समओवी चांगदेवपासष्टी

ज्ञानेश्वरी, अमृतानुभव आणि चांगदेव पासष्टी या तिन्ही ग्रंथांतून काव्य आणि तत्वज्ञान संत ज्ञानेश्वर आपल्या विलक्षण भाषासौंदर्याने मराठी माणसाला विस्तारून सांगतात.


कल्याण करो श्रीवटेश । जो लपोनि दावी जगदाभास । मग प्रकटोनि ग्रास । तयाचा करी ॥१॥

प्रकटे तों तों न दिसे । लपे तों तों आभासे । प्रकट ना लपला असे । अलिप्त जो ॥२॥

बहु जों जों होई । तों तों काहीचि होत नाही । काही न होउनि आहेही । अवघाचि जो ॥३॥

सोने सोनेपणासि उणे- । न आणिताचि, झाले लेणे । तैसे स्वयें न विकारता होणे- । जग जयायोगें ॥४॥

तरंगप्रावरणे अनेक । न फेडिताचि उघड ते उदक । तैसा जगासह परमात्माचि एक । सम्यक्‌स्वरूप जो ॥५॥

दाटीवाटीने परमाणूंचिया । पृथ्वीपण नच जाई वाया । तैसे विश्वाचे आविष्कारीं या- । जो न झाके ॥६॥

कलांचे पांघरुणें । चंद्रमा हरपो न जाणे । की वन्ही दीपपणें । अन्य न होय ॥७॥

म्हणोनि अविद्येचे निमित्ताने । दृश्य-द्रष्ट हे भाव वर्तणे । ऐसे मी न जाणे । स्वरूपीं ते आयतेचि ॥८॥

जैसे नाममात्र लुगडे । एरवी सूतचि ते उघडे । वा माती आणि सुगडे । ज्यापरी की; ॥९॥

द्रष्टा-दृश्यातीत दशेत तैसे । ज्ञानमात्र जे विलसे । तेचि द्रष्टा-दृश्यमिषें । केवळ होय ॥१०॥

अलंकार ऐशा अभिधानें । असावे निखळ सुवर्णें । वा अवयवसमुच्चयाने । अवयवधारी जैसा; ॥११॥

तैसे शिवापासुनि पृथ्वीपावत । पदार्थांचे प्रकार भासत । परमवस्तूचि करी प्रकाशित । एकसरे या वैविध्यासी ॥१२॥

नाही नाही ती चित्रे दावितो । परि असती केवळ भिंती । पकाशे आत्मवस्तूचि ती । जगदाकारें ॥१३॥

गुळाची ढेप होय । परि गोडी न बांधली जाय । तैसे अमित हे आत्मतत्त्व । जगद्रूपी ॥१४॥

घडीचे आकारें । प्रकटावे जैसे अंबरें । तैसी विश्वाचे आविष्कारें । स्फुरे स्फूर्तीचि ही ॥१५॥

सुखदुःखें न लिप्त क्षणही । जगदाकारें स्फुरेही । आपणाचिसन्मुख होई । आपणचि जे; ॥१६॥

तयासीचि दृश्य हे नाव । जेणे द्रष्टेपण पावे आत्मतत्त्व । जैसे बिंबा लाभावे बिंबत्व । प्रतिबिंबायोगें ॥१७॥

आपणासचि आपुल्या ठायी । दृश्यरुपें आणुनी ठेवी । द्रष्टा-दृश्य-दर्शन-त्रिपुटी ही । मांडे ऐसी ॥१८॥

गुंडया सुताचिया । आतबाहेरी न दुज्या । तैसी तीनपणाविण या । जाणावी त्रिपुटी ॥१९॥

नुसते मुख जैसे । देखावे दर्पणमिषें । ते व्यर्थचि देखने ऐसे । गमू लागे; ॥२०॥

भेददशेसि न जाता तैसे । आत्मवस्तु त्रिधा भासे । हीचि प्रसिद्ध असे । उपपत्ती येथ ॥२१॥

उभारिला दृश्याचा पसारा । तेचि द्रष्टेपण व्यवहारा । दोहोतिल शोधिता अंतरा । दृष्टीचि पंगू होय ॥२२॥

जेव्हा नाही दृश्य- । दृष्टी घेउनि करिसी काय ? । आणि दृश्याविण का होय । द्रष्टेपणही ? ॥२३॥

म्हणोनि दृश्याचे आभासेंही । दृष्टी-द्रष्टेपण सार्थ होई । पुढे दृश्य गेल्यावरीही । तैसेचि दोन्ही ॥२४॥

त्रिपुटी ही आत्मतत्त्वाचीच मूळ । तिन्ही जाता एकचि सकळ । म्हणोनि तीन ही भ्रांती केवळ । एकपण साच ॥२५॥

दर्पणाचे आधी वा अंतींही । मुख असेचि मुखाठायी । मध्ये दर्पणीं देखोनीही । अन्य काही होय ? ॥२६॥

पुढे दिसे त्यायोगें । देखते ऐसे गमो लागे । परि ते दृष्टीसी वावगे । चकविणे होय ॥२७॥

म्हणोनि दृश्याचिये मिषें । दृश्य-दृश्यपणावेगळे ऐसे । वास्तविक आत्मवस्तु न्याहाळीतसे । स्वतःसीचि ॥२८॥

वाद्यजाताविण ध्वनी । काष्ठमात्राविण अग्नी । तैसे दृश्यादि भावा नाशुनी । आत्मा स्वयेंचि असे ॥२९॥

जे म्हणता न ये ऐसे ऐसे । जाणिता नये ते कैसे । तरि असेचि असे । असणे जया ॥३०॥

पाहण्या आपुल्या बुबुळा । दृष्टी असोनि अक्षम डोळा । तैसा आत्मज्ञानीं दुबळा । ज्ञानरूप जो ॥३१॥

जे जाणणेचि की ठायी । न जाणणे साचचि नाही । परि जाणणे म्हणताही । जाणणे कैसे ?  ॥३२॥

यालागी मौनेंचि बोलावे । काही नसोनि सर्व व्हावे । काही न होता लाभावे । जे काहीचि नाही ॥३३॥

नाना बोधांचे सोयरिकेतून । ज्ञानातचि एके साचपण । नाना कल्लोळमालिकांतून । पाणीचि जैसे ॥३४॥

जे दृश्यत्वाविण । एकलेचि देखतेपण । हे असो, आपणा आपण । आपणचि जे ॥३५॥

कोणाचे न होताचि असणे । कोणाचेही नसता दिसणे । कोणाचे न लागताहि भोगणे । ऐसा केवळ जो ॥३६॥

पुत्र तू वटेश्वराचा । अंश जैसा कापुराचा । तुझा माजा आपणाचा । चांगदेवा, बोल ऐक ॥३७॥

ज्ञानदेव म्हणे । तुज माझा बोल ऐकणे । तळहातें तळहाता मिठी देणे- । ज्यापरी की ॥३८॥

बोलेंचि बोला ऐकावे । स्वादेंचि स्वादा चाखावे । की उजेडें देखावे । उजेडा जैसे; ॥३९॥

सोन्या कस सोनेचि जैसा । की मुखचि मुखासि होय आरसा । माझा-तुझा संवाद तैसा । चक्रपाणी ॥४०॥

गोडीने आपुली गोडी घेता । काय राहे मुखीं न समावता ? । आमुच्या परस्पर प्रेमभावात आता । तीचि परी आहे ॥४१॥

सखया तुझेचि उद्देशें । भेटाया जीव उल्हासे । परि भय वाटे विस्कटेल ऐसे । स्वयंसिद्ध भेटीने ॥४२॥

तुझे दर्शन घेऊ पाही । तोंचि मन स्वरूपासी येई । तेथ असंभवनीयचि दर्शनही । ऐसे वाटू लागे ॥४३॥

काही करी, बोले, कल्पीही । वा न करी, न बोले, कल्पीना काही । दोन्ही तुझ्या स्वरूपीं ही । न येती उमटू ॥४४॥

चांगया तुझे नावें । करणे न करणे न व्हावे । हे काय म्हणू, परि न धरवे । मीपण हे ॥४५॥

लवण पाण्यात । मिळोनि जात । तेचि नाही, मग कैसे घेत । माप जळाचे ? ॥४६॥

आत्मस्वरूपा, तुज भेटू जावे । पाहो जाता मीचि नुरावे । तेथ तुज कैसे म्हणावे- । कल्पावयाजोगे तरी ? ॥४७॥

जो जागोनि नीज देखे । तो जागण्यासीही मुके । तैसा तुज पाहोनि मी ठाके । काही न क होउनी ॥४८॥

अंधाराचे ठायी । सूर्यप्रकाश तर नाही । तरि ‘मी आहे’ हे काही । नष्ट न होत जैसे; ॥४९॥

तैसे स्वरूप तुझे असता शोधित । तूपण-मीपण यासकट येथ । सर्वचि नाहीसे होत । उरे भेटचि केवळ ॥५०॥

डोळा दाबिता हातें । डोळाचि चित्र होते । आणि स्वतःसि देखे ते । न डळमळता ॥५१॥

तैसी संवादाची गोष्ट उपजे येथ । परि फूट न पडे दृष्टीत । मी-तूपणाविण भेट होत । माझी-तुझी ॥५२॥

मी-तू या उपाधि ग्रासुनी । ही भेट गा चक्रपाणी, । भोगिली म्यां घोळघोळुनी । अनुवादीं या ॥५३॥

रुचीचेचि मिषे । जेवणारा रुचि भोगितसे । वा दर्पणमिषेंचि देखतसे । देखणारा जैसे; ॥५४॥

तैसे अप्रमेय परमात्म्यासी या । प्रमेयरूपेंचि वर्णावया । एकत्वाची गोष्ट साधिली म्यां । मौनाचेचि अक्षरांनी ॥५५॥

या ऐक्याचे करुनि निमित्त । जाण तू आत्मस्वरूप येथ । दीप दीपपणें रूप पाहत । स्वतःचे जैसे ॥५६॥

येथवरी मी गोष्टी केल्या । म्हणोनि उघडो तव दृष्टी, चांगया, । आपणचि ये भेटीसी आपुल्या । आपणामाजी ॥५७॥

प्रळयीं सागर एक होती । उदके अपार धावती । आपुला उगम गिळिती । तैसे करी ॥५८॥

ज्ञानदेव म्हणे, नामरूपावाचून । साच आत्मस्वरूप जाण । अनुभवुनि ते आनंदजीवन । सुखी होई ॥५९॥

पुन्हा पुन्हा सांगतो तुज, चांगया, । घरा येई हा ज्ञानठेवा । वेद्य-वेदक-भेदातीत या । पदीं बैसे तेव्हा ॥६०॥

अगा चांगदेवा, तुजमिषें । माउली श्रीनिवृत्तिरायें ऐसे । दिधले मज लोभे सहजसे । रसाळ हे अनुभवभातुके ॥६१॥

ज्ञानदेव आणि चक्रपाणी । आरसे डोळस दोन्ही । परस्परांसी पाहताक्षणीं- । मुकले भेदा ॥६२॥

तयापरी जो या ओव्यांसी । दर्पण करील या ठेव्यासी । तो पावेल सुखासी । आत्म्याएवढया ॥६३॥

नाही तेचि काय न जाणो असे । दिसे तेचि काय न जाणो नसे । असे तेचि न जाणो आपोआपसे- । आत्मतत्त्व की होय ॥६४॥

निजेपलिकडचे निजणे । की जागृति गिळोनि जागणे । केले तैसे हे गुंफिणे । ज्ञानदेव म्हणे ॥६५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP