वासुदेव जयंती - वासुदेवमयतेची अपूर्वता व आनंद

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


शुक्रवार ता. १५-८-१९३०

वासुदेव नाम घ्यावे । तेथे मन रमवावे ॥१॥
तेथे जे कां सुख पावे । कोणी तैसे ते वर्णावे ॥२॥
अनुपम तो हरीख । अननुभूत पावे सुख ॥३॥
वासुदेवस्मरणाने । वासुदेव चिंतनाने ॥४॥
वासुदेवस्तवनाने । वासुदेवसंकीर्तने ॥५॥
देहभाव विसरत । आनंदचि उद्भवत ॥६॥
आनंदासी सीमा नाही । ऐसे होत लवलाही ॥७॥
समाधि-निर्भर होतसे । रंगी रंगोनी जातसे ॥८॥
काय सांगूं रंग तेथ । प्रगटोनी येत समर्था ॥९॥
त्याच आनंदात दंग । होवोनी जाते अंतरंग ॥१०॥
सुखभरे डोलतसे । विश्रांतिला चाखितसे ॥११॥
परम हा आराम की । अनुपमता विलोकी ॥१२॥
बोलणेच खुंटुंनि जात । शब्द कांही न निघत ॥१३॥
वर्णनाची सीमा होत । अवघा गुरु अवधूत ॥१४॥
वासुदेवमय होणे । देहभाव विसरणे ॥१५॥
ज्योत पहा हे पेटली । धगधगीत असे भली ॥१६॥
प्रकाशाची अपूर्वता । कोण होईल वर्णिता ॥१७॥
शीतल आहे उष्ण आहे । दोही परी भासताहे ॥१८॥
तेजोरुप होवोनी गेलो । वासुदेवी मिसळलो ॥१९॥
वासुदेव वासुदेव । मज वासुदेव-भाव ॥२०॥
विनायका लावी छंद । स्वामी वासुदेवानंद ॥२१॥

N/A

References : N/A
Last Updated : February 02, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP