अमृतानुभव - जीवन्मुक्तदशाकथन

अमृतानुभव हा ज्ञानेश्वरांना ज्ञानेश्वरी लिहून झाल्यावर आलेला अनुभव आहे.


आता सुगंध नासिका जाहले । शब्दासि कर्ण फुटले । आरसे प्रगटले लोचनांसह ॥१॥

आपणचि वारा होऊन । हेलावती विंझण । मस्तकेचि चाफे होउन । धुंदावती ॥२॥

जिव्हा ओथंबली रसें । कमळ सूर्य होउनि विकसे । चकोरचि जैसे । चंद्रमा जाहले ॥३॥

फुलेचि झाली भ्रमर । तरुणीचि झाल्या नर । झाला आपुले शेजघर । झोपाळूचि ॥४॥

सोन्याची लगड सुंदर । ठेवा हा मनोहर । की घडविला अलंकार । कोरीव जैसा; ॥५॥

तैसा भोक्ता आणि भोग्य । देखणारा आणि दृश्य । हे सरले अक्षय- । अद्वैतामाजी ॥६॥

शेवंतीपणाबाहेरी । न निघताचि परी । पाकळ्या सहस्त्रवरी । उमलाव्या जैशा; ॥७॥

तैसे नवनव्या अनुभवीं । तुतारी वाजावी । परि अक्रिय ब्रह्माचे गावीं । न जाणवे ते ॥८॥

म्हणूनि विषयांचे करुनि नाव । इंद्रियांचे थवे सर्व । घेताति धाव । समोरचि ॥९॥

परि आरशा शिवे न शिवे । तोंचि दिठीसि दिठी पावे । तैसी धाव झाली आहे । इंद्रियवृत्तीची ॥१०॥

नाग मुदी कंकण । त्रिलिंगीं भेद दावून । घेता तरी सुवर्ण- । म्हणूनचि घेती ॥११॥

वेचूनि आणू कल्लोळ । म्हणोनि धावे करतळ । तेथ तरी निखळ- । पाणीचि भेटे ॥१२॥

हातांनी स्पर्शिला । डोळ्यांनी देखिला । जिभेने चाखिला । कोणी एके; ॥१३॥

परी परिमळावेगळे ते । मिरवणे नाही कापुराते । तैसे बहुतपरींनी स्फुरते । ते चैतन्यचि ॥१४॥

म्हणोनि शब्दादि पदार्थ । घ्यावयासी जेथ । कर्णादिकांचे हात । सज्ज होती; ॥१५॥

मग संबंध होय न होय । तोंचि इंद्रियांचे न होत विषय । मग नुरे अस्तित्व । तर सबंध कैसा ? ॥१६॥

जी पेरे दिसती उसीं । तीचि असती का रसीं ? । कला न जैशा चंद्रासी । पुनवेचिया ॥१७॥

चंद्रावरी चांदणे पडता । समुद्रीं वर्षाव होता । विषया इंद्रिये भेटता । होय तैसे ॥१८॥

म्हणोनि येई तोंडापुढे । तेचि वाचा बडबडे । परि समाधी न मोडे । मौनमुद्रेची ॥१९॥

व्यवहाराचे भरताड ते । अपारही जरि घडते । तरि अक्रिय ब्रह्माचे न पडते । पाऊल कोठेही ॥२०॥

पसरुनि वृत्तीचे करांते । दिठी आलिंगी रूपाते । परि काहीचि न घडते । सत्याचे नावें ॥२१॥

तमाते घ्यावयासी । पसरूनि बाहुटयासी । शेवटी ह्या सूर्यासी । हाचि जैसा; ॥२२॥

स्वप्नींचिया विलासा । भेटेन, ही धरुनि आशा । उठला, तर तया जैसा । तोचि मग; ॥२३॥

तैसा विषय जेव्हा उदया येई । ज्ञानीं विषय होऊ पाही । तेथ दोन्ही न होउनि होई- । काय, न जाणे ॥२४॥

चंद्र वेचू गेला चांदणे । तर वेचिले काय कोणे ? । प्रसवोनिहि वांज स्मरणे । होती जैसी ॥२५॥

इंद्रियनिग्रहादि ज्या अंगीं । योगी अंग टाकिती योगीं । तो योग जाहला या मार्गी । दिवसाचा चांद ॥२६॥

येथ प्रवृत्ति मागे पालटे । आत्मवृत्ती प्रकटे । आता व्यवहार भेटे । अंतर्मुखपणें ॥२७॥

द्वैतदशेचे अंगण । अद्वैत सेवी आपण । भेदाचे हो जों जों वर्धन । तों तों अभेद दुणावे ॥२८॥

चढाई कैवल्याहीवरी । ज्ञानी विषय सेवुनि करी । आता होय भक्तीच्या घरी । स्वामी-भक्तांचे ऐक्य ॥२९॥

घरात चालता पायी । मार्गही तोचि होई । अथवा बैसे तरि स्वतःठायी । पावणेचि की ॥३०॥

तैसे ज्ञानी काहीही करिता । येथ पावेल काही आता- । ऐसे नाही, न डगमगता । पावेलचि ना ? ॥३१॥

आठव आणि विसर । यांचा होऊ न देई विस्तार । आत्मदशेचा व्यवहार । असाधारण ॥३२॥

झाली स्वेच्छाचि विधि । स्वैरता झाली समाधि । बैसण्यासि मोक्षसिद्धी । हेचि आसन ॥३३॥

झाला देवचि भक्त । घरचि झाला पथ । होउनि ठाकले एकांत । विश्वचि ते ॥३४॥

कोणे एके व्हावे दैवत । कोणे एके भक्त । हा अक्रिय बैसला तेथ । ब्रहौश्वर्यें राज्य करी ॥३५॥

दाटीवाटीने देवांचिया । देऊळ दिसेना डोळियां । देशकालाचे वाटया । येईचिना ॥३६॥

देवात समावेना देव । तेथ देवीसी कैसा आश्रय ? । मग परिवार बहु होय । ऐसे घडेचिना ॥३७॥

ऐशाही केवळ आत्मभावीं । जर श्रद्धा उपजावी । तर कमावला जाई । देवचि नुसता ॥३८॥

अवघ्याचि उपचारां । जप-ध्यान-निर्धारां । नाही अन्य संसारा । देवावाचुनी ॥३९॥

आता देवेंचि देवा भजावे । देवचि पूजासाहित्य व्हावे । अर्पणाचे नावें । कोणतेही असो ॥४०॥

देव देऊळ परिवार । करावे कोरून डोंगर । ऐसा भक्तीचा व्यवहार । का न व्हावा ? ॥४१॥

पाहा की अवघ्या- । वृक्षा वृक्षचि या । परि दुसरा नाही तया । विस्तार जैसा ॥४२॥

अहो, मुक्याने मौन जैसे- । घेता न घेता नवल नसे । केले देवपण तैसे । दोही परींनी ॥४३॥

अक्षतांची देवता । अक्षतींचि असे न पूजिता । मग अक्षतांनी आता । काय पुजू जावे ? ॥४४॥

दीप्तीची लुगडी । दीपकलिके, तू वेढी । हे न म्हणावे तर ती उघडी । राहे काय ? ॥४५॥

चंद्रा जरि न म्हणावे । तुवा चंद्रिकेसि न ल्यावे । तरि तो तिचाचि आहे । सर्वस्वी ना ? ॥४६॥

आगपणें अग्नी आगीत । वसेचि सतत । मग कासयालागी तेथ । देणे न देणे ? ॥४७॥

म्हणोनि भजताचि भजणे व्हावे । मग न भजता काय भजणे नव्हे ? । ऐसे नव्हे, स्वभावें- । हा श्रीशिवचि असे ॥४८॥

आता भक्ति-अभक्तीसी । ताटे आली एके पंक्तीसी । कर्म-अकर्माच्या वातींसी । मालवूनिया ॥४९॥

म्हणोनि उपनिषदांनी जे वर्णिले । ते निंदेचेचि दशेसि आले । आणि ती निंदाचि झाले । स्तोत्र येथ ॥५०॥

नातरीं निंदा-स्तुती । दोन्ही मौनींचि समावती । ज्ञानियांचे बोल असती । मौनीं मौन ॥५१॥

ज्ञानियाने कोठेही पाऊल टाकावे । शिवयात्राचि होत राहे । तो शिवयात्रेसी जाय स्वयें । तरि न गेल्या ऐसाचि ॥५२॥

चाले आणि बैसे । दोन्ही मिळुनि एकचि जैसे । काय नव्हे कौतुक ऐसे । ज्ञानियाचे ठायी ? ॥५३॥

कोठेही लाविता डोळा शिवदर्शनाचा सोहळा । भोगावा कोण्याही वेळा । कोणत्याहि भक्तें ॥५४॥

समोरी दिसे शिवही । परि देखिले काही नाही । देवा भक्ता दोहोंसीही । एकचि मान ॥५५॥

चंडू आपणचि आपला सुटे । मग स्वतःवरिचि आपटे । तेथ उसळूनि दाटे । आपणातचि; ॥५६॥

ऐसी जर चेंडू-फळी । दिसे कोणत्याही वेळी । तरचि कळे एकत्वातली । क्रीडा प्रबुद्धाची ॥५७॥

कर्माचा हात न लागे । ज्ञान काही न रिघे । ऐसीचि होतसे अंगें । उपासना की ॥५८॥

न निपजे न निमत । अंगीं अंग घुमत । सुखा अन्य सुखाची उपमा येथ । देववेल का ? ॥५९॥

कोण्या एका अकृत्रिम- । भक्तीचे हे वर्म । योग-ज्ञानादि विश्रामधाम । असे हे ॥६०॥

अंगें एकचि जाहले । परि नामरूपात्मक होते भासले । तेही की आटले । हरि-हर येथ ॥६१॥

अहो, अर्धनारीनटेश्वरें । गिळित गिळित परस्परें । ग्रहण केले एकसरे । सर्वग्रासें ॥६२॥

वाच्यजात खाऊन । वाचकत्वही गिळून । ठाकली होवोनि लीन । परावाणी येथ ॥६३॥

शिवा शिवा समर्था स्वामी, । एवढी ही आनंदभूमी । घ्यावी द्यावी एके आम्ही । ऐसे केले ॥६४॥

जागृताचि मग जागविले । निद्रितासी निजविले । आम्हातचि आम्हा आणिले । नवल जी, तुझे ॥६५॥

आम्ही निखळ गा तुझे । वरि लोभें म्हणसी ’माझे’ । ही पुनरुक्ती साजे । तूचि म्हणोनी ॥६६॥

कोणाचे काही न घेसी । तैसे आपुलेही न देसी । कोण जाणे भोगसी । गुरुगौरव कैसा ॥६७॥

जितुके श्रेष्ठ गुरुत्व । तितुकेचि तारण्या लघुत्व । परि जया तुझी उणीव । तोचि गुरु-लघु भेद करी ॥६८॥

शिष्यांसि देत वाटे । अद्वैताचे ममत्व फुटे । तर का शास्त्रे होती मोठे । भाट तुझे ? ॥६९॥

किंबहुना हे गुरुवरा, । मी-तूपणाचे संसारा । वेचुनि होसी सोयरा । तेणेंचि तोषें ॥७०॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP