श्रीगणेशायनम: । श्रीसरस्वत्यैनम: । श्रीसीतारामचंद्रायनम: । श्रीसद्‍गुरुवे नम: । श्रीराम समर्थ ।
याउपरी श्रीगुरुनाथ । गोंदावलें ग्रामींच राहत । श्वान वाढला अत्यंत । शक्ती क्षीन जाहली ॥१॥
परी असती जे विदेही । देहसंबंध तया नाही । वस्त्रापरी ठेविती पाही । केव्हां दूर केव्हा जवळी ॥२॥
याचें पहा प्रत्यंतर । श्वान उठतां अनिवार । सकळां वाटे भय फार । केव्हां काय होईल ॥३॥
तत्क्षणीं येतां परस्थ । श्वान जाय विलयाप्रत । शांतपणें समाचार पुसत । आश्चर्य वाटे सकळांसी ॥४॥
चार दोन दिवसांवर । न बैसतां घोडयावरी । घोडा दंगा करी भारी । जवळी कोणा येऊं न दे ॥५॥
समर्थसेवा नाही घडली । ह्मणजे घोडाही खिंकाळी । आह्मां मानवां भूल पडली । सेवासुख समजेना ॥६॥
असो श्वाससमयासी । दमवोन आणिती वारुसी । कार्यसमयीं व्याधीसी । कोण पुसे ॥७॥
जनासी मात्र उपदेशिती । चंचल जाय विलयाप्रती । निश्वळ ओळखोन धरा चित्ती । शाश्वत एक गुरुपद ॥८॥
कोणवेळ कैसी स्थिती । येईल हें न कळे पुढती । यास्तव साधकहो शीघ्रगती । शंका निरसा प्रश्नोत्तरें ॥९॥
कली वाढला दुर्धर । साधू न राहती स्थीर । याकारणें श्रीरघुवीर । आपुलासा करावा ॥१०॥
वरचेवरी कथिती ऐसें । परी मायेनें लाविलें पिसें । आह्मी आळसी जैसे तैसे । मायमात्र कळवळे ॥११॥
असो ऐसी देहस्थिती । परी अखंड रामभक्ती । बहुतांचा उध्दार करिती । रामनाम बोधोनी ॥१२॥
भक्तकार्यार्थ सोलापुरीं । एकदां गेली श्रीची स्वारी । परतोन येता माघारी । दृष्टांता होय विठूचा ॥१३॥
बडवे पुजारी कळी केली । माझी महापूजा राहिली । भक्त तुह्मी महाबळी । येवोन कलह तोडावा ॥१४॥
कुर्डुवाडीहून फिरले । शीघ्र पंढरीस आले । विठठलचरण वंदिले । देवभक्त महासखे ॥१५॥
तंव इकडे प्रकार घडला । तंटा सरकारांत गेला । त्यांनी समर्था लखोटा लिहिल । तोही पावला त्याच वेळीं ॥१६॥
गृहकलह तोडावा तुम्हीं । आम्हीं असो परधर्मी । साधू शिरोमणी येकामी । न्याय कराल तो सत्य ॥१७॥
श्रीहरीचा हुकूम झाला । सरकारचा लखोटा आला । मग आरंबिले कार्याला । तंटयाचें मूळ शोधिलें ॥१८॥
देवाची वस्त्रभुषणें । याजसंबंधी तंटाभांडणें । येकासी एक घेतली म्हणे । कलह थोर मातला ॥१९॥
श्रीगुरुंनीं मोजदाद केली । उभयतांची समजूत घातली । महपूजा चालू केली । सकळां आनंद वाटला ॥२०॥
आणिक तेथें थोडे दिवस । राहिले तेसमयास । क्षेत्रमहिमा सांगती विशेष । नामगजर ऐसा नाही ॥२१॥
पुंडलीकें उपकार केले । वैकुंठीचें निधान आणिलें । विटेवरी उभें ठेलें । भक्त कार्यार्थ रघुनाथ ॥२२॥
उत्तरे क्षेत्र वाराणशी । दक्षिणे पंढरी अघनाशी । तीर्थे पुनित व्हावयासी । सकल येती या ठाई ॥२३॥
पंढरीक्षेत्रीं राहोनी । बोधिती बहुत अज्ञानी । रामभक्तीसी लावोनी । उध्दरिले अज्ञजन ॥२४॥
पुन्हा परतोन गोंदवलीसी । येते झाले ज्ञानरासी । आनंद नारीनरासी । ग्रामस्त जाती सामोरे ॥२५॥
धन्य गोंदावलीचे जन । नित्य घडे गुरुदर्शन । नानाव्याधींचे निरसन । गुरुप्रसादें होतसे ॥२६॥
कोणी अडचणीत गवसला । विनवी गुरुराजयाला । साह्य करिती तयाला । अर्थबोधेंकरोनी ॥२७॥
व्यापार वाढला गहन । देशोदेशीचें विद्वज्जन । भेटती स्वयें येवोन । कुग्राम कोण म्हणे तया ॥२८॥
श्रीराममंदिराप्रती । अन्नदाना नसे भिती । आणिक मजूर किती खाती । अठरा कारखाने ॥२९॥
दरसाल नवीन इमारती । विहिरी किती खोदिती । अखंड चाले वाहती । समुदाय येतजातसे ॥३०॥
असो गोंदवल्याचे लोकां । मायबाप सद्‍गुरु सखा । तैसाचि इतरां भाविकां । कल्पतरू गुरु माझा ॥३१॥
श्रीमंत ज्ञानी बहु असती । परी परदु:खा नेणती । परदु:खा जे निवविती । तेचि होती जगीं वंद्य ॥३२॥
आपुलें आपण खादलें । यांत काय हाता आलें । देवें जरी ऐसे केलें । तरी काय माती खाती ॥३३॥
असो आमची गुरुमाउली । बहुता आश्रयो झाली । क्षेत्र केलें गोंदावली । भूवैकुंठ ॥३४॥
स्वयें घालोन लंगोटी । बहुतांची राखिली पाठी । विश्वकुटुंबी होऊन शेवटीं । अलिप्त राहिले ॥३५॥
घरची सर्वही शेती । वाहिली रामचरणाप्रती । खरेदी घेवो वरती । रामसेवेसी लाविली ॥३६॥
श्रीराममंदिरें दोन । तैसींच शिवालये जाण । दत्त, शनी देवस्थान । संस्थान स्थापिलें ॥३७॥
पंच नेमूण तयावरी । व्यवस्था अखोन दिली सारी । आल्यागेल्यासी भाकरी । अवश्य म्हणती घालावी ॥३८॥
वरचेवरी उपदेशिती । आम्ही जाऊं आपलें पंथी । शीघ्र जोडा रामभक्ती । पश्चात्ताप पावाल ॥३९॥
परी कोणा खरें न वाटे । मायापट्ल आलें मोठें । विनोदें वदती ऐसें वाटे । हास्यमुखावरोनी ॥४०॥
असो शके अठराशेंपसतीसांत । रामनवमी झाली प्राप्त । आज्ञापत्रे धारोनी बहुत । शिष्यसमुदाय मेळविला ॥४१॥
मार्गशीर्षी नित्यनेमी । दर्शना गेलों होतों आम्हीं । अगत्य यावें रामनवमी । आज्ञा ऐसी जाहली ॥४२॥
पुढती वेळ कैसी येईल । नैमिषवनीं जाणे घडेल । भेटी होईल न होईल । नवमी येण्या विसरू नये ॥४३॥
काय मायेचा जिव्हाळा । आतां आम्हा आठवला । ते समयी विनोद भासला । मायामोहें ॥४४॥
असो रामनवमीसी । गेलों आम्ही आज्ञा जैशी । तेंचि दर्शन आम्हासी । अखेरचें जाहलें ॥४५॥
श्रीरामनवरात्र । अखंड चाले नामसत्र । समुदाय भरला सर्वत्र । उतराया ठाव मिळेना ॥४६॥
चहूं देशींचे लोय येती । भाषाभेद चालीरीती । ध्येय एक गुरुमूर्ती । गुतूबंधु एकवटाले ॥४७॥
शास्त्री वैदिक आणि भट । साहेब पंत कवी भाट । भिषगूरत्नें कुणबी अफाट । नरनरी किती जमले ॥४८॥
ताशे चौघडे वाजती । रामनामें भक्त गर्जती । भजनी दिंडया अभंग गाती । उत्सव अपूर्व चालिला ॥४९॥
हरिदास करिती कीर्तन । कोणी वाचिती पुराण । कोणी आध्यात्म विवेचन । करिती प्रेमसंवाद ॥५०॥
सद्‍गुरुपूजा सकळ करिती । अपूप नैवेद्य दाविती । चरणतीर्थ आदरें घेती । अनन्यभक्तीनें ॥५१॥
कोणी सुवासीक उटणीं । लावोनि न्हाणिलें पंचामृतानें । कफनी टोपी ऊर्णा वसनें । अर्पिती कोणी गुरुसी ॥५२॥
यथाशक्ती धनरासी । कोणी अर्पिती गुरुसी । यात्रा भरली भरती जैसी । रन्माकरा चंद्रोदयीं ॥५३॥
रामजन्मसमयास । दोन्ही मंदिरी दाटी विशेष । यास्तव सद्‍गुरुपरेश । धर्मशाळेत बैसले ॥५४॥
तेथेंच जन्मोत्साह करिती । भक्त तेथें सीतापती । तीन ठायीं पाळणे हलंती । सद्‍गुरुगृही ॥५५॥
परस्थांची मंदिरीं वस्ती । ही नेहमींचीच पध्दती । नवमीचे पारण्याप्रती । गांवभोजन घातलें ॥५६॥
रात्रौ निघाली मिरवणूक । शिबिके बैसले रघुनायक । श्रीसी रथीं बैसवोनी देख । अत्यानंदें चालिले ॥५७॥
सर्वातरी उत्साह भरला । ऐसा महोत्साह जाहला । सद्‍गुरुराजा । शोभला । अयोध्ये जैसा श्रीराम ॥५८॥
कांहीं दिवसाउपरांतीं । अप्पाबुवा श्रीसी वदती । आम्हीं जाऊं पुढती । दादा आज्ञा असावी ॥५९॥
अप्पा पूर्वी निघून गेला । संत जाणती संतलीला । श्रीगुरु निघाले पंढरीला । समुदायासमवेत ॥६०॥
इति श्रीसद‍ गुरुलीलामृते एकादशअध्यायांतर्गत तृतीय:समास :। ओवीसंख्या ॥६०॥
॥ श्रीसद्‍गुरुपादुकार्पणमस्तु ॥
॥ श्रीराम समर्थ ॥

N/A

References : N/A
Last Updated : October 23, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP