TransLiteral Foundation

गोष्ट बासष्ठावी

संस्कृत नीतिकथांमध्ये पंचतंत्र कथांचे प्रथम स्थान मानले जाते.

The fascinating stories told by Vishnu Sharma, called Panchatantra.


गोष्ट बासष्ठावी

गोष्ट बासष्ठावी

लोभ धरी अती, त्याच्या तोंडात पडे माती

एका गावात दारिद्र्याने पिडलेले चार ब्राह्मण तरुण एकमेकांचे मित्र होते. एकदा ते एकत्र आले असता, त्यांच्यापैकी एकजण म्हणाला, 'आपण दरिद्री असल्यामुळे आपले नातेवाईकसुद्धा आपल्याला काडीची किंमत देत नाहीत. मग इथे राहण्यात काय अर्थ ? म्हटलंच आहे ना ? -

वरं वनं व्याघ्रगजादिसेवितं जलेन हीनं बहुकण्टकावृतम् ।

तृणानि शय्या परिधानवल्कलं न बन्धुमध्ये धनहीनजीवितम् ॥

(वाघ व हत्ती यांचा बुजबुजाट असलेले, जलहीन व काट्याकुट्यांनी भरलेले असे अरण्य पत्करले व तिथे वल्कले नेसून गवताच्या बिछान्यावर पहुडलेले परवडले, पण दरिद्री अवस्थेत नातेवाईकांमध्ये राहणे नको.)

हे त्याचे म्हणणे पटल्यामुळे नशीब काढण्यासाठी त्यांनी आपला गाव सोडला व उज्जयिनीचा रस्ता धरला.

तिथे गेल्यावर क्षिप्रा नदीत स्नान करून व महांकालेश्वराचे दर्शन घेऊन ते भैरवानंद नावाच्या एका सिद्ध पुरुषाला भेटले व म्हणाले, 'महाराज, आम्हाला धनप्राप्तीचा मार्ग दाखवा.' ते ऐकून त्या चौघांपैकी प्रत्येकाला एकेक सिद्धीची दिव्य वात देऊन भैरवानंद म्हणाला, 'या वाती घेऊन तुम्ही हिमालयात जा व चालत राहा. पहिली वात जिथे पडेल तिथेच तुम्हाला पोटाचे साधन मिळेल. पण तेवढ्याने तुमचे समाधान नाहीच झाले, तर आणखी पुढे जा, व दुसरी वात पडेल तिथे तुम्हाल जे मिळेल ते घ्या.'

मग त्या दिव्य वाती घेऊन ते चौघे हिमालयातून जाऊ लागले असता, एकाच्या हातातली वात खाली पडली. त्याने तिथे जमीन खणून पाहिली असता, त्याला तिथे तांब्याची खाण आढळून आली. तो म्हणाला, 'हे तांबे विकून मी आयुष्यभर सुखात जगेन. आपण सर्वचजण इथे थांबून या खाणीतल्या तांब्यावर पोट भरू या.' बाकीचे तिघे नाक मुरडून म्हणाले, 'छे ! तांबे विकून काही आपण वैभवात राहू शकणार नाही. आम्ही पुढे जातो.'

याप्रमाणे बोलून उरलेले तिघे पुढे चालू लागले असता, दुसर्‍या तरुणाच्या हातातली वात खाली पडली. त्याला तिथे चांदीची खाण सापडली. तो तिथे थांबला. पण उरलेले दोघे म्हणाले, 'चांदी विकून विकून कितीसे पैसे मिळणार ? आम्ही पुढे जातो.' याप्रमाणे बोलून उरलेले दोघे थोडे पुढे जात असता तिसर्‍याच्या हातातली वात पडली. त्याला तिथे सोन्याची खाण सापडली. तो चौथ्या साथीदाराला म्हणाला, 'ही खाण आपल्याला दोघांनाही वैभवात ठेवील. मी तर इथेच थांबतो. पण तूही इथेच थांबलेले बरे.' पण चौथा लोभी तरुण म्हणाला, 'मी आणखी पुढे जातो. मला रत्‍नांची खाण मिळेल.'

याप्रमाणे बोलून चौथा तरुण पुढे चालत असता त्याच्याही हातातली वात खाली पडली. पण मोठ्या आनंदाने तो तिथली जमीन खोदणार, तोच एक चक्र घोंगावत आले व त्याच्या मस्तकाभोवती फिरू लागले. त्यामुळे नुसते बसून राहण्याखेरीज त्याला काहीच करता येईना. तेवढ्यात त्याचे लक्ष एका हाडकुळ्या माणसाकडे गेले. त्या दोघांची दृष्टादृष्ट होताच तो हाडकुळा माणूस म्हणाला, 'तू रत्‍नांच्या लोभाने इकडे आलास हे बरे झाले. कारण त्यामुळे गेली एक हजार वर्षे माझ्या मस्तकाभोवती फिरत असलेले चक्र मला सोडून आता तुझ्या पाठीशी लागले.'

'पण असे होण्याचे कारण काय?' असे त्या चौथ्या ब्राह्मण तरुणाने विचारले असता तो हडकुळा मनुष्य म्हणाला, 'मी पण उज्जयिनीच्या एका सिद्ध पुरुषाने दिलेली वात हाती घेऊन धनाच्या शोधार्थ हिमालयात आलो होतो. पण तांबे, रूपे व सोने यांच्या खाणींवर समाधान न मानता रत्‍नांच्या शोधार्थ इकडे आलो आणि हा मुलूख कुबेराचा असल्याने त्याने फेकलेल्या चक्रामुळे एका जागी जखडून पडलो. यापुढे जेव्हा तुझ्यामाझ्यासारखा लोभी मनुष्य रत्‍नांच्या शोधार्थ इकडे येईल, तेव्हा हे चक्र तुला सोडून त्याच्या मस्तकाभोवती फिरत राहील. तोपर्यंत माझ्याप्रमाणेच तुलाही तहानभुकेने व्याकूळ अशा स्थितीत जीतेजागते जीवन जगावे लागेल.' तो हाडकुळा मनुष्य असे बोलला आणि निघून गेला.

ज्याला सोन्याची खाणी सापडली होती, त्या 'सुवर्णसिद्धी' ने पुरेसे सोने घेऊन, रत्‍नांच्या शोधार्थ गेलेल्या व 'चक्रधर' बनलेल्या आपल्या मित्राच्या येण्याची बराच वेळ वाट पाहिली. अखेर तो त्याच्या शोधार्थ निघाला. जेव्हा मस्तकाभोवती चक्र फिरत असलेला 'चक्रधर' त्याला आढळला व त्याच्याकडून त्याला सर्व प्रकार कळला, तेव्हा तो त्याला म्हणाला, 'मित्रा, मी तुला सोन्याच्या खाणीतच समाधान मानायला सांगत असता, तू सारासार विचार न करता पुढे आलास, आणि मृत सिंहाला जिवंत करून स्वतःचा प्राणांत करून घेणार्‍या त्या चार अविचारी ब्राह्मणकुमारांप्रमाणे स्वतःचा घात करून घेतलास.' यावर 'तो कसा ?' असा प्रश्न चक्रधराने केला असता सुवर्णसिद्धी त्याला म्हणाला, 'ऐक-

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2010-10-15T14:56:29.9130000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

epitheloid

  • अधिस्तराभ 
RANDOM WORD

Did you know?

Wife disgracing, defaming her husband, what is the solution ?
Category : Hindu - Philosophy
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.