अध्याय एकवीसावा - श्लोक ५१ ते १००

श्रीधरस्वामी रचित ’ श्रीरामविजय ’ ग्रंथाचे पारायण केल्याने जीवनातील वनवास संपून सुख प्राप्त होते.


मग पुसे प्रधान प्रहस्त ॥ तूं कोणाचा आहेस दूत ॥ परी तो न बोले हनुमंत ॥ पाहे चकित उगाचि ॥५१॥

मग पुसे द्विपंचवदन ॥ मर्कटा तूं कोणाचा कोण ।ं यावरी जनकजाशोकहरण ॥ काय वचन बोलत ॥५२॥

म्हणे रे मशका रजनीचरा ॥ महामळिणा दुर्जना पामरा ॥ मी कोण आहे तुज तस्करा ॥ कळलें नाहीं अद्यापि ॥५३॥

जेणें स्वयंवरीं तुज वांचविलें ॥ उरावरोनि चाप काढिलें ॥ त्याचा दास मी जाण वहिलें ॥ शिरकमळें छेदीन तुझीं ॥५४॥

जेणें ताटिका सुबाहु मारून ॥ केलें कौशिकमखपाळण ॥ मूढा त्याचा दास मी आहे पूर्ण ॥ करीन दहन लंकेचें ॥५५॥

तुझे भगिनीचें नासिक छेदिलें ॥ खर दूषण त्रिशिरा मारिले ॥ त्याचा दूत मी आलों बळें ॥ शिक्षा तुज लावावया ॥५६॥

जैसें अन्नसदनी रिघे श्र्वान ॥ तैसा पंचवटीस येऊन ॥ चोरिलें जानकी चिद्रत्न ॥ महामलिना अपवित्रा ॥५७॥

रामपंचानानची वस्तु ॥ कैसा ठेविशील तूं बस्तु ॥ पाडून वासुकीचा दांतु ॥ मंडूक वांचेल कैसा पां ॥५८॥

व्याघ्र असतां निद्रिस्त ॥ बाहेर जिव्हा लळलळित ॥ ती तोडोनि जंबुक यथार्थ ॥ कैसा वांचेल सांग पां ॥५९॥

तुझा अखया मारून ॥ विध्वंसिलें म्यां अशोकवन ॥ तुझें दळ अवघें मर्दून ॥ इंद्रजित गांजिला ॥६०॥

राक्षसकुळवैश्र्वानर ॥ अयोध्याप्रभु कौसल्याकुमार ॥ तुझें छेदावया शिर ॥ समरधीर येत आतां ॥६१॥

तो विषयकंठवंद्य रघुनंदन ॥ तुझे दश कंठ छेदून ॥ दशदिशांसि वळी देऊन ॥ सीता घेऊन जाईल ॥६२॥

ऐसें ऐकतां द्विपंचवदन ॥ जाहला परम क्रोधायमान ॥ म्हणे यांचें पुच्छ नासिक कर्ण ॥ जिव्हा छेदून टाका रे ॥६३॥

ऐसें बोलता लंकेश ॥ चौताळले महाराक्षस ॥ पुच्छावरी आसमास ॥ शस्त्रघाय मारिती ॥६४॥

धांपा दाटती हाणतां वैभवें ॥ परी त्याचे रोमही वक्र नोहे ॥ भय घेतलें दशग्रीवें ॥ म्हणे बरवें दिसेना ॥६५॥

मग विचारी निजमनीं ॥ हा रामउपासक सत्यवचनी ॥ तरी याचा मृत्यु कैसेनि ॥ आण घालूनि विचारूं ॥६६॥

मग म्हणे तुज रघुपतीची आण ॥ सत्य सांग तुझें मृत्यांग कोण ॥ येरू म्हणे मज नाहीं मरण ॥ ऐकोनि रावण हांसत ॥६७॥

ब्रह्म्य़ासही आहे मरण ॥ तेथें तुझा कीटका पाड कोण ॥ येरू म्हणे पुच्छा होईल दहन ॥ तैंच मरण आम्हांसी ॥६८॥

तैलें वस्त्रें भिजवून ॥ पुच्छ गुंडाळूनि लावा अग्न ॥ क्षणामाजी भस्म होऊन ॥ सर्व जाईल निर्धारें ॥६९॥

वस्त्रें गुंडाळा बहुत ॥ तेणें अग्नि चेतेल अद्भुत ॥ क्षणामध्यें होईल अंत ॥ उशीर येथें न लगेचि ॥७०॥

रावण म्हणे हें साचार ॥ मग स्नेहेंसहित वस्त्रभार ॥ पुच्छा गुडाळिती समग्र ॥ वायुकुमर काय बोले ॥७१॥

म्हणे पुच्छ उघडें राहतां ॥ मग मज नाटज्ञेपे हे तत्वतां ॥ राक्षस भागले वस्त्रें गुंडाळितां ॥ पुच्छ सर्वथा न सरेचि ॥७२॥

वस्त्रराशी आटल्या समग्र ॥ अधिकाधिक वाढें पुच्छाग्र ॥ जैसें पंडितबुद्धीचा प्रसर ॥ बोलतां बहु न सरेचि ॥७३॥

कीं महाकवीची पद्यरचना ॥ अपार लिहितां ते सरेना ॥ रामगुणांची वर्णना ॥ वर्णितां शेषा नाटोपे ॥७४॥

तैसें मारुतीचें पुच्छ अद्भुत ॥ राक्षसांसि नव्हे गणित ॥ जैसा अजारक्षकांसी निश्र्चित ॥ वेदार्थपार समजेना ॥७५॥

असो सरल्या वस्त्रांच्या राशी ॥ शेवटीं नग्न केले नगरवासी ॥ कोठें न मिळे एक दशी ॥ बहुत प्रयासें शोधितां ॥७६॥

रावणीवसा नग्न केला ॥ तरी पुच्छाग्र उघडा राहिला ॥ निःशेष तंतुमात्र उरला ॥ नाहीं कोठें नगरांत ॥७७॥

हनुमंत म्हणे अणुमात्र रितें ॥ राहतां बोले नाहीं मातें ॥ एक काढूनि यज्ञोपवीतें ॥ भयें पुच्छासी गुंडाळिती ॥७८॥

तैल घृत नवनीत ॥ शोधितां न मिळे निश्र्चित ॥ विंशतिचक्षूसी सांगती दूत ॥ स्नेह वस्त्रें न मिळती कोठें ॥७९॥

राजसेवक फिरती नग्न ॥ उभयद्वारें मुक्त सोडून ॥ नगरींचे लज्जेनें जन ॥ कपाटें झांकून बैसले ॥८०॥

एक बैसले अंधारीं ॥ एक निघाले विवरीं ॥ एक नेत्र लावून निशा थोरी ॥ दिवस असतां केली हो ॥८१॥

वृद्ध वृद्ध एक बोलती ॥ पुढें दिसे बरवी गति ॥ हें लंकानगर अंती ॥ भस्म होईल दिसतसे ॥८२॥

असो वस्त्रें न मिळती निश्र्चित ॥ पुच्छ उघडें एक हस्त ॥ रावण म्हणे अशोकवनांत ॥ वस्त्रें असती सीतेपाशीं ॥८३॥

ऐकतां तयाच्या उत्तरा ॥ हनुमंत आवरी पुच्छाग्रा ॥ दूत सांगती दशकंधरा ॥ अणुमात्र पुच्छ उरलें नसे ॥८४॥

तेथें कासया पाहिजे वस्त्र ॥ लंकेश म्हणे लावा रे वैश्र्वानर ॥ चुडी लाविती रजनीचर ॥ अनळ साचार स्पर्शेना ॥८५॥

नाना उपाय योजिती ॥ परी न लागेचि अग्निज्योति ॥ रावण पुसे मारुती ॥ अनळ कां रे स्पर्शेना ॥८६॥

मग बोले अशोकवनारी ॥ पुच्छयज्ञ होती तुझे घरीं ॥ तरी सेवकाहातीं निर्धारीं ॥ मूर्खा किमर्थ फुंकविसी ॥८७॥

तरी तूं स्वमुखेंकरून ॥ चेतवी सत्वर कृशान ॥ न लागतां एक क्षण ॥ ज्वाळा येथें उठती ॥८८॥

ऐसें बोलतां अंजनींसुतें ॥ तें मानलें दशमुखातें ॥ परी अंतरीं पावला भयातें ॥ मग धैर्य धरूनि उठियेला ॥८९॥

ते वेळे निजमुखें दाहक ॥ बळें फुंकी लंकानायक ॥ हनुमंतें बंधु आणि जनक ॥ अनळ अनिळ स्मरियेला ॥९०॥

तों एकाएकीं अग्न धडकला ॥ दाही मुखीं झोंबती ज्वाळा ॥ दाढ्या मिशा तेव्हां सकळा ॥ भस्म केल्या जाळूनि ॥९१॥

रावणें पाप केले बहुत ॥ पुढें रामबाणें यासी देहांत ॥ यालागीं अगोदर प्रायश्र्चित्त ॥ राघवप्रियें दिधलें कीं ॥९२॥

दशमुखीं पोळला दशकंधर ॥ दिसे दग्धकांतार ॥ असो मुखासी लावूनियां वस्त्र ॥ निजासनीं बैसला ॥९३॥

तंव धडकला पुच्छवन्हि ॥ हनुमंत गडबडां लोळे धरणीं ॥ काकुळती ये म्हणे सोडी कोणी ॥ असुर मनीं आनंदले ॥९४॥

म्हणती हे बरवें जाहलें ॥ अखयादिकांसी येणें मारिलें ॥ मर्कटें बहुतांसी संहारिलें ॥ विटंबिलें इंद्रजिता ॥९५॥

मग विरिंचीनें धरिला युक्तीं ॥ दशमुखें योजिली बरवी गती ॥ अग्न लाविला पुच्छाप्रति ॥ मरेल निश्र्चितीं आतांचि ॥९६॥

येरू चडफडी तडफडी ॥ उडे पडे भूमीसी गडबडी ॥ आपली मांडी थापटोनि दाढी ॥ रावणाची गेला धरावया ॥९७॥

तों दाढीच नाहीं निःशेष ॥ तेणें रावणासी बसला दचक ॥ देखोन करी हास्यमुख ॥ म्हणे अनर्थ दिसता पुढें ॥९८॥

हनुमंत म्हणे असुरांप्रति ॥ मज सोडवावें समस्तीं ॥ ऐका माझी एक विनंति ॥ धांवे मारुती पुढेंचि ॥९९॥

तंव ते पळती दूरदूर ॥ पुच्छें आकर्षूनि असुर ॥ दाढ्या जाळियेल्या समग्र ॥ प्रळय थोर मांडला ॥१००॥

N/A

References : N/A
Last Updated : April 10, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP