TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

अध्याय छ्त्तीसावा - श्लोक १०१ ते १५०

श्रीधरस्वामी रचित ’ श्रीरामविजय ’ ग्रंथाचे पारायण केल्याने जीवनातील वनवास संपून सुख प्राप्त होते .


श्लोक १०१ ते १५०

जाहला एकचि जयजयकार ॥ सुमनें वर्षती सुरवर ॥ सकळ राजयांनीं करभार ॥ राघवापुढें समर्पिला ॥१॥

सर्व नृप करूनि नमन ॥ उभे ठाकती कर जोडून ॥ भरतें भांडार फोडून ॥ याचकजन गौरविले ॥२॥

उदार धीर रघुवीर ॥ ज्याचा बंधु भरत वीर ॥ मोटा बांधूनि अपार ॥ द्रव्य न्याहो म्हणतसे ॥३॥

पुरे पुरे हेचि मात ॥ याचक बोलती समस्त ॥ हय गज रत्नें अद्भुत ॥ दिधले बहुत यांचकां ॥४॥

गोदानें भूदानें अपार ॥ जें वेदीं बोलिलें साचार ॥ तितकें देऊन द्विजवर ॥ सुखी केले ते काळीं ॥५॥

ऐसा षोडश दिनपर्यंत ॥ सोहळा होतसे अद्भुत ॥ कळापात्रें येऊन तेथ ॥ विद्या दावित रामापुढें ॥६॥

लक्ष्मण आणि भरत ॥ शत्रुघ्न आणि सुमंत ॥ सुवराज्य त्यांते देत ॥ श्रीरघुनाथ ते समयीं ॥७॥

वस्त्रें भूषणें देऊन ॥ चवघे मुख्य प्रधान ॥ तुमच्या अनुमतेंकरून ॥ राज्य चालवीन राम म्हणे ॥८॥

असो दिव्य अन्नें निर्मून ॥ सकळ रायांसी दिधलें भोजन ॥ वस्त्रालंकारी पूर्ण ॥ सेनेसहित गौरविले ॥९॥

मग श्रीरामाची आज्ञा घेती ॥ सेनेसहित सकळ नृपती ॥ स्वदेशाप्रति तेव्हां जाती ॥ गुण वर्णिती राघवाचे ॥११०॥

सुग्रीव आणि बिभीषणास ॥ रामें राहविलें एक मास ॥ नित्य भोजन पंक्तीस ॥ नानाविलास सोहळे पैं ॥११॥

सिंहासनीं बैसतां रघुनाथ ॥ बंधू भोंवतें आनंदभरित ॥ भक्तिरसें शत्रुघ्न भरत ॥ चामरें वरी वारिती ॥१२॥

तों गवाक्षद्वारें ते समयीं ॥ अवलोकिती जाहली कैकयी ॥ म्हणे त्रिभुवनीं शोधितां पाहीं । अभागी नाही भरताऐसा ॥१३॥

चवदा वर्षें भिकारी ॥ जाऊनि बैसला वनांतरीं ॥ शेवटीं बंधूचें दास्य करी ॥ चामरें वरी वारितो ॥१४॥

माझे पूर्व पाप फळासी आलें ॥ ऐसें भरताची माता बोले ॥ वसिष्ठास बोलावून ते वेळे ॥ कैकयी सांगे एकांतीं ॥१५॥

म्हणे माझिया पोटी भरत ॥ दरिद्री जन्मला अत्यंत ॥ बंधूचें दास्य करित ॥ मज हें दुःख वाटतें ॥१६॥

मग बोले ब्रह्मसुत ॥ अजूनि तरी राहे निवांत ॥ ग्रासिला राजा दशरथ ॥ वना रघुनाथ धाडिला ॥१७॥

सच्चिदानंदन ब्रह्म पूर्ण ॥ तो हा अवतरला रघुनंदन ॥ मूर्खे तुज हे नाही ज्ञान ॥ अद्यापि कां कळेना ॥१८॥

जे ब्रह्मादिदेवांची ध्येय मूर्ति ॥ हृदयीं ध्यात अपर्णाति ॥ हृदयकमळीं वाहती ॥ सनकादिक प्रीतीनें ॥१९॥

पुराणपुरुष रघुनंदन ॥ त्याचे भजनीं लावीं मन ॥ आपली युक्ति ठेवीं झांकून ॥ नसतीं वचनें बोलू नको ॥१२०॥

तुजप्रति सांगावे ज्ञान ॥ जैसे काननामाजी रुदन ॥ कीं बधिरापुढें गायन ॥ लसणी कर्पूर घांसिला ॥२१॥

पुष्पवाटिकेंत पलांडु उपजला ॥ परी तो गुण न सांडी आपुला ॥ नित्य दुग्धें वायस धुतला ॥ परी कृष्णवर्ण नवजाय ॥२२॥

शर्करेचें आळें केलें ॥ माजी निंबबीज पेरिलें ॥ परी शेवटी कडू येती फळें ॥ व्यर्थ गेले कष्ट सर्व ॥२३॥

खापरास परिस घांसतां ॥ परी सुवर्ण नव्हेचि तत्वतां ॥ कीं दुग्धामाजी हरळ घालितां ॥ मवाळ नव्हे कल्पांतीं ॥२४॥

तैसें तुजप्रति जें जें शिकविलें ॥ तें तें सर्वही व्यर्थ गेले ॥ आतां स्वस्थ राहूनि उगलें ॥ चित्त ठेवीं रघुनाथीं ॥२५॥

ऐसें शिकवून तियेसी ॥ बाहेर आला वसिष्ठ ऋषि ॥ यावरी बिभीषणसुग्रीवांसी ॥ निरोप देतसे श्रीराम ॥२६॥

वानरांसी श्रीराम म्हणे ॥ भोजन करून गमन करणें ॥ ते केले मान्य वचन ॥ अवश्य म्हणती तेधवां ॥२७॥

ते दिवशीं मोठा सोहळा ॥ मेळवूनि द्विजांचा मेळा ॥ वानरांसहित सकळां ॥ भोजनविधि आरंभिला ॥२८॥

प्रेमाचिया गंधाक्षता ॥ लावी सर्वां सरसिजोद्भवपिता ॥ सुमनमाळा तत्वतां ॥ अर्पीत समस्तां आदरें ॥२९॥

चैतन्य परिमळद्रव्यें बहुत ॥ सर्वांस चर्चिलीं शोभिवंत ॥ उत्तर धूप दीप यथार्थ ॥ करूनि भोजना बैसविले ॥१३०॥

श्रीरामगृहीचें दिव्यान्न ॥ त्या सुवासालागीं ॥ वेधोन ॥ वसंत करी प्रदक्षिणा ॥ इच्छाभोजत तेथीचें ॥३१॥

त्या अन्नाचा सुवास बहुत ॥ स्वर्गीं देवांस आवंतूं जात ॥ विबुध लाल घोंटिती समस्त ॥ श्रीरामपंक्तीस जेवावया ॥३२॥

बैसावया सुवर्णपाट ॥ मांडिले दिव्यरत्नांचे ताट ॥ जडित अडणियांचे प्रकट ॥ दिव्य तेज चहूंकडे ॥३३॥

सुगंध उदकें भरूनियां ॥ जवळी ठेविल्या जडित झारिया ॥ पात्रांप्रति शोभती समया ॥ लावूनियां रत्नदीप ॥३४॥

प्रथम विश्वास संपूर्ण ॥ तेंच आधी वाढिले लवण ॥ विरक्तीचीं मिरगुंडें जाण ॥ नानासाधनें त्याचि शाखा ॥३५॥

सत्कर्मांचिया कोशिंबिरी ॥ वाढिल्या नवविधभक्तीचिया क्षीरी ॥ निश्चय शर्करा त्यावरी ॥ ऐसियापरी शुभ्र दिसे ॥३६॥

निजबोधचा भात पूर्ण ॥ अक्षय शांतीचें वरी वरान्न ॥ तेथें अभेद वडे करून ॥ नानापरीचें वाढिले ॥३७॥

पूर्णप्राप्तीचे मांडी थोर ॥ भूतकृपेच्या धारिया सुकुमार ॥ तेलवारिया गोडपुऱ्या अपार ॥ मिष्ट ऐसीं वाढिली ॥३८॥

सत्त्वघृतांत तळून ॥ गुळवरिया अंतरीं गोड पूर्ण ॥ क्षमाफेणिया शोभायमान ॥ समसमान सर्वांसी ॥३९॥

विवेकपापड चांगले ॥ वैराग्यअग्नीवरी भाजिले ॥ विज्ञान तेंचि अमृतफळें ॥ वाढिली केळें सत्वाची ॥१४०॥

सर्वांगभूती समता चोखडी ॥ तेच घमघमीत वाढिली कढी ॥ सज्जन जाणती तिची गोडी ॥ वेदांतशास्त्रवेत्ते जे ॥४१॥

मुख्य गुरुकृपेचें घृत ॥ त्याविणें अन्न विरस समस्त ॥ प्रेमेंकरून सद्यस्तप्त ॥ शुद्ध करीत अन्नातें ॥४२॥

जेवणार बसले सद्भक्त ॥ स्वानंदजळें पात्रें प्रोक्षित ॥ देहबुद्धीच्या चित्राहुति तेथ ॥ पात्राबाहेरी घातल्या ॥४३॥

सोहंगायत्री जपोनी ॥ देहबुद्धिनांवें सोडिले पाणी ॥ निवृत्ति आपोशन घेऊनी ॥ रामस्मरणें गर्जिले ॥४४॥

पंचप्राणांच्या प्राणाहुती ॥ योगाभ्यासें आधीं करिती ॥ शिखेची कामग्रंथि ॥ सत्वर सोडिती निजहस्तें ॥४५॥

निरभिमान संपूर्ण ॥ तेणेंच केले करक्षालन ॥ नेत्रांसी लाविलें जीवन ॥ जगज्जीवन सर्व दिसे ॥४६॥

श्रीरामभक्त क्षुधाक्रांत ॥ स्वाद घेऊनि प्रीतीनें जेवीत ॥ पद्मासन घालोनि निश्चित ॥ ग्रासामागें ग्रासी घेती ॥४७॥

भवरोगें जे वेष्टित ॥ नाही भावक्षुधा पोटांत ॥ ते टकमकां उगेच पाहात ॥ ग्रास एक न घेववे ॥४८॥

चंद्रोदयीं द्रवे सोमकांत ॥ इतर पाषाण कोरडे समस्त ॥ तैसे श्रीरामपंक्तीस जेविले भक्त॥ अभाग्यां प्राप्त कैचें तें ॥४९॥

ऐसी जेविती आनंदें ॥ नामें गर्जती महाशब्दें ॥ भावें चर्चा करिती ऋषि वेदें ॥ ज्याचे स्मरणेंकरूनियां ॥१५०॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2010-06-04T21:42:53.9100000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

tactile

  • Bot., Zool.(pertaining to the contact or sense of touch) स्पर्शी, स्पर्श- 
  • स्पर्शग्राही 
  • स्पर्श- 
  • स्पर्शग्राही 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

पंचप्राणांना भोजनापूर्वी आहुती का द्यावी ?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.