अर्जुन म्हणाला, जे एक निष्कलंक पंच महाभूतांच्या अतीत, शुध्द, निर्मळ, दिव्य आणि अप्रमेय ब्रह्म आहे ते कसे आहे, ते तू मला सांग. ॥१॥
जे तर्काच्या पलीकडे जाणून घेण्यास कठीण. उत्पत्ती आणि विनाश नसलेले, जे शांत कैवल्य आणि अत्यंत मलरहित आहे (असे ब्रह्म काय ते तू मला सांग. ॥२॥
जे योग्यांच्या विमुक्ततेचे कारण, ज्याच्या प्राप्तीत सर्व हेतू थिटे पडले ते ब्रह्म साळीच्या कुसळाच्या अग्राप्रमाणे सूक्ष्म ज्ञानानेच केवळ जाणणे शक्य अशा ब्रह्माचे स्वरुप तू मला सांग. ॥३॥
हे केशवा ! जे त्रिगुणातीत, गूढ आहे, भिन्न शरीर मात्रामध्ये सारखेच आहे. जे संसार बंधनातून मुक्त करते असे विशेष ज्ञानरुप ब्रह्म तू मला सांग. ॥४॥
श्रीभगवान म्हणाले, हे महाबाहो , पार्था, उत्तम उत्तम ! हे पांडवा, तू बुध्दिमान्‍ आहेस. तूं जो तत्त्वार्थ मला विचारला आहेस तो समग्र मी तुला सांगतो. ॥५॥
आत्मत्त्वाच्या आणि सोहंच्या परस्पर समन्वयातून जे सहज निर्माण होणारे तेच ब्रह्माचे बीज असे तू जाण. ॥६॥
सर्व शरीरमात्रांमध्ये परमात्मा हंस रुपाने नांदत असून अखंडत्वाने गोचर होत असतो. परंतू अज्ञानामुळे तो जाणला जात नाही. ज्याला सोहंकार म्हणतात तो अक्षररुपाने नांदतो. यालाच कूटस्थ आणि अचल अशा संज्ञा आहेत. ॥७॥
हे षडानना, कार्तिकेया, शरीराविषयी ज्यांना आसक्ती राहिलेली नाही. तसेच मी मुक्त आहे. याची आठवणही ज्यांना नाही ते मुक्त होत, यात शंका नाही. ॥८॥
जे ज्ञानी पुरुष अक्षररुप माझे स्वरुप प्राप्त करुन घेतात. ते जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्त होतात. बुध्दी स्थिर झाली की मोह रहात नाही. मग ब्रह्मज्ञान होऊन ते केवळ ब्रह्मरुप होऊन राहतात. ॥९॥
पुरुष आणि प्रकृती यांच्या संगमातून होणार्‍या सृष्टीला येथे काकीमुख म्हटले आहे. पुरुष हा शक्तीचे शोषण करतो तेव्हा काकीमुखाची समाप्ती होते (प्रलय होतो.). उकाररुप देवाची शक्ती चैतन्यरुपाने जाणवते. पुरुष नसता प्रकृतीला स्थानच नाही. याप्रमाणे दोन्ही तत्त्वाच्या अभाव स्थितीला काय म्हणावे? ह्या स्थितीसच अनिर्वचनीय ब्रह्म म्हटले जाते. ॥१०॥
आकाशाचा जेवढा आकार पहावा तेवढा त्याच्या विस्तीर्णतेचा विचार होतो. आकाशाचे संदर्भात स्वत:स व आत्मसंदर्भात आकाशास प्रमाण मान. ॥११॥
आत्म्याला आकाशामध्ये आणि आकाशाला आत्म्यामध्ये स्थिर कर. आत्म्याला आकाशमय केले की मग दुसरा कोणताही विचार करु नकोस. ॥१२॥
योग्याच्या स्थितीचे लक्षण - (शब्द गुण रहित असे जे) बाह्य आकाश ते, नासिकाग्रावर दृष्टी स्थिर करुन , दोन्ही भुवयांमध्ये कल्पावे. तेथे येणारा जो स्वरुपाचा अनुभव तेच निर्मळ, निश्चल, नित्य विशुध्द ज्ञानरुप तत्त्व जाणणे होय. हेच शोकादी सहा ऊर्मीरहित शांत शिवपद होय. ॥१३॥
प्रभा (जागृती), मन (स्वप्न), बुध्दी (सुषुप्ति) या तीन अवस्थातीत अशी आत्म्याची अवस्था असणे हे समाधिस्थ योग्याचे लक्षण आहे. ॥१४॥
ऊर्ध्व शून्य सुषुप्ती, मध्ये स्वप्न स्थिती, अध: शून्य जागृती आणि निरामय जी ती तुर्या, त्रिशून्यातीत स्थिती जो जाणतो, तोच या जन्म -मृत्यूच्या बंधनातून मुक्त होतो. ॥१५॥
अकार, उकार, मकार आणि अर्धमात्रा यांच्या उच्चाराने ऊँकाराचा ध्वनी निर्माण होतो. जे अमात्र, शब्दरहित, स्वर-व्यजनरहित आणि चौथ्या अर्ध मात्रेच्या (बिंदूच्या नादाच्या अतीत) असे आत्मतत्व ज्याने जाणले तोच (योगी) विव्दान्‍ असे तू जाण. ॥१६॥
ज्ञान (प्रपंच), विज्ञान (आत्मविचार), आणि ज्ञेय वस्तू हे गुरुकृपेने हृदयात स्थिर झाले असता शांती प्राप्त होते आणि त्याला योग किंवा धारणेची गरजच उतर नाही. ॥१७॥
जो वेदबीज ऊँकार वेदाच्या आधी होता आणि वेदांनंतरही आहे तो मूळ मायेत विलीन होतो आणि ( ती महामाया महेश्वरात विलीन होते. ते ब्रह्म) त्याहून पलिकडे असणारा तो महेश्वर होय. ॥१८॥
जोपर्यंत नदीच्या पैलतीरी जायचे असते तोपर्यंत नावेची गरज असते. एकदा नदीपलीकडे गेल्यानंतर नावेचे काय प्रयोजन? ॥१९॥
ज्याप्रमाणे धान्यार्थी भुसा टाकून धान्य घेतो त्याप्रमाणे ज्ञानार्थी बुध्दिमंताने ग्रंथाचा अभ्यास करुन ज्ञान प्राप्त झाल्य़ावर ग्रंथ पूर्णपणे बाजूस ठेवावा. ॥२०॥
जसं द्रव्य हातात येईपर्यंत दिवा आणि कुदळ उपयोगी आहे ज्ञानामुळे परमतत्त्वाची प्राप्ती झाल्यावर ज्ञानाचा त्याग करावा. ॥२१॥
जसं अमृताने एखाद्याची तृप्ती झाल्यावर त्याला दुधाचे काय प्रयोजन? तसं ज्याने एकदा तत्त्वपदाला जाणून घेतले त्याला वेदांचे काय प्रयोजन? ॥२२॥
एकदा ज्ञानामृताने तृप्त होऊन कृतकृत्य झालेल्या योग्याला काही करणं न करणं याच्याशी काहीच कर्तव्य नाही. आणि जर तसे कर्तव्य असेल तर तो खरा विव्दान्‍, तत्त्ववेत्ता नव्हे. ॥२३॥
तेलाची संतत धार आणि घंटेचा अखंड नाद याप्रमाणे निर्वाच्य प्रणवालीचा नित्य अभ्यास गुरुकृपेने ज्याने केला (प्राणायाम) तो वेदविद्‍ आहे असे तू जाण. ॥२४॥
आत्म्याची अरणी करावी आणि प्रणवाची उत्तरारणी करावी.ध्यानाचा मंथा करावा. तो वेगाने फिरवून गूढ परमात्म्याचे (शक्तीचे) दर्शन घ्यावे. ॥२५॥
हे पार्था, धूमरहित जसा निर्मळ अग्नी असावा, तसेच आत्मस्वरुप महातेजोमय असते. हे पार्था त्याचे अनन्य भावाने सतत स्मरण ठेवावे. ॥२६।
आत्मतत्त्व दूर आहे असे वाटते. पण प्रत्यक्षात तसे ते दूर नाही. ते पिंड आणि ब्रह्मांड यांना व्यापून उतरे.ते शुध्द, निष्कलंक नित्य देहात असूनही सर्वव्यापी आहे. ॥२७॥
आत्मा शरीरात असूनही तो शरीर राहतो तथापि तो भोक्ता नाही. आणि शरीरात राहूनही त्याला शारीरिक बंधने असत नाहीत. ॥२८॥
जसं तिळात तेल असतं. दुधामध्ये तुपाचा अंश असतोच. गंध फुलाला सोडून रहात नाही किंवा रस फळामध्ये असतो. ( तसाच आत्मा शरीरात असतो. ) ॥२९॥
लाकडात अग्नीचा प्रवेश झाल्यावर प्रकाश पडतो. आकाशात वार्‍याचा संचार असतो. त्याप्रमाणे आत्मा देहाला व्यापून असतो. ॥३०॥
देहात प्रधान मन, परंतु मनाला अधिष्ठान आत्मस्वरुपाचे. जसे कोठे पाहिले तरी साक्षी म्हणून आकाश असतेच त्याचप्रमाणे आत्मा साक्षीरुप आहे. ॥३१॥
संकल्प विकल्प ते मन, मनामध्ये आत्मा, मनाचे कल्प विरले बाजूला झाले की निखळ वस्तुज्ञान होते. मनाने़च मनाला पाहून योगी लोक ब्रह्मस्वरुप होऊन जातात. ॥३२॥
मनाचा विषयव्यापार थांबवून पंचमहाभूतांसकट मन चिदाकाशारुप करुन निराश्रय पदाशी मिळवावे. असे होणे हेच समाधीचे लक्षण असे तू जाण. ॥३३॥
प्रभाशून्यादी सर्व शून्यापलीकडची जी आत्म्याची स्थिती ती प्राप्त होते हे समाधियोग्याचे लक्षण आहे. ज्याचा आत्मभाव शून्याकार झाला आहे तो पापपुण्यापासून मुक्त होतो. ॥३४॥
अर्जुन म्हणाला, अदृश्यात कोणतीही भावना नाही, दृश्यमान तर सगळे नाश पावणारे आहे मग अवर्ण आणि अस्वर असे ब्रह्म त्याचे योगी लोक कसे ध्यान करतात? ॥३५॥
श्रीभगवान म्हणाले, वर पूर्ण, खाली पूर्ण, मध्ये पूर्ण याप्रमाणे सर्वत्र पूर्णच पूर्ण असणारे जे तत्त्व तो आत्मा होय. अशी अनुभूती येणे हे समाधिस्थाचे लक्षण आहे. ॥३६॥
अर्जुन म्हणाला, प्रपंचाचे आलंबन दिसते पण ते नाशिवंत आहे. जे निरालंब ते शून्याकार आहे. ते दिसत नाही. याप्रमाणे उभयत्र दोष असल्याने योगीजन त्या ब्रह्माचे ध्यान कसे करतात? ॥३७॥
श्रीभगवान म्हणाले, हृदय निर्मळ करुन निरामय तत्त्वाचे चिंतन करावे. मीच हे सर्व आहे अशी धारणा धरावी व सुखी व्हावे. ॥३८॥
अर्जुन म्हणाला, अक्षरे, त्यांच्या मात्रा, या सर्वांना बिंदूचे अधिष्ठान आहे. बिंदूचा भेद नादाने होतो. त्या नादाचा भेद कशाने करतात? ॥३९॥
श्रीभगवान म्हणाले, हृदयातील जो अनाहत नाद, त्याचा जो ध्वनी त्याच्या अंतर्गत एक ज्योती प्रकाशते (चित्‍) त्या ज्योतीच्या अंतर्गत मन असते. ॥४०॥
ते मन जेथे विलय पावते तेथे श्रीविष्णूचे परम पद होय, ज्ञानी याप्रमाणे जाणतो त्यामुळे तो पाप - पुण्याने लिप्त होत नाही. ॥४१॥
ओंकारध्वनीच्या लहरींनी वायूचा पूर्ण संकोच झाल्यावर निरालंब तत्त्वाच अनुभव येतो. त्या निरालंब तत्त्वात नाद लय पावतो. (म्हणजे नादाचा भेद याने होतो. ) ॥४२॥
अर्जुन म्हणाला, या पंचमहाभूतात्मक देहाचा भेद झाला. ती पंचमहाभूते पंचमहाभूतात विलीन झाली. प्राण देहाला सोडून गेले की अशावेळी धर्म व अधर्म हे कोठे  जातात.? ॥४३॥
श्रीभगवान म्हणाले, धर्म, अधर्म,  मन आणि जी पंचमहाभूते आहेत ती, तसेच पाच इंद्रिये त्यांच्या पाच देवता यांचा मान राखला असता, हे सर्व शिवतत्त्व जोवर प्राप्त होत नाही तोवर जीवाबरोबर जाते. ॥४४-४५॥
अर्जुन म्हणाला, स्थावर आणि जंगम असे जेवढे म्हणून चराचर जीवविश्व आहे त्यातील ते जीव दुसर्‍या जीवाला खाऊन जगतात. तो जीव कोणत्या उपायाने अमर होईल? ॥४६॥
श्रीभगवान म्हणाले, मुख आणि नासिका मध्ये (शरीरात) प्राणाचा नित्य संचार असतो. हा प्राण आकाशात विलीन होतो. तसा जीव आकाशात राहतो. ॥४७॥
अर्जुन म्हणाला, आकाश ब्रह्माण्डाला व्यापून आहे. आणि जगतात आकाश भरुन आहे. याप्रमाणे अंतर्बाह्य आकाशच आहे. तर ते ब्रह्मतत्त्व निष्कलंक कसे? (आकाशाहून अलिप्त कसे?) ॥४८॥
श्रीभगवान म्हणाले, अवकाश ही केवळ पोकळी आहे. आकाशाने ते विश्व वैशिष्ट्याने व्यापले आहे. आकाशात विश्व व विश्वात आकाश हे ते वैशिष्टय . आकाशाचा गुण शब्द आहे. परंतु ब्रह्म नि:शब्द आहे असे सांगतात. (याप्रमाणे ते आकाशगुणाने लिप्त नाही. )॥४९॥
अर्जुन म्हणाला, दात, ओठ, तालू आणि जीभ ही वर्णोच्चारची स्थाने आहेत.तेथे वर्ण व्यक्त होतात. तेव्हा त्याचे क्षरत्व आणि अक्षरत्व कसे? ॥५०॥
श्रीभगवान म्हणाले , जे अक्षर अघोषित, स्वररहित दात , ओठ, तालू, जिह्वा यांच्या वापर न करता उच्चारले जाते, जे रेखरहित ऊष्मवर्ण विभागरहित ते अक्षर होय. कारण ते कधीही क्षरत नाही. (नाश पावत नाही.) ॥५१॥
अर्जुन म्हणाला, इंद्रियनिरोधाने देहातील धातू क्षीण होतात. देह नष्ट झाला असता बुध्दी कोठून? आणि बुध्दिनाशानंतर ज्ञान तरी कोठून? ॥५२॥
श्रीभगवान म्हणाले, हे अर्जुना ! जोपर्यंत तत्त्वावबोध होत नाही तोपर्यंत्च निरोध असावा. श्रेष्ठ निजतत्वाचा बोध झाल्यावर (तिथे व्दैत नाही) फक्त एकतत्वाचाच अनुभव असतो. ॥५३॥
देहाला नऊ छिद्रे पाडलेली आहेत. घटिकायंत्रातून पाणी शुध्द होऊन गळत असते त्याप्रमाणे ह्या नवाच्छिद्रांच्या निरोधाने बाह्यशुध्दि केली जाते. अशा बाह्यशुध्दनेही अंती ब्रह्मानंदाची प्राप्ती पुरुषास होते. ॥५४॥
देह अत्यंत मलिन आहे. त्याउलट आत्मा अत्यंत निर्मळ आहे. दोहोतील हा उघड फरक जाणल्यानंतर शुध्दिकर्म ते कोणाचे? ॥५५॥
ज्ञानामृताने तृप्त झालेल्या कृतकृत्य अशा योग्याला कोणाचे काहीही करावयाचे शिल्लक राहात नाही. तसे जर करावयाचे शिल्लक असेल तर तो तत्त्ववेत्ताच नव्हे. ॥५६॥
॥उत्तरगीतेचा प्रथमाध्याय समाप्त ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 05, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP