अध्याय एकतीसावा - श्लोक २०१ ते २४८

श्रीधरस्वामी रचित ’ श्रीरामविजय ’ ग्रंथाचे पारायण केल्याने जीवनातील वनवास संपून सुख प्राप्त होते .


हा वर मागितला त्वरित ॥ युद्धसमयीं वर्षावें अमृत ॥ ऐक्य होतां सुधारसमुक्त ॥ उद्भवती महिरावण ॥१॥

भ्रमरमाळा शिवकंठी ॥ ते मिलिंद पाताळा जाती उठाउठी ॥ अमृत चंचू भरूनि वृष्टी ॥ रक्तावरी करिती त्या ॥२॥

एकत्र होतां रक्त अमृत ॥ महिरावण निजपती तेथ ॥ ऐसें ऐकतांचि हनुमंत ॥ पाताळ धुंडीत गेला असे ॥३॥

तों अमृतकुंड परम गहन ॥ तेथें लोकपाळांचे रक्षण ॥ तें तोडित वायुनंदन ॥ अमृताजवळी पातला ॥४॥

तों चंचू भरूनि अपार ॥ असंख्यात जाती भ्रमर ॥ पर्वताऐसें तयांचे शरीर ॥ केले चूर सर्वही ॥५॥

त्यांमाजी श्रेष्ठ भ्रमर ॥ मेरुपर्वताऐसें त्याचें शरीर ॥ क्रोधें धांविन्नला सत्वर ॥ वायुकुमर लक्षूनियां ॥६॥

हनुमंतें मुष्टिघात दिधला ॥ भ्रमर पृथ्वीवरी पाडिला ॥ पक्ष उपडितां ते वेळां ॥ काकुळती आला मारुतीसी ॥७॥

मज देई प्राणदान ॥ मी तुझ्या कार्यासी येईन ॥ हनुमंतें भाष घेऊन ॥ तेव्हां भ्रमर सोडिला ॥८॥

सवेंच उडाला तेथून ॥ राघवाजवळी येऊन ॥ म्हणे आतां ब्रह्मास्त्र घालोन ॥ वैरी एकदांचि आटावे ॥९॥

ऐसें बोलतां वायुसुत ॥ रघुनाथ बाणीं ब्रह्मास्त्र स्थापित ॥ शर सुटतांचि समस्त ॥ भस्म जाहले महिरावण ॥२१०॥

जैसी होतां ब्रह्मप्राप्ति ॥ संसारदुःखें वितळती ॥ कीं उगवतां गभस्ति ॥ जेवीं लपती तारागणे ॥११॥

तैसें सुटतां ब्रह्मास्त्र ॥ मुख्य रूपसहित असुर ॥ भस्म जाहले समग्र ॥ जयजयकार सुर करिती ॥१२॥

पडली देखतां मुख्य धुर ॥ पळों लागले ते असुर ॥ हनुमंतें पुच्छ समग्र ॥ सेनेभोवतें वेष्टिलें ॥१३॥

मग लोहर्गळा घेउनी ॥ सैन्य झोडी तयेक्षणीं ॥ कित्येक अंतरिक्ष उडोनि ॥ राक्षस पळती तेधवां ॥१४॥

तों वरून पुच्छें सत्वर ॥ बांधिले सर्व निशाचर ॥ सागरीं बुडविलें समग्र ॥ पुच्छें घुसळूनि आणिले ॥१५॥

एक जाती दिशा लंघून ॥ तों पुच्छ येत तिकडून ॥ ब्रह्मांड व्यापिलें संपूर्ण ॥ पुच्छेंकरूनि हनुमंतें ॥१६॥

मारुति केवळ ईश्वर ॥ त्याचे पुच्छासी नाहीं पार ॥ ब्रह्मांडाबाहेर समग्र ॥ आढेवेढे करी पुच्छ ॥१७॥

असो दशदिशा धुंडोन ॥ पुच्छें असुर आणिले ओढून ॥ महिकावतीस जाऊन ॥ पुच्छ रिघे घरोघरीं ॥१८॥

पुरुष ओढोनि काढी बाहेरी ॥ अर्गळाघायें चूर्ण करी ॥ भ्रतारा लपवोनि नारी ॥ दारीं उभ्या राहती ॥१९॥

परी पुच्छ न सोडी साचार ॥ गूढ स्थळाहून काढी असुर ॥ आकांत वर्तला थोर ॥ सांगती हेर चंद्रसेनेसी ॥२२०॥

ती म्हणे घाला जानकीची आण ॥ तेणें निरसेल हे विघ्न ॥ मग त्याचि युक्तीकरून ॥ जन सकळ वांचले॥२१॥

जयजयकार करून सुर ॥ वर्षती पुष्पसंभार ॥ रामसौमित्र वायुकुमर ॥ एके ठायीं मिळाले ॥२२॥

शत्रुक्षयाचें कारण ॥ कैसा निमाला महिरावण ॥ सौमित्रासी म्हणे सीतारमण ॥ तेणें प्रत्युत्तर दीधलें ॥२३॥

म्हणें हनुमंतें जाऊन ॥ शत्रुक्षय होय पूर्ण ॥ तें साधून आला कारण ॥ त्यास वर्तमान पुसा हें ॥२४॥

मग मारुतीचे गळां सप्रेम ॥ मिठी घाली श्रीराम ॥ तंव तो चिंताच्रकी परम ॥ पडला असे मारुती ॥२५॥

मग राम म्हणे प्राणसखया ॥ कां मुख गेलें उतरोनियां ॥ ते मज सांग लवलाह्या ॥ म्हणेन वदन कुरवाळिलें ॥२६॥

मग हनुमंत वर्तमान ॥ रामासि सांगें मुळींहून ॥ चंद्रसेनेसी भाषदान ॥ दृढ देऊनि मी आलों ॥२७॥

ऐकोनि हांसें रामचंद्र ॥ म्हणे बा रे तूं चातुर्यसमुद्र ॥ मी एकपत्नीव्रती वीर ॥ हे तुज काय न ठाऊकें ॥२८॥

तुझी भाषा नव्ह अप्रमाण ॥ मजही न गमे दुर्व्यसन ॥ तूं चतुरमुकुटरत्न ॥ युक्ति करून वारीं हें ॥२९॥

मग चंद्रसेनेच्या गृहाप्रति ॥ आला तत्काळ मारुति ॥ म्हणे आणितों अयोध्यापति ॥ मंचक दृढ घाली कां ॥२३०॥

चंद्रसेना हर्षलीं चित्तीं ॥ दृढ मंचक घातला एकांती ॥ सुमनशेज रचूनि युक्तीं ॥ नाना उपभोग ठेविले ॥३१॥

मग बोले हनुमंत ॥ मंचक मोडतां अकस्मात ॥ तरी न बैसे रघुनाथ ॥ बोल मग मज नाहीं ॥३२॥

चंद्रसेना म्हणे हनुमंता ॥ मंचक न मोडे हा तत्वंतां ॥ मग जो भ्रमर रक्षिला होता ॥ तो आणिला गुप्तरूपें ॥३३॥

रंभापत्रप्रमाण पूर्ण ॥ मंचक आंत अवघा कोरून ॥ तेणें तत्काळ आज्ञा वंदून ॥ तैसाचि केला ते काळीं ॥३४॥

चंद्रसेनेच्या गृहीं सत्वर ॥ हनुमंतें आणिला रघुवीर ॥ मंचकीं बैसतां जगदोद्धार ॥ तत्काळ चूर्ण जाहला ॥३५॥

उठोनि चालिला रघुनंदन ॥ येरी विलोकी दीनवदन ॥ वायुसुताकडे पाहून ॥ चंद्रसेना बोलतसे ॥३६॥

म्हणे कपटी तूं वानर देख ॥ तुवांचि कोरविला मंचक ॥ शेवटी नेतोसी रघुनायक ॥ मनोरथ माझे न पुरतां ॥३७॥

मी तुज शाप देईन आतां ॥ ऐकतां कृपा उपजली रघुनाथा ॥ हस्त ठेवीत तिचे माथां ॥ म्हणे चिंता न करावी ॥३८॥

माझी ध्यानमूर्ति सुंदर ॥ हृदयीं भोगीं निरंतर ॥ पुढें सत्यभामा चतुर ॥ कृष्णावतारीं होसी तूं ॥३९॥

ऐसें बोलतां रघुनाथ ॥ ती तेथेंचि जाहली समाधिस्थ ॥ पुढें महाकावतींत नृपनाथ ॥ मकरध्वज स्थापिला ॥२४०॥

स्कंधीं वाहून रामलक्ष्मण ॥ हनुमंतें केलें उड्डाण ॥ नळ नीळ अंगद जांबुवंत पूर्ण ॥ तेही पुढें भेटलें ॥४१॥

जैसा उदय पावे आदित्य ॥ तैसा सुवेळेसी येत हनुमंत ॥ बिभीषण आणि किष्किंधानाथ ॥ सामोरे धांवती दळभारेंसी ॥४२॥

सप्रेंमें सुग्रीव बिभीषण ॥ आले हनुमंतासी देखोन ॥ म्हणती बा रे हा देह ओवाळून ॥ तुजवरून टाकावा ॥४३॥

सुग्रीव आणि बिभीषण ॥ आश्चर्य करिती दोघेजण ॥ म्हणती धन्य धन्य वायुनंदन ॥ भरिलें त्रिभुवन प्रतापें ॥४४॥

जाहला एकचि जयजकार ॥ सर्वांसी भेटला रघुवीर ॥ हनुमंताचा प्रताप समग्र ॥ राजीवनेत्र स्वयें वर्णीं ॥४५॥

या ब्रह्मांडमंडपांत ॥ मारुतिऐसा नाही भक्त ॥ याचे प्रतापें आम्ही समस्त ॥ वानर धन्य जाहलों ॥४६॥

ब्रह्मांनंद म्हणे श्रीधर ॥ अग्निपुराणीं हे कथा सुंदर ॥ बोलिला सत्यवतीकुमर ॥ तेंचि सार कथियेलें ॥४७॥

स्वस्ति श्रीरामविजयग्रंथ सुंदर ॥ संमत वाल्मीकनाटकाधार ॥ सदा परिसोत पंडित चतुर ॥ एकत्रिंशत्तमोध्याय गोड हा ॥२४८॥

॥ अध्याय ३१॥

॥ श्रीरामचंद्रार्पमणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : June 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP