भाऊबीज - भाऊबीजेची फ़लश्रुती

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


सूर्यापोटी जे का युग्म उपजले । प्रगट जाहले यमयमी ॥१॥
अखंड प्रमाचा रस तयांपाशी । भ्रातृभगिनीसी ओढा थोर ॥२॥
म्हणोनि हे केली नेमस्त द्वितीया । कार्तिकमासि या शुक्लपक्षी ॥३॥
तया दिनी यम यमीसी भेटतो । नाना वस्तु देतो तिजलागी ॥४॥
आज यमालय नाहीच उघडे । भगिनीची कोडे पुरवी तो ॥५॥
आज मृत्यु ज्यासी त्या, न यमबाधा । ऐशी अनुसंधा केली असे ॥६॥
जो कां भ्रांता निज भगिनीसी पूजी । बहुमाने आजी संतोषवी ॥७॥
तया अपमृत्यु मुळि न बाधत । दारिद्र्य नासत तयांचे की ॥८॥
सकल संभार तया प्राप्त होत । भगिनीसी देत जो कां जाणा ॥९॥
ऐसा आहे दिन आज मंगलाचा । भावाबहिणींचा आनंदाचा ॥१०॥
म्हणोनियां भावभक्तीयांचा योग । तेणे अंतरंग खुलवावे ॥११॥
भाव भक्तीयोगे दर्शन देवासी । घडे आपणांसी निश्चय हा ॥१२॥
मग मंगलचि सकल होणार । सर्व येरझार चुकणार ॥१३॥
जन्ममृत्युचा तो चुके मग फ़ेरा । भेट त्या ईश्वरा घडतांच ॥१४॥
म्हणोनियां भेट भावाबहिणीची । जुळवावी साची ह्रदयांत ॥१५॥
भावभक्तीयोगे ईश्वर प्रगटे । बळेच लगटे आपणांसी ॥१६॥
पंचप्राण ज्योति भक्ती ओवाळील । भावा सुखविल अनुरक्ति ॥१७॥
कुंकुमतिलक भावासी लाविल । उत्कर्ष होईल प्रेमरंगा ॥१८॥
विनायक म्हणे महामृत्यु चुके । साधन हे निके रामबाण ॥१९॥

N/A

References : N/A
Last Updated : February 03, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP