नारायणहंसाख्यान - सिध्दावस्था

श्रीमत्सद्‍गुरूहंसराजस्वामींची शिकवण म्हणजे मोक्षरूपी ध्येय गाठण्याकरितां श्रुति , युक्ति व अनुभूति यांच्या आधाराने साधकांच्या सोयीकरितां तयार करून दिलेली ज्ञानयोगाची सोपानपरंपराच आहे .


आतां श्रीसदगुरु नारायणहंस । प्रपंचीं असोनि सदा उदास । निशिदिनीं होतसे अभ्यास । दृढापरीक्षा ॥१॥

परी आधीं व्यवसाय तो कैसा । कोठें राहोनी होय अपैसा । ज्या त्या परी वर्तोनिया सहसा । नातळती कमळपत्रापरी ॥२॥

अनासिंगनामें वराडामाझारीं । एक असे सानसी नगरी । तेथील काज सरदेशपांडेगिरी । असे उपजीवन ॥३॥

तेथेंचि जाउन असती राहिले । नायब जमीदार सत्कारिते जहाले । तेणेसी सहवासें कार्यभाग चाले । अनायासें अवघा ॥४॥

दप्तर तितुकें सांभाळावें । येर कारभारा उगें साह्य असावें । सर्वत्रांसी मिळूनि वर्तावें । ज्याचे त्यापरी ॥५॥

उणेंच न पहावें कवणाचें । सर्वांसि मित्रत्त्वाचि साचें । अनुपकारियांही उपकाराचें । करावें सहायत्त्व ॥६॥

कदा बहु बोलणें असेना । कार्य साधावें एकचि वचना । बहु समाजांत बैसावेना । कार्यापुरतें असावें ॥७॥

धाकुटा बंधुहि तेथेंचि असे । त्याकडे पागेचें काम वसे । सदनींचा व्यापार तो पहातसे । सर्व उणापुरा ॥८॥

सरदेशपांडेगिरीचें जें उत्पन्न । भाग नेमिला होता त्यांतून । तो त्याचे करावा सर्व स्वाधीन । तेणें करावें आवडे तैसें ॥९॥

पुढें तेथेंचि आली असे कांता । आणि येवोनि राहिले मातापिता । परी नारायणहंसांसी प्रपंचाची वार्ता । ठाउकी नाहीं ॥१०॥

पूर्वी कर्माचरण सांग होत होतें । तें हळूहळूं जालें रहातें । मात्र लोकसंग्रहापुरतें । स्नानसंध्यादि होती ॥११॥

राममूर्तीचें करावें पूजन । तेंही लोकसंग्रहार्थ घडे अर्चन । परी सदा अंतरीं ज्ञानस्फुरण । अकृत्रिम असे ॥१२॥

प्रात :काळीं जागृतीस येतां । स्मरण आपसया उमटतसे चित्ता । शौचविधिही यथासांग करितां स्मरण काकदृष्टिसम ॥१३॥

नंतर मुहूर्त एक निवांत बैसावें । वृत्तिअभावीं निर्विकल्पक व्हावें । स्फुरणामाजींहि सामान्य पहावें । जेवी प्रकाशीं गगन ॥१४॥

उत्थनकाळीं संधीचें देखणें । विशेषामाजीं सहज समाधान । देहासी गमन परी विस्मरण । आपुलें नव्हे ॥१५॥

प्रात :स्नानादि नेम राहिले । होईल तेव्हां होवो वहिले । स्फूर्तिमात्र अतुट चाले । निदिध्यासरुपें ॥१६॥

कचेरीचा धंदा जालिया । स्नान करावें येवोनिया । पूजाप्रकार ब्रह्मकर्म सारोनिया । भोजनें करावी ॥१७॥

वामकुक्षी जालियावरी । पुस्तकें पहात बसावें निर्धारी । कोणी श्रवणार्थी मिळतां अधिकारी । निरुपणही करावें ॥१८॥

पुन्हां कचेरीस काम असतां यावें । नातरी देवस्थानालागी जावें । रात्रौ संध्याजालिया नेमें वाचावें । पुस्तकालागी ॥१९॥

नित्यनेम भजन करावें । मंडळीसहित फलाहार घ्यावें । नंतर शयनसदनीं जावोनि बैसावें । निद्रा ये जों पावेतों ॥२०॥

तेथें अनेक प्रकारिचे तर्क । स्वानुभवासहित प्रबोधात्मक । प्रबोधशक्तीचीं रुपें अनेक । आनाश्रुतहि होत जावे ॥२१॥

मग सुखें शयन स्त्रीसमवेत । करोनि उत्थानीं वर्तणें पूर्ववत । प्रपंचाचे उद्योग चित्त । कधींही नातळे ॥२२॥

आतां व्यापार भोजनादि होत असतां । ब्रह्मानुभूति स्फुरतसे चित्ता । तेचि कैसी कैसी समस्ता । परिसावी श्रोतीं ॥२३॥

देहासी घडतां मलसर्ग । आपण क्षररहित अभंग । देहासी शुध्दि होता असंग । मळेचिना शुध्द नव्हे ॥२४॥

देह आसनीं बैसला । आपण स्थित ना उभा ठेला । दहमार्गी चालतां संचला । आपण गगनापरी ॥२५॥

कोणी देहाकडे पाहुनि बोले । कीं वाणीनें तया उत्तर दिधलें । दोहीमध्येंहि आत्मरुप संचलें । आकार ना विकार ॥२६॥

कोणी नाम घेउनी हांका मारितां । आपण तो नामरुपापरता । या देहसंबंधाची वार्ता । मजला नाहीं ॥२७॥

अमुक एक कार्य करावें । अमुक अमक्यासी बोलावें । तेचि क्षणीं हें कार्य समजावें । अन्य चिदाभासाचें ॥२८॥

कोणी एकासी एक मारिती । एकासी एक कलह करिती । पाहतां विस्मय होतसे चित्तीं । म्हणे हे निरर्थक ॥२९॥

उगे मीमी माझेमाझे करिती । जयास्तव तयासी नेणती । खाती पाहती चालती वास घेती । मांसाचीं शरीरें कैसी ॥३०॥

हें तयालागी तो न कळे । परी मज वाटे कीं जाणीव उफाळे । गरगरा फिरविती मात्र डोळे । परी हे चित्कळा अवघी ॥३१॥

आपण पाहतां तेहि पाहे । तेणें निरखितां खुणेते लाहे । हे परस्परे जाणीव मिळताहे । जेवी पाणिया पाणी ॥३२॥

ऐसी एकरुपता अंतरीं उठतां । आनंदहेलावा दाटॆ अतौता । तेणें रोमांचादि थरकती वरुता । अथवा उडूं पाहे ॥३३॥

परी लोक हे भलतेचि भाविती । म्हणोनी जिरवावी आंतिच्या आंति । जरी नाटोपेचि तरी शीघ्रगती । उठोनी जावें तेथोनी ॥३४॥

स्नान करितां देह जीवनी । आपण पाणियाचीहि होय गवसणी । कैचा देह कोण प्रवर्ते स्नानीं । मी आपें ओला नव्हे ॥३५॥

मूर्तिपूजा कीं संध्यादि करितां । गंधपुष्पें कीं धूपधीप समर्पितां । आपण त्या सर्वा बाह्य आतौता । तेथें कैचें पूज्य पूजक ॥३६॥

मग तें करणें सर्वही रहावें । तटस्थ होउनि बैसावें । अहो धन्य मियाच मज ओळखावें । धन्य गुरु धन्य शास्त्र ॥३७॥

तथापि पूजाहि जरी सांग जाली । परी वाटेना तो देव म्यां केली । नैवेद्यादि दावितां वाटे हे भुली । चाळवणें लेकुरा ॥३८॥

भोजन करितांही मनीं वाटत । जेवी कणगींत धान्य साठवित । येणें प्रमाणें देहासी पुष्टि येत । मज विशेष काय ॥३९॥

वाईट गोड जरी लागतां । हे तो मनाचे धर्म वाटती परोता । तथापि माझिया प्रकाशाकरितां । मनासी मनत्त्व ॥४०॥

शयनीं जरी देह निजेला । परी मी न वाटे गुंडोनि पडिला । गगनासी वेष्टून जो असे उरला । तो मी न माय घटीं ॥४१॥

गगनीं जैसें कळसूत्र नाचे । तेवी आत्मत्त्वीं व्यापार देहाचे । तेथें तूं मी हें देहभान कैचें । उठतां वेचे आपणची ॥४२॥

पोथी वाचितां अर्थ घे बुध्दि । आपण तो अर्थाचेहि आधीं । तेंचि उफाळतसे वृत्तीमधीं । तेधवां पुस्तक फेकावें ॥४३॥

आरोळी मारोनि उठावें । तंव लोकलाजेस्तव सांवरोनि बसावें । परी कंपरोमांचादि थरकती स्वभावें । अश्रुधारा नेत्रीं ॥४४॥

अथवा न सावरतां पळावें उठोनी । मग पळतां थोडी वाटे मेदिनी । मागुती बैसावें सावरुनी । किंवा शयनीं निजावें ॥४५॥

वाद्य अथवा कथाकीर्तन । ऐकतां फुंजें दाटावें मन । तैसेंचि तेथून जावें सांडून । किमपि वृत्तीसी न साहे ॥४६॥

एकदां भजनीं मारुतीचें स्मरण । होतां मारुती मीचि जाला आपण । तेव्हां पाटासहीत केलें उड्डाण । मग पडे तळीं पाट वरी ॥४७॥

असो हे किती सांगावें । धरणी लेखा न पुरे स्वभावें । तिळभरही विस्मरण न पडावें । हरएक व्यापारी ॥४८॥

अनेकापरी अनेकधा । व्यापारनिव्यापारी तोचि धंदा । देहाची संपदा कीं आपदा । विटंबु ना वाटे ॥४९॥

वस्त्र पात्र कीं अलंकार । वाटे मढ्याचा जेवी श्रृंगार । वाहनीं आरुढतां अंतर । अनारिसें नव्हे ॥५०॥

द्रव्य जरी हातीं घेतलें । मृत्तिका म्हणोनि मन विटलें । लोक यासी काय असती भुकेले । यास्तव फेंकी आवेशें ॥५१॥

परस्त्री पाहतां उसाळे मन । सर्व पहातसे विदारुन । कानकोंडें होय चिळसून । नंतर आत्मत्त्व तेथें पाहे ॥५२॥

आत्मत्त्व पाहतां स्त्री ना पुरुष । तरी भोग्य भोक्ता कोण विशेष । आपणचि आपणात असतां निर्दोष । मग देखतां न देखतां सारिखे ॥५३॥

मातापिता बंधु कांता । माझे ऐसे जरी वाटे चित्ता । ब्रह्मस्फूर्ति उठतसे चित्ता । तेव्हां लाजे आपेआप ॥५४॥

प्रवाहें काष्टें जेंवि मिळालीं । खेद नव्हेचि जरी बिघडलीं । तैसी हे जन्मली कीं मेली । परी मज संबंध असेना ॥५५॥

या रीती माझें म्हणणेंची मावळलें । उगेंच शेजारियापरी वाटते जालें । आतां देहासी मी म्हणुन नेणतां स्फुरलें । तेथें उमटलें ब्रह्मत्त्व ॥५६॥

या मढ्यासी जरी मी म्हणतां । लाज कोणती असे यापरता । ब्रह्मानंदेंचि वृत्ति दाटतां । देहबुध्दि मावळे ॥५७॥

शंकरापुढें जैसा काम । कीं सहस्त्र करापुढें तम । तेवी एकचि दाटतां आत्माराम । देहबुध्दि उभी जळे ॥५८॥

अभ्यासें मी स्फूर्तिच उठो राहे । स्फूर्तिस बाह्य आपण आहे । जरी व्यापारी मी म्हणणें लाहे । परी अंतरीं वाटे अहाच ॥५९॥

देहाचे व्यापार वाईट कीं चांगले । प्रारब्धवशें जे घडती वहिले । ते म्यां आत्मयानें नाहीं केले । अथवा करविलेहि ना ॥६०॥

जरी देहाचें करणे देहपंचकांसी । संबंध काय मज आत्मयासी । तरी पापपुण्यभोगही कवणासी । क्रियमाणाचे असती ॥६१॥

आतां याचें करणें कीं न करणें । सारखेचि असती मज काय तेणें । येणें रीती कर्तृत्त्व निर्दाळणें । भोक्तृत्त्वहि तैसेंचि ॥६२॥

असो मीमाझें कीं कर्ताभोक्ता । नातळेचि व्यापारही होत्सातां । बहु बोलणें कासया आतां । स्वप्नींही असंगत्त्व ॥६३॥

ऐसा ब्रह्मविद्येचा वाढला । अहंकार ब्रह्मांडाहुनी थोर जाला । त्यामध्येंचि पाहे सकळला । पिंडब्रह्मांडीं जीवशिवादि ॥६४॥

ऐसें तीन संवत्सर तेथें लोटले । स्वजनीं असोनि तया नाहीं आतुळले । जरी कमळ असतांहि नव्हे ओलें । जळाचेनि ॥६५॥

तेथें परशराम भट एक । विरक्त पाहोनि होती त्या बोधक । परी तो जडबुध्दि उपदेश कौतुक । उपतिष्टला नाहीं ॥६६॥

असो नारायणहंस प्रपंचामाझारीं । असोनि मीमाझियां नातळे तिळभरी । तयासी त्याग कासया निर्धारी । परी त्यागबुध्दि विसरेना ॥६७॥

सदा संचारावें भूमीवरी । स्वतंत्रपणें एकटे निर्विकारी । हाचि हेतु सर्वदा अंतरीं । उठे अकृत्रिम ॥६८॥

मिया निवांत संचरावें । देही देह बुध्दीसी नातळावें । परी उपाधिविण केवी बोलावें । बोलतां तादात्म्य नसे ॥६९॥

असो नारायणहंसाचा हेतु । कीं त्यागोनि जावें समस्तु । परी गुरुनें आज्ञापिता राहतु । तरी आतां आज्ञा पुसो ॥७०॥

या कारभारीं अधिक उणें । कवणासीहि लागेचि बोलणें । एके दिनीं कांतेलागी म्हणे । कीं आम्हां जाणें संचारा ॥७१॥

तूं सासुसासर्‍याची सेवा करी । अथवा जावोनि राहे माहेरीं । आम्हीं आतां जातसों संचारीं । स्वतंत्रपणें ॥७२॥

तंव लक्ष्मीबाई असे बोलत । मज सदा ठेवावें सेवे आंत । मजसी चरणाविण गणगोत । दुजें कवण असे ॥७३॥

तथापि मज जाल सोडुनी । तरी मी वाचेना अन्यस्थानीं । तस्मात मज न्यावें सहगमनीं । मी अर्धविभागी सुखदु :खां ॥७४॥

तुम्ही खाल जरी निंबपाला । तरी मीही विभागी असे तयाला । अन्यथा चरणशपथ असे मजला । जरी मी कांहीं मागेन ॥७५॥

मग कळवळोनि नारायणहंसें । तथास्तु म्हणोनि चाल म्हणती सहवासें । आणिक या पूर्वीच वर्तमान जालेंसे । तें बोलतां राहिलें ॥७६॥

एक भगवंतरावनामें सत्वगुणी । तो नायब असे तया स्थानीं । तेणें नारायणहंसांसी गुरुत्त्व मानुनी । तत्त्वविचार पुसतसे ॥७७॥

तयासी मानसपूजाविधानप्रकार । सगुण कल्पोनि करावें निराकार । हेंचि सांगितलें जेणें ज्ञानाधिकार । अनायासें होय ॥७८॥

असो तयासीही न पुसतां । आणि मातापिताबंधूसीही न कळतां । मागील सहा घटका रात्र असतां । उभयतां निघाले ॥७९॥

उजाडिचे मार्गा निघाले । गांवाबाहेर येतां अस्वल भेटलें । तें लक्ष्मीबाईनें पाहुन घातलें । आलिंगन पतिकंठी ॥८०॥

ते रीस स्वइच्छेनें जातां मग मार्गी चालिले उभयतां । परी मार्गात तीन दिवस चालतां । अन्न नाहीं मिळालें ॥८१॥

चौथें दिनीं डोंगरगांवा आले । तेथें एका भावार्थियानें नेलें । शिवपार्वती म्हणोनि पूजिलें । घातिलें भोजन ॥८२॥

नंतर अस्तमानीं शेवाळियासी । येउनि भेटले सदगुरुसी । वर्तमान निवेदिलें चरणांसी । जी जी परार्जन मज नको ॥८३॥

श्रीस्वामीचे आज्ञेवरुनी । प्रपंच संपादिला अर्जन करोनि । आतां हेतु जी गुरुआज्ञा घेउनी । भिक्षा मागावी ॥८४॥

कवणेहि क्षेत्रीं जाउनि रहावें । आणि सज्जनगडासी वाटे जावें । तंव सदगुरु म्हणती आतांचि युक्त नव्हे । मजसी आज्ञा देणें ॥८५॥

दहा घरें जे भिक्षा मागावी । ते एका यजमानापासोनि घ्यावी । तेही मानसीं भिक्षा म्हणावी । यथालाभ संतुष्ट ॥८६॥

मज अर्धी जे मिळतसे । ते उभयतां खाऊं एक सहवासें । नारायणहंस म्हणे यें युक्त नसे । मज सेवाधारका ॥८७॥

तरी येथें चरणापासींच राहोनी । उदरशांति करुं भिक्षा मागुनी । चरणसेवा करुं अनुदिनीं । ऐकतां उत्तर नाहीं दिलें ॥८८॥

मनिचा भाव कीं लक्ष्मणहंसांचा । कांहीं बंदोबस्त करावा उपजीविकेचा । परी बोलून दाखविलें नाहीं वाचा । मग नारायणें काय केलें ॥८९॥

माध्यान्हकालीं मधुकरीसी गेले । ते सदगुरुहंसालागी कळलें । शिष्य पाठऊन माघारें आणिलें । आणि रागेजोनि बोलती ॥९०॥

देह तरी असतां अमुचा । तूं स्वतंत्रपणा करिसी कैचा । आम्ही भाजुन खाऊं किंवा काचा । यांत तुझें काय ॥९१॥

नारायणहंसें साष्टांग नमोनि । नाहीं कवण म्हणे अंत :करणीं । परी ओझें न पडावें सदगुरुलागुनी । देहपोषणाचें ॥९२॥

तेथें कोमटी एक नारायण । तो उपदेशी होता युक्तधनकण । त्याचें दुकानीं वही लिहून । वेतन घ्यावें उदरासीं ॥९३॥

या रीती सांगोनि नारायणासी । गुरुसेवाचि जाणोनि मानसी । निर्वाह चालवोनिया मजपासी । सेवेसी रहावें ॥९४॥

नारायण विनवीतसे मागुती । मी राहीन आज्ञा पाळुनी प्रीती । परी मातापिता उगे राहों न देता । सळिती दे दे म्हणोनी ॥९५॥

गुरु म्हणती तुझें काय गेलें । मिळाल्या विभागातून जरी नेलें । परंतु तुवां पाहिजे राहिले । दुकान सांभाळोनी ॥९६॥

तथास्तु म्हणोनि दुकानीं राहिले । वाडियांतचि क्रोपट वसिनलें । तेणें जें वेतन करोनि दिधलें । त्यांत निर्वाह करावा ॥९७॥

तीर्थरुपहि समाचारा येती । येथें राहिले म्हणोनि सुखरुप जाती । पुढें धाकुटे बंधूचे लग्नाची निश्चिती । तीथ असे नेमिली ॥९८॥

मग ते साहित्य मागों आले । कांहीं सामान उधार घेऊन गेले । यास्तव कर्ज द्यावें लागलें । अल्पवेतनामधुनी ॥९९॥

यथाशक्ति त्याकरितां निमें वेतन द्यावें । अर्धियामाजीं निर्वाह चालवावें । ऐसी दोन वर्षे लोटलीं बरवें । परी अल्पलाभें संतोष ॥१००॥

त्यामाजींच अतिथिअभ्यागत । पिताहि येउन तेथें रहात । नित्य उणें उत्तर बोलत । तेणें चित्त भंगतसे ॥१०१॥

असो कांहीं काळ पिता राहोनी । जाते जाले ते निजभुवनीं । इकडें वर्तणूक चाले जे अनुदिनीं । तें कांहीं एक बोलूं ॥१०२॥

दिवसां यजमानाचें दुकानीं । व्यापार चालवावे त्या अनुसरोनी । परी अंतरीं ब्रह्मानुभवचिंतनीं । उदासीनत्त्वें असावें ॥१०३॥

गुरुगृहीं कांहीं लागतां । आणोनि द्यावें पदार्थ जाता । रात्रीं जालिया सदना अतौता । गुरुसेवा करावी ॥१०४॥

दासबोध आणि भजन । नित्य नेम चाले प्रतिदिन । अथवा पुस्तकाचें निरुपण । मध्यान्हरात्रपावेतों ॥१०५॥

मग सदगुरुची आज्ञा जालियावरी । शयन करावें जावोनि निर्धारी । ऐसीच वर्तणूक होतसे अहोरात्रीं । परी अनुसंधान खंडेना ॥१०६॥

ब्रह्मानुभूतीचे आनंदें । सुख :दुखां नातळे स्वच्छंदें । नित्यानंदचि दाटे रसास्वादें । पूर्वी निरोपिल्यापरी ॥१०७॥

त्या वृत्यानंदाचेनि योगें । ब्रह्मांडही तुच्छ वाटूं लागे । नामरुपाचीहि हरपलीं सोंगें । उमसूं नलाहती ॥१०८॥

परी ब्रह्मानंदाचा सोहळा । भडभडा उठतसे उमाळा । तेणें देह सुखरुप कीं अवकळा । नाठवे किमपि ॥१०९॥

परीं त्रिपुटीचें मात्र द्वैत असे । तेंही स्वानुभवें ऐक्य होतसे । परी मागुती आल्हादें उमसे । वारंवार पूर्वरीती ॥११०॥

प्रतिदिनीं वेदांत -श्रवण -मनन । त्यावरी गुरुचें शासन । तेणें क्रमेंचि सोडोनि ध्यातेपण । ध्येयीं समरसावें ॥१११॥

अज्ञान समूळ नष्ट जालिया । ज्ञानवृत्तिही मावळे आपसया । वस्तुतंत्र समाधान पावूनिया । दृढ अपरोक्षता जाली ॥११२॥

हें अमुक त्यागावें का घ्यावें । हें अमुक करावें का न करावें । अमुक साध्य असे कीं साधावें । कांहीं उरलें नाहीं ॥११३॥

हें वाईट अथवा बरें । हें मिथ्या हें साचोकारें । हें सानसे आणि थोरे । कांहींचि उरलें नाहीं ॥११४॥

सहज घडेल तोचि विधि । अर्थातचि नव्हेल ते निषेधि । ऐसी दृढतरचि जाली बुध्दि । सहज समाधि ॥११५॥

एवं करावयाचें तितुकें केलें । पाववयाचें तें प्राप्त जालें । अनिर्वाच्य समाधान पावलें । सदगुरुप्रसादें ॥११६॥

आतां त्यागाचेंहि काम नसतां । परी त्याग बुध्दि उठतसे चित्ता । हा पूर्वील प्रवाह स्वभावतां । न निमे आमरण ॥११७॥

हा सदगुरुनारायणहंसांसी । उपेगा न येचि निश्चयेसी । परी अमुच्या मुमुक्षूच्या भाग्यासी । हेतु हा उठतसे ॥११८॥

एके दिनीं लक्ष्मणहंसांनीं । उपदेश देवविला कांतेलागुनी । तेहि तत्पर असे गुरुपादसेवनीं । आणि अल्पसंतोषी ॥११९॥

जसो लक्ष्मीबाई काळे करुनी । तेथें जाली असे गुर्विणी । लक्ष्मणहंसांसी आनंद मनीं । परी नारायणहंस साशंक ॥१२०॥

म्हणे स्वतंत्रता जे वाढावी । तों तों परतंत्राचि होतसे बरवी । आतां पुत्रादि जालिया उठाठेवी । व्याप अधिक होईल ॥१२१॥

ऐसें अंतरींच उठतसे । मागुती समाधानही होतसे । जें जें होणें तें होय अपैसे । न होणें तें नव्हेचि ॥१२२॥

असो सातवा मास लागला । मातेसी आणावें म्हणोनि बेत केला । तंव प्रसूति झाली अवकाळाला । निमाला पुत्र जन्मोनी ॥१२३॥

लक्ष्मीबाईसीहि कष्ट थोर । दुखणेंहि जालें अपार । कोणी करावया नाहीं दुसर । स्वहस्तें पथ्य घालावी ॥१२४॥

असो पांच दिवस लोटल्यावरी । मृत्यु पावली ती सुंदरी । परी नारायणहंसांचें अंतरीं । दु :ख स्पर्शलें नाहीं ॥१२५॥

दुसरे दिनीं माताही आली । ते अति आक्रोशें रडूं लागली । ते म्हणे माझे हातिची गेली । पुत्र आणि सून ॥१२६॥

असो यथाविधि सपिंडी जालिया । कर्जही होतें तें फेडोनिया । उरलें वस्त्र पात्र वांटोनिया । मोकळे जाले ॥१२७॥

मातेसीहि वाटे लाविले । मग एकांतीं प्रभूसी विनविले । आतां पाहिजे मज आज्ञापिलें । भूमिसंचारा ॥१२८॥

मी येथेंचि राहिलों जरी । पितरे राहूं न देती तरी । तस्मात आज्ञाचि द्यावीं जी झडकरी । तथास्तु म्हणती गुरुनाथ ॥१२९॥

आतां पुढील कैसी कैसी वर्तणुक । लोकोपकारार्थ होय सकळिक । ते यथामति चिमणें बाळक । ऐकावें बोलेल ॥१३०॥

इति श्रीमद्वंसगुरुपध्दति । ग्रंथरुपें ज्ञानाभिव्यक्ति । नारायणहंसाख्याण निगुती । पंचम प्रकरणीं ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : May 24, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP