद्ध करू शकतो. तसेच या पैकी पित्याला प्रथम पत्‍नी पासून झालेला मुलगा पुत्र सावत्र आईचे श्राद्ध करील पण तिच्या पूर्वीच्या अपत्यांचेहि श्राद्ध करील.

सर्व मुलगे वेगवेगळे रहात असले तरी, सपिंडी करणापर्यंतची श्राद्धे एकट्याने मोठ्यानेच करावीत. नंतर मात्र प्रत्येकाने वेगवेगळे श्राद्ध करावे. जर एकत्र येऊन श्राद्ध केले तर खर्चातील काही अंश न मागता द्यावा.

श्राद्धाला लागणारी तयारी

पांढरे चंदन, उगाळून, पांढरी सुवासिक फुले, मोगरा, जाई-जुई, सोनटक्का दुहेरी तगर, कमळे लाल सोडून, अगस्तीची फुले, सोनचाफा, नागचाफा, पारिजात, बकुल, सुरंगी वगैरे. तुळस, माका, अगस्तीची पाने, दुर्वा, स्वच्छ केलेले धुतलेले काळे तीळ, तसेच यव (जव टरफलासहित गहू) पूर्वी एक धान्य मिळत होते. सुपार्‍या चांगल्या (पोफळेसुद्धा), नारळ (वाजणारे), धूप (अगरबत्ती), दीप दोन्ही, विड्याची देठाची पाने, शक्य झाल्यास विडे बनवून, कापुर, जानवी जोड, काडेपेटी, पांढरी लोकर, वस्त्र धोतर, पंचा, शर्टपीस, शाल, पलंगपोस, चादर वगैरे भस्म, मध, तीन चार ताम्हने, तांबे ३, पळ्या ३, आसने, पाट, भांडी ३, गोपीचंदन, सुटे पैसे, पत्रावळी, केळीची पाने, द्रोण, अथवा पाट्या, शक्यतो स्टीलचे ताट वाटी वापरू नये.

श्राद्धाचे जेवण

वरण, भात, तांदळाची खीर, कढी-भजी टाकून, पुर्‍या, पाटवडी (डाळीच्या पिठाच्या वड्या), पाटवड्याची भाजी, उडदाच्या डाळीचे वडे, हरभरा डाळीचे वडे, भजी, घारगे (गूळ घालून केलेल्या पुर्‍या) अळुवडी

भाज्या - मेथी, कारले, गवार (अख्खी), भेंडी, लाल भोपळा.

कोशिंबीर - पेरू, केळी, डाळींब, सफरचंद, काकडी या फळांची

लिंबू, आल्याचा तुकडा (काही पदार्थ राहिले असल्यास सर्व 'आले' या अर्थी)

शक्यतो पदार्थात करताना कांदा, लसूण वापरू नये.

तारतम्याने भाज्यांच्या अभावी कडधान्ये चालतात.

N/A

References : N/A
Last Updated : February 08, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP