अमृतानुभव - शिवशक्तिसमावेशन

अमृतानुभव हा ज्ञानेश्वरांना ज्ञानेश्वरी लिहून झाल्यावर आलेला अनुभव आहे.


ऐसे हे उपाधिरहित । जे जगतासी निर्मित । ते वंदिले मी मूलभूत । देवदेवी ॥१॥

प्रियतमचि होय प्राणेश्वरी । प्रकटुनि प्रीतीचे बहरीं । रम्य ब्रह्मस्थळीं एकेहारीं । एकेअंगीं ॥२॥

प्रीतीचिये वेगें । एकमेकां गिळिती अंगें । की द्वैताचे तृष्णें दोघे । वेगळे प्रकटती ॥३॥

एकसरिसे जे एक नव्हत । दोघां दोपण ना पुरत । काय न जाणो साकारत । स्वरूपे ती ॥४॥

कैसा स्वसुखाचा छंद देख । की दोनपण मिळूनि एक । न देतीचि कवतिक । एकपणाचे फुटो ॥५॥

येथवरि वियोगभय जोडे । प्रसवली बाळ जगाएवढे । तरि त्रिवार न मोडे । दोघुलेपण ॥६॥

आपुलिये अंगीं संसारा । देखती ते चराचरा । परि न देतीचि वारा । तिसर्‍याचा लागो ॥७॥

जयां एके ब्रह्मसत्तेवरि बैसणे । दोघां एका प्रकाशाचे लेणे । जी अनादि एकपणे । नांदती दोघे ॥८॥

भोगास्तव भेद जेथ । द्वैताचा शोध घेत । परि लाजोनि बुडी देत । प्रीतीचे एकरसीं ॥९॥

जेणे देवें देवी संपूर्ण । काही न तो स्वामी जियेविण । किंबहुना एकमेकां जीवन । एकमेक ॥१०॥

कैसा मेळ आला गोडीत । दोघे या जगीं न समावत । परि परमाणुहिमाजी नांदत । आनंदाने ॥११॥

जी एकमेकाविण । तृणहि न करिती निर्माण । जी दोघे जीवप्राण । ज्या दोघां ॥१२॥

घरसंसारीं मोजकी दोघे । जेव्हा स्वामी शेजे रिघे । तेव्हा दांपत्यपणें जागे । स्वामिनी जी ॥१३॥

एक जरी दोघातुनी । क्वचित् उठे निद्रेतुनी । तरी घरसंसार ग्रासुनी । उरो न दे काही ॥१४॥

दोन्ही अंगांची आटणी । शोधित असती एकपणीं । झाली भेदाचिये वाहणीं । अर्धी अर्धी जी ॥१५॥

एकमेकांचे विषय होती । जी एकमेकां भोगिती । जी दोघे सुखावती । ज्या दोघांनी ॥१६॥

स्त्रीपुरुष नामभेदामुळे । शिवपणचि नांदे एकले । ज्यांचे अर्धेअर्धेपणे झाले । जग सगळे ॥१७॥

एक नाद दो टिपर्‍यात । एक गंध दोही फुलात । दीप्ती दो दीपात । एकचि जैशी; ॥१८॥

एक गोष्ट दो ओठीं । दो डोळ्यांत एक दिठी । ज्या दोहोंनी सृष्टी । एकचि तैशी ॥१९॥

जे अनादि मेहुण । दावूनि दोनपण । एकरसाचे पान । करीत असे ॥२०॥

जी स्वामीचिया अस्तित्वाविण । असो न जाणे एकही क्षण । सर्वकर्ता ज्या पतिव्रतेविण । काहीचि न जो ॥२१॥

जी की भ्रताराचे दिसणे । भ्रतारचि जिचे असणे । शक्य न एका निवडणे । ज्या दोहोतुनी ॥२२॥

गोडी आणि गुळा । कापूर आणि परिमळा । निवडू जाता पांगळा- । निवाडाचि होय ॥२३॥

समग्र दीप्ती घेता । जैसा दीपचि ये हाता । तैसा जियेचे स्वरूपीं तत्त्वता । शिवचि लाभे ॥२४॥

जैशी सूर्य मिरवे प्रभा । प्रभेसि सूर्यत्वचि गाभा । तैशी भेद गिळित चैतन्यशोभा । एकचि जी ॥२५॥

बिंब प्रतिबिंबाचे द्योतक । प्रतिबिंब बिंबाचे मापक । तैसे द्वैतमिषें एक । आत्मतत्त्वचि विलसे ॥२६॥

सर्व शून्याचा निष्कर्ष । ज्या बायजेने केला पुरुष । ज्या दादल्याचे अस्तित्वें, विशेष । शक्ती झाली ॥२७॥

ज्या प्राणेश्वरीविण । शिवातही शिवपण । ठरू न शके, जी आपण । शिवेंचि घडली ॥२८॥

ऐश्वर्यासह ईश्वराचिया । आपणचि अंग जियेचे या । जे संसारा उभारावया । आपनहोउनी ॥२९॥

पतीचे अरूपपणें । लाजुनि, अंग मिरविण्या जिने । केले जगाएवढे लेणे । नामरूपाचे ॥३०॥

ऐक्याचेही दुष्काळा । बहुपणाचा सोहला । ज्या सुभगेने दाविला । लीलेने ॥३१॥

अंगाचिये आटणीने । कांत भरासि आणिला जिने । स्वसंकोचे जयाने । प्रकटविली प्रिया ॥३२॥

जियेते पहावयाचे लोभें । द्रष्टत्वाचा विकार क्षोभे । जी न दिसताचि उभे- । अंगचि टाकी ॥३३॥

कांतेचिये भिडे । पतिराज होती जगाएवढे । परि अंगाने उघडे । जियेविण ॥३४॥

जो येथवरी अचलरूपें । विस्तारोनिही हरपे । तो जियेचे प्रीतिरूपें । झाला विश्वरूप ॥३५॥

जिने शिवासि जागवून । वाढिले जगताचे पक्वान्न । वाढणारणीसह जेवून । तृप्त जो झाला ॥३६॥

निजला असता भ्रतार । जी विते चराचर । जी विसावली तर । नुरे नवरेपणही ॥३७॥

जेव्हा कांत लपुनि बैसे । तेव्हा जियेमुळे न दिसे । जे दोघे आरसे । ज्या दोघां ॥३८॥

जियेचे अंगलगें । आनंद आपणासचि भोगू लागे । तो सर्वभोक्ताही न भोगे । जियेविण काही ॥३९॥

प्रियेचे अंगचि ज्याचे अंग । प्रियतम जिजेचे अंगोपांग । कालवूनि दोन्ही भाग । जेवत असती ॥४०॥

जैशी का समीरासह गती । की सोन्यासह कांती । तैशी शिवासह शक्ती । अवघीचि जी ॥४१॥

की कस्तुरीसह परिमळ । उष्यासह अनळ । तैसा शक्तीसह केवळ । श्रीशिवचि जो ॥४२॥

पाचता सूर्याचे ठायी । रात्र आणि दिवस नाही । तैसे आपुल्या सत्स्वरूपींही । नसतीचि जी दोघे ॥४३॥
 
किंबहुना प्रणवाक्षरीं । प्रपंचदशा अंकुरणारी । तिचेहि होती वैरी । शिवशक्ती ॥४४॥

नामरूपभिन्नत्वा गिळिती । आत्मतत्त्वा प्रकटविती । नमिली उभय शिवदंपती । ज्ञानदेव म्हणे ॥४५॥

जयाचे रूपनिर्धारीं । गेली परेसह वैखरी । सिंधूसह प्रलयनीरीं । गंगा जैशी ॥४६॥

ज्या दोघांच्या आलिंगनीं । विरोनि गेली दोन्ही । आघव्याचि रजनातुनी । दिठी जैसी ॥४७॥

वायू चांचल्यानिशी । जिरता व्योमाचिये कुशीं । लोपला प्रलयप्रकाशीं । प्रभेसह सूर्य ॥४८॥

तैसे या दोघां न्याहाळिता । गेला पाहण्यासह पाहता । आतुनि बाहेरूनि तयां आता । वंदिले पुन्हा ॥४९॥

जयां जाणण्याचे प्रवाहाअंगीं । तहानेला उत्तरे पाण्यालागी । परि न पिताचि त्या ओघीं । बुडोनि जाई ॥५०॥

त्या भेदशून्यां नमस्कारास्तव । मी जर दुसरा होय । तर भेदाची परी अन्य- । काय असे ? ॥५१॥

परि न होताचि दुजे । लेणे सोन्या भजे । हे नमन करणे माझे । तैसे आहे ॥५२॥

वाणी वाणीसि वर्णित असेल । वाच्यावाचक भेद जरि दिसेल । तरि तेथ काय विटाळ । भेदाचा होई ? ॥५३॥

सागर-गंगेची मिळणी । स्त्री-पुरुष नामांची मिरवणी । दिसे, परि काय पाणी । द्वैतरूप होई ? ॥५४॥

पाहे बा, भास्य-भासकता । आपुल्याचिठायी दाविता । एकपणा काय सविता । मोडितसे ? ॥५५॥

चंद्राचिया देहीं । चांदण्याची पखरण होई । काय दीप्तीत उणेपण येई । की शोधावे दीपें ? ॥५६॥

मोत्याचे तेज जरी । विसावे मोत्यावरी । आगळेचि निर्मळ तरी । रूप विलसे ॥५७॥

अ उ म मात्रात्रय । काय प्रणवा चिरीत जाय ? । त्रिरेघांनी ‘ण’ कार काय । भेदला जाई ? ॥५८॥

ऐक्याचे मुद्दल न ढळे । आणि साजिरेपणाचा लाभ मिळे । तर स्वतरंगांची कमळे । का न हुंगावी जळें ? ॥५९॥

म्हणोनि भूतेश भवानी । वंदिली वेगळी न करोनी । मी निघालो नमनीं । ते हे ऐसे ॥६०॥

दर्पणाचे त्यागें । प्रतिबिंब बिंबीं रिघे । की बुडी द्यावी तरंगें । वारा पडता; ॥६१॥

अथवा नीज जाताचि । पावे आपुला ठाव आपणचि । बुद्धित्यागें मी तैशीचि । वंदिली देवदेवी ॥६२॥

मीठपणासी न लोभावून । मिठें सिंधुत्व घेतले लाभवून । तैसे देउनी अहंपण । शंभुशांभवी मी झाली ॥६३॥

केळीगर्भांतिल पोकळी सहजशी । मिळे आकाशा जैशी । एकवटुनि शिवशक्तीसी । नमन मी केले ॥६४॥

२. श्रीगुरुस्तवन

आता साधनोद्यानवसंत । ब्रह्मविद्येचे मंगल सूत्र । अमूर्तचि परि मूर्त । करुणा जो ॥१॥

मायाहत्तीण मारून । मुक्तिमोत्याचे भोजन । जेवू घाली, त्या वंदन- । सद्‌गुरु निवृत्तीसी ॥२॥

अविद्येचे आडरानात । जन्ममृत्यूचे फेरे भोगित । त्या चैतन्यास्तव धावत । करुणेने जो ॥३॥

जयाचे कृपाकटाक्षात । जीवबद्ध मोक्षपण पावत । जाणणार्‍या जाणते भेटत । जयापाशी ॥४॥

कैवल्य-कनकाचिया दाना । जो न निवडी थोर-साना । ज्ञानमार्गाचिया दर्शना । वाटाडया जो ॥५॥

सामर्थ्याचे बळात । जो शिवाचेही गुरुत्व जिंकत । जीवात्मा आत्मसुख देखत । आरशांत ज्या ॥६॥

बोधचंद्राच्या विखुरल्या कला । तयां करुनी एकमेळा । कृपापुनव लीला । करी जयाची ॥७॥

जो भेटताचि । थांबे धाव साधनांची । प्रवृत्तिगंगा स्थिरावेचि । सागरीं ज्या ॥८॥

जयाचे वियोग-अवसरे । द्रष्टयासि जगत्-दृश्य सामोरे । जो भेटताक्षणींचि सरे । बहुरूप हे ॥९॥

अविद्येचिया काळोखात । स्वबोधसुदिन फाकत । जेव्हा प्रसादसूर्य स्पर्शत । जयाचा ॥१०॥

जयाचे कृपाजळें । जीव येथवरी प्रक्षाळे । की शिवपणही ओवळे । अंगा न लागो दे ॥११॥

राखो जाता शिष्यास । गुरुपण जे सापेक्ष । ते जाताही जयास । गुरुगौरव तैसाचि ॥१२॥

एकलेपण न सोसे । म्हणूनि गुरुशिष्याचे मिषें । पाहणेचि पाहत असे । आपुली वाट ॥१३॥

जयाचे कृपातुषारें । परतले अविद्येचे मोहरे । परिणामीं अपार संचरे । बोधामृत ॥१४॥

जगताची करुनि निवृत्ती शेवटी । जिवाशिवासि घातले पोटीं । तरी नव्हेचि उष्टी । दिठी जयाची ॥१५॥

जयाचे साहाय्यें । जीव ब्रह्मापैलचे लाहे । ब्रह्म तृणातळीं जाये । औदासीन्यें जयाच्या ॥१६॥

राबे उपासनेत । तयाचे उपाय फळीं लहडत । जर देहा समर्पित । अनुज्ञें जयाच्या ॥१७॥

जयाचे दिठीचा वसंत । जोवरि न रिघे वेदउद्यानात । तोंवरि आत्मज्ञानफळीं हात । पोहोचेना ॥१८॥

पुढे दृष्टीचे अग्र खोवत । की मागे देह निमटत । एवढयाही यशा न घेत । आपणाकडे जो ॥१९॥

शिष्याचे लघुत्वें ऐसे । गुरुत्वाचे आसनीं बैसे । नाशुनि मिथ्या जीवदशे । दैववान जो ॥२०॥

नसत्याचि जळीं बुडती । तेव्हा जे कृपाघन तारिती । जयांनी तारिलेही नुरती । कवणे ठायी ॥२१॥

आकाश हे सगुण । जया आकाशा तुल्य न । ऐसे कोणीएक ज्ञानघन । आकाश जो ॥२२॥

चंद्रादि सुशीतळ । साधूनि जया मेळ । जयाचे प्रकाशें तेजाळ । सूर्य असे ॥२३॥

जीवपणाचे त्रासें । यावया आपुल्या मूळदशे । शिवही मुहूर्त पुसे । ज्या ज्योतिष्या ॥२४॥

चांद्णे स्वप्रकाशाचे । लोइला दुपदराचे । तरी उघडेपण चंद्राचे । न सरे ॥२५॥

जो उघड, तरी न दिसे । प्रकाश, तरी न प्रकाशे । असतेपणेंही नसे । कोणीकडे ॥२६॥

आता ‘जो’ ‘तो’ या अक्षरीं । किती करू अनुमानांच्या परी । हा प्रमाणा ‘ओ’ न भरी । कोणत्याही ॥२७॥

जेथ शब्दाची लिपी पुसे । तेथचि बोलो बैसे । दुजेपणाचे रागीं रुसे । एकपणा जो ॥२८॥

प्रमाणाच्या परी सरत । तेव्हा प्रमेयचि आविष्करत । नवल ! आवड धुरेसि येत । ‘नाही’ पणाची ॥२९॥

काहीबाही अल्पसे । एखादेवेळ देखतसे । तरि देखे तेही विटाळ ऐसे । जयागावीं ॥३०॥

तेथ गमनें वा बोलें । कैसी टाकावी पाउले ? । अंगीं लावुनि नाडिले । निवृत्ति नाव याने ॥३१॥

नसे आत्म्या आत्मप्रवृत्ती । तेथ कैसी वाढे निवृत्ती ? । व्यर्थ या नामाची ती । टाकीना खोळ ॥३२॥

निवारण्या तर काहीचि नसे । मग काय हा निवारीतसे ? । तरि कैसा ठायी बैसे- । निवृत्तिनामाच्या ? ॥३३॥

अंधःकार सूर्याला । कधी का गोचर जाहला ? । तरि ‘तमारि’ या प्रसिद्धीला । आलाचि की ॥३४॥

तैसे लटिके याने रूढे । जड यानेचि उजाडे । न घडे तेही घडे । याचेचि मायेने ॥३५॥

अगा मायावशें दाविशी । ते मायावी म्हणुनि वाळिशी । अमायावी म्हणुनि न होशी । कोणाही विषय ॥३६॥

शिवशिव हे सद्‌गुरु । तुजला गूढा काय करू । एकही काही निर्धारू- । देतोसि का? ॥३७॥

बहुविध नावारूपांस । उभारुनि पाडिलेसि ओस । धरुनि सत्‌तेचा आवेश । तोषलासि ना ? ॥३८॥

जीवबंध तोडिल्याविणे । चालो न देसी साजणपणें । भक्त उरावा स्वामीपणें । तर तेही न होय ॥३९॥

विशेष ज्ञानदृष्टीचे नावें । आत्मत्वहि यासि न साहवे । किंबहुना कोणताहि नोहे । सामान्य विशेष धर्म ॥४०॥

सुर्योदयीं नुरे रात । नुरे लवण पाण्यात । वा होता जागृत । नुरे नीज जैसी ॥४१॥

कापूर जळोनि सरे । अग्नीची शोभाहि हरे । तैसेचि याचे नुरे । नाव रूप ॥४२॥

कोणी हातापाया पडेही । तरि वंद्यत्वें हा पुढे न येई । नच पडे भिडेसही । भेदाचिये ॥४३॥

स्वतःस्तव रवी । न उदये जेवी । हा वंद्य नव्हे तेवी । वंदनासी ॥४४॥

की आपणासि समोरी आपुल्या । न येता ये काही केल्या । तैसे वंद्यत्व हिरावुनिया । घेतले सद्‌गुरूंनी ॥४५॥

आकाशाचा आरसा । उमटू न दे प्रतिबिंबाचा ठसा । हा वंद्य नव्हे तैसा- । नमस्कारासी ॥४६॥

नव्हे तर नसो नंद्य हा गुरू । तरि विरुद्ध का करू ? । हा ठाव न देई उरू । वंदणार्‍यासी ॥४७॥

वेढिल्या वस्त्राचा झोळ । पदर फेडिता बाहेरील- । कड फिटे आतील । न फेडिताचि; ॥४८॥

अथवा बिंबपणासरिसे । प्रतिबिंब नाशतसे । नेले वंद्यत्व याने तैसे । वंदणार्‍यासवे ॥४९॥

रूपाची दाद नसे जेथ । दृष्टीचे काहीचि न चाले तेथ । आम्हा फळले ऐसिया दशेत । हे सद्‌शुरुचरण ॥५०॥

तेलवातीच्या सोयरिकीने । दीपकलिकेचा निर्वाह होणे । तो का होइल । वटिकेने । कापुराच्या ? ॥५१॥

अग्नि आणि कापूरवटी ती । परस्परां भेटती । तों दोन्हीही सरती । एकसरशीचि ॥५२॥

तैसे ह्यासी पाहत न पाहत । तोंचि वंद्य, वंदिते जात । जैसे स्वप्नीं देखिल्या कांतेसहित । जाय कांतही ॥५३॥

किंबहुना त्यागुनिया ही भाष । जेथ द्वैता सायास । श्रीगुरू या स्वसख्यास । वंदियेले ॥५४॥

या सख्य़ाची नवलाई- । अंगीं एकपणा, रूप नाही । तरि गुरुशिष्यद्वैताचीही । कीर्ति केली ॥५५॥

कैसे आपणचि आपणा- । दोनपणाविण सोयरेपणा । हा याहुनिही विलक्षण जाणा । नाही ना आहे ॥५६॥

पोटीं जग सामावुनि घेई । आणि गगनाएवढा होई । परि तोचि निशा साही । नाहीपणाची ॥५७॥

परिपूर्ण दुर्भर । सागर दोहींसी आधार । तैसा विरोधकांसीही पाहुणचार । याचे घरीं ॥५८॥

तेजा-तमाचे काही । परस्परात भले नाही । परि सूर्यावरि दोही । अवलंबुनी ॥५९॥

एक म्हणता, भेदें । का नानापणे नांदे । विरुद्धे ही स्वतःचेचि विरोधें । होती काय ? ॥६०॥

म्हणोनि शिष्य आणि श्रीगुरुनाथ । या दोन्ही शब्दांचा अर्थ । श्रीगुरू सच्चिदानंदचि होत । दोही ठायी ॥६१॥

सुवर्ण आणि लेणे जैसे । एके सुवर्णींचि वसे । चंद्र आणि चांदणे असे । जैसे एके चंद्रातचि; ॥६२॥

वा कापूर आणि परिमळ । कापूरचि केवळ । गोडी आणि गूळ । एकचि जैसा ॥६३॥

तैसा गुरुशिष्यमिषें । हाचि एक विलसे । जरि काही दिसे । दोनपणे ॥६४॥

आरशात मुख पाहिले । ते वेगळेचि जरि वाटले । तरि ते आपुले । हे तो निश्चित जाणे ॥६५॥

पहा निर्जन रानीं निजला । तो निर्विवाद एकला । परि जागता जागविता जाहला । दोही तोचि; ॥६६॥

तोचि जागे तोचि जागवी । तेवी हाचि बोधें बोधवी । गुरु-शिष्यत्व नांदवी । ऐसे हा ॥६७॥

दर्पणाविण डोळा । आपुल्या भेटीचा सोहळा- । भोगील, तरचि ही लीला । सांगता येईल ॥६८॥

द्वैता प्रकटू न देई । ऐक्या न विस्कटवी । ऐसी सोयरिकीची थोरवी । पोषी हा ॥६९॥

निवृत्ति जया अभिधान । निवृत्तीचि जया भूषण । जया निवृत्ति हे राजेपण । निवृत्तीचे ॥७०॥

निवृत्तीचे बोधें । वा प्रवृत्तिविरोधें । लाभे वादविवादें । ऐसा हा नव्हे ॥७१॥

रात्र स्वतःसि अर्पुनी । दिवसासी । उन्नती आणी । तैसा हा प्रवृत्तीसि वारुनी । निवृत्ति नव्हे ॥७२॥

कोंदणाचे तेज, बळ । घेउनि मिरवे रत्न केवळ । तैसे नव्हे हे, निखळ- । चक्रवर्ती हा ॥७३॥

गगनही पोटीं सामावतसे । जेव्हा चंद्राचे पघळे बाळसे । तेव्हा चांदणे विलसे । जैसे अंगचि तयाचे ॥७४॥

तैसे निवृत्तिपणासी कारण । हाचि आपुला आपण । जणु फूलचि जाहले घ्राण । घेण्या आपुला सुवास ॥७५॥

दिठी वळवुनी मागुती । मुखशोभा पाहता येती । तर आरसे का लागती- । धुंडाळावे ? ॥७६॥

की रात्र सरते । आणि तांबड फुटते । काय सूर्या आणावे लागते । सूर्यपण ? ॥७७॥

म्हणोनि जाणावे बोधाने । वा साधावे प्रमाणाने । ऐसा नव्हे, भरवशाने- । स्वामी हा ॥७८॥

ऐसे करण्याविण । स्वयंभूचि जे निवृत्तिपण । तयाचे श्रीचरण । वंदिले ऐसे ॥७९॥

आता ज्ञानदेव म्हणे । श्रीगुरुप्रणामें येणें । फेडिली वाचाऋणे । चारही वाचांची ॥८०॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP