TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पुराणे|श्रीसाईसच्चरित|
दोन शब्द

श्रीसाईसच्चरित - दोन शब्द

श्रीसाईसच्चरित या ग्रंथांत श्रीसाईबाबांच्या अद्भुत लीलांचा व उपदेशांचा संग्रह आहे.


दोन शब्द
(ग्रंथकर्ते कै० गोविंदराव रघुनाथ दाभोलकर ऊर्फ अण्णासाहेब यांचें संक्षिप्त चरित्र व भक्तांस सूचना)

महाराष्ट्राचें महाभाग्य म्हणून प्राय: प्रत्येक पिढीला कोणीतरी महापुरुष जन्माला येऊन जडजीवोद्धार करीत असतो. सुमारें ९५ वर्षांपूर्वीं नगर जिल्ह्याची धार्मिक परिस्थिती अतिशय बिकट होती. महाराष्ट्रांतील इतर कोणत्याही जिल्ह्यापेक्षां या जिल्ह्यांतील दुष्काळामुळें परिस्थितीचा फायदा घेऊन तेथील गरीब जनतेस खिस्ती धर्माची दीक्षा देण्याचें काम सुरू झालें. अशा वेळीं वयाच्या १५-१६ व्या वर्षीं श्रीसाईबाबा शिर्डीस आले. त्यांच्या अद्भुत लीलांचा व उपदेशांचा संग्रह या ग्रंथांत कै० गोविंदराव ऊर्फ अण्णासाहेब रघुनाथ दाभोलकर यांनीं केला. त्यांनीं हा ग्रंथ लिहून श्रीसांईभक्तांवर अनंत उपकार करून ठेविले आहेत. कोणी या प्रासादिक ग्रंथाचें ७ दिवसांचें पारायण करतात, तर कित्येक निदान एक अध्याय अगर कांहीं ओंव्या दररोज वाचीत असतात.

कै० अण्णासाहेब दाभोलकर यांचा जन्म सन १८५६ सालीं मागशीर्ष शु. ५ रोजीं ठाणें जिल्ह्यांत कुडाळ देशस्थ, गौड ब्राम्हाण जातींत झाला. त्यांचे वडील देवभक्त होते. त्यांची घरची स्थिति अत्यंत गरीबीची; तशांत त्यांचे वडील त्यांच्या लहानपणीं वारल्यामुळें शिक्षण फार श्रमानें करावें लागलें. इंग्रजीं पांचवी इयत्ता पास झाल्यावर पुढील अभ्यासक्रम सोडावा लागून घरीं रहाणें भाग पडलें. जरी घरची स्थिती गरीबीची होती, तरी त्यांचा स्वभाव लहानपणापासूनच अत्यंत उदार होता. गरीब स्थितीमुळें व दुसरें कांहींएक उदरनिर्वाहाचें साधन नसल्यामुळें त्यांना सुरवातीस आठ रुपयांची शाळामास्तरची नोकरी करावी लागली. नोकरी उत्कृष्ट रीतीनें कांहीं दिवस केल्यानंतर त्यांची हुषारी व प्रेमळ स्वभाव यांमुळें त्यांना कै० साबाजी चिंतामण चिटणीस (त्या वेळचे ठाणें जिल्ह्याचे डेप्युटी कलेक्टर) यांच्या मदतीनें तलाठयाची जागा मिळाली. वृत्ति आनंदी असून त्यांना गोरगरीबांचा परामर्ष घेण्यांत फारच उल्हास वाटे. त्यांचा स्वभाव फार मेहनती व कचेरींतील कामासंबंधानें फार कर्तव्यदक्ष असल्यामुळें कलेक्टरसाहेबांची त्यांच्यावर दिवसानुदिवस मेहरबानी वाढत गेली व थोडयाच दिवसांत, ते रेव्हेन्यु खात्याची परीक्षा पास झाल्यावर, त्यांची महाड येथें अव्वल कामवर नेमलें. अन्नवाटपाची योग्य व्यवस्था झाल्यामुळें तेथील लोकांचें त्यांचेवर फारच प्रेम बसलें. ह्या निरपेक्ष भगवत्सेवेमुळें त्यांस १९०१ सालीं कायम मामलेदाराची जागा देण्यांत आली. त्यानंतर १९०३ ते १९०७ पावेतों वांद्रें येथें रेसिडेंट मँजिस्ट्रेट फर्स्ट क्लासचें काम केलें. १९०७ सालीं त्यांची बदली खेड जिल्ह्यांत झाली व १९१० सालांत वांद्रा येथें रेसिडें मँजिस्ट्रेटच्या जागेवर पुन्हां त्यांची नेमणूक झाली. या जागेवर १९१६ मार्च अखेरपावेतों राहून ते सेवानिवृत्त झाले.

कै० अण्णासाहेब हे १९०३ ते १९०७ सालांत वांद्रें येथें असतांना त्यांचा विशेष स्नेह कै० हरी सीताराम दीक्षित साँलिसिटर ह्यांच्याबरोबर जमला. ते दोघेही श्रीभगवद्नीता वाचीत असत. दोघांपैकीं कोणासहि जर महात्मा पुरुष भेटला तर एकमेकांस त्याची बातमी द्यावी. दीक्षित यांस १९०९ सालीं कै० नानासाहेब चांदोरकर यांचे द्वारें श्रीक्षेत्र शिर्डी येथील श्रीसद्‌गुरु सांईबाबांचें पहिलें दर्शन झालें. अशा अलौकिक महात्म्याचें दर्शन कै० अण्णासाहेबांस घाडवावें म्हणून त्यांनीं आपल्या दर्शनाची सर्व हकीकत कै० अण्णासाहेबांस आनंद मुक्कामीं ते रेसिडेंट मँजिस्ट्रेट असतांना कळविली. ती वाचून अण्णासाहेबांस श्रीसाईबाबांचे दर्शनाची अत्यंत उत्कंठा लागली व त्यामुळें त्यांनीं एक महिना रजेचा अर्ज, उत्तरभाग कमिशनर साहेबांस केला, परंतु ‘सध्यां रजा देतां येत नाहीं’ असें त्यांस उत्तर मिळालें. थोडया दिवसांनीं कमिशनर साहेबांचा मुक्काम आनंद येथें आला. अण्णासाहेबांनीं त्यांची प्रत्यक्ष गांठ घेऊन आपणांस वांद्यास तरी बदला अशी विनंति केली. पण कमिशनरसाहेबांनीं ती नाकारली. कारण वांद्रें येथें दोन वेळां त्यांनीं मँजिस्ट्रेटचें काम केलें होतें व पुन्हां त्याच जागेवर नेमणें योग्य दिसलें नाहीं. त्यांना तर साईबाबांचे दर्शनाची फारच उत्कंठा लागली होती. त्यामुळें श्रीगुरुमाउलीचें अंत:करण कळवळलें व त्यांनीं अघटित घटना केली. कमिशनर साहेबांचा मुक्काम आठ दिवसांत एकदम आनंदहून ठाण्यास आला व तेवढयांत एका असिस्टंट कलेक्टरचे अकस्मात मृत्यूमुळें वर्गावर्गी करितां वांद्याची जाग पुन्हां खालीं पडली. त्यामुळें ताबडतोब कमिशनरनें तारेनें अण्णासाहेबांस वांद्रें येथें रेसिडेंट मँजिस्ट्रेट नेमिलें. त्या जागेचा चार्ज घेतल्याबरोबर त्यांनीं दहा दिवसांची किरकोळ रजा घेऊन ताबडतोब आपल्या सर्व कुटुंबासह श्रीसद्नुरु साईबाबांचें प्रथम दर्शन घेतलें. त्या वेळच्या भेटीच आनंद काय वर्णन करावा ! सद्नुरु माउलीनें सूचक रूपानें त्यांचा पूर्व इतिहास सर्वांदेखत सांगितला. तो ऐकून ते तर थक्कच झाले ! पुढें सद्रुरुरायांचें त्यांच्यावर एवढें प्रेम बसलें कीं त्यांनीं त्यांस ‘हेमाडपंत’ हा किताब दिला. आणि आपल्या पश्चात्‌ त्यांच्याकडून श्रीसाईसच्चरिताचे ५२ अध्याय पुरे करून घेतले. हे साईलीला मासिकांत प्रसिद्ध झालेले आहेत. शेवटचा ५२ वा अध्याय निधनापूर्वीं दोन दिवसच अगोदर त्यांनीं छापावयास पाठविला व हा माझा शेवटचा अध्याय म्हणून आपल्या काहीं स्नेह्यांस आणि नातलगांस दोनतीन दिवस अगोदर कळविलें. त्यानीं १९१६ सालीं पेन्शन घेतल्यापासून आपलें आयुष्य परमार्थपर व परोपकारार्थ घालविलें.

त्यांचें रोजचे भगवत्सेवेचे नियम फार असत. स्नान-संध्या आटपल्यावर श्रीगुरुचरित्र वाचणें, श्रीविष्णुसहस्रनामाचें पठण, एकनाथी भागवत व रामायण वाचणें, कांहीं उपनिषदें व श्रीमद्भगवद्नीता वगैरे आध्यात्मिक ग्रंथांचा अभ्यास करणें हा परिपाठ होता. शेवटीं सुमारें एक महिना ते दररोज श्रीकृष्ण-निधनाचा श्रीएकनाथी भागवतांतील विसावा अध्याय मोठया प्रेमानें वाचीत असत. हे सर्व नियम पाळून ते शिर्डी संस्थान, श्रीसांईलीला मासिक वगैरे सर्व कामें करून आपल्या कामांची रोजची डायरी व्यवस्थित टिपून ठेवीत.

कोणी श्रीमंत अगर गरीब भेटावयास आल्यास आपला वेळ खर्च करून त्याचेबरोबर ते प्रेमानें बोलत असत. त्यांची वृत्ति सदैव आनंदी. कथा कीर्तनें ऐकण्याची हौस, त्यामुळें आमंत्रणाची वाट न पाहातां ऐकावयास जात. गरीब विद्यार्थ्यांस शिक्षणासाठीं त्यांनीं पुष्कळ मदत केली आहे. कोणीं कांहीं मागितल्यास ते केव्हांहि नकार देत नसत. ते गरीबींतून वर आले असल्यामुळें गरीबांच्या अडचणी जाणून होतां होईतों मदत करीत. भेटावयास कोणी आल्यास त्यांना कांहीं खावयास दिल्याशिवाय त्यांच्यानें राहवत नसे. त्यांचे स्नेही सर्व जातींमधून आहेत.

अशा प्रकारें कै. अण्णासाहेबांनीं प्रपंच करून परमार्थही उत्तम प्रकारें साधला. त्यांचें निधन ता. १५ जुलै १९२९ रोजीं दुपारीं त्यांच्या स्वत:च्या बंगल्यांत एकाद्या योगभ्रष्टास साजेल अशा प्रकारें आकांक्षणीय झालें.

श्रीसाईनाथांच्या कृपेनें, अण्णासाहेबांनीं या ग्रंथरूपानें ही अमूल्य देणगी मागें ठेवली आहे, त्याचा उपयोग वाचकांनीं अवश्य करून द्यावा, शेवटच्या अध्यायांतील १८२ ते १९४ ओंव्यांत सुचविल्याप्रमाणें या ग्रंथाचें पारायण अगर सप्ताह साईभक्तांनीं करून अनुभव घ्यावा.

श्रीसाईमहाराजांचे भक्त कै० हरी सीताराम दीक्षित यांनीं या ग्रंथाचे ३५ अध्याय पूर्ण झाल्यावर श्रीसांईलीलेंत एक उपोद्धात प्रसिद्ध केला. तसेंच ग्रंथ पुरा झाल्यावर सांईभक्त कै० बाळकृष्ण विश्वनाथ देव यांनीं प्रस्तावना लिहिली. श्रीसांईमहाराजांकडे येणार्‍या हजारों भक्तांपैकीं भक्तश्रेष्ठ कै० अण्णासाहेब दाभोलकर हे एक होते. कै० अण्णासाहेबांकडून या प्रासादिक ग्रंथाचे ५२ अध्याय पूर्ण झाल्यावर ५३ व्या अध्यायाचीं म्हणजेच अवतरणिकेचीं टिपणेंहि त्यांनीं तयार केलीं होतीं, पण याच वेळीं अण्णासाहेब या जगाचा पसारा सोडून बाबांचे चरणीं विलीन झाल्यामुळें सदर टिपणें मिळालीं नाहींत. कै० देव ऊर्फ ‘बाबांचें बाळ’ यांनीं ही अवतरणिका पुरी केली. उपरिनिर्दिष्ट उपोद्धात व प्रस्तावना असे दोन्ही लेख या ग्रंथांत दिले असले तरी कै० बाळासाहेब देव यांच्या प्रस्तावनेंत ग्रंथवाचनाचें महत्त्व तसेंच गुरुचरित्रावर आजपर्यंत किती व कोणी ग्रंथ लिहिले वगैरे माहिती पूर्णपणें दिली आहे.

हल्लीं मुंबई. पुणें, गुजराथ, कलकत्ता, मद्रास. वगैरे  शिरडीहून फार लांब असलेल्या जागीं श्रीसांईमहाराजांचे उत्सव सार्वजनिक रीतीनें साजरे केले जात आहेत. तसेंच निरनिराळ्या प्रांतांतून असंख्य लोक त्यांच्या समाधीचें दर्शन घेण्यासाठीं दररोज शिरडी येथें येतात. अशा वेळीं प्रत्येकानें फारच सावधगिरीनें रहावें अशी सूचना द्यावीशी वाटते. “आपण श्रींचे पट्टशिष्य आहों, बाबा आपल्याशिंच प्रत्यक्ष बोलतात, तुझ्यासाठीं अमूक संदेश दिला आहे, तुझें म्हणणें मी बाबांना सांगेन, तुझें काम लवकर होईल,” वगैरे तर्‍ह्रेची बुवाबाजी ठिकठिकाणीं चालू असल्याचें दिसून येतें; इतकेंच नव्हे तर प्रत्यक्ष शिरडींत सुद्धां असे लोक आहेत कीं, “श्रींची प्रार्थना केल्यावर दररोज बाबा आपल्याशीं बोलतात” असा प्रचार आपल्या सहकार्‍यांमार्फतहि करण्यास कमी करीत नाहींत. एकमेकांच्या सहवासानें प्रथमच शिरडींत आलेला गृहस्थ शिरडीची विशेष माहिती नसल्यामुळें अशा बुवाबाजीच्या आहारीं जाण्याचा बराच संभव असतो.

श्रीसांईबाबा प्रत्यक्ष परमेश्वर असून स्वत: मनोभावानें केलेली प्रार्थना त्यांना पोहोंचते: त्यासाठीं मध्यस्थांची आवश्यकता नाहीं, याचें प्रत्यंतर श्रीसांईबाबांच्या हजारों भक्तांना आहे, त्यांच्या समाधीचें दर्शन, त्यांचें स्मरण, मनन, वाचन वगैरे करीत असल्यास हा अनुभव खात्रीनें येतो. श्रीसांईबाबांचे वेळींहि असे पुष्कळ ढोंगी लोक तेथें येत आणि फजित होऊनच परत जात. कै० मुक्ताराम( रावेर, खानदेश) हे श्रींच्या वेळीं शिरडींत होते. श्रीसांईनाथांनीं देह ठेवल्यावर दोन दिवसांनीं ह्या गृहस्थांनीं तेथील लोकांस सांगितलें. “श्रीबाबांनीं मलाच आपल्या जागीं द्वारकामाईंत बसण्याचा आदेश दिला आहे. मीच त्यांचा वारस आहें.” कै० तात्याबा कोते पाटील, श्री. रामचंद्र पाटील, वगैरे मंडळींनीं तसें न करण्यसाठीं त्यांना समजावून सांगितलें पण कोणाचें न ऐकतां सर्वांना झिडकारून बाबा बसत त्या जागीं जाऊन बसले. अगदीं थोडयाच वेळांत त्यांना खालून सुय टोंचूं लागल्या व रक्त पडूं लागलें. त्या जागेवरून बाजूला बसले तरी तीच स्थिति; शेवटीं सातआठ दिवसांतच भयंकर हालांत त्यांनीं श्रींची क्षमा मागून प्राण सोडला. यांची समाधी लेंडीबागेंत आहे. असेच हक्क सांगणारे आणखी तीन चार गृहस्थ त्या वेळीं होते, पण वरील स्थिती पाहून ते दुसर्‍या ठिकाणीं गेले.

असा कोणी ढोंगी बुवाबाजी करूं लागला, आपण कोणीतरी मोठे महाराज आहों अशी स्वत:ची समजूत करून घेऊं लागला, तर “बरोबरी करतोस का ?” असें म्हणून त्याला श्रीसांई जागें करीत असत. पण आज श्रीबाबांच्या द्वारकामाईंत आणि समाधिमंदिरांतहि कांहीं लोक “श्रीबाबाच माझ्यांत अवतीर्ण झाले आहेत,” असें लोकांस भासवून स्वत:च्या पाया पडून घेतात. आपल्या सद्‌ग्रुरूची बरोबरी करण्याचें धाडसे जीं माणसें करितात त्यांचा शेवट कसा होतो हें वरील गोष्टीवरून दिसून येईल.

अशा कृत्यांना उत्तेजन देणारे बहुधा सुशिक्षित समाजांतले असून अशा महाराजांचें प्रस्थ वाढविण्यसाठीं ते आपल्या हस्तकांतर्फें प्रचारही जोरांत करितात. जगांत प्रत्येक बाबतींत जसे साधू तसे भोंदूहि आढळतात. परमार्थाच्या बाबतींत तर याचा भरणा पुष्कळ आहे. कारण परमार्थ हा बुद्धीपलीकडचा विषय असून त्यामध्यें थोडया फार श्रद्धेवांचून पाऊल पुढें पडणें अशक्य. खोटें नाणें नको म्हणून व्यवहारांत भागेल का ? परंतु तें जसें आपण पारखून घेतों तसेंच साधूहि पारखून घ्यावा लागतो. बाबा म्हणत असत कीं, “माझीं हाडें समाधींतून बोलतील, लोक मुंगीसारखे येतील. माझ्या लेंकरांना मी चिमणीसारखे पायाला दोरा बांधून माझ्याकडे आणीन” वगैरे, ही प्रचीति आतां येत आहे.

बुडती हे जन न वहावे डोळां । म्हणुनी कळवळा येतो त्यांचा ॥

असे तुकाराम महाराजांचे शब्द आहेत. खर्‍या साधूचें अंत:करण मानवी जीवाच्या कल्याणाकरितां तळमळत असतें. हें काम इतर जनांच्या प्रचारकार्यानें होणार नाहीं. प्रचार करणारांनाही सद्‌गुरूचा आदेश (आशीर्वाद) असावा लागतो.

बहुधा सुरवातीस मनुष्य आपला कार्यभाग साधण्यासाठीं ईश्वराची प्रार्थना सकाम करीत असतो अगर अशा पवित्र स्थानांत किंवा एकाद्या सत्पुरुषाच्या दर्शनास जात असतो. हल्लीं हजारों लोकांना श्रीबाबांचे अनुभव असून भोंदूहि बर्‍याच ठिकाणीं आपला मुलामा चढवीत आहेत. श्रीसाईमहाराज ‘जन्मसिद्ध’ पुरुष होते. ध्येयप्राप्तीला साधकांचा प्रयत्न हा पाहिजेच; पण नुसत्या प्रयत्नानें यश येत नाहीं. तर त्या प्रयत्नांत यश येण्यास ईशकृपेचें सहाय्य लागतें. परमार्थसाधकांची देखील गोष्ट अशीच आहे. साधकांच्या प्रयत्नास यश येणास गुरुकृपा पाहिजे. गुरुकृपेवांचून परमार्थांत योग्य स्थान गांठतां येणार नाहीं. गुरूकृपेवरोबर ईश्वरकृपाही पाहिजे.

गुरुद्वारा पाविजे ज्ञान । तेथें ईश्वराचा आभार कोण । येथ ईश्वरकृपेवीण । सद्नुरु जाण भेटेना ॥
झालिया सद्नुरुप्राप्ति । ईश्वरकृपेवीण न घडे भक्ति । सद्नुरु तोचि ईश्वरमूर्ति । वेदशास्त्रार्थीं संमत ॥
गुरुईश्वरां भिन्नपण । देखे तो नागवला आपण । एवं ईश्वरानुग्रहें जाण । ज्ञानसंपन्न होय जीवु ॥

(ए. भा. अ. २२)

ईश्वरी कृपेवांचून सद्रुरूची गांठ पडणें शक्य नाहीं. असें योगवासिष्ठांत यावरूनच म्हटलें आहे. मायाळू आईबाप मिळणेंहि सर्वस्वी सुदैवावरच अवलंबून असतें.

श्रीसाईबाबांची गुरुकिल्ली अगदीं निराळी आहे. जशी कासवी आपल्या पिलांना कांहीं न देतां आपल्या नजरेनें त्यांचें पोट भरीत असते, त्याचप्रमाणें आमच्या सद‌गुरूंनीं कोणालाही उपदेश अगर मंत्र न देतां आपल्या कृपेनेंच निरनिराळ्या वेळीं भक्तांच्या योग्यतेप्रमाणें त्यांना ब्रह्मानंद मिळवून दिला. श्री. ह. भ. प. दासगणू महाराजांना पंढरपूर वारीला जाण्याची अतिशय आवश्यकता वाटूं लागल्यावर आपणच श्रीपांडुरंग आहों, पंढरीस जाण्याची आवश्यकता नाहीं, हें दाखविण्यासाठीं शिरडींतील द्वारकामाईंतच स्वत: श्रीपांडुरंग होऊन दर्शन दिलें. कै० बापूसाहेब जोग जांनीं श्रीसद्नुरु अक्ककोट स्वामींचें दर्शन घेण्याची इच्छा प्रकट केली. आणि त्यांनीं इतका हट्ट धरला कीं दुपारच्या आरतीसहि आले नाहींत. आरतीच्या वेळीं श्री ॥ नीं दोन वेळां बोलाविण्यास पाठविल्यानंतर आले. आरती झालीं आणि बाबांपुढें नमस्कार घालतांना तेथें हजर असलेल्या सर्वांनाच श्रीसाईनाथांनीं श्रीअक्कलकोट स्वामींचे रूपांत दर्शन दिलें. अशा महात्म्याची कृपा मिळविण्यास मध्यस्थांची आवश्यकता पाहिजे का ? श्रीपांडुरंग, भगवान कृष्ण, रामचंद्र प्रभु आदि देवतेचे जसे कोणी शिष्य होऊं शकत नाहींत तसेंच श्रीसद्रुरु सांईनाथांचेही कोणी शिष्य त्यांच्या हयातींत झालें नाहींत. आतांही नाहींत व पुढेंही नाहींत. आपण सर्व त्यांचे भक्त आहोंत. प्रेमानें आपल्या दवतेला प्रसन्न करून घेतां येतें, हें ह्या ग्रंथांत अनुभवावरून दिसून येईल. हल्लींहि असे अनुभव बहुधा प्रत्येकाला येत आहेत. श्रीसांईनाथांमुळेंच शिरडी गांवाला महत्त्व आलें आहे. इतकेंच नव्हे तर पंढरपूर, गाणगापूर, नासिक, रामेश्वर, बद्रीनारायण, प्रयाग, काशी यांप्रमाणें शिरडी हें क्षेत्र झालें असून जागृत स्थान आहे; म्हणून श्रीसांईबाबांना संत, गुरु अगर देव मानणार्‍यांना पुन्हां सुचवावेंसें वाटतें कीं श्री ॥ च्या चरणीं जें मागणें असेल तें शिरडींत अगर जगाच्या पाठीवर कोठेंही राहून भक्तिभावानें आणि विश्वास ठेवून मागावें. सबुरी असूं द्यावी. मनोरथ पूर्ण होतील. पण नकळत बुवाबाजीच्या आहारीं जाऊन स्वत:ची व दुसर्‍याची फसवणूक करूं नये.

श्रीसांईबाबांचे परमभक्त कै० हरी सीताराम दीक्षित ऊर्फ काका यांचा उल्लेख या ग्रंथांत पुष्कळ ठिकाणीं आला आहे. ते श्रीबाबांचे निस्सीम भक्त होते. दक्षिण भारतांतील १-२ भक्तांनीं प्रसिद्ध केलेल्या आपल्या पुस्तकांत श्रीसांईबाबा हे मुसलमान असून त्यांचा जन्म हैद्राबाद मधील एका गांवीं झाल्याचें नमूद केलें आहे. यासंबंधीं कै० दीक्षित यांनीं २५ वर्षांपूर्वीं सांईलीलेंत प्रसिद्ध झालेल्या उपोद्धातांत सुरवातीसच माहिती दिली आहे. बाबांचें नांव “साईबाबा” कोणीं ठेविलें, बाबांकडे येणारे गृहस्थ, त्यावेळची परिस्थिती वगैरे माहिती भरपूर असल्यामुळें हा उपोद्धात या ग्रंथाच्या सुरवातीस दिला आहे. श्रींचे कान टोंचलेले होते असें श्रींच्या सान्निध्यांतील पण हल्लीं हयात असलेले श्री. रामचंद्र दादा पाटील, सगुण मेरू नाईक, बाप्पाजी रत्नपारखी, दगडू सोनार वगैरे शिरडी येथील गृहस्थ सांगतात. ते हिंदू होते कीं यवन होते याचें संशोधन करण्याचें कांहींच कारण नाहीं. यासंबंधीं ७ व्या अध्यायांत हेमाडपंतांनीं लिहिलें आहेच. श्रीबाबांच्या ठिकाणीं सर्व धर्म होते. झाड कितीही मोठें असो, तें कोणी लावलें अगर झाडावर फळें किती आहेत, वगैरे मोजणी न करतां आपण त्यावरील गोड फळें कशीं मिळतील तें पहातों. पण साधु-संतांची जात-धर्म पहाण्याचा मोह आपण टाळीत नाहीं.

आपल्या धर्मांत मनुष्यानें आपला दैनंदिन आयुष्यक्रम कसा चालवावा याबद्दल पुष्कळच नियम आहेत. त्यांतच प्रार्थनेचा समावेश होतो. प्रपंचांत राहून निर्विकल्प प्रार्थना करणार्‍यास मुक्ति मिळूं शकते हें तत्त्व सन्त तुकाराम व एकनाथ महाराजांनीं दाखवून दिलें आहे. प्रार्थनेंत नामस्मरण, कीर्तन मनन, वगैरेंचा समावेश होतो. धार्मिक ग्रंथांचें वाचन हाही एक भाग, प्रार्थनेचा असल्याचें कैं. देव यांच्या प्रस्तावनेवरून दिसून येईल. आपल्या दररोजच्या २४ तासांपैकीं निदान २४ मिनिटें जरी एकाग्र मन करून प्रार्थनेकडे खर्च केलीं, तरी मन शान्त होईल. प्रार्थनेचें बल अवर्णनीय आहे. पूर्वसंचितानुसार ऐहिक सुखदु:खें मनुष्यास भोगावयाचीं असल्यानें नशिबीं असलेलें कोणासही टाळतां येत नसलें. तरी या जन्मींची सेव आणि सत्कृत्यें पुढील जन्मांतील संचित ठरत असतात. प्रार्थना ही वैयक्तिक अगर सामुद्रायिक असो, ती त्या त्या श्रेणीनें यशस्वी होत असते. साधक अथवा मुमुक्षु कोणीही असो, त्यानें आपल्या गुरुवर सत्य प्रेम ठेऊन स्वतंत्र बुद्धीनें विचार, अभ्यास व निदिध्यास केल्यास ज्याच्या योग्यतेप्रमाणें गुरुकृपा होईल, ही खात्री आहे.

गुरुपौर्णिमा, ता० १८-७-१९५१
शिरदी
नागेश आत्माराम सावंत
Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2014-06-19T05:34:27.1230000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

capital intensive industry

  • पूंजी प्रधान उद्योग 
RANDOM WORD

Did you know?

Request for Anagha Ashtami Puja vrat Sagrasangit Puja
Category : Hindu - Puja Vidhi
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site