TransLiteral Foundation

दशक तिसरा - सगुणपरीक्षा

दशक तिसरा - सगुणपरीक्षा

दशक तिसरा - सगुणपरीक्षा

॥ श्रीरामसमर्थ ॥ ॥ श्रीमत् दासबोध ॥ ॥ स्वगुणपरीक्षानाम दशक तिसरा ॥ ॥ समास पहिला : जन्मदुःख निरूपण ॥ ॥ श्रीराम ॥ जन्म दुःखाचा अंकुर । जन्म शोकाचा सागर । जन्म भयाचा डोंगर । चळेना ऐसा ॥ १॥ जन्म कर्माची आटणी । जन्म पातकाची खाणी । जन्म काळाची जाचणी । निच नवी ॥ २॥ जन्म कुविद्येचें फळ । जन्म लोभाचें कमळ । जन्म भ्रांतीचें पडळ । ज्ञानहीन ॥ ३॥ जन्म जिवासी बंधन । जन्म मृत्यासी कारण । जन्म हेंचि अकारण । गथागोवी ॥ ४॥ जन्म सुखाचा विसर । जन्म चिंतेचा आगर । जन्म वासनाविस्तार । विस्तारला ॥ ५॥ जन्म जीवाची आवदसा । जन्म कल्पनेचा ठसा । जन्म लांवेचा वळसा । ममतारूप ॥ ६॥ जन्म मायेचे मैंदावें । जन्म क्रोधाचें विरावें । जन्म मोक्षास आडवें । विघ्न आहे ॥ ७॥ जन्म जिवाचें मीपण । जन्म अहंतेचा गुण । जन्म हेंचि विस्मरण । ईश्वराचें ॥ ८॥ जन्म विषयांची आवडी । जन्म दुराशेची बेडी । जन्म काळाची कांकडी । भक्षिताहे ॥ ९॥ जन्म हाचि विषमकाळ । जन्म हेंचि वोखटी वेळ । जन्म हा अति कुश्चीळ । नर्कपतन ॥ १०॥ पाहातां शरीराचें मूळ । या ऐसें नाहीं अमंगळ । रजस्वलेचा जो विटाळ । त्यामध्यें जन्म यासी ॥ ११॥ अत्यंत दोष ज्या विटाळा । त्या विटाळाचाचि पुतळा । तेथें निर्मळपणाचा सोहळा । केवी घडे ॥ १२॥ रजस्वलेचा जो विटाळ । त्याचा आळोन जाला गाळ । त्या गळाचेंच केवळ । शरीर हें ॥ १३॥ वरी वरी दिसे वैभवाचें । अंतरीं पोतडें नर्काचें । जैसें झांकणें चर्मकुंडाचें । उघडितांच नये ॥ १४॥ कुंड धुतां शुद्ध होतें । यास प्रत्यईं धुईजेतें । तरी दुर्गंधी देहातें । शुद्धता न ये ॥ १५॥ अस्तीपंजर उभविला । सीरानाडीं गुंडाळिला । मेदमांसें सरसाविला । सांदोसाअंदीं भरूनी ॥ १६॥ अशुद्ध शब्दें शुद्ध नाहीं । तेंहि भरलें असे देहीं । नाना व्याधी दुःखें तेंहि । अभ्यांतरी वसती ॥ १७॥ नर्काचें कोठार भरलें । आंतबाहेरी लिडीबिडिलें । मूत्रपोतडें जमलें । दुर्गंधीचें ॥ १८॥ जंत किडे आणी आंतडी । नाना दुर्गंधीची पोतडी । अमुप लवथविती कातडी । कांटाळवाणी ॥ १९॥ सर्वांगास सिर प्रमाण । तेथें बळसें वाहे घ्राण । उठे घाणी फुटतां श्रवण । ते दुर्गंधी नेघवे ॥ २०॥ डोळां निघती चिपडें । नाकीं दाटतीं मेकडें । प्रातःकाळीं घाणी पडे । मुखीं मळासारिखी ॥२१॥ लाळ थुंका आणी मळ । पीत श्लेष्मा प्रबळ । तयास म्हणती मुखकमळ । चंद्रासारिखें ॥ २२॥ मुख ऐसें कुश्चीळ दिसे । पोटीं विष्ठा भरली असे । प्रत्यक्षास प्रमाण नसे । भूमंडळीं ॥ २३॥ पोटीं घालितां दिव्यान्न । कांहीं विष्ठा कांहीं वमन । भागीरथीचें घेतां जीवन । त्याची कोये लघुशंका ॥ २४॥ एवं मळ मूत्र आणी वमन । हेंचि देहाचें जीवन । येणेंचि देह वाढे जाण । यदर्थीं संशय नाहीं ॥ २५॥ पोटीं नस्तां मळ मूत्र वोक । मरोन जाती सकळ लोक । जाला राव अथवा रंक । पोटीं विष्ठा चुकेना ॥ २६॥ निर्मळपणें काढूं जातां । तरी देह पडेल तत्वतां । एवं देहाची वेवस्था । ऐसी असे ॥ २७॥ ऐसा हा धड असतां । येथाभूत पाहों जातां । मग ते दुर्दशा सांगतां । शंका बाधी ॥ २८॥ ऐसिये कारागृहीं वस्ती । नवमास बहु विपत्ती । नवहि द्वारें निरोधती । वायो कैंचा तेथें ॥ २९॥ वोका नरकाचे रस झिरपती । ते जठराग्नीस्तव तापती । तेणें सर्वहि उकडती । अस्तिमांस ॥ ३०॥ त्वचेविण गर्भ खोळे । तंव मातेसी होती डोहळे । कटवतिक्षणें सर्वांग पोळे । तया बाळकाचें ॥ ३१॥ बांधलें चर्माचें मोटाळें । तेथें विष्ठेचें पेटाळें । रसौपाय वंकनाळें । होत असे ॥ ३२॥ विष्ठा मूत्र वांती पीत । नाकीं तोंडीं निघती जंत । तेणें निर्बुजलें चित्त । आतिशयेंसीं ॥ ३३॥ ऐसिये कारागृहीं प्राणी । पडिला अत्यंत दाटणीं । कळवळोन म्हणे चक्रपाणी । सोडवीं येथून आतां ॥ ३४॥ देवा सोडविसी येथून । तरी मी स्वहित करीन । गर्भवास हा चुकवीन । पुन्हां न ये येथें ॥ ३५॥ ऐसी दुखवोन प्रतिज्ञा केली । तंव जन्मवेळ पुढें आली । माता आक्रंदों लागली । प्रसूतकाळीं ॥ ३६॥ नाकीं तोंडीं बैसलें मांस । मस्तकद्वारें सांडी स्वास । तेंहि बुजलें निशेष । जन्मकाळीं ॥ ३७॥ मस्तकद्वार तें बुजलें । तेणें चित्त निर्बुजलें । प्राणी तळमळूं लागलें । चहूंकडे ॥ ३८॥ स्वास उस्वास कोंडला । तेणें प्राणी जाजावला । मार्ग दिसेनासा जाला । कासावीस ॥ ३९॥ चित्त बहु निर्बुजलें । तेणें आडभरीं भरलें । लोक म्हणती आडवें आलें । खांडून काढा ॥ ४०॥ मग ते खांडून काढिती । हस्तपाद छेदून घेती । हातां पडिलें तेंचि कापिती । मुख नासिक उदर ॥ ४१॥ ऐसे टवके तोडिले । बाळकें प्राण सोडिले । मातेनेंहि सांडिलें । कळिवर ॥ ४२॥ मृत्य पावला आपण । मतेचा घेतला प्राण । दुःख भोगिलें दारुण । गर्भवासीं ॥ ४३॥ तथापी सुकृतेंकरूनी । मार्ग सांपडला योनी । तऱ्हीं आडकला जाउनी । कंठस्कंदीं मागुता ॥ ४४॥ तये संकोचित पंथीं । बळेंचि वोढून काढिती । तेणें गुणें प्राण जाती । बाळकाचे ॥ ४५॥ बाळकाचे जातां प्राण । अंतीं होये विस्मरण । तेणें पूर्वील स्मरण । विसरोन गेला ॥ ४६॥ गर्भीं म्हणे सोहं सोहं । बाहेरी पडतां म्हणे कोहं । ऐसा कष्टी जाला बहु । गर्भवासीं ॥ ४७॥ दुःखा वरपडा होता जाला । थोरा कष्टीं बाहेरी आला । सवेंच कष्ट विसरला । गर्भवासाचे ॥ ४८॥ सुंन्याकार जाली वृत्ती । कांहीं आठवेना चित्तीं । अज्ञानें पडिली भ्रांती । तेणें सुखचि मानिलें ॥ ४९॥ देह विकार पावलें । सुखदुःखें झळंबळे । असो ऐसें गुंडाळलें । मायाजाळीं ॥ ५०॥ ऐसें दुःख गर्भवासीं । होतें प्राणीमात्रांसीं । म्हणोनियां भगवंतासी । शरण जावें ॥ ५१॥ जो भगवंताचा भक्त । तो जन्मापासून मुक्त । ज्ञानबळें बिरक्त । सर्वकाळ ॥ ५२॥ ऐशा गर्भवासीं विपत्ती । निरोपिल्या येथामती । सावध होऊन श्रोतीं । पुढें अवधान द्यावें ॥ ५३॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे जन्मदुःखनिरूपणनाम समास पहिला ॥ १॥


समास दुसरा : स्वगुणपरीक्षा (अ) ॥ श्रीराम् ॥ संसार हाचि दुःखमूळ । लागती दुःखाचे इंगळ । मागां बोलिली तळमळ । गर्भवासाची ॥ १॥ गर्भवासीं दुःख जालें । तें बाळक विसरलें । पुढें वाढों लागलें । दिवसेंदिवस ॥ २॥ बाळपणीं त्वचा कोंवळी । दुःख होतांचि तळमळी । वाचा नाहीं तये काळीं । सुखदुःख सांगावया ॥ ३॥ देहास कांहीं दुःख जालें । अथवा क्षुधेनें पीडलें । तरी तें परम आक्रंदलें । परी अंतर नेणवे ॥ ४॥ माता कुरवाळी वरी । परी जे पीडा जाली अंतरीं । ते मायेसी न कळे अभ्यांतरीं । दुःख होये बाळकासीं ॥ ५॥ मागुतें मागुतें फुंजे रडे । माता बुझावी घेऊन कडे । वेथा नेणती बापुडें । तळमळी जीवीं ॥ ६॥ नानाव्याधीचे उमाळे । तेणें दुःखें आंदोळे । रडे पडे कां पोळे । अग्निसंगें ॥ ७॥ शरीर रक्षितां नये । घडती नाना अपाये । खोडी अधांतरीं होये । आवेवहीन बाळक ॥ ८॥ अथवा अपाय चुकले । पूर्णपुण्य पुढें ठाकलें । मातेस ओळखों लागलें । दिवसेंदिवस ॥ ९॥ क्षणभरी मातेस न देखे । तरी आक्रंदें रुदन करी दुःखें । ते समईं मातेसारिखें । आणीक कांहिंच नाहीं ॥ १०॥ आस करून वास पाहे । मातेविण कदा न राहे । वियोग पळमात्र न साहे । स्मरण जालियां नंतरें ॥ ११॥ जरी ब्रह्मादिक देव आले । अथवा लक्ष्मीने अवलोकिलें । तरी न वचे बुझाविलें । आपले मातेवांचुनी ॥ १२॥ कुरूप अथवा कुलक्षण । सकळांहूनि करंटेपण । तरी नाहीं तीसमान । भूमंडळीं कोणी ॥ १३॥ ऐसें तें केविलवाणें । मातेविण दिसे उणें । रागें परतें केलें तिनें । तरी आक्रंदोनी मिठी घाली ॥ १४॥ सुख पावे मातेजवळी । दुरी करितांचि तळमळी । अतिप्रीति तयेकाळीं । मातेवरी लागली ॥ १५॥ तंव ते मातेस मरण आलें । प्राणी पोरटें जालें । दुःखें झुर्णीं लागलें । आई आई म्हणोनी ॥ १६॥ आई पाहातां दिसेना । दीनरूप पाहे जना । आस लागलिसे मना । आई येईल म्हणोनी ॥ १७॥ माता म्हणौन मुख पाहे । तंव ते आपुली माता नव्हे । मग हिंवासलें राहे । दैन्यवाणें ॥ १८॥ मातावियोगें कष्टलें । तेणें मानसीं दुःख जालें । देहहि क्षीणत्व पावलें । आतिशयेंसीं ॥ १९॥ अथवा माताहि वांचली । मायलेंकुरा भेटी जाली । बाळदशा ते राहिली । देवसेंदिवस ॥ २०॥ बाळपण जालें उणें । दिवसेंदिवस होये शाहाणें । मग ते मायेचें अत्यंत पेरूणें । होतें, तें राहिलें ॥ २१॥ पुढें लो लागला खेळाचा । कळप मेळविला पोरांचा । आल्यगेल्या डायाचा । आनंद शोक वाहे ॥ २२॥ मायेबापें सिकविती पोटें । तयाचें परम दुःख वाटे । चट लागली न सुटे । संगती लेंकुरांची ॥ २३॥ लेंकुराअंमध्यें खेळतां । नाठवे माता पिता । तंव तेंथेहि अवचिताअ । दुःख पावला ॥ २४॥ पडिले दांत फुटला डोळा । मोडले पाय जाला खुळा । गेला माज अवकळा- । ठाकून आली ॥ २५॥ निघाल्या देवी आणी गोवर । उठलें कपाळ लागला ज्वर । पोटसुळीं निरंतर । वायगोळा ॥ २६॥ लागलीं भूतें जाली झडपणी । जळीच्या मेसको मायेराणी । मुंज्या झोटिंग करणी । म्हैसोबाची ॥ २७॥ वेताळ खंकाळ लागला । ब्रह्मगिऱ्हो संचरला । नेणों चेडा वोलांडिला । कांहीं कळेना ॥ २८॥ येक म्हणती बीरे देव । येक म्हणती खंडेराव । येक म्हणती सकळ वाव । हा ब्राह्मणसमंध ॥ २९॥ येक म्हणती कोणें केलें । आंगीं देवत घातले । येक म्हणती चुकलें । सटवाईचें ॥ ३०॥ येक म्हणती कर्मभोग । आंगीं जडले नाना रोग । वैद्य पंचाक्षरी चांग । बोलाऊन आणिले ॥ ३१॥ येक म्हणती हा वांचेना । येक म्हणती हा मरेना । भोग भोगितो यातना । पापास्तव ॥ ३२॥ गर्भदुःख विसरला । तो त्रिविधतापें पोळला । प्राणी बहुत कष्टी जाला । संसारदुःखें ॥ ३३॥ इतुकेंहि चुकोन वांचला । तरी मारमारूं शाहाणा केला । लोकिकीं नेटका जाला । नांव राखे ऐसा ॥ ३४॥ पुढें मायबापीं लोभास्तव । संभ्रमें मांडिला विव्हाव । दाऊनियां सकळ वैभव । नोवरी पाहिली ॥ ३५॥ वऱ्हाडीवैभव दाटलें । देखोन परमसुख वाटले । मन हें रंगोन गेलें । सासुरवाडीकडे ॥ ३६॥ मायबापीं भलतैसें असावें । परी सासुरवाडीस नेटकें जावें । द्रव्य नसेल तरी घ्यावें । रुण कळांतरें ॥ ३७॥ आंतर्भाव ते सासुरवाडीं । मायेबापें राहिलीं बापुडीं । होताती सर्वस्वें कुडकुडीं । तितुकेंच कार्य त्यांचें ॥ ३८॥ नोवरी आलियां घरा । अती हव्यास वाटे वरा । म्हणे मजसारिखा दुसरा । कोणीच नाहीं ॥ ३९॥ मायबाप बंधु बहिणी । नोवरी न दिसतां वाटे काणी । अत्यंत लोधला पापिणीं । अविद्येनें भुलविला ॥ ४०॥ संभोग नस्तां इतुका प्रेमा । योग्य जालिया उलंघी सीमा । प्रीती वाढविती कामा- । करितां प्राणी गुंतला ॥ ४१॥ जरी न देखे क्षण येक डोळां । तरी जीव होय उताविळा । प्रीतीपात्र अंतर्कळा । घेऊन गेली ॥ ४२॥ कोवळे कोवळे शब्द मंजुळ । मर्यादा लज्या मुखकमळ । वक्त्रलोकनें केवळ । ग्रामज्याचे मैंदावें ॥ ४३॥ कळवळा येतां सांवरेना । शरीर विकळ आवरेना । अनेत्र वेवसाईं क्रमेना । हुरहुर वाटे ॥ ४४॥ वेवसाय करितां बाहेरी । मन लागलेंसे घरीं । क्षणाक्षणां अभ्यांतरीं । स्मरण होये कामिनीचें ॥ ४५॥ तुम्हीं माझिया जिवांतील जीव । म्हणौनी अत्यंत लाघव । दाऊनियां चित्त सर्व । हिरोन घेतलें ॥ ४६॥ मैद सोइरीक काढिती । फांसे घालून प्राण घेती । तैसें आयुष्य गेलियां अंतीं । प्राणीयांस होये ॥ ४७॥ प्रीति कामिनीसीं लागली । जरी तयेसी कोणी रागेजली । तरी परम क्षिती वाटली । मानसीं गुप्तरूपें ॥ ४८॥ तये भार्येचेनि कैवारें । मायेबापासीं नीच उत्तरें । बोलोनियां तिरस्कारें । वेगळा निघे । ४९॥ स्त्रीकारणें लाज सांडिली । स्त्रीकारणें सखीं सोडिलीं । स्त्रीकारणें विघडिलीं । सकळहि जिवलगें ॥ ५०॥ स्त्रीकारणें देह विकिला । स्त्रीकारणें सेवक जाला । स्त्रीकारणें सांडविला । विवेकासी ॥ ५१॥ स्त्रीकारणें लोलंगता । स्त्रीकारणें अतिनम्रता । स्त्रीकारणें पराधेनता । अंगिकारिली ॥ ५२॥ स्त्रीकारणें लोभी जाला । स्त्रीकारणें धर्म सांडिला । स्त्रीकारणें अंतरला । तीर्थयात्रा स्वधर्म ॥ ५३॥ स्त्रीकारणें सर्वथा कांहीं । शुभाशुभ विचारिलें नाहीं । तनु मनु धनु सर्वही । अनन्यभावें अर्पिलें ॥ ५४॥ स्त्रीकारणें परमार्थ बुडविला । प्राणी स्वहितास नाडला । ईश्वरीं कानकोंडा जाला । स्त्रीकारणें कामबुद्धी ॥ ५५॥ स्त्रीकारणें सोडिली भक्ती । स्त्रीकारणें सोडिली विरक्ती । स्त्रीकारणें सायोज्यमुक्ती । तेहि तुछ्य मानिली ॥ ५६॥ येके स्त्रियेचेनि गुणें । ब्रह्मांड मानिलें ठेंगणें । जिवलगें तीं पिसुणें । ऐसीं वाटलीं ॥ ५७॥ ऐसी अंतरप्रीति जडली । सार्वस्वाची सांडी केली । तंव ते मरोन गेली । अकस्मात ॥ ५८॥ तेणें मनीं शोक वाढला । म्हणे थोर घात जाला । आतां कैंचा बुडाला । संसार माझा ॥ ५९॥ जिवलगांचा सोडिला संग । अवचिता जाला घरभंग । आतां करूं मायात्याग । म्हणे दुःखें ॥ ६०॥ स्त्री घेऊन आडवी । ऊर बडवी पोट बडवी । लाज सांडून गौरवी । लोकां देखतां ॥ ६१॥ म्हणे माझें बुडालें घर । आतां न करी हा संसार । दुःखें आक्रंदला थोर । घोर घोषें ॥ ६२॥ तेणें जीव वारयावेघला । सर्वस्वाचा उबग आला । तेणें दुःखें जाला । जोगी कां महात्मा ॥ ६३॥ कां तें निघोन जाणें चुकलें । पुन्हां मागुतें लग्न केलें । तेणें अत्यंतचि मग्न जालें । मन द्वितीय संमंधीं ॥ ६४॥ जाला द्वितीय संमंध । सवेंचि मांडिला आनंद । श्रोतीं व्हावें सावध । पुढिले समासीं ॥ ६५॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे स्वगुणपरीक्षानाम समास दुसरा ॥ २॥

समास तिसरा : स्वगुणपरीक्षा (ब) ॥ श्रीराम् ॥ द्वितीय संमंध जाला । दुःख मागील विसरला । सुख मानून राहिला । संसाराचें ॥ १॥ जाला अत्यंत कृपण । पोटें न खाय अन्न । रुक्याकारणें सांडी प्राण । येकसरा ॥ २॥ कदा कल्पांतीं न वेची । सांचिलेंचि पुन्हा सांची । अंतरीं असेल कैंची । सद्वासना ॥ ३॥ स्वयें धर्म न करी । धर्मकर्त्यासहि वारी । सर्वकाळ निंदा करी । साधुजनाची ॥ ४॥ नेणे तीर्थ नेणे व्रत । नेणे अतित अभ्यागत । मुंगीमुखींचें जें सीत । तेंही वेंचून सांची ॥ ५॥ स्वयें पुण्य करवेना । केलें तरी देखवेना । उपहास्य करी मना- । नये म्हणौनी ॥ ६॥ देवां भक्तांस उछेदी । आंगबळें सकळांस खेदी । निष्ठुर शब्दें अंतर भेदी । प्राणीमात्रांचें ॥ ७॥ नीति सांडून मागें । अनीतीनें वर्तों लागे । गर्व धरून फुगे । सर्वकाळ ॥ ८॥ पूर्वजांस सिंतरिलें । पक्षश्राद्धहि नाहीं केलें । कुळदैवत ठकिलें । कोणेपरी ॥ ९॥ आक्षत भरिली भाणा । दुजा ब्राह्मण मेहुणा । आला होता पाहुणा । स्त्रियेस मूळ ॥ १०॥ कदा नावडे हरिकथा । देव नलगे सर्वथा । स्नानसंध्या म्हणे वृथा । कासया करावी ॥ ११॥ अभिळाषें सांची वित्त । स्वयें करी विस्वासघात । मदें मातला उन्मत्त । तारुण्यपणें ॥ १२॥ तारुण्य आंगीं भरलें । धारिष्ट न वचे धरिलें । करूं नयें तेंचि केलें । माहापाप ॥ १३॥ स्त्री केली परी धाकुटी । धीर न धरवेचि पोटीं । विषयलोभें सेवटीं । वोळखी सांडिली ॥ १४॥ माये बहिण न विचारी । जाला पापी परद्वारी । दंड पावला राजद्वारीं । तऱ्हीं पालटेना ॥ १५॥ परस्त्री देखोनि दृष्टीं । अभिळाष उठे पोटीं । अकर्तव्यें हिंपुटी । पुन्हां होये ॥ १६॥ ऐसें पाप उदंड केलें । शुभाशुभ नाहीं उरलें । तेणें दोषें दुःख भरलें । अकस्मात आंगीं ॥ १७॥ व्याधी भरली सर्वांगीं । प्राणी जाला क्षयरोगी । केले दोष आपुले भोगी । सीघ्र काळें ॥ १८॥ दुःखें सर्वांग फुटलें । नासिक अवघेंचि बैसलें । लक्षण जाऊन जालें । कुलक्षण ॥ १९॥ देहास क्षीणता आली । नाना वेथा उद्भवली । तारुण्यशक्ती राहिली । खंगला प्राणी ॥ २०॥ सर्वांगीं लागल्या कळा । देहास आली अवकळा । प्राणी कांपे चळचळां । शक्ति नाहीं ॥ २१॥ हस्तपादादिक झडले । सर्वांगीं किडे पडिले । देखोन थुंकों लागले । लाहानथोर ॥ २२॥ जाली विष्टेची सारणी । भोवती उठली वर्ढाणी । अत्यंत खंगला प्राणी । जीव न वचे ॥ २३॥ आतां मरण दे गा देवा । बहुत कष्ट जाले जीवा । जाला नाहीं नेणों ठेवा । पातकाचा ॥ २४॥ दुःखें घळघळां रडे । जों जों पाहे आंगाकडे । तों तों दैन्यवाणें बापुडें । तळमळी जीवीं ॥ २५॥ ऐसे कष्ट जाले बहुत । सकळ जालें वाताहात । दरवडा घालून वित्त । चोरटीं नेलें ॥ २६॥ जालें आरत्र ना परत्र । प्रारब्ध ठाकलें विचित्र । आपला आपण मळमूत्र । सेविला दुःखें ॥ २७॥ पापसामग्री सरली । देवसेंदिवस वेथा हरली । वैद्यें औषधें दिधलीं । उपचार जाला ॥ २८॥ मरत मरत वांचला । यास पुन्हां जन्म जाला । लोक म्हणती पडिला । माणसांमध्यें ॥ २९॥ येरें स्त्री आणिली । बरवी घरवात मांडिली । अति स्वार्थबुद्धी धरिली । पुन्हां मागुती ॥ ३०॥ कांहीं वैभव मेळविलें । पुन्हां सर्वही संचिलें । परंतु गृह बुडालें । संतान नाहीं ॥ ३१॥ पुत्र संताअन नस्तां दुःखी । वांज नांव पडिलें लोकिकीं । तें न फिटे म्हणोनी लेंकी । तरी हो आतां ॥ ३२॥ म्हणोन नाना सायास । बहुत देवास केले नवस । तीर्थें व्रतें उपवास । धरणें पारणें मांडिलें ॥ ३३॥ विषयसुख तें राहिले । वांजपणें दुःखी केलें । तंव तें कुळदैवत पावलें । जाली वृद्धी ॥ ३४॥ त्या लेंकुरावरी अतिप्रीति । दोघेहि क्षण येक न विशंभती । कांहीं जाल्या आक्रंदती । दीर्घस्वरें ॥ ३५॥ ऐसी ते दुःखिस्ते । पूजीत होती नाना दैवतें । तंव तेंहि मेलें अवचितें । पूर्व पापेंकरूनी ॥ ३६॥ तेणें बहुत दुःख जालें । घरीं आरंधें पडिलें । म्हणती आम्हांस कां ठीविलें । देवें वांज करूनी ॥ ३७॥ आम्हांस द्रव्य काये करावें । तें जावें परी अपत्य व्हावें । अपत्यालागी त्यजावें । लागेल सर्व ॥ ३८॥ वांजपण संदिसें गेलें । तों मरतवांज नांव पडिलें । तें न फिटे कांहीं केलें । तेणें दुःखें आक्रंदती ॥ ३९॥ आमुची वेली कां खुंटिली । हा हा देवा वृत्ती बुडाली । कुळस्वामीण कां क्षोभली । विझाला कुळदीप ॥ ४०॥ आतां लेंकुराचें मुख देखेन । तरी आनंदें राडी चालेन । आणी गळही टोंचीन । कुळस्वामिणीपासीं ॥ ४१॥ आई भुता करीन तुझा । नांव ठेवीन केरपुंजा । वेसणी घालीन, माझा- । मनोरथ पुरवी । ४२॥ बहुत देवांस नवस केले । बहुत गोसावी धुंडिले । गटगटां गिळिले । सगळे विंचू ॥ ४३॥ केले समंधास सायास । राहाणे घातलें बहुवस । केळें नारिकेळें ब्राह्मणास । अंब्रदानें दिधलीं ॥ ४४॥ केलीं नाना कवटालें । पुत्रलोभें केलीं ढालें । तरी अदृष्ट फिरलें । पुत्र नाहीं ॥ ४५ वृक्षाअखालें जाऊन नाहाती । फळतीं झाडें करपती । ऐसे नाना दोष करिती । पुत्रलोभाकारणें ॥ ४६॥ सोडून सकळ वैभव । त्यांचा वारयावेधला जीव । तंव तो पावला खंडेराव । आणी कुळस्वामिणी ॥ ४७॥ आतां मनोरथ पुरती । स्त्रीपुरुषें आनंदती । सावध होऊन श्रोतीं । पुढें अवधान द्यावें ॥ ४८॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे स्वगुणपरीक्षानाम समास तिसरा ॥ ३॥


समास चवथा : स्वगुणपरीक्षा (क) ॥ श्रीराम् ॥ लेंकुरें उदंड जालीं । तों ते लक्ष्मी निघोन गेली । बापडीं भिकेसी लागलीं । कांहीं खाया मिळेना ॥ १॥ लेंकुरें खेळती धाकुटीं । येकें रांगती येकें पोटीं । ऐसी घरभरी जाली दाटी । कन्या आणी पुत्रांची ॥ २॥ देवसेंदिवसा खर्च वाढला । यावा होता तो खुंटोन गेला । कन्या उपवरी जाल्या, त्यांला- । उजवावया द्रव्य नाहीं ॥ ३॥ मायेबापें होतीं संपन्न । त्यांचें उदंड होतें धन । तेणें करितां प्रतिष्ठा मान । जनीं जाला होता ॥ ४॥ भरम आहे लोकाचारीं । पहिली नांदणूक नाहीं घरीं ।

देवसेंदिवस अभ्यांतरीं । दरिद्र आलें ॥ ५॥ ऐसी घरवात वाढली । खातीं तोंडें मिळालीं । तेणें प्राणीयांस लागली । काळजी उद्वेगाची ॥ ६॥ कन्या उपवरी जाल्या । पुत्रास नोवर्या आल्या । आतां उजवणा केल्या । पहिजेत कीं ॥ ७॥ जरी मुलें तैसींच राहिलीं । तरी पुन्हां लोकलाज जाली । म्हणती कासया व्यालीं । जन्मदारिद्र्‌यें ॥ ८॥ ऐसी लोकलाज होईल । वडिलांचें नांव जाईल । आतां रुण कोण देईल । लग्नापुरतें ॥ ९॥ मागें रुण ज्याचें घेतलें । त्याचें परतोन नाहीं दिल्हें । ऐसें आभाळ कोंसळलें । उद्वेगाचें ॥ १०॥ आपण खातों अन्नासी । अन्न खातें आपणासीं । सर्वकाळ मानसीं । चिंतातुर ॥ ११॥ पती अवघीच मोडली । वस्तभाव गाहाण पडिली । अहा देवा वेळ आली । आतां डिवाळ्याची ॥ १२॥ कांहीं केला ताडामोडा । विकिला घरींचा पाडारेडा । कांहीं पैका रोकडा । कळांतरें काढिला ॥ १३॥ ऐसें रुण घेतलें । लोकिकीं दंभ केलें । सकळ म्हणती नांव राखिलें । वडिलांचें ॥ १४॥ ऐसें रुण उदंड जालें । रिणाइतीं वेढून घेतलें । मग प्रयाण आरंभिलें । विदेशाप्रती ॥ १५॥ दोनी वरुषें बुडी मारिली । नीच सेवा अंगीकारिली । शरीरें आपदा भोगिली । आतिशयेंसीं ॥ १६॥ कांहीं मेळविलें विदेशीं । जीव लागला मनुष्यांपासीं । मग पुसोनियां स्वामीसी । मुरडता जाला ॥ १७॥ तंव तें अत्यंत पीडावलीं । वाट पाहात बैसलीं । म्हणती दिवसगती कां लागली । काये कारणें देवा ॥ १८॥ आतां आम्ही काये खावें । किती उपवासीं मरावें । ऐसियाचे संगतीस देवें । कां पां घातलें आम्हांसी ॥ १९॥ ऐसें आपुलें सुख पाहाती । परी त्याचें दुःख नेणती । आणी शक्ती गेलियां अंतीं । कोणीच कामा न येती ॥ २०॥ असो ऐसी वाट पाहतां । दृष्टीं देखिला अवचिता । मुलें धावती, ताता । भागलास म्हणौनी ॥ २१॥ स्त्री देखोन आनंदली । म्हणे आमुची दैन्यें फिटली । तंव येरें दिधली । गांठोडी हातीं ॥ २२॥ सकळांस आनंद जाला । म्हणती आमुचा वडील आला । तेणें तरी आम्हांला । आंग्या टोप्या आणिल्या ॥ २३॥ ऐसा आनंद च्यारी देवस । सवेंच मांडिली कुसमुस । म्हणती हें गेलियां आम्हांस । पुन्हां आपदा लागती ॥ २४॥ म्हणौनी आणिलें तें असावें । येणें मागुतें विदेशास जावें । आम्ही हें खाऊं न तों यावें । द्रव्य मेळऊन ॥ २५॥ ऐसी वासना सकळांची । अवघीं सोईरीं सुखाचीं । स्त्री अत्यंत प्रीतीची । तेहि सुखाच लागली ॥ २६॥ विदेसीं बहु दगदला । विश्रांती घ्यावया आला । स्वासहि नाहीं टाकिला । तों जाणें वोढवलें ॥ २७॥ पुढें अपेक्षा जोसियांची । केली विवंचना मुहूर्ताची । वृत्ति गुंतली तयाची । जातां प्रशस्त न वटे ॥ २८॥ माया मात्रा सिद्ध केली । कांहीं सामग्री बांधली । लेंकुरें दृष्टीस पाहिलीं । मार्गस्त जाला ॥ २९॥ स्त्रियेस अवलोकिलें । वियोगें दुःख बहुत वाटलें । प्रारब्धसूत्र तुकलें । रुणानबंधाचें ॥ ३०॥ कंठ सद्गदित जाला । न संवरेच गहिवरला । लेंकुरा आणी पित्याला । तडातोडी जाली ॥ ३१॥ जरी रुणानुबंध असेल । तरी मागुती भेटी होईल । नाहीं तरी संगती पुरेल । येचि भेटीनें तुमची ॥ ३२॥ ऐसीं बोलोन स्वार होये । मागुता फीरफिरों पाहे । वियोगदुःख न साहे । परंतु कांहीं न चले ॥ ३३॥ आपुला गांव राहिला मागें । चित्त भ्रमलें संसारौद्वेगें । दुःखवला प्रपंचसंगें । अभिमानास्तव ॥ ३४॥ ते समईं माता आठवली । म्हणे म्हणे धन्य ते माउली । मजकारणें बहुत कष्टली । परी मी नेणेंचि मूर्ख ॥ ३५॥ आजी जरी ते असती । तरी मजला कदा न विशंभती । वियोग होतां आक्रंदती । ते पोटागि वेगळीच ॥ ३६॥ पुत्र वैभवहीन भिकारी । माता तैसाचि अंगिकारी । दगदला देखोन अंतरीं । त्याच्या दुःखें दुःखवे ॥ ३७॥ प्रपंच विचारें पाहातां । हें सकळ जोडे न जोडे माता । हें शरीर जये करितां । निर्माण जालें ॥ ३८॥ लांव तरी ते माया । काय कराविया सहश्र जाया । परी भुलोन गेलों वायां । मकरध्वजाचेनी ॥ ३९॥ या येका कामाकारणें । जिवलगांसिं द्वंद घेणें । सखीं तींच पिसुणें । ऐसीं वाटतीं ॥ ४०॥ म्हणौन धन्य धन्य ते प्रपंची जन । जे मायेबापाचें भजन । करिती न करिती, मन- । निष्ठुर जिवलगांसीं ॥ ४१॥ संगती स्त्रीबाळकाची । आहे साठी जन्माची । परी मायेबापीं कैंचीं । मिळतील पुढें ॥ ४२॥ ऐसें पूर्वीं होतें ऐकिलें । परी ते समईं नाहीं कळलें । मन हें बुडोन गेलें । रतिसुखाचा डोहीं ॥ ४३॥ हे सखीं वाटती परी पिसुणें । मिळाली वैभवाकारणें । रितें जातां लाजिरवाणें । अत्यंत वाटे ॥ ४४॥ आता भलतैसें करावें । परि द्रव्य मेळऊन न्यावें । रितें जातां स्वभावें । दुःख आहे ॥ ४५॥ ऐसी वेवर्धना करी । दुःख वाटलें अंतरीं । चिंतेचिये माहापुरीं । बुडोन गेला ॥ ४६॥ ऐसा हा देह आपुला । असतांच पराधेन केला । ईश्वरीं कानकोंडा जाला । कुटुंबकाबाडी ॥ ४७॥ या येका कामासाठीं । जन्म गेला आटाटी । वय वेचल्यां सेवटीं । येकलेंचि जावें ॥ ४८॥ ऐसा मनीं प्रस्तावला । क्षण येक उदास जाला । सवेंचि प्राणी झळंबला । मायाजाळें ॥ ४९॥ कन्यापुत्रीं आठवलीं । मनींहुनि क्षिती वाटली । म्हणे लेंकुरें अंतरलीं । माझीं मज ॥ ५०॥ मागील दुःख आठवलें । जें जें होतें प्राप्त जालें । मग रुदन आरंभिलें । दीर्घ स्वरें ॥ ५१॥ आरुण्यरुदन करितां । कोणी नाहीं बुझाविता । मग होये विचारिता । आअपुले मनीं ॥ ५२॥ आतां कासया रडावें । प्राप्त होतें तें भोगावें । ऐसे बोलोनिया जीवें । धारिष्ट केलें ॥ ५३॥ ऐसा दुःखें दगदला । मग विदेशाप्रती गेला । पुढे प्रसंग वर्तला । तो सावध ऐका ॥ ५४॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे स्वगुणपरीक्षानाम समास चवथा ॥ ४॥


समास पाचवा : स्वगुणपरीक्षा ( ड ) ॥ श्रीराम् ॥ पुढें गेला विदेशासी । प्राणी लागला व्यासंगासी । आपल्या जिवेसीं सोसी । नाना श्रम ॥ १॥ ऐसा दुस्तर संसार । करितां कष्टला थोर । पुढें दोनी च्यारी संवत्सर । द्रव्य मेळविलें ॥ २॥ सवेंचि आला देशासी । तों आवर्षण पडिलें देसीं । तेणें गुणें मनुष्यांसी । बहुत कष्ट जाले ॥ ३॥ येकांच्या बैसल्या अमृतकळा । येकांस चंद्री लागली डोळां । येकें कांपती चळचळा । दैन्यवाणीं ॥ ४॥ येकें दीनरूप बैसलीं । येकें सुजलीं येकें मेलीं । ऐसीं कन्यापुत्रें देखिलीं । अकस्मात डोळां ॥ ५॥ तेणें बहुत दुःखी जाला । देखोनिया उभड आला । प्राणी आक्रंदों लागला । दैन्यवाणा ॥ ६॥ तंव तीं अवघीं सावध जालीं । म्हणती बाबा बाबा जेऊं घाली । अन्नालागीं मिडकलीं । झडा घालिती ॥ ७॥ गांठोडें सोडून पाहाती । हातां पडिलें तेंचि खाती । कांहीं तोंडीं कांहीं हातीं । प्राण जाती निघोनी ॥ ८॥ तांतडी तांतडी जेऊं घाली । तों तें जेवितां जेवितां कांहीं मेलीं । कांहीं होतीं धादावलीं । तेंहि मेलीं अजीर्णें ॥ ९॥ ऐसीं बहुतेकें मेलीं । येक दोनीं मुलें उरलीं । तेंहि दैन्यवाणीं जालीं । आपलें मातेवांचुनी ॥ १०॥ ऐसे आवर्षण आलें । तेणें घरचि बुडालें । पुढें देसीं सुभिक्ष जालें । आतिशयेंसी ॥ ११॥ लेकुरां नाहीं वाढवितें । अन्न करावें लागे आपुलेन हातें । बहु त्रास घेतला चित्तें । स्वयंपाकाचा ॥ १२॥ लोकीं भरीस घातलें । पुन्हां मागुतें लग्न केलें । द्रव्य होतें तें वेचलें । लग्नाकारणें ॥ १३॥ पुन्हां विदेशासी गेला । द्रव्य मेळऊन आला । तव घरीं कळहो लागला । सावत्र पुत्रांसी ॥ १४॥ स्त्री जाली न्हातीधुती । पुत्र देखों न सकती । भ्रताराची गेली शक्ती । वृद्ध जाला ॥ १५॥ सदा भांडण पुत्रांचें । कोणी नायकती कोणाचें । वनिता अति प्रीतीचें । प्रीतिपात्र ॥ १६॥ किंत बैसला मनां । येके ठाई पडेना । म्हणोनियां पांचा जणा । मेळविलें ॥ १७॥ पांच जण वांटे करिती । तों ते पुत्र नायेकती । निवाडा नव्हेचि अंतीं- । भांडण लागलें ॥ १८॥ बापलेकां भांडण जालें । लेंकीं बापास मारिलें । तंव ते मातेनें घेतलें । शंखतीर्थ ॥ १९॥ ऐकोनि मेळले लोक । उभे पाहाती कौतुक । म्हणती बापास लेक । कामा आले ॥ २०॥ ज्या कारणें केले नवस । ज्या कारणें केले सायास । ते पुत्र पितीयास । मारिती पहा ॥ २१॥ ऐसी आली पापकळी । आश्चिर्य मानिलें सकळीं । उभे तोडिती कळी । नगरलोक ॥ २२॥ पुढें बैसोन पांच जण । वांटे केले तत्समान । बापलेंकांचें भांडण । तोडिलें तेहीं ॥ २३॥ बापास वेगळें घातलें । कोंपट बांधोन दिधलें । मन कांतेचें लागलें । स्वार्थबुद्धी ॥ २४॥ कांता तरुण पुरुष वृद्ध । दोघांस पडिला संमंध । खेद सांडून आनंद । मानिला तेहीं ॥ २५॥ स्त्री सांपडली सुंदर । गुणवंत आणी चतुर । म्हणे माझें भाग्य थोर । वृद्धपणीं ॥ २६॥ ऐसा आनंद मानिला । दुःख सर्वही विसरला । तंव तो गल्बला जाला । परचक्र आलें ॥ २७॥ अकस्मात धाडी आली । कांता बंदीं धरून नेली । वस्तभावही गेली । प्राणीयाची ॥ २८॥ तेणें दुःख जालें भारीं । दीर्घ स्वरें रुदन करी । मनीं आठवे सुंदरी । गुणवंत ॥ २९॥ तंव तिची वार्ता आली । तुमची कांता भ्रष्टली । ऐकोनियां आंग घाली । पृथ्वीवरी ॥ ३०॥ सव्य अपसव्य लोळे । जळें पाझरती डोळे । आठवितां चित्त पोळे । दुःखानळें ॥ ३१॥ द्रव्य होतें मेळविलें । तेंही लग्नास वेचलें । कांतेसिही धरून नेलें । दुराचारी ॥ ३२॥ मजही वृद्धाप्य आलें । लेंकीं वेगळें घातलें । अहा देवा वोढवलें । अदृष्ट माझें ॥ ३३॥ द्रव्य नाहीं कांता नाहीं । ठाव नाहीं शक्ति नाहीं । देवा मज कोणीच नाहीं । तुजवेगळें ॥ ३४॥ पूर्वीं देव नाहीं पुजिला । वैभव देखोन भुलला । सेखीं प्राणी प्रस्तावला । वृद्धपणीं ॥ ३५॥ देह अत्यंत खंगलें । सर्वांग वाळोन गेलें । वातपीत उसळलें । कंठ दाटला कफें ॥ ३६॥ वळे जिव्हेची बोबडी । कफें कंठ घडघडी । दुर्गंधी सुटली तोंडीं । नाकीं स्लेष्मा वाहे । ३७॥ मान कांपे चळचळां । डोळे गळती भळभळां । वृद्धपणीं अवकळा । ठाकून आली ॥ ३८॥ दंतपाटी उखळली । तेणें बोचरखिंडी पडिली । मुखीं लाळ गळों लागली । दुर्गंधीची ॥ ३९॥ डोळां पाहातां दिसेना । कानीं शब्द ऐकेना । दीर्घ स्वरें बोलवेना । दमा दाटे ॥ ४०॥ शक्ती पायांची राहिली । बैसवेना मुरुकुंडी घाली । बृहती वाजों लागली । तोंडाच ऐसी ॥ ४१॥ क्षुधा लागतां आवरेना । अन्न समईं मिळेना । मिळालें तरी चावेना । दांत गेले ॥ ४२॥ पित्तें जिरेना अन्न । भक्षीतांच होये वमन । तैशेंचि जाये निघोन । अपानद्वारें ॥ ४३॥ विष्टा मूत्र आणि बळस । भोवता वमनें केला नास । दुरून जातां कोंडे स्वास । विश्वजनाचा ॥ ४४॥ नाना दुःखें नाना व्याधी । वृद्धपणीं चळे बुद्धी । तऱ्हीं पुरेना आवधी । आयुष्याची ॥ ४५॥ पापण्या भवयाचे केंश । पिकोन झडले निःशेष । सर्वांगीं लोंबलें मांस । चिरकुटासारिखें ॥ ४६॥ देह सर्व पाअरिखें जालें । सवंगडे निःशेष राहिले । सकळ प्राणीमात्र बोले । मरेना कां ॥ ४७॥ जें जन्मून पोसलीं । तेंचि फिरोन पडिलीं । अंतीं विषम वेळ आली । प्राणीयासी ॥ ४८॥ गेलें तारुण्य गेलें बळ । गेलें संसारीचें सळ । वाताहात जालें सकळ । शरीर आणी संपत्ती ॥ ४९॥ जन्मवरी स्वार्थ केला । तितुकाहि वेर्थ गेला । कैसा विषम काळ आला । अंतकाळीं ॥ ५०॥ सुखाकारणें झुरला । सेखीं दुःखें कष्टी जाला । पुढें मागुता धोका आला । येमयातनेचा ॥ ५१॥ जन्म अवघा दुःखमूळ । लागती दुःखाचे इंगळ । म्हणोनियां तत्काळ । स्वहित करावें ॥ ५२॥ असो ऐसें वृद्धपण । सकळांस आहे दारुण । म्हणोनियां शरण । भगवंतास जावें ॥ ५३॥ पुढें वृद्धीस तत्वतां । गर्भीं प्रस्तावा होता । तोचि आला मागुता । अंतकाळीं ॥ ५४॥ म्हणौनि मागुतें जन्मांतर । प्राप्त मातेचें उदर । संसार हा अति दुस्तर । तोचि ठाकून आला ॥ ५५॥ भगवद्भजनावांचुनी । चुकेना हे जन्मयोनि । तापत्रयांची जाचणी । सांगिजेल पुढे ॥ ५६॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे स्वगुणपरीक्षानाम समास पाचवा ॥ ५॥


समास सहावा : आध्यात्मिक ताप ॥ श्रीराम् ॥ तापत्रयाचें लक्षण । आतां सांगिजेल निरूपण । श्रोतीं करावें श्रवण । यकाग्र होऊनी ॥ १॥ जो तापत्रैं पोळला । तो संतसंगें निवाला । आर्तभूत तोषला । पदार्थ जेवी ॥ २॥ क्षुधाक्रांतास मिळे अन्न । तृषाक्रांतास जीवन । बंदीं पडिल्याचें बंधन- । तोडिनां, सुख ॥ ३॥ माहापुरें जाजावला । तो पैलतीरास नेला । कां तो स्वप्नींचा चेइला । स्वप्नदुःखी ॥ ४॥ कोणी येकासी मरण- । येतां, दिलें जीवदान । संकटास निवारण । तोडितां सुख ॥ ५॥ रोगियास औषध । सप्रचित आणी शुद्ध । तयासी होये आनंद । आरोग्य होतां ॥ ६॥ तैसा संसारें दुःखवला । त्रिविधतापें पोळला । तोचि येक अधिकारी जाला । परमार्थासी ॥ ७॥ ते त्रिविध ताप ते कैसे । आतां बोलिजेत तैसे । येविषईं येक असे । वाक्याधार ॥ ८॥ श्लोक ॥ देहेंद्रियप्राणेन सुखं दुःखं च प्राप्यते । इममाध्यात्मिकं तापं जायते दुःक देहिनाम् ॥ १ ॥ सर्वभूतेन संयोगात् सुखं दुःखं च जायते । द्वितीयतापसंतापः सत्यं चैवाधिभौतिकः ॥ २ ॥ शुभाशुभेन कर्मणा देहांते यमयातना । स्वर्गनरकादिं भोक्तव्यमिदं चैवाधिदैविकम् ॥ ३ ॥ येक ताप आध्यात्मिक । दुजा तो आदिभूतिक । तिसरा आदिदैविक । ताप जाणावा ॥ ९॥ आध्यात्मिक तो कोण । कैसी त्याची वोळखण । आदिभूतिकांचें लक्षण । जाणिजे कैसें ॥ १०॥ आदिदैविक तो कैसा । कवण तयाची दशा । हेंहि विशद कळे ऐसा । विस्तार कीजे ॥ ११॥ हां जी म्हणोनि वक्ता । जाला कथा विस्तारिता । आध्यात्मिक ताप आतां । सावध ऐका ॥ १२॥ देह इंद्रिय आणी प्राण । यांचेनि योगें आपण । सुखदुःखें सिणे जाण । या नांव आध्यात्मिक ॥ १३॥ देहामधून जें आलें । इंद्रियें प्राणें दुःख जालें । तें आध्यात्मिक बोलिलें । तापत्रईं ॥ १४॥ देहामधून काये आलें । प्राणें कोण दुःख जालें । आतां हें विशद केलें । पाहिजे कीं ॥ १५॥ खरुज खवडे पुळिया नारु । नखरुडें मांजर्या देवि गोवरु । देहामधील विकारु । या नांव आध्यात्मिक ॥ १६॥ काखमांजरी केशतोड । वोखटें वर्ण काळफोड । व्याधी मूळव्याधी माहाजड । या नांव आध्यात्मिक ॥ १७॥ अंगुळवेडे गालफुगी । कंड लागे वाउगी । हिरडी सुजे भरे बलंगी । या नांव आध्यात्मिक ॥ १८॥ वाउगे फोड उठती । कां ते सुजे आंगकांती । वात आणी तिडका लागती । या नांव आध्यात्मिक ॥ १९॥ नाइटे अंदु गजकर्ण । पेहाचे पोट विस्तीर्ण । बैसलें टाळें फुटती कर्ण । या नांव आध्यात्मिक ॥ २०॥ कुष्ट आणि वोला कुष्ट । पंड्यारोग अतिश्रेष्ठ । क्षयरोगाचे कष्ट । या नांव आध्यात्मिक ॥ २१॥ वाटी वटक वायेगोळा । हातीं पाईं लागती कळा । भोवंडी लागे वेळोवेळां । या नांव आध्यात्मिक ॥ २२॥ वोलांडा आणी वळ । पोटसुळाची तळमळ । आर्धशिसी उठे कपाळ । या नांव आध्यात्मिक ॥ २३॥ दुःखे माज आणि मान । पुष्ठी ग्रीवा आणि वदन । अस्तिसांदे दुःखती जाण । या नांव आध्यात्मिक ॥ २४॥ कुळिक तरळ कामिणी । मुरमा सुंठरें माळिणी । विदेसीं लागलें पाणी । या नांव आध्यात्मिक ॥ २५॥ जळसोस आणी हिवारें । गिरीविरी आणी अंधारें । ज्वर पाचाव आणी शारें । या नांव आध्यात्मिक ॥ २६॥ शैत्य उष्ण आणी तृषा । क्षुधा निद्रा आणी दिशा । विषयतृष्णेची दुर्दशा । या नांव आध्यात्मिक ॥ २७॥ आळसी मूर्ख आणी अपेसी । भय उद्भवे मानसीं । विसराळु दुश्चित्त आहिर्निशी । या नांव आध्यात्मिक ॥ २८॥ मूत्रकोड आणी परमें । रक्तपिती रक्तपरमें । खडाचढाचेनि श्रमे । या नांव आध्यात्मिक ॥ २९॥ मुरडा हागवण उन्हाळे । दिशा कोंडतां आंदोळे । येक वेथा असोन न कळे । या नांव आध्यात्मिक ॥ ३०॥ गांठी ढळली जाले जंत । पडे आंव आणी रक्त । अन्न तैसेचि पडत । या नांव आध्यात्मिक ॥ ३१॥ पोटफुगी आणी तडस । भरला हिर लागला घांस । फोडी लागतां कासावीस । या नांव आध्यात्मिक ॥ ३२॥ उचकी लागली उसित गेला । पीत उसळलें उलाट झाला । खरे पडसा आणी खोंकला । या नांव आध्यात्मिक ॥ ३३॥ उसळला दमा आणी धाप । पडजिभ ढासि आणी कफ । मोवाज्वर आणी संताप । या नांव आध्यात्मिक ॥ ३४॥ कोणी सेंदूर घातलाअ । तेणें प्राणी निर्बुजला । घशामध्ये फोड जाला । या नांव आध्यात्मिक ॥ ३५॥ गळसोट्या आणी जीभ झडे । सदा मुखीं दुर्गंधी पडे । दंतहीन लागती किडे । या नांव आध्यात्मिक ॥ ३६॥ जरंडी घोलाणा गंडमाळा । अवचिता स्वयें फुटे डोळा । आपणचि कापी अंगुळा । या नांव आध्यात्मिक ॥ ३७॥ कळा तिडकी लागती । कां ते दंत उन्मळती । अधर जिव्हा रगडती । या नांव आध्यात्मिक ॥ ३८॥ कर्णदुःख नेत्र दुःख । नाना दुःखें घडे शोक । गर्भांध आणी नपुश्यक । या नांव आध्यात्मिक ॥ ३९॥ फुलें वडस आणी पडळें । कीड गर्ता रातांधळें । दुश्चित्त भ्रमिष्ट आणी खुळें । या नांव आध्यात्मिक ॥ ४०॥ मुकें बधीर राखोंडें । थोटें चळलें आणी वेडें । पांगुळ कुऱें आणी पावडे । या नांव आध्यात्मिक ॥ ४१॥ तारसें घुलें काणें कैरें । गारोळें जामुन टाफरें । शडांगुळें गेंगाणें विदरें । या नांव आध्यात्मिक ॥ ४२॥ दांतिरें बोचिरें घानाळ । घ्राणहीन श्रोत्रहीन बरळ । अति कृश अति स्थूळ । या नांव आध्यात्मिक ॥ ४३॥ तोंतरें बोंबडें निर्बळ । रोगी कुरूप कुटीळ । मत्सरी खादाड तपीळ । या नांव आध्यात्मिक ॥ ४४॥ संतापी अनुतापी मत्सरी । कामिक हेवा तिरस्कारी । पापी अवगुणी विकारी । या नांव आध्यात्मिक ॥ ४५॥ उठवणें ताठा करक । आवटळे आणी लचक । सुजी आणी चालक । या नांव आध्यात्मिक ॥ ४६॥ सल आडवें गर्भपात । स्तनगुंते सनपात । संसारकोंडे आपमृत्य । या नांव आध्यात्मिक ॥ ४७॥ नखविख आणी हिंगुर्डें । बाष्ट आणी वावडें । उगीच दांतखीळ पडे । या नांव आध्यात्मिक ॥ ४८॥ झडती पातीं सुजती भवया । नेत्रीं होती राझणवडीया । चाळसी लागे प्राणियां । या नांव आध्यात्मिक ॥ ४९॥ वांग तिळ सुरमें लांसें । चामखिळ गलंडे मसें । चुकुर होइजे मानसें । या नांव आध्यात्मिक ॥ ५०॥ नाना फुग आणी आवाळें । आंगीं दुर्गंधी प्रबळे । चाईचाटी लाळ गळे । या नांव आध्यात्मिक ॥ ५१॥ नाना चिंतेची काजळी । नाना दुःखें चित्त पोळी । व्याधीवांचून तळमळी । या नांव आध्यात्मिक ॥ ५२॥ वृद्धपणीच्या आपदा । नाना रोग होती सदा । देह क्षीण सर्वदा । या नांव आध्यात्मिक ॥ ५३॥ नाना व्याधी नाना दुःखें । नाना भोग नाना खांडकें । प्राणी तळमळी शोकें । या नांव आध्यात्मिक ॥ ५४॥ ऐसा आध्यात्मिक ताप । पूर्वपापाचा संताप । सांगतां सरेना अमूप । दुःखसागर ॥ ५५॥ बहुत काय बोलावें । श्रोतीं संकेतें जाणावें । पुढें बोलिजे स्वभावें । आदिभूतिक ॥ ५६॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे आध्यात्मिकतापनिरूपणनाम समास सहावा ॥ ६॥


समास सातवा : आधिभौतिक ताप ॥ श्रीराम् ॥ मागां जालें निरूपण । आध्यात्मिकाचें लक्षण । आतां आदिभूतिक तो कोण । सांगिजेल ॥ १॥ श्लोक ॥ सर्वभूतेन संयोगात् सुखं दुःखं च जायते । द्वितीयतापसंतापः सत्यं चैवाधिभौतिकः ॥ सर्व भूतांचेनि संयोगें । सुखदुःख उपजों लागे । ताप होतां मन भंगे । या नांव आदिभूतिक ॥ २॥ तरी या आदिभूतिकाचें लक्षण । प्रांजळ करूं निरूपण । जेणें अनुभवास ये पूर्ण । वोळखी तापत्रयाची ॥ ३॥ ठेंचा लागती मोडती कांटे । विझती शस्त्रांचे धायटे । सला सिलका आणी सरांटे । या नांव आदिभूतिक ॥ ४॥ अंग्या आणी काचकुहिरी । आवचटा लागे शरीरीं । गांधील येऊन दंश करी । या नांव आदिभूतिक ॥ ५॥ मासी गोमासी मोहळमासी । मुंगी तेलमुंगी डांस दसी । सोट जळू लागे यासी । आदिभूतिक बोलिजे ॥ ६॥ पिसा पिसोळे चांचण । कुसळें मुंगळे ढेंकुण । विसीफ भोवर गोंचिड जाण । या नांव आदिभूतिक ॥ ७॥ गोंबी विंचु आणी विखार । व्याघ्र लाअंडिगे आणी शूकर । गौसायळ सामर । या नांव आदिभूतिक ॥ ८॥ रानगाई रानम्हैसे । रानशकट्ट आणी रीसें । रानहाती लांवपिसें । या नांव आदिभूतिक ॥ ९॥ सुसरीनें वोढून नेलें । कां तें आवचितें बुडालें । आथवा खळाळीं पडिलें । या नांव आदिभूतिक ॥ १०॥ नाना विखारें आजगर । नाना मगरें जळचर । नाना वनचरें अपार । या नांव आदिभूतिक ॥ ११॥ अश्व वृषभ आणी खर । स्वान शूकर जंबुक मार्जर । ऐसीं बहुविध क्रूर । या नांव आदिभूतिक ॥ १२॥ ऐसीं कर्कशें भयानकें । बहुविध दुःखदायकें । दुःखें दारुणें अनेकें । या नांव आदिभूतिक ॥ १३॥ भिंती माळवंदे पडती । कडे भुयेरीं कोंसळती । वृक्ष आंगावरी मोडती । या नांव आदिभूतिक ॥ १४॥ कोणी येकाचा श्राप जडे । कोणी येकें केले चेडे । आधांतरी होती वेडे । या नांव आदिभूतिक ॥ १५॥ कोणी येकें चाळविलें । कोणी येकें भ्रष्टविले । कोणी येकें धरून नेलें । या नांव आदिभूतिक ॥ १६॥ कोणी येकें दिलें वीष । कोणी येकें लाविले दोष । कोणी येकें घातलें पाश । या नांव आदिभूतिक ॥ १७॥ अवचिता सेर लागला । नेणो बिबवा चिडला । प्राणी धुरें जाजावला । या नांव आदिभूतिक ॥ १८॥ इंगळावरी पाय पडे । शिळेखालें हात सांपडे । धावतां आडखुळे पडे । या नांव आदिभूतिक ॥ १९॥ वापी कूप सरोवर । गर्ता कडा नदीतीर । आवचितें पडे शरीर । या नांव आदिभूतिक ॥ २०॥ दुर्गाखालें कोंसळती । झाडावरून पडती । तेणें दुह्खें आक्रंदती । या नांव आदिभूतिक ॥ २१॥ सीतें वोठ तरकती । हात पाव टांका फुटती । चिखल्या जिव्हाळ्या लागती । या नांव आदिभूतिक ॥ २२॥ अशनपानाचिये वेळे । उष्ण रसें जिव्हा पोळे । दांत कस्करे आणी हरळे । या नांव आदिभूतिक ॥ २३॥ पराधेन बाळपणीं । कुशब्दमारजाचणी । अन्नवस्त्रेंवीण आळणी । या नांव आदिभूतिक ॥ २४॥ सासुरवास गालोरे । ठुणके लासणें चिमोरे । आलें रुदन न धरे । या नांव आदिभूतिक ॥ २५॥ चुकतां कान पिळिती । कां तो डोळा हिंग घालिती । सर्वकाळ धारकीं धरिती । या नांव आदिभूतिक ॥ २६॥ नाना प्रकारीचे मार । दुर्जन मारिती अपार । दुरी अंतरे माहेर । या नांव आदिभूतिक ॥ २७॥ कर्णनासिक विंधिलें । बळेंचि धरून गोंधिलें । खोडी जालिया पोळविलें । या नांव आदिभूतिक ॥ २८॥ परचक्रीं धरून नेलें । नीच यातीस दिधलें । दुर्दशा होऊन मेलें । या नांव आदिभूतिक ॥ २९॥ नाना रोग उद्भवले । जे आध्यात्मिकीं बोलिले । वैद्य पंचाक्षरी आणिले । या नांव आदिभूतिक ॥ ३०॥ नाना वेथेचें निर्शन । व्हावया औषध दारुण । बळात्कारें देती जाण । या नांव आदिभूतिक ॥ ३१॥ नाना वल्लीचे रस । काडे गर्गोड कर्कश । घेतां होये कासावीस । या नांव आदिभूतिक ॥ ३२॥ ढाळ आणी उखाळ देती । पथ्य कठीण सांगती । अनुपान चुकतां विपत्ती । या नांव आदिभूतिक ॥ ३३॥ फाड रक्त फांसणी । गुल्लडागांची जाचणी । तेणें दुःखें दुःखवे प्राणी । या नांव आदिभूतिक ॥ ३४॥ रुचिक बिबवे घालिती । नाना दुःखें दडपे देती । सिरा तोडिती जळा लाविती । या नांव आदिभूतिक ॥ ३५॥ बहु रोग बहु औषधें । सांगतां अपारें अगाधें । प्राणी दुखवे तेणें खेदें । या नांव आदिभूतिक ॥ ३६॥ बोलाविला पंचाक्षरी । धूरमार पीडा करी । नाना यातना चतुरीं । आदिभूतिक जाणिजे ॥ ३७॥ दरवडे घालूनियां जना । तश्कर करिती यातना । तेणें दुःख होये मना । या नांव आदिभूतिक ॥ ३८॥ अग्नीचेनि ज्वाळें पोळे । तेणें दुःखें प्राणी हरंबळे । हानी जालियां विवळे । या नांव आदिभूतिक ॥ ३९॥ नाना मंदिरें सुंदरें । नाना रत्नांचीं भांडारें । दिव्यांबरें मनोहरें । दग्ध होती ॥ ४०॥ नाना धान्यें नाना पदार्थ । नाना पशु नाना स्वार्थ । नाना पात्रें नाना अर्थ । मनुष्यें भस्म होती ॥ ४१॥ आग्न लागला सेती । धान्यें बणव्या आणी खडकुती । युक्षदंड जळोन जाती । अकस्मात ॥ ४२॥ ऐसा आग्न लागला । अथवा कोणी लाविला । हानी जाली कां पोळला । या नांव आदिभूतिक ॥ ४३॥ ऐसें सांगतां बहुत । होती वन्हीचे आघात । तेणे दुःखें दुःखवे चित्त । या नांव आदिभूतिक ॥ ४४॥ हारपे विसरे आणी सांडे । नासे गाहाळ फुटे पडे । असाध्य होये कोणीकडे । या नांव आदिभूतिक ॥ ४५॥ प्राणी स्थानभ्रष्ट जालें । नाना पशूतें चुकलें । कन्यापुत्र गाहाळले । या नांव आदिभूतिक ॥ ४६॥ तश्कर अथवा दावेदार । आवचितां करिती संव्हार । लुटिती घरें नेती खिल्लार । या नांव आदिभूतिक ॥ ४७॥ नाना धान्यें केळी कापिती । पानमळां मीठ घालिती । ऐसे नाना आघात करिती । या नांव आदिभूतिक ॥ ४८॥ मैंद उचले खाणोरी । सुवर्णपंथी भुररेकरी । ठकु सिंतरु वरपेकरी । वरपा घालिती ॥ ४९॥ गठीछोडे द्रव्य सोडिती । नाना आळंकार काढिती । नाना वस्तु मूषक नेती । या नांव आदिभूतिक ॥ ५०॥ वीज पडे हिंव पडे । प्राणी प्रजंनी सांपडे । कां तो माहापुरीं बुडे । या नांव आदिभूतिक ॥ ५१॥ भोवरें वळणें आणी धार । वोसाणें लाटा अपार । वृश्चिक गोंबी आजगर । वाहोन जाती ॥ ५२॥ तयामधें प्राणी सांपडला । खडकी बेटीं आडकला । बुडत बुडत वांचला । या नांव आदिभूतिक ॥ ५३॥ मनासारिखा नसे संसार । कुरूप कर्कश स्त्री क्रूर । विधवा कन्या मूर्ख पुत्र । या नांव आदिभूतिक ॥ ५४॥ भूत पिशाच्च लागलें । आंगावरून वारें गेलें । अबद्धमंत्रे प्राणी चळलें । या नांव आदिभूतिक ॥ ५५॥ ब्राह्मणसमंध शरीरीं । बहुसाल पीडा करी । शनेश्वराचा धोका धरी । या नांव आदिभूतिक ॥ ५६॥ नाना ग्रहे काळवार । काळतिथी घातचंद्र । काळवेळ घातनक्षत्र । या नांव आदिभूतिक ॥ ५७॥ सिंक पिंगळा आणी पाली । वोखटें होला काक कलाली । चिंता काजळी लागली । या नांव आदिभूतिक ॥ ५८॥ दिवटा सरवदा भाकून गेला । अंतरीं धोका लागला । दुःस्वप्नें जाजावला । या नांव आदिभूतिक ॥ ५९॥ भालु भुंके स्वान रडे । पाली अंगावरी पडे । नाना चिन्हें चिंता पवाडे । या नांव आदिभूतिक ॥ ६०॥ बाहेरी निघतां अपशकून । नाना प्रकारें विछिन्न । तेणें गुणें भंगे मन । या नांव आदिभूतिक ॥ ६१॥ प्राणी बंदी सांपडला । यातने वरपडा जाला । नाना दुःखें दुःखवला । या नांव आदिभूतिक ॥ ६२॥ प्राणी राजदंड पावत । जेरबंद चाबुक वेत । दरेमार तळवेमार होत । या नांव आदिभूतिक ॥ ६३॥ कोरडे पारंब्या फोक । बहुप्रकारें अनेक । बहुताडिती आदिभूतिक । या नांव बोलिजे ॥ ६४॥ मोघरीमार बुधलेमार । चौखुरून डंगारणेमार । बुक्या गचांड्या गुढघेमार । या नांव आदिभूतिक ॥ ६५॥ लाता तपराखा सेणमार । कानखडे दगडमार । नाना प्रकारींचे मार । या नांव आदिभूतिक ॥ ६६॥ टांगणें टिपर्या पिछोडे । बेडी बुधनाल कोलदंडे । रक्षणनिग्रह चहूंकडे । या नांव आदिभूतिक ॥ ६७॥ नाकवणी चुनवणी । मीठवणी रायवणी । गुळवण्याची जाचणी । या नांव आदिभूतिक ॥ ६८॥ जळामध्यें बुचकळिती । हस्तीपुढें बांधोन टाकिती । हाकिती छळिती यातायाती । या नांव आदिभूतिक ॥ ६९॥ कर्णछेद घ्राणछेद । हस्तछेद पादछेद । जिव्हाछेद अधरछेद । या नांव आदिभूतिक ॥ ७०॥ तीरमार सुळीं देती । नेत्र वृषण काढिती । नखोनखीं सुया मारिती । या नांव आदिभूतिक ॥ ७१ पारड्यामध्यें घालणें । कां कडेलोट करणें । कां भांड्यामुखें उडवणें । या नांव आदिभूतिक ॥ ७२॥ कानीं खुंटा आदळिती । अपानीं मेखा मारिती । खाल काढून टाकिती । या नांव आदिभूतिक ॥ ७३॥ भोत आणी बोटबोटी । अथवा गळ घालणें कंठीं । सांडस लावून आटाटी । या नांव आदिभूतिक ॥ ७४॥ सिसें पाजणें वीष देणें । अथवा सिरछेद करणें । कां पायातळीं घालणें । या नांव आदिभूतिक ॥ ७५॥ सरड मांजरें भरिती । अथवा फांसीं नेऊन देती । नानापरी पीडा करिती । या नांव आदिभूतिक ॥ ७६॥ स्वानप्रळये व्याघ्रप्रळये । भूतप्रळये सुसरीप्रळये । शस्त्रप्रळये विझप्रळये । या नांव आदिभूतिक ॥ ७७॥ सीरा वोढून घेती । टेंभें लाउन भाजिती । ऐशा नाना विपत्ती । या नांव आदिभूतिक ॥ ७८॥ मनुष्यहानी वित्तहानी । वैभवहानी महत्वहानी । पशुहानी पदार्थहानी । या नांव आदिभूतिक ॥ ७९॥ बाळपणीं मरे माता । तारुण्यपणीं मरे कांता । वृद्धपणीं मृत्य सुता । या नांव आदिभूतिक ॥ ८०॥ दुःख दारिद्र आणी रुण । विदेशपळणी नागवण । आपदा अनुपत्ति कदान्न । या नांव आदिभूतिक ॥ ८१॥ आकांत वाखाप्रळये । युद्ध्य होतां पराजये । जिवलगांचा होये क्षये । या नांव आदिभूतिक ॥ ८२॥ कठीण काळ आणी दुष्काळ । साशंक आणी वोखटी वेळ । उद्वेग चिंतेचे हळाळ । या नांव आदिभूतिक ॥ ८३॥ घाणा चरखीं सिरकला । चाकाखालें सांपडला । नाना वन्हींत पडिला । या नांव आदिभूतिक ॥ ८४॥ नाना शस्त्रें भेदिला । नाना स्वापदीं भक्षिला । नाना बंदीं पडिला । या नांव आदिभूतिक ॥ ८५॥ नाना कुवासें निर्बुजे । नाना अपमानें लाजे । नाना शोकें प्राणी झिजे । या नांव आदिभूतिक ॥ ८६॥ ऐसें सांगतां अपार । आहेत दुःखाचे डोंगर । श्रोतीं जाणावा विचार । आदिभूतिकाचा ॥ ८७॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे आदिभौतिकतापनिरूपणनाम समास सातवा ॥ ७॥


समास आठवा : आधिदैविक ताप ॥ श्रीराम् ॥ मागां बोलिला आध्यात्मिक । त्याउपरीं आदिभूतिक । आतां बोलिजेल आदिदैविक । तो सावध ऐका ॥ १॥ श्लोक: शुभाशुभेन कर्मणा देहांते यमयातना । स्वर्गनरकादिभोक्तव्यमिदं चैवाधिदैविकम् ॥ शुभाशुभ कर्मानें जना । देहांतीं येमयातना । स्वर्ग नर्क भोग नाना । या नांव आधिदैविक ॥ २॥ नाना दोष नाना पातकें । मदांधपणें अविवेकें । केलीं, परी तें दुःखदायकें । येमयातना भोगविती ॥ ३॥ आंगबळें द्रव्यबळें । मनुष्यबळें राजबळें । नाना सामर्थ्याचेनि बळें । अकृत्य करिती ॥ ४॥ नीती सांडूनियां तत्वतां । करूं नये तेंचि करितां । येमयातना भोगितां । जीव जाये ॥ ५॥ डोळे झांकून स्वार्थबुद्धीं । नाना अभिळाश कुबुद्धीं । वृत्ति भूमिसिमा सांधी । द्रव्य दारा पदार्थ ॥ ६॥ मातलेपणें उन्मत्त । जीवघात कुटुंबघात । अप्रमाण क्रिया करीत । म्हणौन येमयातना ॥ ७॥ मर्यादा सांडूनि चालती । ग्रामा दंडी ग्रामाधिपती । देशा दंडी देशाधिपती । नीतिन्याय सांडितां ॥ ८॥ देशाधिपतीस दंडिता रावो । रायास दंडिता देवो । राजा न करितां नीतिन्यावो । म्हणौन यमयातना ॥ ९॥ अनीतीनें स्वार्थ पाहे । राजा पापी होऊन राहे । राज्याअंतीं नर्क आहे । म्हणौनियां ॥ १०॥ राजा सांडितां राजनीति । तयास येम गांजिती । येम नीति सांडितां धावती । देवगण ॥ ११॥ ऐसी मर्यादा लाविली देवें । म्हणौनि नीतीनें वर्तावें । नीति न्याय सांडितां भोगावें । येमयातनेसी ॥ १२॥ देवें प्रेरिले येम । म्हणौनि आदिदैविक नाम । तृतीय ताप दुर्गम । येमयातनेचा ॥ १३॥ येमदंड येमयातना । शास्त्रीं बोलिले प्रकार नाना । तो भोग कदापि चुकेना । या नांव आदिदैविक ॥ १४॥ येमयातनेचे खेद । शास्त्रीं बोलिले विशद । शेरीरीं घालून, अप्रमाद- । नाना प्रकारें ॥ १५॥ पापपुण्याचीं शरीरे । स्वर्गीं असती कळिवरें ।

त्यांत घालून नाना प्रकारें । पापपुण्य भोगविती ॥ १६॥ नाना पुण्यें विळास । नाना दोषें यातना कर्कश । शास्त्रीं बोलिलें अविश्वास- । मानूंच नये ॥ १७॥ वेदाज्ञेनें न चालती । हरिभक्ती न करिती । त्यास येमयातना करिती । या नांव आदिदैविक ॥ १८॥ अक्षोभ नर्कीं उदंड जीव । जुनाट किडे करिती रवरव । बांधोन टाकिती हातपाव । या नांव आदिदैविक ॥ १९॥ उदंड पैस लाहान मुख । कुंभाकार कुंड येक । दुर्गंधी उकाडा कुंभपाक ॥ या नांव आदिदैविक ॥ २०॥ तप्तभूमिका ताविती । जळत स्थंभ पोटाळविती । नाना सांडस लाविती । या नांव आदिदैविक ॥ २१॥ येमदंडाचे उदंड मार । यातनेची सामग्री अपार । भोग भोगिती पाअपी नर । या नांव आदिदैविक ॥ २२॥ पृथ्वीमध्यें मार नाना । त्याहून कठीण येमयातना । मरितां उसंतचि असेना । या नांव आदिदैविक ॥ २३॥ चौघे चौंकडे वोढिती । येक ते झोंकून पाडिती । ताणिती मारिती वोढूनि नेती । या नांव आदिदैविक ॥ २४॥ उठवेना बसवेना । रडवेना पडवेना । यातनेवरी यातना । या नांव आदिदैविक ॥ २५॥ आक्रंदे रडे आणि फुंजे । धकाधकीनें निर्बुजे । झुर्झरों पंजर होऊन झिजे । या नांव आदिदैविक ॥ २६॥ कर्कश वचनें कर्कश मार । यातनेचे नाना प्रकार । त्रास पावती दोषी नर । या नांव आदिदैविक ॥ २७॥ मागां बोलिलां राजदंड । त्याहून येमदंड उदंड । तेथील यातना प्रचंड । भीमरूप दारुण ॥ २८॥ आध्यात्मिक आदिभूतिक । त्याहूनि विशेष आदिदैविक । अल्प संकेतें कांहींयेक । कळावया बोलिलें ॥२९॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे आदिदैविकतापनिरूपणनाम समास आठवा ॥ ८॥


समास नववा : मृत्युनिरूपण ॥ श्रीराम् ॥ संसार म्हणिजे सवेंच स्वार । नाहीं मरणास उधार । मापीं लागलें शरीर । घडीनें घडी ॥ १॥ नित्य काळाची संगती । न कळे होणाराची गती । कर्मासारिखे प्राणी पडती । नाना देसीं विदेसीं ॥ २॥ सरतां संचिताचें शेष । नाहीं क्षणाचा अवकाश । भरतां न भरतां निमिष्य । जाणें लागे ॥ ३॥ अवचितें काळाचे म्हणियारे । मारित सुटती येकसरें । नेऊन घालिती पुढारें । मृत्युपंथे ॥ ४॥ होतां मृत्याची आटाटी । कोणी घालूं न सकती पाठीं । सर्वत्रांस कुटाकुटी । मागेंपुढें होतसे ॥ ५॥ मृत्युकाळ काठी निकी । बैसे बळियाचे मस्तकीं । माहाराजे बळिये लोकीं । राहों न सकती ॥ ६॥ मृत्य न म्हणे किं हा क्रूर । मृत्य न म्हणे हा जुंझार । मृत्य न म्हणे संग्रामशूर । समरांगणीं ॥ ७॥ मृत्य न म्हणे किं हा कोपी । मृत्य न म्हणे हा प्रतापी । मृत्य न म्हणे उग्ररूपी । माहांखळ ॥ ८॥ मृत्य न म्हणे बलाढ्य । मृत्य न म्हणे धनाढ्य । मृत्य न म्हणे आढ्य । सर्व गुणें ॥ ९॥ मृत्य न म्हणे हा विख्यात । मृत्य न म्हणे हा श्रीमंत । मृत्य न म्हणे हा अद्भुत । पराक्रमी ॥ १०॥ मृत्य न म्हणे हा भूपती । मृत्य न म्हणे हा चक्रवती । मृत्य न म्हणे हा करामती । कैवाड जाणे ॥ ११॥ मृत्य न म्हणे हा हयपती । मृत्य न म्हणे गजपती । मृत्य न म्हणे नरपती । विख्यात राजा ॥ १२॥ मृत्य न म्हणे वरिष्ठ जनीं । मृत्य न म्हणे राजकारणी । मृत्य न म्हणे वेतनी । वेतनधर्ता ॥ १३॥ मृत्य न म्हणे देसाई । मृत्य न म्हणे वेवसाई । मृत्य न म्हणे ठाई ठाई । पुंड राजे ॥ १४॥ मृत्य न म्हणे मुद्राधारी । मृत्य न म्हणे व्यापारी । मृत्य न म्हणे परनारी । राजकन्या ॥ १५॥ मृत्य न म्हणे कार्याकारण । मृत्य न म्हणे वर्णावर्ण । मृत्य न म्हणे हा ब्राह्मण । कर्मनिष्ठ ॥ १६॥ मृत्य न म्हणे वित्पन्न । मृत्य न म्हणे संपन्न । मृत्य न म्हणे विद्वज्जन । समुदाई ॥ १७॥ मृत्य न म्हणे हा धूर्त । मृत्य न म्हणे बहुश्रुत । मृत्य न म्हणे हा पंडित । माहाभला ॥ १८॥ मृत्य न म्हणे पुराणिक । मृत्य न म्हणे हा वैदिक । मृत्य न म्हणे हा याज्ञिक । अथवा जोसी ॥ १९॥ मृत्य न म्हणे अग्निहोत्री । मृत्य न म्हणे हा श्रोत्री । मृत्य न म्हणे मंत्रयंत्री । पूर्णागमी ॥ २०॥ मृत्य न म्हणे शास्त्रज्ञ । मृत्य न म्हणे वेदज्ञ । मृत्य न म्हणे सर्वज्ञ । सर्व जाणे ॥ २१॥ मृत्य न म्हणे ब्रह्मत्या । मृत्य न म्हणे गोहत्या । मृत्य न म्हणे नाना हत्या । स्त्रीबाळकादिक ॥ २२॥ मृत्य न म्हणे रागज्ञानी । मृत्य न म्हणे ताळज्ञानी । मृत्य न म्हणे तत्वज्ञानी । तत्ववेत्ता ॥ २३॥ मृत्य न म्हणे योग्याभ्यासी । मृत्य न म्हणे संन्यासी । मृत्य न म्हणे काळासी । वंचूं जाणे ॥ २४॥ मृत्य न म्हणे हा सावध । मृत्य न म्हणे हा सिद्ध । मृत्य न म्हणे वैद्य प्रसिद्ध । पंचाक्षरी ॥ २५॥ मृत्य न म्हणे हा गोसावी । मृत्य न म्हणे हा तपस्वी । मृत्य न म्हणे हा मनस्वी । उदासीन । २६॥ मृत्य न म्हणे ऋषेश्वर । मृत्य न म्हणे कवेश्वर । मृत्य न म्हणे दिगंबर । समाधिस्थ ॥ २७॥ मृत्य न म्हणे हठयोगी । मृत्य न म्हणे राजयोगी । मृत्य न म्हणे वीतरागी । निरंतर ॥ २८॥ मृत्य न म्हणे ब्रह्मच्यारी । मृत्य न म्हणे जटाधारी । मृत्य न म्हणे निराहारी । योगेश्वर ॥ २९॥ मृत्य न म्हणे हा संत । मृत्य न म्हणे हा महंत । मृत्य न म्हणे हा गुप्त । होत असे ॥ ३०॥ मृत्य न म्हणे हा स्वाधेन । मृत्य न म्हणे हा पराधेन । सकळ जीवांस प्राशन । मृत्युचि करी ॥ ३१॥ येक मृत्युमार्गी लागले । येकीं आर्धपंथ क्रमिले । येक ते सेवटास गेले । वृद्धपणीं ॥ ३२॥ मृत्य न म्हणे बाळ तारुण्य । मृत्य न म्हणे सुलक्षण । मृत्य न म्हणे विचक्षण । बहु बोलिका ॥ ३३॥ मृत्य न म्हणे हा आधारु । मृत्य न म्हणे उदार । मृत्य न म्हणे हा सुंदर । चतुरांग जाणे ॥ ३४॥ मृत्य न म्हणे पुण्यपुरुष । मृत्य न म्हणे हरिदास । मृत्य न म्हणे विशेष । सुकृती नर ॥ ३५॥ आतां असो हें बोलणें । मृत्यापासून सुटिजे कोणें । मागेंपुढें विश्वास जाणें । मृत्युपंथें ॥ ३६॥ च्यारी खाणी च्यारी वाणी । चौर्यासी लक्ष जीवयोनी । जन्मा आले तितुके प्राणी । मृत्य पावती ॥ ३७॥ मृत्याभेणें पळों जातां । तरी मृत्य सोडिना सर्वथा । मृत्यास न ये चुकवितां । कांहीं केल्या ॥ ३८॥ मृत्य न म्हणे हा स्वदेसी । मृत्य न म्हणे हा विदेसी । मृत्य न म्हणे हा उपवासी । निरंतर ॥ ३९॥ मृत्य न म्हणे थोर थोर । मृत्य न म्हणे हरिहर । मृत्य न म्हणे अवतार । भगवंताचे ॥ ४०॥ श्रोतीं कोप न करावा । हा मृत्यलोक सकळांस ठावा । उपजला प्राणी जाईल बरवा । मृत्यपंथें ॥ ४१॥ येथें न मनावा किंत । हा मृत्यलोक विख्यात । प्रगट जाणती समस्त । लहान थोर ॥ ४२॥ तथापी किंत मानिजेल । तरी हा मृत्यलोक नव्हेल । याकारणें नासेल । उपजला प्राणी ॥ ४३॥ ऐसें जाणोनियां जीवें । याचें सार्थकचि करावें । जनीं मरोन उरवावें । कीर्तिरूपें ॥ ४४॥ येरवीं प्राणी लहान थोर । मृत्य पावती हा निर्धार । बोलिलें हें अन्यथा उत्तर । मानूंची नये ॥ ४५॥ गेले वहुत वैभवाचे । गेले बहुत आयुष्याचे । गेले अगाध महिमेचे । मृत्यपंथें ॥ ४६॥ गेले बहुत पराक्रमी । गेले बहुत कपटकर्मी । गेले बहुत संग्रामी । संग्रामसौरे ॥ ४७॥ गेले बहुतां बळांचे । गेले बहुतां काळांचे । गेले बहुतां कुळांचे । कुळवंत राजे ॥ ४८॥ गेले बहुतांचे पाळक । गेले बुद्धीचे चाळक । गेले युक्तीचे तार्किक । तर्कवादी ॥ ४९॥ गेले विद्येचे सागर । गेले बळाचे डोंघर । गेले धनाचे कुबेर । मृत्यपंथे ॥ ५०॥ गेले बहुत पुरुषार्थाचे । गेले बहुत विक्रमाचे । गेले बहुत आटोपाचे । कार्यकर्ते ॥ ५१॥ गेले बहुत शस्त्रधारी । गेले बहुत परोपकारी । गेले बहुत नाअनापरी । धर्मरक्षक ॥ ५२॥ गेले बहुत प्रतापाचे । गेले बहुत सत्कीर्तीचे । गेले बहुत नीतीचे । नीतिवंत राजे ॥ ५३॥ गेले बहुत मतवादी । गेले बहुत कार्यवादी । गेले बहुत वेवादी । बहुतांपरीचे ॥ ५४॥ गेलीं पंडितांची थाटें । गेलीं शब्दांचीं कचाटें । गेलीं वादकें अचाटें । नाना मतें ॥ ५५॥ गेले तापषांचे भार । गेले संन्यासी अपार । गेले विचारकर्ते सार । मृत्यपंथे ॥ ५६॥ गेले बहुत संसारी । गेले बहुत वेषधारी । गेले बहुत नानापरी । नाना छंद करूनी ॥ ५७॥ गेले ब्राह्मणसमुदाये । गेले बहुत आच्यार्य । गेले बहुत सांगों काये । किती म्हणौनि ॥ ५८॥ असो ऐसे सकळहि गेले । परंतु येकचि राहिले । जे स्वरुपाकार जाले । आत्मज्ञानी ॥ ५९॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे मृत्यनिरूपणनाम समास नववा ॥ ९॥


समास दहावा : वैराग्य निरूपण ॥ श्रीराम् ॥ संसार म्हणिजे माहापूर । माजीं जळचरें अपार । डंखूं धावती विखार । काळसर्प ॥ १॥ आशा ममता देहीं बेडी । सुसरी करिताती तडातोडी । नेऊन दुःखाचे सांकडी- । माजीं घालिती ॥ २॥ अहंकारनक्रें उडविलें । नेऊनि पाताळीं बुडविलें । तेथुनियां सोडविलें । न वचे प्राणी ॥ ३॥ काम =मगरमिठी सुटेना । तिरस्कार लागला तुटेना । मद मत्सर वोहटेना । भूलि पडिली ॥ ४॥ वासनाधामिणी पडिली गळां । घालून वेंटाळें वमी गरळा । जिव्हा लाळी वेळोवेळां । भयानक ॥ ५॥ माथां प्रपंचाचें वोझें । घेऊन म्हणे माझें माझें । बुडतांही न सोडी, फुंजे । कुळाभिमानें ॥ ६॥ पडिलें भ्रांतीचें अंधारें । नागविलें अभिमानचोरें । आलें अहंतेचें काविरें । भूतबाधा ॥ ७॥ बहुतेक आवर्तीं पडिले । प्राणी वाहातचि गेले । जेंहिं भगवंतासी बोभाईलें । भावार्थबळें ॥ ८॥ देव आपण घालूनि उडी । तयांसी नेलें पैलथडी । येर तें अभाविकें बापुडीं । वाहातचि गेलीं ॥ ९॥ भगवंत भावाचा भुकेला । भावार्थ देखोन भुलला । संकटीं पावे भाविकाला । रक्षितसे ॥ १०॥ जयास भगवंत आवडे । तयाचें देवासीं सांकडें । संसारदुःख सकळ उडे । निजदासाचें ॥ ११॥ जे अंकित ईश्वराचे । तयांस सोहळे निजसुखाचे । धन्य तेचि दैवाचे । भाविक जन ॥ १२॥ जैसा भाव जयापासीं । तैसा दैव तयासी । जाणे भाव अंतरसाक्षी । प्राणीमात्रांचा ॥ १३॥ जरी भाव असिला माईक । तरी देव होये माहा ठक । नवल तयाचें कौतुक । जैशास तैसा ॥ १४॥ जैसें जयाचें भजन । तैसेंची दे समाधान । भाव होतां किंचित न्यून । आपणहि दुरावे ॥ १५॥ दर्पणीं प्रतिबिंब दिसे । जैस्यास तैसें भासे । तयाचें सूत्र असे । आपणाच पासीं ॥ १६॥ जैसें आपण करावें । तैसेंचि तेणें व्हावें । जरी डोळे पसरूनि पाहावें । तरी तेंही टवकारे ॥ १७॥ भृकुटीस घालून मिठी । पाहातां क्रोधें तेंहि उठी । आपण हास्य करितां पोटीं । तेंहि आनंदे ॥ १८॥ जैसा भाव प्रतिबिंबला । तयाचाचि देव जाला । जो जैसें भजे त्याला । तैसाचि वोळे ॥ १९॥ भावें परामार्थाचिया वाटा । वाहाती भक्तीचिया पेंठा । भरला मोक्षाचा चोहाटा । सज्जनसंगें ॥ २०॥ भावें भजनीं जे लागले । ते ईश्वरी पावन जाले । भावार्थबळें उद्धरिले । पूर्वज तेहीं ॥ २१॥ आपण स्वयें तरले । जनासहि उपेगा आले । कीर्तिश्रवणें जाले । अभक्त, भावार्थी ॥ २२॥ धन्य तयांची जननी । जे लागले हरिभजनीं । तेहिंच येक जन्म जनीं । सार्थक केला ॥ २३॥ तयांची वर्णूं काय थोरी । जयांचा भगवंत कैवारी । कासे लाऊन उतरी । पार दुःखाचा ॥ २४॥ बहुतां जन्मांचे सेवटीं । जेणें चुके अटाटी । तो हा नरदेह भेटी । करी भगवंतीं ॥ २५॥ म्हणौन धन्य ते भाविक जन । जेंहिं जोडिलें हरिनिधान । अनंत जन्मांतरींचें पुण्य । फळासि आलें ॥ २६॥ आयुष्य हेचि रत्नपेटी । माजीं भजनरत्नें गोमटीं । ईश्वरीं अर्पूनिया लुटी । आनंदाची करावी ॥ २७॥ हरिभक्त वैभवें कनिष्ठ । परी तो ब्रह्मादिकां वरिष्ठ । सदा सर्वदा संतुष्ट । नैराशबोधें ॥ २८॥ धरून ईश्वराची कास । केली संसाराची नैराश । तयां भाविकां जगदीश । सबाह्य सांभाळी ॥ २९॥ जया संसाराचें दुःख । विवेकें वाटे परमसुख । संसारसुखाचेनि पढतमूर्ख । लोधोन पडती ॥ ३०॥ जयांचा ईश्वरीं जिव्हाळा । ते भोगिती स्वानंदसोहळा । जयांचा जनावेगळा । ठेवा आक्षै ॥ ३१॥ ते आक्षै सुखें सुखावले । संसारदुःखें विसरले । विषयेरंगी वोरंगले । श्रीरंगरंगीं ॥ ३२॥ तयांस फावली नरदेह पेटी । केली ईश्वरेंसिं साटी । येरें अभाविकें करंटीं । नरदेह गेला ॥ ३३॥ आवचटें निधान जोडलें । तें कवडिच्या बदल नेलें । तैसें आयुष्य निघोनि गेलें । अभाविकाचें ॥ ३४॥ बहुता तपाचा सांठा । तीणें लाधला परीस गोटा । परी तो ठाईंचा करंटा । भोगूंच नेणे ॥ ३५॥ तैसा संसारास आला । मायाजाळीं गुंडाळला । अंतीं येकलाचि गेला । हात झाडुनी ॥ ३६॥ या नरदेहाचेनि संगतीं । बहुत पावले उत्तम गती । येकें बापुडी यातायाती । वरपडी जालीं ॥ ३७ ॥ या नरदेहाचेनि लागवेगें । सार्थक करावे संतसंगें । नीचयोनीं दुःख मागें । बहुत भोगिलें ॥ ३८॥ कोण समयो येईल कैसा । याचा न कळे किं भर्वसा । जैसे पक्षी दाही दिशा । उडोन जाती ॥ ३९॥ तैसें वैभव हें सकळ । कोण जाणे कैसी वेळ । पुत्रकळत्रादि सकळ । विघडोन जाती ॥ ४०॥ पाहिली घडी नव्हे आपुली । वयसा तरी निघोन गेली । देह पडतांच ठेविली- । आहे नींच योनी ॥ ४१॥ स्वान शुकरादिक नीच याती । भोगणें घडे विपत्ती । तेथे कांहीं उत्तम गती । पाविजेत नाहीं ॥ ४२॥ मागा गर्भवासीं आटाटी । भोगितां जालासि रे हिंपुटी । तेथुनियां थोरा कष्टीं । सुटलासि दैवें ॥ ४३॥ दुःख भोगिलें आपुल्या जीवें । तेथें कैचिं होतीं सर्वें । तैचेंचि पुढें येकलें जावें । लागेल बापा ॥ ४४॥ कैंचि माता कैंचा पिता । कैंचि बहिण कैंचा भ्राता । कैंचीं सुहृदें कैंची वनिता । पुत्रकळत्रादिक ॥ ४५॥ हे तूं जाण मावेचीं । आवघीं सोइरीं सुखाचीं । हे तुझ्या सुखदुःखाचीं । सांगाती नव्हेती ॥ ४६॥ कैंचा प्रपंच कैंचे कुळ । कासया होतोसी व्याकुळ । धन कण लक्ष्मी सकळ । जाइजणें ॥ ४७॥ कैंचें घर कैंचा संसार । कासया करिसी जोजार । जन्मवरी वाहोन भार । सेखीं सांडून जासी ॥ ४८॥ कैंचें तारुण्य कैंचे वैभव । कैंचें सोहळे हावभाव । हें सकळहि जाण माव । माईक माया ॥ ४९॥ येच क्षणीं मरोन जासी । तरी रघुनाथीं अंतरलासी । माझें माझें म्हणतोसी । म्हणौनियां ॥ ५०॥ तुवां भोगिल्या पुनरावृत्ती । ऐसीं मायबापें किती । स्त्री कन्या पुत्र होती । लक्षानलक्ष ॥ ५१॥ कर्मयोगें सकळ मिळालीं । येके स्थळीं जन्मास आलीं । तें तुवां आपुलीं मानिलीं । कैसीं रे पढतमूर्खा ॥ ५२॥ तुझें तुज नव्हे शरीर । तेथें इतरांचा कोण विचार । आतां येक भगवंत साचार । धरीं भावार्थबळें ॥ ५३॥ येका दुर्भराकारणें । नाना नीचांची सेवा करणें । नाना स्तुती आणी स्तवनें । मर्यादा धरावी ॥ ५४॥ जो अन्न देतो उदरासी । शेरीर विकावें लागे त्यासी । मां जेणें घातलें जन्मासी । त्यासी कैसें विसरावें ॥ ५५॥ अहिर्निशीं ज्या भगवंता । सकळ जिवांची लागली चिंता । मेघ वरुषे जयाची सत्ता । सिंधु मर्यादा धरी ॥ ५६॥ भूमि धरिली धराधरें । प्रगट होईजे दिनकरें । ऐसी सृष्टी सत्तामात्रें । चालवी जो कां ॥ ५७॥ ऐसा कृपाळु देवाधिदेव । नेणवे जयाचें लाघव । जो सांभाळी सकळ जीव । कृपाळुपणें ॥ ५८॥ ऐसा सर्वात्मा श्रीराम- । सांडून, धरिती विषयकाम । ते प्राणी दुरात्मे अद्धम । केलें पावती ॥ ५९॥ रामेविण जे जे आस । तितुकी जाणावी नैराश । माझें माझें सावकाश । सीणचि उरे ॥ ६०॥ जयास वाटे सीण व्हावा । तेणें विषयो चिंतीत जावा । विषयो न मिळतां जीवा । तगबग सुटे ॥ ६१॥ सांडून राम आनंदघन । ज्याचे मनीं विषयचिंतन । त्यासी कैंचें समाधान । लोलंगतासी ॥ ६२॥ जयास वाटे सुखचि असावें । तेणें रघुनाथभजनीं लागावें । स्वजन सकळही त्यागावे । दुःखमूळ जे ॥ ६३॥ जेथें वासना झोंबोन पडे । तेणेंचि अपायें दुःख जडे । म्हणौनि विषयवासना मोडे । तो येक सुखी ॥ ६४॥ विषयजनित जें जें सुख । तेथेंचि होतें परम दुःख । पूर्वीं गोड अंतीं शोक । नेमस्त आहे ॥ ६५॥ गळ गिळितां सुख वाटे । वोढून घेतां घसा फाटे । कां तें बापुडें मृग आपटे । चारा घेऊन पळतां ॥ ६६॥ तैसी विषयसुखाची गोडी । गोड वाटे परी ते कुडी । म्हणौनियां आवडी । रघुनाथीं धरावी । ६७॥ ऐकोनि बोले भाविक । कैसेनि घडे जी सार्थक । सांगा स्वामी येमलोक । चुके जेणें ॥ ६८॥ देवासी वास्तव्य कोठें । तो मज कैसेंनि भेटे । दुःखमूळ संसार तुटे । कोणेपरी स्वामी ॥ ६९॥ धडपुडी भगवत्प्राप्ती- । होऊन, चुके अधिगती । ऐसा उपाये कृपामूर्ती । मज दीनास करावा ॥ ७०॥ वक्ता म्हणे हो येकभावें । भगवद्भजन करावें । तेणें होईल स्वभावें । समाधान ॥ ७१॥ कैसें करावें भगवद्भजन । कोठें ठेवावें हें मन । भगवद्भजनाचें लक्षण । मज निरोपावें ॥ ७२॥ ऐसा म्लानवदनें बोले । धरिले सदृढ पाऊलें । कंठ सद्गदित, गळाले । अश्रुपात दुःखें ॥ ७३॥ देखोन शिष्याची अनन्यता । भावें वोळला सद्गुरु दाता । स्वानंद तुंबळेल आतां । पुढिले समासीं ॥ ७४॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे वैराग्यनिरूपणनाम समास दहावा ॥ १०॥

॥ दशक तीसरा समाप्त ॥

Translation - भाषांतर
N/A

N/A
Last Updated : 2018-01-17T19:25:31.6730000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

glossa

  • पु. Zool.(pl. glossae or gossa) (as a tongue or lingual structure esp. in an insect) जिव्हाधार 
RANDOM WORD

Did you know?

गणेशोत्सवाच्या काळात सत्यनारायण पूजा करावी काय? मग कोणती पूजा करावी?
Category : Hindu - Puja Vidhi
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Status

  • Meanings in Dictionary: 717,490
  • Total Pages: 47,439
  • Dictionaries: 46
  • Hindi Pages: 4,555
  • Words in Dictionary: 325,863
  • Marathi Pages: 28,417
  • Tags: 2,707
  • English Pages: 234
  • Sanskrit Pages: 14,232
  • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.