समर्थानुयायी तुकारामसिध्द । जया पूर्ण वैराग्य अध्यात्मबोध ॥
तया प्रार्थुनी राममंत्रासि वेती । नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ति ॥४॥

श्री गणेशायनम: । श्रीसरस्वत्यैनम: । श्रीसीतारामचंद्रायनम: । श्रीसद्‍गुरुब्रह्मचैतन्यगुरवेनम: । श्रीअनंतकोटी ब्रह्मांडनायक
श्रीरामसमर्थ । नमो सद्‍गुरुयोगेश्वरा । करुणा करा परमोदारा । भवभितासी थारा । आत्मरुपा ॥१॥
बहुत जन्मी जाहलों कष्टी । कामक्रोधें घातली मिठी । दुष्ट वासना पाठेपोटी । लुबाडीतसे ॥२॥
तेणे जाहलों भिकारी । चौर्‍यांशी लक्ष गेलों घरी । परी शांति नसे अणुभरी । कासावीस झालों ॥३॥
तंव अवचटे ये सदनीं । पावलों तेथे श्रीमंत धनी । भेटला करितों विनवणी । तळमळ निववा दातारा ॥४॥
वेदशास्त्रें वर्णिली कीर्ती । दया क्षमा बोध शांती । अनन्य भक्तीची संपत्ती । बसते येथ ॥५॥
कर्ण नाशिवंत दाता । सद्‍गुरु देई शाश्वता । पुनरपी मागण्याची आस्ता । अल्पही उरेना ॥६॥
ऐसी कीर्ती परिसिली । तेव्हा धांव घेतली । परी द्वारी आड पडली । थोर थोर ॥७॥
अविश्वासे ढकलोनि दिलें । देह लोभ पडळ आलें । अंतहेनें पांगुळे केलें । मजलागी दयाळा ॥८॥
निद्रा आळस चंचल मन । आड कांटेरी कुंपण । अज्ञान तिमिर फिरफितोन । अभक्ती कूपीं लोटतसें ॥९॥
पापपुण्यांच्या भगदाडी । मता मतांच्या दरडी । ढकलोनि देवविती बुडी । स्वर्ग नरकीं ॥१०॥
बहूत केल्या येरझारा । अद्यापि नये शिसारा । दयासिंधू सद‍गुरुवरा । दीनाकडे पाहावें ॥११॥
 दीपा जवळीक पाखरें । तैसें मज जाहलें खरें । भाजतें परी ते बरें । मोहानें भासतें ॥१२॥
ऐसे मोहाचें पडळ । विवेक वैराग्य नसे बळ । तेणें जाहलों विकळ । दीर्घ स्वरें वाहतों ॥१३॥
तूं बा दीनांचा कनवाळू । धांव घेई न करी वेळू । विझवी हा माया जाळू । कृपामृत वर्षोनी ॥१४॥
काकुलती वाट पाहे । काळ पाठिसी उभा आहे । क्षण न लागतां घालील घाये । उपेक्षा कासया मांडिली ॥१५॥
भक्त थोर तेजो राशी । दीन म्हणोनि अव्हेरिसी । तरी दीनदास म्हणविसी ॥ दीनानाथा गुरुराया ॥१६॥
श्रवणीं स्वर न पडे । म्हणतां सर्वज्ञता मोडे । तुम्हांसी अज्ञेय मागेंपुढें । कोठेंही असेना ॥१७॥
जरी म्हणाल साधन बळें । दवडावी सर्व किडाळेम । माया मोहें आंधळे । केलें असे जी दयाळा ॥१८॥
आंधळ्या पांगळयांचा । आधार तूं एकसाचा । यास्तव दीन वाचा । तुजसी आम्हीं बाहतों ॥१९॥
धांव धांव गुरुराया । मायेनें आणिलें आया । आठविलें तंव पाया । आतां उपेक्षा न करावी ॥२०॥
स्वामी जरी उपेक्षिती । अज्ञान सान बालक । सोडोनि केला गृहसुख । कोण करील त्याचें कौतुक । खाऊं जेऊं घालीन ॥३५॥  
आधार नसे त्रिजगती । म्हणूनि येती काकुलती । कृपा दृष्टी विलोकाचे ॥२१॥
जरी ह्मणाल पोपट । मुमुक्षत्व नसेल धीड । तरी हा दारीचा भाट राखा आपुलें ॥२२॥
मायेनें त्याजिले बाळासी । कोणी भेटेल मावशी रायें त्याजिता प्रजेसी । दैव साह्य करील ॥२३॥
परी तुम्ही टाकिल्यावरी। थारा न मिळे अवनीवरी म्हणोनि विनवणी आदरी । मायबाप गुरुराया ॥२४॥
आठवावे तुझे पाय । अन्य ना जाणे उपाय । जाणोनि देई सोय । चरणा जवळी ॥२५॥
मागील अध्यायी कथा । सद्‍गुरू निघाले सांडोनि ममता । दामू वामन संगती असतां । पावले करवीर नगरीं ॥२६॥
अयाचित भोजन करती । परस्पर साह्य होती । सतेज दिसे गणपती । मोहवी मन जनाचे ॥२७॥
कोणी पक्वानें ओपिती । कोणी येऊन दर्शन घेती । कोणी पाहून आश्चर्य करिती । तप तेज म्हणती हें ॥२८॥
देखोनि गणपती गुण । दत्तक घेऊं आपण । गुरुजी कोणी भाव संपन्न । अत्याग्रह मांडिला ॥२९॥
सत्वर निघाले तेथुनी । जगदंबा भेट घेऊनी । दामु आला परतोनि । गृहीं वृतांत निवेदिला ॥३०॥
वामन बुवा ह्मासुर्णेकर । कांही दिवस बरोबर । होते तेही माघार । घेऊन आले गृहासी ॥३१॥
काय झालें गोंदावलीं । दोन प्रहर वाट पाहिली । मग माउली संचित झाली । बाळ कोठे दिसेना ॥३२॥
रावजी झाले चिंताक्रांत । ग्राम समस्त धुंडाळित । नदीतीरी जाऊन पाहात । बैसला असेल एकांती ॥३३॥
रानोमाळीं शोधिती । गावोगांवी दूत प्रेरिती । कोठेहीं न दिसे गणपती । दु:ख करिता अनिवार ॥३४॥
ऊन पाऊस थंडी वारा । कोण देईल निवारा । नयनी लोटती अश्रुधारा । पुत्रस्नेहें क्क्क॥३६॥
कोणी नाही मारिलें । अथवा रागे भरिलें । कोण काजा रुसोनि गेले । सोडोनि आम्हां पाडस ॥३७॥
आमुचें जीवीचें जीवन । सद्‍गुणी चातुर्याची खाण । भगवदभजनी अनन्य । कोठे गेला कळेना ॥३८॥
देवानें दृष्टांत दिला । सिध्द पुरुष होईल भला । साधन साधावया गेला । गृहत्याग करुनी ॥३९॥
कांही तर्क चालेना । गुण आठविती नाना । कोणी शोधूनी सांगाना । पुत्रवार्ता ॥४०॥
ऐसे दु:ख बहुपरीं । करु लागले ते अवसरीं । जमोनि बोधिती शेजारी । भेटी येईल मागुतां ॥४१॥
जो सद्वर्तनी चतुर । कदा न करी अविचार । भेटेल तुम्हासी सत्वर । चिंता न करावी ॥४२॥
माता पिता मित्रगण । समस्त होती उद्विग्न । पाडस चुकता जैसी जाण । धेनू फोडी हंबरडा ॥४३॥
तंव दामू परतोनी आला । गृहीं वृतांत निवेदिला । सद्‍गुरू भेटीसी गेला । तुमचा सुत ॥४४॥
परिसोनी ऐसी वार्ता । शोधू धांवले सदगुरूणी सुंता । मार्गी अवचित भेटतां । घेवोनि आले गृहासीं ॥४५॥
कांही दिवस राहोनी । पुनरपी गेला निघोनी । शोक करिती जनक जननीं  । हातीं न लागे पुत्र हा ॥४६॥
दामू वामन शांतविती । त्यासी कोठेंही नसे कमती । बहुत जन दर्शन घेती । आपती पुरविती अनेक ॥४७॥
तो ज्ञानी वैराग्ययुत । श्रीगुरूसी शोधित । येईल पुरल्यावरी हेत । चिंता तुम्हीं न करावी ॥४८॥
सद्‍गुरू भेटी वाचून । गणपती नय परतोन । निश्चय मनीं धरुन । समाधान मानिती ॥४९॥
इकडे गणपती बाळ । फिरतसे रानोमाळ । कोठें सद्‍गुरू दयाळ । भेटतील कीं ॥५०॥
नाना तीर्थे नाना देश । गिरी गव्हरे विशेष । नदी तटकीं बहुवस । शोधित फिरे ॥५१॥
शास्त्री पंडीत वैदिक । अध्यात्मवादी पुराणिक । भजनी गोसावी भाविक । योगी आणि हटयोगीं ॥५२॥
मठपती फडपती हरिदास । संन्यासी आणि परमहंस । गृहधर्मी परी उदास । संतचरणीं सादर जे ॥५३॥
तैसे गुरुपरंपरागत । गुरुभक्त हरिहरभक्त । ब्रह्मचारी कर्मठ शास्त्र । शुध्दज्ञानी वैरागी ॥५४॥
बाह्य वेडे अंतरी शहाणे । राजयोगी अलिप्तपणें । करिती जे तीर्थाटनें । सिध्दि चमत्कार दाविते ॥५५॥
ऐसी यांच्या घेती भेटी । करिती तयासवें गोष्टी । न्याहाळिती सूक्ष्म दृष्टी । सत्यासत्य ॥५६॥
कोणी मानाचे भुकेले । कोणा धनानें भुलविलें । किती स्त्रीसंगें भ्रष्टलें । सोंग राहिलें केवळ ॥५७॥
कित्येक बोलती जैसे भाट । अनुभव हीच धीट पाठ । मधुर गायनी लाविती चट । भाविकासी ॥५८॥
कित्येक सिध्दि उपभोगिती । तेवि समाधान मानिती । कित्येक धर्म उच्छेदिती । म्हणती आम्ही अद्वैती ॥५९॥
साधुत्वाचे नावाखालीं । दुष्कर्म कोणी झाकिलीं । वरी दिसली भलीभली । कवंडलासारखी ॥६०॥
योगभ्रष्ट कोणी झाले । उपासनेविण ज्ञान बोले । वैराग्य नाही देखिलें । देहासक्त ॥६१॥
कांही ते उदरदास । म्हणतीं आम्हीं हरिदास । मोले ज्ञान विक्रयास । मांडिती बाजारी ॥६२॥
जे मोलें विकतां नये । कोणी कोणा देतां नये । वासना जिंकोन जो जाये । तयासीच प्राप्त ॥६३॥
कित्येक वडिलोपार्जित साधू । वैराग्यापासना ना बोधू । अहंकारी स्वयंसिध्दू । म्हणती आम्ही ॥६४॥
गायनाचे भोक्ते कोणी । लक्ष्य वोधिले सुरांनी । दुरी राहिला चक्रपाणी । नाठवे जयां ॥६५॥
कित्येक अत्यंत कर्मठ । संशयें ग्रासिलें सगट । दयेची झाली ताटातूट । कर्मही सांग बडेना ॥६६॥
कोणी संपत्तीचे बळें । साधुत्वाचे कर्ती चाळे । अंतरी भाव ते वेगळे । बाजारी दिसती ॥६७॥
असो ऐसे बहुत प्रकार । सांगता नये अनिवार । भोळया भाबडया चमत्कार । दावोनि नादी लाविती ॥६८॥
बाह्य सोंग संपादिती । अंतरें मलिन राखिती । पुढें आतां ऐसी स्थिती । होणार आहे ॥६९॥
क्वचित स्थळीं भगवद्भक्त । हरी जयांचा अंकित । भक्तिज्ञान वैराग्य युक्त । त्यांची लक्षणें अवधारा ॥७०॥
नित्यतृप्त ज्यांचे चित्त । जे पूर्ण ज्ञानी विरक्त । नि:संदेही गुणातीत । ब्रह्मानंदी अनन्य ॥७१॥
आशासूत्र जळोनि गेलें । चित्त चैतन्यचि झालें । लोकेषणेसी न वंचले । निरहंकृती ॥७२॥
देही असोनि विदेही । द्वेष मत्सर मुळी नाहीं । भूतीं भगवद‍रुप पाही । सहज समाधी भोगिती ॥७३॥
जाणोनि निर्गुणाची खूण । सगुण भक्ति करी गहन । निरालस्य निर्विकार मन । स्थीरबुध्दी जयाची ॥७४॥
दया शांतीचा पुतळा । चोदा विद्या चौसष्ट कळा । जाणोनि राहे वेगळा । प्राकृता ऐसा ॥७५॥
चौदेहाचा केला अंत । प्रारब्धें देह वर्तत । उर्मी निमाल्या समस्त । हर्ष ना विषाद ॥७६॥
ताप न होई इतरांसी । इतरांपासोन जयासीं । शांति नांदते दिवानिशीं । अंतर्बाह्य ॥७७॥
ऐसेही भेटती कोणी । तेथें तेथें जावोनि । हस्तद्वय जोडोनी । म्हणे विद्या शिकवाहो ॥७८॥
चौवेद षट्‍दर्शनें । चौसष्ट कला पुराणें । एकेदिनीं शिकवा म्हणे । विवेकी बाळ ॥७९॥
प्रश्न पाहोनि चकित होती । कांहिसें वर्म जाणती । कांहीं उगेच उपहासिती । बालबुध्दि म्हणोनी ॥८०॥
जे कां ज्ञानी भगवद्भक्त । ते म्हणति सदगुरू पदांकित । होता येतील समस्त । विद्यातुज ॥८१॥
पहाहो याची विरक्ती । शमदमादी संपत्ती । ज्ञान पाहतां वेडावती । थोर थोर ॥८२॥
कामक्रोधादि जिंकिलें । गृहपाशही तोडिले । देहदंडाण बहू केलें । अल्पवयीं ॥८३॥
दिसतो तरी वज्रदेही । उन्मत्तपणा मुळी नाहीं । बाल फिरें सकल महीं । सद्‍गुरूपद शोधित ॥८४॥
काशीपासोन रामेश्वर । बहूत केलीं येरझार । तीर्थे क्षेत्रें समग्र । शोधिली गुरुकारणें ॥८५॥
रामेश्वर अर्पिली गंगा । सेतू नेला प्रयागा । सप्तपुर्‍या ज्योतिर्लिंगा बहुधाम शोधिले ॥८६॥
मार्गी फलाहार करावा । सिध्द साधक धुंडावा । मुखी रघुवीर गावा । ऐसा क्रम चालिला ॥८७॥
मार्गी भेटले बहुत । मुमुक्षु साधक संत । कांही भेटीचें वर्णन येथ। करूं विषद ॥८८॥
इति श्रीसद‍ गुरुलीलामृते चतुर्थो्ध्यायांतर्गत प्रथमसमास: । ओंवीसंख्या ॥८८॥
॥ श्रीसद‍ गुरूनाथार्पणमस्तु ॥
॥ श्रीराम समर्थ ॥

N/A

References : N/A
Last Updated : October 22, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP