अध्याय तीसावा - श्लोक १५१ ते २१२

श्रीधरस्वामी रचित ’ श्रीरामविजय ’ ग्रंथाचे पारायण केल्याने जीवनातील वनवास संपून सुख प्राप्त होते .


भूजपत्र दाविलें त्वरित ॥ आश्चर्य करी कौसल्यासुत ॥ तों वानर म्हणती समस्त ॥ आम्हांसी सत्य न वाटे ॥५१॥

निर्जीव हस्ते लिहिले पत्र ॥ तरीच आम्ही मानूं साचार ॥ जरी हें हांसवील शिर ॥ आपुल्या पतीचें ये काळी ॥५२॥

राम म्हणे इचा महिमा थोर ॥ काय एक न करी निर्धार ॥ तंव ऋषभाहातीं आणविलें शिर ॥ अर्कपुत्रें ते काळीं ॥५३॥

महाविशाल भयंकर ॥ जिव्हा लोळे मुखाबाहेर ॥ झांकिला असे सव्य नेत्र ॥ भाळीं शेंदूर चर्चिलासे ॥५४॥

बाबरझोटी धरूनी ॥ ऋषभें ठेविलें आणोनी ॥ तें सुलोचनेनें धरूनी ॥ हृदयी तेव्हां आलिंगिलें ॥५५॥

स्फुंदस्फुंदोनि सती रडत ॥ त्रिभुवनीं बळिया इंद्रजित ॥ त्याचें शिर पडिलें येथ । कर्म विचित्र पूर्वींचें ॥५६॥

खालीं पसरी उत्तरीय वस्त्र ॥ त्यावरी बैसविलें तेव्हां शिर ॥ सतीनें करूनि नमस्कार ॥ विनवितसे कर जोडोनियां ॥५७॥

अयोध्यानाथ श्रीरामचंद्र ॥ पाहती स्वर्गींचे सुरवर ॥ तरी तुम्हीं हास्य करावें सत्वर ॥ जेणें श्रीराम धन्य म्हणे ॥५८॥

मजसीं विनोद नाना रीती ॥ करीतसां प्राणपती ॥ तरीच आजि क्रोध चित्तीं ॥ काय म्हणोनि धरियेला ॥५९॥

आजि अपराध समस्त ॥ समर्थें घालावे पोटांत ॥ माझा पतिव्रताधर्म बहुत ॥ रघुपतीसी दाविजे ॥१६०॥

होम विध्वंसिला म्हणोन ॥ तेणें क्रोध धरिलें मौन ॥ कीं समरीं जय न देखोन ॥ म्हणोनि खेद वाटला ॥६१॥

कीं रामदर्शना शिर आणिलें ॥ सायुज्यपद प्राप्त जाहलें ॥ म्हणोनि बोलणें खुंटलें ॥ जन्ममरण तुटले पैं ॥६२॥

इत्यादि भाव ते अवसरीं ॥ बोलिली फणिपाळकुमरी ॥ किंचित विनोदही करी ॥ सुलोचना हांसवावया ॥६३॥

शूर्पणखा तुमची आत । ते जयस्थानीं गौरविली बहुत ॥ कर्ण नासिक सुमित्रासुत ॥ घेऊनि गेला आरंभीं ॥६४॥

भगिनीचें देखोनि भूषण ॥ आनंदला पितृव्य कुंभकर्ण ॥ तेणें नासिक आणि कर्ण । सुग्रीवासी समर्पिले ॥६५॥

ऐसा विनोद करितां ॥ परी शिर न हांसे तत्वतां ॥ मग सहस्रवदनदुहिता ॥ खेद परम करीतसे ॥६६॥

म्हणे मी पूर्वीं चुकल्ये यथार्थ ॥ जरी पितयासी साह्य आणित्यें येथ ॥ तरी तुमचे शत्रू समस्त ॥ पराभविता क्षणार्धें ॥६७॥

ऐसी ऐकतांचि मात ॥ गदगदां तेव्हां शिर हांसत ॥ सव्य नेत्र उघडोनि पाहत ॥ जेवीं विकासे कमळिणी ॥६८॥

श्रीरामास पुसती वानर ॥ काय गोष्टीस हांसले शिर ॥ याउपरी राजीवनेत्र ॥ काय बोलता जाहला ॥६९॥

म्हणे इचा पिता सहस्रवदन ॥ तोचि अवतरला लक्ष्मण ॥ त्या श्वशुरें मज मारिलें म्हणोन ॥ शिर हांसलें गदगदां ॥१७०॥

अज्ञानरूप वामनयन ॥ मी त्यास न दिसे सगुण ॥ ज्ञानमय सव्य नयन ॥ उघडोनि मज विलोकी ॥७१॥

वानर डोलविती मान ॥ सुलोचना देवी धन्य धन्य ॥ सकळ सतियांमाजी निधान ॥ शिर अचेतन हांसविलें ॥७२॥

तंव तो वीर लक्ष्मण ॥ व्यापिला मायामोहेंकरून ॥ सुलोचनेकडे पाहोन ॥ आंसुवें नयन भरियेले ॥७३॥

रघुत्तमाप्रती बोलत ॥ अन्याय केला म्यां यथार्थ ॥ प्रत्यक्ष मारून जामात ॥ कन्या सुलोचना श्रमविली ॥७४॥

ऐसा शोकार्णवीं लक्ष्मण ॥ पडतां देखोनि रघुनंदन ॥ म्हणे बारे क्षत्रियधर्म दारुण ॥ देवें पूर्वींच निर्मिला ॥७५॥

बंधु अथवा पितापुत्र ॥ समरीं आलिया समोर ॥ त्यासी वधितां अणुमात्र ॥ दोष नसे सहसाही ॥७६॥

सौमित्र म्हणे श्रीरामा ॥ विश्वफलांकितद्रमा ॥ अजअजित पूर्णकामा ॥ तुम्हीं बोलिलां ते सत्य सर्व ॥७७॥

मायाचक्र महादुर्गम ॥ प्रियावियोगें वाटे श्रम ॥ सीतेलागीं तुम्हीं कष्टोनि परम ॥ वृक्ष पाषाण आलिंगिलें ॥७८॥

ऐसी ऐकातांचि मात ॥ कृपेनें द्रवला रघुनाथ ॥ म्हणे मी उठवीन इंद्रजित ॥ करीन ऐक्य उभयतांसी ॥७९॥

इंद्रकरीं आणोनि अमृत ॥ आतांचि उठवीन शेषजामात ॥ ऐकतां महावीर तेथे ॥ गजबजिले ते काळीं ॥१८०॥

खूण दावी सूर्यनंदन ॥ हे मनी न धरावें आपण ॥ विमानीं देव संपूर्ण ॥ भयभीत जाहले ॥८१॥

अंगद दावी करपल्लवीं ॥ बिभीषण किंचित मान हालवी ॥ जांबुवंत नेत्रसंकेत दावी ॥ नका करूं हे अघटित ॥८२॥

मग निर्भिडपणें वायुतनय ॥ बोलिला जो सर्वांसी प्रिय ॥ म्हणे तुमचें ठेवा औदार्य ॥ एकीकडे नेऊनियां ॥८३॥

अजा म्हणोनि न पाळिजे वृक्र ॥ मित्र म्हणों नये दंदशूक ॥ विषतरूचें काय सार्थक ॥ दुग्ध घालोनि वाढवितां ॥८४॥

इंद्रजिताचें बळें देव ॥ रावणें घातले बंदी सर्व ॥ याचें कापट्य वासव ॥ तोही नेणें सर्वथा ॥८५॥

सौमित्र बोलिला वचन ॥ जेणें होय सर्वांचे समाधान ॥ तैसें करावें आपण ॥ रघुनंदन यथार्थ म्हणे ॥८६॥

सुलोचनेसी म्हणे मित्रपुत्र ॥ पतीचें शिर घेऊनि जाय सत्वर ॥ निराशा देखोनि उत्तर ॥ सती सुलोचना बोलतसे ॥८७॥

दृष्टीं देखिला रघुनाथ ॥ इतुकेन सर्व कृतकृत्य ॥ म्हणोनि रामचरणीं ठेवित ॥ मस्तक पुन्हां सुलोचना ॥८८॥

सव्य घालोनि रघुवीर ॥ मागुता घाली नमस्कार ॥ उभी राहिली जोडोनि कर ॥ काय उत्तर बोलिली ॥८९॥

म्हणे आदिपुरुषा वैकुंठनायका ॥ मत्स्यरूपा वेदोद्धारका ॥ कमठरूपा सृष्टिपाळका ॥ आदिवराहस्वरूप तूं ॥१९०॥

तो तूं स्तंभोद्भव नरहरी ॥ वामनरूप मधुकैटभारी ॥ तीन सप्तके धरित्री ॥ केली निःक्षत्री तुवांचि ॥९१॥

तोचि तूं आतां रघुनाथ ॥ कौसल्यात्मज जनकजामात ॥ माता पिता बंधु सर्व गोत ॥ तूंचि माझें जगद्वंद्या ॥९२॥

मदनशत्रुहृदयआरामा ॥ परत्रींचा सोयरा तूं श्रीरामा ॥ दीनबंधु सर्वोत्तमा ॥ पूर्णब्रह्मा जगद्रुरो ॥९३॥

लंकेकडे आजि तत्वतां ॥ कपी न धाडावे सर्वथा ॥ मज अग्निप्रवेश करितां ॥ विक्षेप कोणी न करावा ॥९४॥

अवश्य म्हणोनि जगदुद्धार ॥ सतीचे मस्तकीं ठेविला कर ॥ सुलोचना वारंवार ॥ नमस्कार करी राघवा ॥९५॥

नेत्रद्वारें न्याहाळून ॥ हृदयी रेखिला रघुनंदन ॥ जयजय राम म्हणोन ॥ शिर घेऊनि चालिली ॥९६॥

मग रणमंडळीं येऊन सत्वर ॥ घेतलें पतीचें शरीर ॥ समुद्रतीरीं भयंकर ॥ विस्तीर्ण कुंड रचियेले ॥९७॥

मंदोदरीसहित लंकानाथ ॥ सहपरिवारें पातला तेथ । विमानीं देव समस्त ॥ पाहती कौतुक सतीचें ॥९८॥

सुलाचनेनें करूनि स्नान ॥ सौभाग्यकारक देत वाण ॥ कुंडी पतीची तनु घालून ॥ महाअग्नि चेतविला ॥९९॥

कुंडासी प्रदक्षिणा करूनि येरी ॥ धर्मशिळेवरी शेषकुमरी ॥ उभी ठाकोनि ते अवसरीं ॥ पाहे अंबरीं न्याहाळूनि ॥२००॥

धडकत दुंदुभीचे ध्वनी ॥ सुरांची दाटी झाली विमानी ॥ सकळ सुरांगना गगनीं ॥ अक्षय्य वाणें घेऊनि उभ्या ॥१॥

तंव दिव्य शरीर पावोनी ॥ इंद्रजित देखिला विमानी ॥ ऐसे देखतांचि नयनीं ॥ प्राण जाहला कासाविस ॥२॥

शरीर टाकूनि त्वरितगती ॥ आंतूत निघाली आत्मज्योती ॥ दिव्य देह पावोनि निश्चिंतीं ॥ पतीपाशीं पावली ॥३॥

मग शरीर उलंडोन ॥ अग्निमुखीं घातलें नेऊन ॥ तेव्हां मंदोदरी आणि रावण ॥ शोक करिती अत्यंत ॥४॥

सिंधुसंगमीं करूनि स्नान ॥ सहपरिवारें परतला रावण ॥ मंदोदरीसहित करीत रुदन ॥ लंकेमाजी प्रवेशला ॥५॥

घरोघरी लोक वानीत ॥ म्हणती यशस्वी अयोध्यानाथ ॥ एकपत्नीव्रत सत्य ॥ केलें सार्थक सुलोचनेचें ॥६॥

परिसोत सर्व पंडित ॥ अग्निपुराणीं सत्यवतीसुत ॥ बोलिला कथा हे यथार्थ ॥ नाहीं विपरित सर्वथा ॥७॥

कथा रसिक बहु पाहीं ॥ म्हणोनि योजिली श्रीरामविजयीं ॥ श्रोते धरोन सदा हृदयीं ॥ ब्रह्मानंदेंकरूनियां ॥८॥

पुढें कथा गोड गहन ॥ अहिरावण महिरावणाख्यान ॥ पाताळासी रामलक्ष्मण ॥ चोरूनियां नेतील ॥९॥

तेथें धांवण्या धांवेल हनुमंत ॥ ते कथा ऐकोत प्रेमळ भक्त ॥ ब्रह्मानंद अत्यद्भुत ॥ हृदयीं तेणें ठसावें ॥२१०॥

श्रीधरवरदा ब्रह्मानंदा ॥ पुराणपुरुषा अनादिसिद्धा ॥ निर्गुणा जगदंकुरकंदा ॥ जगद्वंद्या अभंगा ॥११॥

स्वति श्रीरामविजयग्रंथ सुंदर ॥ संमत वाल्मीकनाटकाधार ॥ सदा परिसोत भक्त चतूर ॥ त्रिंशत्तमाध्याय गोड हा ॥२१२॥

ओंव्या ॥२१२॥ अध्याय ॥३०॥

॥ श्रीरामचंद्रार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : June 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP