श्रीगणेशायनम: । श्रीसरस्वत्यैनम: । श्रीसीतारामचंद्रायनम: । श्रीरामसमर्थ ।
आतां ऐका शिकवण । युक्ति शहाणपण । जेणे घडे समाधान । प्रपंची आणि परमार्थी ॥१॥
कोणास आशा दाखवूं नये । स्वयें कोणाची धरूं नये । कोणास उत्तर देऊम नये । हेतू जाणल्या वाचोनी ॥२॥
सुखदु:खाची येतां वेळ । आपलें समाधान न ढळेल । ऐशी वृत्ती सखोल । स्थीर राखावी ॥३॥
साधनासी जी सबब । ती नुकसान स्वयंभ । या कारणें साधन दुर्लभ । तेंचि आधीं साधावें ॥४॥
जपासी बैसल्या वरी । कोणी द्रव्य घालील पदरी । अथवा पितामह जरी । आला असतां बोलूं नये ॥५॥
नाम जपा श्वासोश्वासीं । भजा श्रीरामरायासी । याचना वृत्तीने कोणासी । काहींही मागूं नये ॥६॥
जो हिशोबी पैशाचा । तोचि दरिद्री साचा । जेथे अयात निर्गतीचा । हिशेब नसे तो धन्य ॥७॥
या कारणें द्रव्य चिंतन । कदा करुं नये जाण । आशाळभूत आपुलें मन । कदापी असूं नये ॥८॥
या मृत्युलोकांमाझारीं । रोग नाश शरीरीं । होणार हें निर्धारी । त्याचें दु:ख मानूं नये ॥९॥
देह ममता सांडावी । आशा तृष्णा सोडावी । रामभक्ति करावी । म्हणजे रामची होय ॥१०॥
त्याची जयावरी प्रीती । तेंचि रुप ते होती । अंतकाळी उपजें मती । तोचि अभ्यास करावा ॥११॥
स्त्रीयांचे रुप आणि भाषण । शब्द स्पर्श ममता जाण । अगत्य परमार्थ गहन । कधीं सत्य मानूं नये ॥१२॥
क्वचित काळी साच असतें । बहुतेक साधका मोडितें । यास्तव वारेहि अंगावरुतें । पडो देऊं नये ॥१३॥
ध्यानीं धरावें पुढील नेम । धरितां होईल आराम । तोचि परमार्थी परम । नसतां अवघी मळमळ ॥१४॥
अजिंक्य मन जिंकीं सदा । परपीडाअ परनिंदा । परदारा परापवादा । पर दोषा न वदावे ॥१५॥
सुख दु:ख मानापमान । हर्ष विषाद समसमान । दंभ गर्व त्यागोन । सत्य शांती धरावी ॥१६॥
अक्रोध जनप्रियता । निर्लोभ विवेक समता । भूतीं दया विरक्तता । लय साक्षित्वता असावी ॥१७॥
भगवदभक्ति प्रेमरस । आत्मज्ञानाचा हव्यास । स्वानंद स्मरण श्वासोश्वास । निर्विषयक चित्त असावें ॥१८॥
दुर्जन छळावया येती । राखोनि समाधान नीती । सहाय्य होईल श्रीपती । प्रयत्ने निवारितां ॥१९॥
धर्म संकट महान आलें । तेथे नीतीनें वागले । धनाशें अधर्मी न गुंतले । तेचि धन्य सत्पुरुष ॥२०॥
उदरभरण लागे करावें । म्हणोनी उद्योगी असावें । परंतु नीतिन्यायें जोडावें । अल्प धन ॥२१॥
परमार्थ तरी साधीत जावा । अल्पकाळ धंदा करावा । देह सेवेसी न विकावा । धनिका वा नृपासी ॥२२॥
प्राराब्धें घडेल ताबेदारी । तेथें राखा खबरदारी । भाकरी दे त्यासी चाकरी । कुचराईवीण करावी ॥२३॥
जो असे निरपेक्षा । त्यानें वरावी दीक्षा । उदरपुरती भिक्षा । मागोन साधनी रमावें ॥२४॥
आता सांगू स्त्रीधर्म । पती हे दैवत परम । अंतरी घ्यावा श्रीराम । शुध्द भाव ठेवोनी ॥२५॥
जरी पती रागीट तामसी । तरी सोसावें बोलासी । अथवा ग्रासला रोगें बहुवासी । तरी वीट मानूं नये ॥२६॥
पतिसेवा मुख्य साधन । पतिवचन मुख्य प्रमाण । सदां संतोषी ठेवी मन । सत्कार्ये पतीचें ॥२७॥
पतीवांचोन परपुरुष । बाप बंधू मानून त्यांस । अखंड नामस्मरणास । जपत जावें ॥२८॥
काम क्रोध लोभ गहन । वर्जुन करा सत्य भाषण । पतीनें आज्ञा दिल्या जाण । इतर साधन करावें ॥२९॥
पति असतां दरिद्री । संतोषी असावें घरीं । परवैभव परोपारी । वांछोनी न हिणवावें ॥३०॥
पति आज्ञा पंचप्राण । अंतरीं अखंड नामस्मरण । ऐशिया माउंलीचे चरण । वंदूं आम्हीं ॥३१॥
आमुची कथा कायसी । देव साधू वंदिती तिसी । उध्दरील उभय कुळांसी । पतिव्रता माउली ॥३२॥
स्त्रियेसी पति दैवत । पतीचा स्त्री डावा हात । त्यानेंही निववावें चित्त । सत्धर्मानुलक्षोनी ॥३३॥
पातिव्रत्य न मोडावें । धैर्य बळें सांभाळावें । संकटकाळीं आळवावें । चगाधिपतीसी ॥३४॥
ऐसा असे स्त्रीधर्म । सदगुरु वचनामृत सुगम । सेवितां हरतील श्रम । मायामोहे भासलेले ॥३५॥
वडिलांची आज्ञा पाळिती । तीच जाणा गुरुभक्ती । येणेंचि घडे सायुज्यमुक्ती । देवसाधू मानिती ॥३६॥
अखंडा नामस्मरण करणें । सोपें आहे कठीणपण । चित्त मलिन होती या कारणें । फुकाचें नाम घेववेना ॥३७॥
अनंत जन्मीची विषयासक्ती । तेणें चित्तें मलिन होती । याकारणे बळें वृत्तीं । नामस्मरणी लावावी ॥३८॥
अभ्यासें जरी नाम वाढें । तरीच चित्तशुध्दि घडे । संकल्प विकल्प भगदाडें । भरोन येतीं ॥३९॥
मग नामी लागेल गोडी । वासना जाय देशोधडी । सदगुरु होवोनी नावाडी । रामभेटी करील ॥४०॥
नामीं जितुकी गोडी कमी । तितुके दोष अंतर्यामी । चित्त मलिय विषयधामीं । गेलें ऐसें जाणावें ॥४१॥
मीठ कडू लागेल जरी । तरी ज्वर असे शरीरीं । जाणोन उपाय सत्वरीं । करावा लागे ॥४२॥
अमृताहून नाम गोड । साधू बहू करिती कोड । परी आपणा वाटे अवघड । तरी दुरित जाणावें ॥४३॥
यास्तव धरोनि भेटा । बळेंची करी नाम पाठ । भवसागर हा अफाट । तरीच तरसी ॥४४॥
या कलियुगाचे राहाटी । नामावाचोन होसी कष्टी । नामें प्राप्त पुढील गोष्टी । अन्य साधनें होतीना ॥४५॥
साधनी उपजेल गोडी । गुरुकृपा होईल गाढी । विमल ज्ञानाची परवडी । बाणेल सत्य अंतरी ॥४६॥
शांति भक्ती आणि मुक्ती । प्रपंची आणिक परमार्थी । विघ्नें बाधा न करिती । समाधान अक्षय ॥४७॥
नामें विमल ज्ञानोदय । स्वयंसिध्द अप्रमेय । जे पाठका दुर्लभ होय । नामधारका सुखसाध्य ॥४८॥
प्रपंच परमार्थ संकटी । नाम पावें उठाउठी । नामावाचोन जनजेठी । धांव न घेई ॥४९॥
अहो शिष्य सज्जन । गुरुभक्ति नामस्मरण । मी सदां सन्निधान । पाठींपोटी रक्षितसे ॥५०॥
विषयीं पोसी जैसा काम । अथवा कृपण रक्षी जैसा दाम । तैसा जोडावा श्रीराम । साधकानें ॥५१॥
त्रैलोक्य व्यापून उरला । दशांगुल परमात्मा भरला । तोची पूजीत जा भला । ह्र्दयमंदिरीं ॥५२॥
आधी शुध्द चित्त व्हावें । तरीच तें ध्यान ठसावें । चित्तशुध्दी कारणें घ्यावें । रामनाम अखंड ॥५३॥
अखंड व्हावया नामस्मरण । मुख्य प्रयत्न सतत गहन । नित्य प्रयत्नें उल्लंघोन । महागिरी मुंगी जाय ॥५४॥
रुक्मांगदादि उध्दरिले । स्वयें तरोन तारिलें । पाहतां तेही नर भले । आपण ही खर नव्हे ॥५५॥
याकारणें देहबुध्दी । सोडोनी जोडा ज्ञाननिधी । देहबुध्दीची उपाधी । मनाहोनी कठिण आहे ॥५६॥
सर्प पाहतां मरोन गेला । परी सांगाडा असे पडला । हात लागतांच द्चकला । प्राणी जैसा ॥५७॥
प्रेत म्हणजे केवळ माती । परी त्यातेंचि लोक भिती । देहवासना धरोनि राहती । कित्येक जीव स्मशानीं ॥५८॥
देही नव्हे जो असक्त । तोचि एक जीवन्मुक्त । देहबंधनें ही सतत । तोडीत जावीं ॥५९॥
मरणाची तयारी असावी । वासना कोठे न गुंतावी । गुंततां यातना भोगावी । लागेल पुढें ॥६०॥
मुलांनी खेळ मांडिला । बाहुला बाहुली संसार केला । माय संबोधितांचि टाकिला । जेथील तेथें ॥६१॥
क्षणामाजीं विसरोनि जायीं । तैसे उदास सर्वाठायीं । चित्त एक रामपायीं । रामी ज्योत मिळवावी ॥६२॥
परिसतां बहू गोड वाटे । मिळवूं जातां ह्र्दय फाटे । दक्ष तोचि काढी नेटें । मोहोळा सारिखें ॥६३॥
निद्रा आळस चित्त मलीन । अश्रध्दा थोरवी विषयध्यान । टाकोन हें पापलक्षण । देहबंधन तोडावें ॥६४॥
मरोन जातां आपुली गोष्टी । कांही मागे रहावी सृष्टी । ऐसें वर्तन जीवन रहाटी । माजी कांही असावें ॥६५॥
जगाचे हित करुं इच्छिती । सामर्थ्य पाहिजे तयांप्रती । म्हणोनि आधी भगवत्प्रीती । संपादिली पाहिजे ॥६६॥
शब्दज्ञान बडबडे । प्रसंग येतां दरडी दडे । तोहि संता नावडे । शब्दज्ञानी आळशी ।॥६७॥
धरितां कांही साधन नीती । सद्‍गुरु तया तारिती । सद्‍गुरु तारतील म्हणती । आळसी वा वितंडवादी ॥६८॥
बुडरिया नरासी । दोरी देती धरावयासी । न धरी अविवेकी आळसी । तरी दोष कोणाचा ॥६९॥
येथें दुज्या बोल नाही । आपुली करणी सर्व ही ।यास्तव अभ्यास प्रत्यही । केलाचि करावा ॥७०॥
असो । ऐसा गुरुमाउली । बोध पान्हा पान्हवली । सुवत्से सेवितां घालीं । कितीयेक ॥७१॥
सकलांध्यायीं भेरुमणीं महामोध्यायीम बोलवाणी । ठेवितां सदां ही स्मरणीं । भवजाचणी जाईल ॥७२॥
सद्‍गुरुवचनें हीं सरस । परी पादार्थ पूर्ततेचे दोष । घडलिया क्षमा या दीनास । श्रोतेजनीं करावी ॥७३॥
पुढील अध्यायीं निरुपण । गुरुकृपें समाधान । पावले इह पर कोण । कांही विशहद होईल ॥७४॥
कृपामृताचा सागर । सत शिष्य जलचरें अपार । तमस्त गणती करणार । ऐसा कवण ॥७५॥
इति श्रीसद्‍गुरुलीला । श्रवणीं स्वानंद सोहळा । पुरविसी रामदासी यांचा लळा । कृपा कटाक्षें ॥७६॥
इति श्रीसद‍ गुरुलीलामृते सप्तमध्यायांतर्गत पंचमसमास: । अध्याय ओवीसंख्या ॥३९४॥
॥ श्रीगुरूनाथार्पणमस्तु ॥
॥ श्रीराम समर्थ ॥
॥ श्री सद्‍गुरु ब्रह्मचैतन्य महाराजकी जय ॥

N/A

References : N/A
Last Updated : October 23, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP