अध्याय चवतीसावा - श्लोक ५१ ते १००

श्रीधरस्वामी रचित ’ श्रीरामविजय ’ ग्रंथाचे पारायण केल्याने जीवनातील वनवास संपून सुख प्राप्त होते .


सूर्यमंडळातुल्य सुरेख ॥ कणीर्र् वोप देती तांटक ॥ सर्व अलंकारांची अधिक ॥ कांति फांके दशदिशां ॥५१॥

कुंकुममळवट लाविला भाळीं ॥ मध्यें सुवास कस्तूरी रेखिली ॥ दिव्य सुगंध ते काळीं ॥ सर्वांगीं चर्ची त्रिजटा ॥५२॥

दिव्य फळांनी ते काळीं ॥ जानकीची ओंटी भरिली ॥ सरमा म्हणे मुखीं घाली ॥ जननी फळ एक आतां ॥५३॥

मग ते अमृतफळ सुस्वाद ॥ सुंदर आणि बहु सुगंध ॥ बिभीषण मारुतीसी प्रसाद ॥ जानकीनें दीधला ॥५४॥

सरमा आणि त्रिजटेप्रति ॥ फळें दिधलीं परम प्रीतीं ॥ मग एक फळ घेऊनि हातीं ॥ वदनीं घातले जानकीनें ॥५५॥

सवेंचि प्रक्षाळिले वदन ॥ तों जवळी आला बिभीषण ॥ दिव्य मणिमय हार आणून ॥ जानकीपुढें ठेविला ॥५६॥

त्रिभुवनमोल एक मणी ॥ रावणें ठेविला होता कोशसदनी ॥ तो बिभीषणें देतां प्रीतीकरूनी ॥ गळां घाली जगन्माता ॥५७॥

तों लंकेचे सकळ दळ ॥ सिद्ध जाहलें तात्काळ ॥ अठरा अक्षौहिणी वाद्यें प्रबळ ॥ वाजों लागलीं तेधवां ॥५८॥

रत्नजडित शिबिका आणोनी ॥ सीतेपुढें ठेविली ते क्षणी ॥ बिभीषण मारुति लागती चरणीं ॥ सुखासनीं बैसावें ॥५९॥

सरमा त्रिजटा यांचें कंठीं ॥ जानकी घाली दृढ मिठी ॥ म्हणे प्राणसख्यानो दृष्टीं ॥ तुम्हांस कधी मी देखेन ॥६०॥

सरमा त्रिजटेचे नयनीं ॥ अश्रु आले ते क्षणीं ॥ रुदन करिती स्फुंदस्फुंदोनी ॥ चरणीं मिठी घालिती ॥६१॥

मग आपुले कुरळ केशेंकरून ॥ झाडिले जानकीचे चरण ॥ पालखीत बैसविती नेऊन ॥ सद्रद होऊनि बोलती ॥६२॥

अवो प्राणसखे जनकनंदिनी ॥ आम्हां न विसरावें मनींहूनी ॥ सीता म्हणे उपकार साजणी ॥ तुमचे न विसरें कदाही ॥६३॥

तों शिबिकेवरी आवरण ॥ बिभीषणें घातलें पूर्ण ॥ जैसा परीक्षक दिव्य रत्न ॥ पेटीमाजी रक्षितसे ॥६४॥

कीं हृदयींचें ज्ञान संत ॥ बाहेर न दाविती लोकांत ॥ कीं धनाढ्य जैसा आच्छादित ॥ निजधन आपुलें सर्वदा ॥६५॥

अतिउल्हासें वायुसुत ॥ सव्यभागीं जवळी चालत ॥ मध्यभागीं लंकानाथ ॥ बिभीषण जात त्वरेनें ॥६६॥

वहनवाहक बहुत वेगें ॥ चालिले सुवेळेचे मार्गे ॥ बिभीषण हनुमंत दोघे ॥ हात लाविती वहनासी ॥६७॥

सेना चालिली अद्भुत ॥ पुढें वेत्रपाणी धावत ॥ वाद्यांचा गजर होत ॥ दाटी बहुत जाहली ॥६८॥

स्कंद आणि गजवदन ॥ अपर्णेजवळी दोघेजण ॥ तैसे मारुति आणि बिभीषण ॥ प्रेमरंगें धांवती ॥६९॥

रामसेनेंत प्रवेशले सत्वर ॥ तों जाहला एकचि गजर ॥ पहावया धांवती वानर ॥ त्यांस वेत्रधार मारिती ॥७०॥

लंकापतीसी अयोध्याविहारी ॥ सांगून पाठवी ते अवसरीं ॥ आपले वेत्रधार आवरीं ॥ वानरांतें मारिती जे ॥७१॥

या सीतेलागीं कष्ट ॥ वानरीं केले उत्कृष्ट ॥ वहन उघडोनि स्पष्ट ॥ सीता कपींसीं पाहूं द्या ॥७२॥

जवळी असतां प्राणनाथ ॥ स्त्री उघडी सव्र जनांत ॥ वागतां दोष यथार्थ ॥ सर्वथा नाहीं तियेसी ॥७३॥

ऐसी आज्ञा होतां ते काळीं ॥ शिबिका उतरिली भूमंडळी ॥ आवरण काढितां जनकबाळी ॥ सर्वांनी देखिली एकदां ॥७४॥

वहनाबाहेर निघोनी ॥ त्रिभुवनपतीची ते राणी ॥ उघडली जैसी रत्नखाणी ॥ वैदेहतनया उभी तैसी ॥७५॥

पाहतां जियेचे मुखकमळा ॥ लोपती कोटी मृगांककळा ॥ कीं लावण्यसागरींचा उमाळा ।ं रूपा आला ते ठायी ॥७६॥

यावरी ते जगज्जननी ॥ आदिमाया विश्वखाणी ॥ पाहते जाहले भक्तशिरोमणी ॥ जे कां अवतार देवांचे ॥७७॥

जानकी देखतां साचार ॥ देव गण गंधर्व असुर ॥ मानसीं विकल्प साचार ॥ करिते जाहले तेधवां ॥७८॥

एवढें जिचें स्वरूप सुंदर ॥ परम दुरात्मा दशकंधर ॥ षण्मासपर्यंत दुराचार ॥ उगा कैसा असेल ॥७९॥

तो जगदात्मा रघुवीर ॥ जाणोनि सर्वांचे अंतर ॥ जानकीप्रति उत्तर ॥ काय बोलता जाहला ॥८०॥

वाद्यें वाजतां राहिली ॥ तटस्थ जाहली सुरमंडळी ॥ रीस वानर सकळी ॥ निवांतरूप ऐकती ॥८१॥

व्यंकटा भृकुटी करूनि क्रूर ॥ सीतेसी विलोकी रघुवीर ॥ म्हणे आपुला तूंचि विचार ॥ पाहें सत्वर येथोनी ॥८२॥

तुज घेऊन गेला असुर ॥ हा अपवाद वाढला दुर्धर ॥ तो निरसला समग्र ॥ सोडवून तुज आणिलें ॥८३॥

उरावरील उतरला पाषाण ॥ कीं रोग गुल्म गेले विरोन ॥ कीं जन्मांधासी आले नयन ॥ तेवीं आजी सुख वाटे ॥८४॥

तुज आम्ही सोडवून ॥ साच केलें आपुलें वचन ॥ आतां करावें वेगें गमन ॥ मना आवडे तिकडेचि ॥८५॥

मी सर्व संग सोडोनी ॥ उदास विचरेन काननीं ॥ कामकामना कांहीं मनीं ॥ उरली नाही आमुच्या ॥८६॥

आमुची वार्ता टाकोनि समस्त ॥ मना आवडे तो धरीं पंथ ॥ अथवा भलता नृपनाथ ॥ वरीं तुजला आवडे तो ॥८७॥

उभे राहून व्यर्थ कायी ॥ तूं विचरें भलतेठायीं ॥ मोकळ्या तुज दिशा दाही ॥ केल्या आम्ही एधवा ॥८८॥

मज कैकयीनें घातले बाहेर ॥ नाहीं सिंहासन आतपत्र ॥ सेवूनियां घोर कांतार ॥ वनचर सखे केले म्यां ॥८९॥

भक्षावया न मिळ अन्न ॥ राहें कंदमुळें सेवून ॥ वल्कलें परिधान करून ॥ तृणासनीं निजतसें ॥९०॥

याकरितां सीते पाहीं ॥ आमुचे संगतीं सुख नाहीं ॥ तरी तूं भलते पंथे जाई ॥ व्यर्थ काय राहूनियां ॥९१॥

सकळ उपाधि टाकून ॥ मी राहिलो निरंजनीं येऊन ॥ आम्हांसी नावडे दुजेपण ॥ प्रंपचवासना नसेचि ॥९२॥

ऐसें बोलतां रघुनाथ ॥ सीतेसी वाटला कल्पांत ॥ कीं शब्दरूपें शस्त्र तप्त ॥ अकस्मात जेवीं खोंचलें ॥९३॥

शब्द नव्हे ते सौदामिनी ॥ अंगावरी पडे ते क्षणी ॥ कीं शब्दसांडसेंकरूनी ॥ तोडिलें वाटे शरीर ॥९४॥

परम गहिवरें दाटोनी ॥ बोले तेव्हां मंगळभगिनी ॥ अग्नींत करपे कमळिणी ॥ तैसें तेज उतरलें ॥९५॥

नयनीं सुटल्या अश्रुधारा ॥ म्हणे जगद्वंद्या श्रीरामचंद्रा ॥ आनंदकंदा गुणसमुद्रा ॥ करा माझा वध आतां ॥९६॥

षण्मास कष्टी होऊन ॥ आजि दृष्टीं देखिले रामचरण ॥ तों पूर्वकर्म माझे गहन ॥ आडवें विघ्न हें आलें ॥९७॥

आनंदाचा उगवला दिन ॥ म्हणोनि वाटलें समाधान ॥ परी कर्माचें थोर विंदान ॥ पुढें आलें आजि पैं ॥९८॥

कामधेनूची काढितां धार ॥ शेराच्या चिकें भरलें पात्र ॥ अमृताच्या घटीं घातला कर ॥ तों विष दुर्धर भरलें असे ॥९९॥

परिसाच्या देवास येऊन ॥ लोहाचा भक्त भेटला पूर्ण ॥ परी तो कदा नव्हे सुवर्ण ॥ कर्म गहन पूर्वींचे ॥१००॥

N/A

References : N/A
Last Updated : June 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP