श्री गणेशायनम: । श्रीसीतारामचंद्रायनम: । श्रीरामसमर्थ ।

एकदा वृध्द लिंगोपंत । नातवासी पाचारित । म्हणती ऐकरेमात । विचारितो सांगपा ॥१॥
तुजसी एक हंडाभरी । मोहरा दिधल्या जरी तरी काय करिसी सत्वरी । सांग मज ॥२॥
वांटोन टाकीन समस्त । अंध पंगू रोगग्रस्त । गोरगरीब अनाथ । भिकार्‍यासीं ॥३॥
ऐसें देता प्रत्युत्तर । आजा संतोषला थोर । म्हणे करील परोपकार । दु:खभार हरील ॥४॥
लिंगोपंत सुसंकृत । म्हणोनि ऐसें बोलत । उधळया म्हणतील समस्त । प्राकृतजन ॥५॥
बहुतेक मुलांची जात । हातीचे कोणा न देत । दुसर्‍यांचें घेऊं पहात । लोभनोहें ॥६॥
ऐसीं नव्हें सात्विक जाती । परदू:खे दुखावती । परसुखें संतोष चित्तीं । होतसे तयासी ॥७॥
पुनरपी म्हणे आजा । तुज केलीया राजा । काय करिसी कुलध्वजा । सांग बापा ॥८॥
येरु वदे झडकरी । न ठेवीन देशी भिकारी । अन्नछत्र राजद्वारीं । ठेवीन नित्य ॥९॥
सहज विनोदें पुसिलें । मुलानें प्रत्युत्तर दिलें । ऐकोनी अश्रू आले । नयनी तयाच्या ॥१०॥
पंच वर्षाचें बालक । पाहाहो यावें कौतुक । सात्विक ज्ञान नि:शंक । जाहालें यासी ॥११॥
न म्हणी घेऊन घोडा । खोपट काढोनी बांधीन वाडा । उंची वस्त्रें रथगाडा । दासदासी दागिनें ॥१२॥
विषय भोग वांछीना । भूत दयेहोनि बोलेना । वैराग्य कैसें पाहाना । विवेके सहित ॥१३॥
वयें दिसतो सान । परी जोडलें निधान । उपजत लाधलें ज्ञान । सत्यसत्य ॥१४॥
तपांच्या करितां कोडी । न सुटे मोह लोभ वेडी । भलीं भलीं जाहलीं वेडी । याजसाठीं ॥१५॥
क्रियेवाचून वटवट । घरोघरीं बोलती पोपट । उभयकर्मी वर्ते नीट । ऐसा विरळा ॥१६॥
अनंत जन्माचिया पोटीं । विषयाची झाली भेटी । न सुटे सोडितां गांठी । देह काष्टें केलीया ॥१७॥
या कलियुगा माझारी । वेदान्त भरला घरोघरीं । आचार पाहतां अणुभरी । शुध्द नाहीं ॥१८॥
आम्हां वृध्दास लाजवी । ऐसी क्रिया करुन दावी । प्रौढपणीं घेईल पदवी । सायुज्याची ॥१९॥
देहांसी वृध्दपण आलें । लोभ मोह तैसेचि ठेले । चिंतेनें चित्त भ्रमलें । असें नित्य आमुचें ॥२०॥
यासी बाळ म्हणो नये । बुध्दीनें हा वडील होये क। भक्तियुक्त नाम गाये । रामराम म्हणोनी ॥२१॥
आमचे घरी कुलदैवत । पंढरीनाथ नेमस्त । परि हा दिसे रामभक्त । पूर्व संस्कारें ॥२२॥
जन्मार्जित तप केलें । अथवा रामदूत अवतरले । उपजत ज्ञान कैसें आलें । याजपासी ॥२३॥
पहा हो याचा आचार । उष:कालीं जडे सत्वर । चूळ भरावया नीर । त्वरित आणी ॥२४॥
म्हणे म्हणा हो श्रीहरी । आरती भूपाळी सत्वरी । श्रवण करोनि चरण चुरी । दक्षता कैसी पाहावी ॥२५॥
असो तदनंतर । माउली संनिध जाय कुमर । गोड बोलोनि तोष थोर । देतसे तिजलागी ॥२६॥
बोलिलें वचन नुल्लंघी । आळसा न देई अंगी । वाटे हा बाल योगी । पावला गृहीं ॥२७॥
तुळशी आणावयास धावें । म्हणे देवपूजन करावें । धूपदीप लावा बरवे । दाखवा नैवेद्य ॥२८॥
गीतेचा नित्य पाठ घरीं । चित्त देवोनि श्रवण करी । अंतरीं अर्थ विवरी । बाह्य धरी मौनत्व ॥२९॥
निमुटपणे भोजनीं बैसे । गोड तिखटाची हांव नसे । घालिती तें खात असे । आसक्तिरहित ॥३०॥
खेळावयासी नेमस्त । जाईए संवगडया समवेत । खोडी कुटाळी न काढित । सदा प्रेमळ सकळांसी ॥३१॥
सर्वांसी वाटे हा हवा । याचे संगें खेळ बरवा । नित्य नवा खेळावा । सुखदायक ॥३२॥
सायंकाळी स्तोत्रे बरवी । मधुर वाणी म्हणोनि दावी । भजनीं आवडी नित्य नवी । असे जया ॥३३॥
भजन झालिया वाचोनी । न जाई जो शयनीं । सत्कर्मी निशिदिनीं । काळ करी सार्थक ॥३४॥
बाळपणीं साधकवृत्ती । अंगिकारिली ज्यांनीं चित्तीं । तयां वर्णितां मती । कुंठित झाली ॥३५॥
सांप्रत असें कलियुग । अधर्मी प्रवर्तलें जग । न लागे लावितां मार्ग । सध्दर्माचा ॥३६॥
पांचवें वर्षी एकेदिनीं । पाचारिलें आजोबांनीं । भगवद्‍गीता काढोनि । एक श्लोक सांगितला ॥३७॥
पाठ म्हणोनि दाविला । तैसा अर्थही निरुपिला । आजा मनी संतुष्ट झाला । अतिशयेसी ॥३८॥
पुत्र होईल ब्रह्मज्ञानी । कुळें उध्दरील दोन्हीं । ऐसे अणोनिया ध्यानीं । ईशस्तवन करितसे ॥३९॥
असो ऐसी गृहस्थिती । प्रौढ झाला गणपती । मेळवी अनेक सोबती । खेळायासे ॥४०॥
दगड मांडोनी देव करिती । फुलें घालोनि पूजिती । आरती धुपारती म्हणती । तयांपुढें ॥४१॥
मातापित्यांची सेवा करी । आज्ञा नुल्लंघी क्षणभरी । हूडपणें न भरे भरी । क्रीडा विनोदें ॥४२॥
ऐसें असतां वर्तमानी । मध्यसमय झाली रजनी । उठोनि पहातसे जननी । तवं गणपती कोठें दिसेना ॥४३॥
शेजेवरी गणपती नाहीं । गृह शोधिलें सर्वही । कथिलें रावजीसी लवलाही । गणपती कोठें पाहाहो ॥४४॥
उभयतां बहू शोधिती । सर्वत्रासी जागे करिती । गलबला ऐकोनि राती । बहुत लोक मिळाले ॥४५॥
म्हणती कोठें गेलाहो बाळ । पहा पहाहो सकळ । लागली सर्वास तळमळ । तर्क करिती आपुले परी ॥४६॥
कोणी म्हणती तस्करें नेला । जिनसा पाहोनि भुलला । घेऊन सोडील तयाला । चिंता कांही नसावी ॥४७॥
शाकिनी डाकिनी गृहस्कंध । यक्षापिशाच्च समंध । रात्रौ विवरती प्रसिध्द । बालकासी पछाडती ॥४८॥
कोणी म्हणती झोंपा भारी । कुंभकर्णा सारिख्या अघोरी । बाळ नेलें निशाचरीं । ठाउके नाहीं ॥४९॥
द्वार बंद नाहीं केलें । असावधपणें निजलें । तस्करें मुलासी नेलें । खचित खचित ॥५०॥
भजनांचा छंद बहुत । ध्वनी परिसोनि गेला खचित । प्रात:काली गृहप्रत । येईल स्वस्थ रहावें ॥५१॥
कांही मिळाले धीट । म्हणती पुरे पुरे ही वटवट । शोधूं चला हो नीट । चहूं दिशेसी ॥५२॥
मध्यरात्र समयासी । पाहती सांदी सिध्दिसी । कोणी नेलें बालकासी । कांही विचार सुचेना ॥५३॥
रात्रौ फिरती निशाचर । सर्पवृश्चिक दुर्धर । श्वापदें आणि तस्कर । निर्भयपणें ॥५४॥
शोधितां शोधितां थकले । कांही नदीकडे निघाले । मार्गी अकस्मात देखिलें । गणपतीसी ॥५५॥
समाधीचें केलें आसन । वरी घातलें सिध्दासन । नासिकग्र दृष्टी देऊन । रामनाम घेतसे ॥५६॥
पाहूनी मानसी चकित । योगी असे हा निश्चित । दुरोनि चरण वंदित । सिध्द पुरुष जाणोनी ॥५७॥
हाती धरोनी आणिला । सकाळासी आनंद झाला । बहु प्रकारें बोध केला । निबिड अंधारी नच जावें ॥५८॥
कोणी म्हणती उपदेशासी । पात्राता नसे आम्हांसी । कारणिक अवतरले ऋषि । ज्ञानरुप केवळ ॥५९॥
सहा वर्षाचा बालक । बैसला सिध्दासनीं एक । अपरात्रीं नदी तटाक । स्मशानस्थान विशेष ॥६०॥
यासी काय म्हणावें । दंडावें कीं वंदावें । स्तवावें कीं बोधावें । धाक भीती दोवोनी ॥६१॥
गणपती बोलें वचन । एकांती स्थीर होय मन । नामस्मरणीं अनुसंधान । प्रेमपूर वाहतो ॥६२॥
चित्त वाहे भलतीकडे । मुखें नाम हें कोरडें । ऐशीयानें आयुष्य थोडें । पुरणार नाही ॥६३॥
वयें अससी सान । उद्यमीं घालवें मन । वृध्दपणीं अनुसंधान । स्वस्थपणें करावें ॥६४॥
बहुत विद्या शिकावी । आणि भाग्यशी भोगावी । जगी कीर्ती मिळवावी । मग भजन करावें ॥६५॥
इंद्रिये विषय सोसावें तृप्त करोनि भजावें । नातरी लागेल मुकावें । दोहीकडे ॥६६॥
विषयोर्मी येतां पाही । भाव साधनी न राही । अत्याचारे भवडोहीं । बुडतोए नर ॥६७॥
प्रपंच करोनी परमार्थ । करावा बोलती संत । वासना झालिया निवृत्त । सुलभ होयें ॥६८॥
आधी विद्या शिकावी । इंद्रियें अतृप्त न ठेवावी । मग ती परमार्थ पदवी । साधनानें साधावी ॥६९॥
उपदेश नानापरी । करिती ते नरनारी । भूताखेतांची भीती भारी । सांगूं लागलें बाळाते ॥७०॥
ऐसे आपुल्यालामतीं । अधिकार नेणोनि बोध करिती । अघटित करणी वद्ती । परिसिली नाहीं ॥७१॥
कांही दिवस गेल्यावरी । गणपती नसे शय्येवरी । रावजी विचारी अंतरी । एकनिष्ठ वैष्णव हा ॥७२॥
पुत्र स्नेहें कळवळला । धुंडधुंडाळोनी आला । म्हणे हा कोठें लपला । न कळेची ॥७३॥
पहाटेच्या समयासी । बाळ आला गृहासी । रावजी पुसे तयासी । कोठे आसन घातलें ॥७४॥
येरू वदे नदी थडी । खडकांच्या पडल्या दरडी । माजी असती भगदाडी । उपाधीरहित ॥७५॥
अरे सर्प विंचू फिरती । क्रुर श्वापदें नेणो किती । कैसी होईल देहस्थिती । न विचारिसी ॥७६॥
देह प्रारब्धाधीन । कोण चुकवूं शके मरण । समय प्राप्त झालिया जाण । मादूसी हीन टिके ॥७७॥ न
नाशिवंत नासणार । जाणोनिया निर्धार । आहे तंव जगदश्विर । शाश्वत  तो ओळ्खावा ॥७८॥
ऐकोनि ऐसी उत्तरें । रावजी नेत्री नीर झरें । म्हणे होईल तें तें खरें । स्वस्थ राहोनी पाहावें ॥७९॥
अगाध ज्ञान पाहोन । रावजी मानी समाधान । म्हणे धन्य गणपती निधान । ईशकृपें लाधलें ॥८०॥
इति श्रीसद‍ गुरुलीलामृते तृतियाध्यायांतर्गत । द्वितीय: समास समाप्त: ओंवीसंख्या ८०
॥ श्रीसद‍ गुरूनाथार्पणमस्तु ॥
॥ श्रीराम समर्थ ॥

N/A

References : N/A
Last Updated : October 18, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP