अंजली ठकार परिचय

विसाव्या शतकातील एक मान्यवर कवयित्री व लेखिका म्हणून मराठी साहित्य जगताला अंजली ठकार परिचित आहेत.

अंजली ठकार ( १९३६ - २०१० )

विसाव्या शतकातील एक मान्यवर कवयित्री व लेखिका म्हणून मराठी साहित्यजगताला अंजली ठकार परिचित आहेत. त्या पूर्वाश्रमीच्या प्रभा जुमडे. याच नावाने त्यांच्या सुरुवातीच्या कविता व कथा ‘ सत्यकथा ’ , ‘ मौज ’ या प्रतिष्ठित नियतकालिकांत प्रसिद्ध झाल्या. नंतर यांच्याबरोबरच ‘ वीणा ’ , ‘ स्त्री ’ , ‘ दीपावली ’ , ‘ वाड्‍मयशोभा ’ इत्यादी अन्य नामवंत नियतकालिकांतूनही त्यांचे साहित्य प्रकाशित होत राहिले. तरुणपणीच झालेल्या डोळयांवरील व मेंदूवरील मोठया शस्त्रक्रियांतून आलेल्या शारीरिक अडचणींना न जुमानता आपले लेखन त्या स्वयंस्फूर्त जिद्दीने करीत होत्या. कविता, कथा, लेख, काव्यानुवाद यांचे संग्रह ही रसिकांपर्यंत पोचले. विशेष गाजले ते त्यांचे ज्ञानेश्वर - वाड्‍मयावरील कार्य. भगवदगीता उलगडून सांगणारा ‘ ज्ञानेश्वरी ’ हा आद्य मराठी आध्यात्मिक काव्यग्रंथ खरा, परंतु सातशे वर्षांपूर्वीची त्यातली मराठी भाषा आजच्या मराठी जनांना समजणे दुरापस्त होते. गद्य अर्थ सांगणार्‍या निरुपणांतूनच आध्यात्मिक आशय त्यांना समजून घ्यावा लागतो; त्यामुळे ज्ञानेश्वरीच्या काव्यात्म ललित्याला ते पारखे होतात. ज्ञानेश्वर - काव्याचे सौंदर्य प्रत्ययाला येईल व त्यातील आध्यात्मिक आशयही स्पष्ट होईल असे ज्ञानेश्वरीचे आजच्या मराठीत ओवीला ओवी ( ‘ सम ओवी ’ ) रुपांतर अंजली ठकार यांनी पूर्ण केले. त्याला कमालीची लोकप्रियता व विद्वन्मान्यता लाभली. नंतर त्यांनी ‘ अमृतानुभव ’ आणि ‘ चांगदेवपासष्टी ’ या ज्ञानेश्वर वाड्‍ मयाचेही तसेच रुपांतर केले; तेही उत्तम प्रसिद्धी पावले.

N/A

References :

सौजन्य - अंजली ठकारांचे सुपुत्र.
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP