॥६१९१॥
शाक्त गधडा जये देशीं । तेथें राशी पापाच्या ॥१॥
सुकृताचा उदो केला । गोंधळ घाला इंद्रियें ॥२॥
क्रोधें रुपें वसे काम । तीचें नाम जपतसे ॥३॥
मद्यभक्षण मांगिणजाती । विटाळ चित्तीं सांटविला ॥४॥
स्तवूनियां पूजी रांड । न लजे भांड दाढीसी ॥५॥
तुका ह्मणे भगवती । नेइल अंतीं आपणापें ॥६॥

॥६१९२॥
राजा प्रजा द्वाड देश । शाक्त वास करिती तो ॥१॥
अधर्माचें उबड पीक । धर्म रंक त्या गांवीं ॥२॥
न पिके भूमि कांपे भारें । मेघ वारें दीतील ॥३॥
तुका ह्मणे अवघीं दु:खे । येती सुखें वस्तीसी ॥४॥

॥६१९३॥
ऐसें कलियुगाच्या मुळें । झालें धर्माचें वाटोळें ॥१॥
सांडूनियां रामराम । ब्राह्मण ह्मणती दोमदोम ॥२॥
शिवों नये ती निळीं । वस्त्रें पांघरती काळीं ॥३॥
तुका म्हणे वृत्ति । सांडुनि गदा मागत जाती ॥४॥

॥६१९४॥
अवघ्या पापें घडला एक । उपासक शक्तीचा ॥१॥
त्याचा विटाळ नको अंगा । पांडुरंगा माझिया ॥२॥
काम क्रोध मद्य अंगीं । रंगला रंगीं अवगुणी ॥३॥
करितां पाप न धरी शंका । ह्मणे तुका कोणी ही ॥४॥

॥६१९५॥
वारितां बळें धरितां हातीं । जुलुमें जाती नरकामधीं ॥१॥
रंडिदासाप्रति कांहीं । उपदेश तो ही चालेना ॥२॥
जन्म केला वाताहात । थोर घात ये ठायीं ॥३॥
तुका ह्मणे पंढरीनाथा । तुझी कथा दूषीती ॥४॥

॥६१९६॥
शाक्तांची शूकरी माय । विष्ठा खाय बिदीची ॥१॥
तिची त्या लागली सये । मागे धांवे म्हणोनी ॥२॥
शाक्तांची गाढवी माय । भुंकत जाय वेसदारा ॥३॥
तुका म्हणे शिंदळीचे । बोलतां वाचे निंद्य ते ॥४॥

॥६१९७॥
हरिहर सांडुनि देव । धरिती भाव क्षुल्लकीं ॥१॥
ऐका त्यांची विटंबणा । देवपणा भक्तांची ॥२॥
अंगीं कवडे घाली गळां । परडे कळाहिन हातीं ॥३॥
गळां गांठां हिंडे दारीं । मनुष्य परी कुतरीं तीं ॥४॥
माथां सेंदूर दांत खाती । जेंगट हातीं सटवीचें ॥५॥
पूजिती विकट दोंद । पशू सोंड गजाचि ॥६॥
ऐशा छंदें चुकली वाटा । भाव खोटा भजन ॥७॥
तुका म्हणे विष्णु शिवा । वांचुनि देवा भजती ते ॥८॥

॥६१९८॥
कांद्यासाठीं झालें ज्ञान । तेणें जन नाडिलें ॥१॥
काम क्रोध बुचबुची । भुंके पुची व्यालीची ॥२॥
पुजेलागीं द्रव्य मागे । काय सांगे शिष्यातें ॥३॥
तुका म्हणे कैंचें ब्रह्म । अवघा भ्रम विषयांचा ॥४॥

॥६१९९॥
सांडुनियां पंढरीराव । कवणांतें ह्मणो देव ॥१॥
बहु लाज वाटे चित्ता । आणिकांतें देव म्हणतां ॥२॥
सांडुनियां हिरा । कोणें वेचाव्या त्या गारा ॥३॥
तुका म्हणे हरिहर । ऐसी सांडुनियां धुर ॥४॥

॥६२००॥
बहुतें गेलों वांयां । न भजतां पंढरीराया ॥१॥
करिती कामिकाचि सेवा । लागोन मागोन खात्या देवा ॥२॥
अवघियांचा धनी । त्यासी गेलीं विसरोनी ॥३॥
तुका म्हणे अंतीं । पडती यमाचिया हातीं ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : April 12, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP