श्री गणेशायनम: । सद्‍गुरुवेनम: । श्रीसीतारामचंद्रायनम: । श्रीरामसमर्थ । श्रीगुरु वदती शिष्यासी । धन्य धन्य तेजोराशी ।
सांग सेवा झाली तुजसी । आज्ञापितों ते ऐकावें ॥१॥
कली जाहला उन्मत्त । अधर्म माजला समस्त । ना सुचे हितानहित । जीवमात्रांसीं ॥२॥
खर्‍याचे खोटें भासतें । खोटें सत्यत्वें उठतें । कल्पना तरंग नानामतें । भूमंडळी पैसावली ॥३॥
कर्माधिकारी ब्राह्मण । कर्म हीन झालें दीन । विपरीत संगतीगहन । बुध्दी विपरीत जाहली ॥४॥
आचारभ्रष्ट स्थानभ्रष्ट । अधिकारभ्रष्ट बुध्दिभ्रष्ट । देहसुखाची हाव नष्ट । लागली मागें ॥५॥
जितुकी देहाची हाव धरिली । तितुकी क्षीणता आली । शतकाची पन्नाशी झाली । वयसीमा ॥६॥
देहधर्त्या ओळखितां । देहाची कायसी चिंता । शीर सलामत असतां । पगडया बहूत जमतील ॥७॥
एवं देहसुखावाचून काहीं । सर्वथा कार्य उरलें नाहीं । नाशिवंत सुखे समाधान कांही । चित्ताचे होईना ॥८॥
जैसी रोहिणीमाव । तैसी धरिली हाव । घटोत्कच दुकानीचा भाव । पाहून हर्ष वाटतो ॥९॥
देह सुखासी भुलले । शाश्वत टाकोनि धावले । नाशिवंतानेंही पोळले । मग धांवाधांव आरंभिली ॥१०॥
न पाहती कूलगोत । आचार विचार वदप्रणित । वेदासीच मूर्ख म्हणत । जुने टाकून नवे घ्या ॥११॥
धर्माधर्म निती न्याय । करिता उपाय अपाय । देह हेंचि मानुनी ध्येय । आत्मज्ञान विसरलें ॥१२॥
तेणें अत्यंत दीन झाले । स्वसत्तेनें मुकले । वंचने आधीन झाले । धर्म सांडिले अनेकीं ॥१३॥
सुख राहिलें एकीकडे । धुंडाळिती भलतीकडे । मृग जैसा वावडे । कस्तुरी कारणें ॥१४॥
सर्व सुखाचें आगर । सोडोनि धांवती दूरदूर । तेणें उपाय तो अपाय थोर । होऊं लागला ॥१५॥
आत्मानुसंधानावाचोनी । नैष्कर्म बोधी शब्दज्ञानी । आचार्य समर्थाची करणी । ध्यानीं नये ॥१६॥
असो कालचक्राचें कौतुक । भजन वाटे निरर्थक । तेणें विकल होती लोक । दिवसें दिवस ॥१७॥
अहो या भजनानें काय होतें । ऐसे बोलती जाणते । चित्त शुध्दिसी भजना परतें । साधन नाहीं ॥१८॥
शब्द ज्ञानें वेडावले । अनुभवाविण कुडे झाले । प्रवृत्तीज्ञान म्हणती भलें । विषयसुख वांछिती ॥१९॥
मुख्य नरदेहाचा धर्म । आत्मोन्नतीचें जाणावें वर्म । तदनुरोधे क्रिया कर्म । करीत असावें ॥२०॥
ती दृष्टी विसरली । देह बुध्दी दृढ झाली । तेणें अधर्मी प्रवर्तली । दृष्टी सर्व ॥२१॥
वेदशास्त्रें पुराणें । उपनिषदें संत वचनें । उपहासिती शहाणे । म्हणती आम्हीं ॥२२॥
पुराणांतरीच्या कथा । असत्य काल्पनीक सर्वथा । वाटो लागल्या ज्यांच्या चित्तां । कलीधर्मे ॥२३॥
ऐसा हा फिरला काळ । तेणें संता पडिला दु:काळ । नास्तिका झाला सुकाळ । अवनीवरीं ॥२४॥
तया माजीं जे भाविक । त्यासी नसे मार्गदर्शक । तेणें सत्यासत्य विवेक । न सुचे अल्पही ॥२५॥
तया तुवां बोधावें । नास्तिका सुपंथा लावावें । रामनाम वाढवावें । भूमंडळी ॥२६॥
कामिकांचे पुरवोनि काम । त्यासी लावावें भजनीं प्रेम । कालानुरुप साधन सुगम । उरलें नाहीं आणिक ॥२७॥
जगदोध्दाराकारणें । तुम्हां हें कार्य करणें । गुरुआज्ञा मानोनि गुमानें । वाढवावा पंथ ॥२८॥
आज्ञा वंदिली मस्तकीं । मूर्ती ठेविली ह्र्दय मंचकी । गुरुशिष्या झाली एकी । द्वैतभाव विरला ॥२९॥
वंदोनि श्रीगुरुची पाउलें । ब्रह्मचैतन्य सद्‍गुरु निघालें । प्रथम नैमिष्यारण्यीं गेले । एकांत वास कराया ॥३०॥
वेदवर्म हातीं आलें । अज्ञेय कांही न उरलें । योगाभ्यासें दंड्ण केलें । सगुण देहाचें ॥३१॥
देह अत्यंत हलका झाला । आणि तेजें ओथंबला । वाटे दुजा कपि आला । उडडाण करी वृक्षाग्नीं ॥३२॥
गुरुसेवा नवमास । पुढें गेले कांही दिवस । तोंवरी नऊ संवत्सरास । गृहत्यागासी जाहलें ॥३३॥
गीता रावजी वृध्द झाले । शोध शोधुनि थकले । साधू वैरागी भेटले । पुसताती पुत्रवार्ता ॥३४॥
चातक करी मेघ आशा । तैसी झाली त्यांची दशा । करुणा भाकिती जगदीशा । पुत्र भेटवी आम्हातें ॥३५॥
स्नेही सोबती विसरोन जाती । परी मायबाप सर्वदा चिंतीती । पतिव्रता भार्या सती । तीही सदा ध्यातसे ॥३६॥
असो ऐसी इकडील स्थिती । तिकडे सद्‍गुरु मनी ध्याती । आतां जावें गृहाप्रती । मायदर्शना कारणें ॥३७॥
गुरु माउली कारणें । जन्मदात्या दु:ख देणें । घडलें या माया गुणें । सहजी सहज ॥३८॥
गृही जाण्याचा धरिला हेत । श्रीगुरु बैरागी वेष घेत । जटा वळल्या समस्त । अंगी विभुती चर्चिली ॥३९॥
कटीं बांधला कसोटा । हाती घेई चिलीम चिमटा । बैरागी शोभला गोमटा । तेज:पुंज ॥४०॥
तीर्थे क्षेत्रें करीत । स्वामी निघाले त्वरित । मार्गी घेतले सांगात । बैरागी चार ॥४१॥
पाहतां गुरुचे मुखाकडे । तात्काळ लीनतां जोडे । दिसती हे साधू गाढे । पोटभरू नव्हेती ॥४२॥
मार्गी अनंत शरण येती । शिधा सामुग्री अर्पिती । मुक्काम करित गुरुमूर्ती । गोंदावलीस पावली ॥४३॥
कोणा न देती ओळख । दुरुन पाहती कौतुक । टकमका पाहती लोक । बैराग्यासी ॥४४॥
मारुतीचे मंदिरांत । ठाण मांडिती गुरुनाथ । समीप अगदी धगधगीत । केली असे ॥४५॥
दुरोनि देखती माय चर्ण । तैसे पाहती पितृवदन । मनोभावें करोनि वंदन । देवालयीं बैसले ॥४६॥
दर्शन घेतां प्रेम उठे । परी ओळख कोणा न पटे । सद‍गुरु जाणती गोमटे । समस्तांसी ॥४७॥
जमले सकळ गांववेडे । खदखदां वासती दंताडें । श्वान जैसा चघळी हांडें । गोडीना रस ॥४९॥
दाजी पाटील गांवकर क। आणि आण्णा बारसवडेकर । उभयतां पाहती गुरु वर । म्हणती कोडिल वैरागी ॥५०॥
हिरवा तमाखू मिळेल । म्हणोनि गेले ते जवळ । गोष्टी करिती प्रांजळ । कोण कोठिल म्हणोनि ॥५१॥
बोलतां उभयतां संबंध आला । गणूबुवा खचित गमला । खूण पाहती कान तुटला । बाळपणीं ॥५२॥
परी ओळखी न देती । मनीं हर्ष मानिती । रजनी सरलीया प्रभातीं । म्हणती समस्तां कळवूं हें ॥५३॥
यांनी हा बेत केला । अंतर ज्ञानें जाणिला । उठोन पहाट समयाला । गेले निघोनि श्वशुरग्रामीं ॥५४॥
तेथेंही हनुमान मंदिरांत । बुवा जावोनि तळ देत । दर्शना अनेक जन येत । सिध्द पुरुष जाणोनी ॥५५॥
पाहुनियां तेज शांती । पूज्य भाव उपजे चित्तीं । संसारी अनेक प्रश्न करिती । काया व्याधीं पीडितसे ॥५६॥
कोणा सांगती रामनाम । कोणा प्रदक्षिणा नियम । कोणा औषधी सुगम । सांगते झाले तेधवां ॥५७॥
खातबळीं पसरली मात । मारुतीचे मंदिरांत । कोणी आले महंत । त्रिकालज्ञानी ॥५८॥
श्रीगुरुचे श्वशुर गृहीं । चिंता करिती प्रत्यही । कधीं येईल जावयी । परतोनि गृहीते ॥५९॥
सासूची कानगी कळली । कन्येसह दर्शना गेली । गर्दी जाई तो उभी ठेली । मग करी वंदन ॥६०॥
बुवाजी एक विनवणी । कन्येचा गेला घरधनी । कोठे गृह त्यागोनि । मागुतां केव्हां येईल ॥६१॥
रात्रंदिन वाटे चिंता । कन्या प्रौढ झाली आतां । केव्हां येईल मागुता । सांगा स्वामी ॥६२॥
श्रीगुरु बोलती वचन । अखंड केलिया नामस्मरण । त्वरित येईल परतोन । चिंता चित्ती न करावी ॥६३॥
वंदोनी ऐएसी उत्तरें । अजमाविती तें अंतरें । आचार नीति शोधिती सारे । ओळख न देती आपुली ॥६४॥
पहिली गोंदावलीची स्थिती । तैसी तेथीलही पाहत्ती । पुढे गेले डांबेवाडी प्रती । चुलत भगिनीसी भेटाया ॥६५॥
दारी जाउनि रघुवीर । केला दीर्घस्वरें गजर । भीमाताई भिक्षा सत्वर । आणूनियां घालावी ॥६६॥
ऐसा शब्द पडतां कानी । भीमा दचकली मनीं । गोसावी कोण मजलागोणि । नामें हाका मारित ॥६७॥
बाहेर येवोनि पहात । ओळखी कांही न लागत । परी आनंदलें चित्त । उगाच पाहे मुखाकडे ॥६८॥
दिव्य रुप भव्य मूर्ती । मस्तकीं जटा शोभति । कौपिनधारी विभूती । सर्वांगासी चर्चिली ॥६९॥
सद्‍गुरु वदती भीमाताई । सासरी तल्लीन झालीस बाई । ओळखी सांडिली सर्वही । माहेर घरची ॥७०॥
इतकें परिसतां सत्वरी । गणू म्हणूनि हांक मारी । आनंदे नयनीं नीरधरी । गूण आठवी बाळपणीचे ॥७१॥
कासया झालासि निष्ठूर । सोडून गेलास घरदार । दुखाविलें सर्वाचें अंतर । काय साधिलें सांग बा ॥७२॥
येरू वदे साधिलें नाहीं । ऐसी वस्तूच नसे कांही । आज्ञा देई लवलाही । जाणे असे बहू दूर ॥७३॥
कोणा सांगू नये वार्ता । गणपती येथें आला होता । सत्वरी येईन मागुतां । सत्य सत्य जाणावें ॥७४॥
ऐसें बोलोनि सत्वर । निघाला तो योगेश्वर । हाक मारी करुणस्वर । सत्वर येई परतोनि ॥७५॥
श्रीगुरु निघाले तेथून । तीर्थे क्षेत्रें करिती भ्रमण । सूक्ष्मपणें अवलोकून । जन स्थिती जाणती ॥७६॥
बहुतेक कामासक्त । आश्रम धर्मासि विरक्त । धनें विधिलें चित्त । सर्वत्रांचे सारिखें ॥७७॥
वेद अतिथि साधूसंत । असत्य मानिती पौराणमत । हिंसा कर्मी प्रवर्तत । वाग्जल्प वाढला ॥७८॥ र
राजसत्ता निधर्मी झाली । धर्मश्रध्दा उडाली । समाधानापासोनि ढळली । जनता सर्व ॥७९॥
नाना प्रापांचिक आपत्ती । नसती विघ्नें आदळती । बुध्दी आयुष्य शरीर संपत्ती । विलया जात चालली ॥८०॥
जितुक्या सुखसोई केल्या । तितुक्या गरजा वाढल्या । देह पराधीन झाला । व्यसनीं अनंत नागवले ॥८१॥
जगच्चालक आत्माराम । विसरोनि गेलिया सर्व श्रम । कोठे न मिळे आराम । त्रिखंडही शोधिल्या ॥८२॥
काम्यकर्मे कांही राहिलीं । नैष्कर्म भावना उडाली । पातकांची सिमा झाली । व्यभिचारकर्म वाढलें ॥८३॥
सकळांसी भ्रष्टता आली । दैवी शक्ति अदृश्य झाली । तेणें श्रध्दा उडोनि गेली । देववेदसंतांची ॥८४॥
नास्तिक बनोनी सकळ । अनुभवहीन वाग्जाळ । घरोघरीं ब्रह्म सुकाळ । वैखरीवरी राहिला ॥८५॥
अनुभवाविण निर्गुण । श्रध्दे विना सगुण भजन । करितां नव्हे समाधान । कोणा एकाचें ॥८६॥
सगुणीं सायुज्यता घडे । तरी निर्गुणज्ञान जोडे । श्रध्दा सगुणी पवाडे । नवविध भक्तिमार्गे ॥८७॥
कुल शील चित्तशुध्दी । परंपरागत धर्मबुध्दी । लया जातां वेदविधी । यथा सांग घडेना ॥८८॥
दुर्धर कली माजला । अधर्म बहू पैसावला । तरणोपाय न उरला । प्राणियासी ॥८९॥
यास्तव सुलभ रामभजनीं । लावावे श्रीगुरुवचनीं । ऐसे आणोनि ध्यानीं । विचरती महीवरीं ॥९०॥
इती श्रीसद्‍गुरुलीला । श्रवणीं स्वानंदसोहाळा । पुरविती रामदासी यांचा लळा । कृपा कटाक्षें ॥९१॥
इति श्रीसद‍ गुरुलीलामृते पंचमोध्यायांतर्गत तृतीयसमास: । ओंवीसंख्या ॥२१७॥
॥ श्रीसद‍गुरूनाथार्पणमस्तु ॥
॥ श्रीराम समर्थ ॥
॥ इति पंचम अध्याय समाप्त ॥

N/A

References : N/A
Last Updated : October 22, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP