अध्याय अठरावा - श्लोक २०१ ते २५५

श्रीधरस्वामी रचित ’ श्रीरामविजय ’ ग्रंथाचे पारायण केल्याने जीवनातील वनवास संपून सुख प्राप्त होते.


मी बहु वडील तुम्हांहून ॥ मज आधीं देइंजे हा मान ॥ मग बोले वायुनंदन ॥वडील आयुष्यें मी असे ॥१॥

जयाचे गांठीं आयुष्य फार ॥ तोचि वृद्ध म्हणावा साचार ॥ ज्याचें मरण जवळी निर्धार ॥ तोच धाकुटा बोलिजे ॥२॥

तुझें आयुष्य मागें सरलें ॥ माझें बहुत पुढें उरलें ॥ ज्याचे गांठीचें धन वेंचलें ॥ तरी भाग्यवंत नव्हे तो ॥३॥

असो मग जांबुवंताप्रती ॥ समस्त वानर विनविती ॥ श्रीराममुद्रांकित मारुति ॥ त्यासी आज्ञा देइंजे ॥४॥

मग हनुमंतें झांकून नेत्र ॥ हृदयीं आठविला कामांतकमित्र ॥ जो जीमूतवर्ण कोमलगात्र ॥ अति पवित्र नाम ज्याचें ॥५॥

स्मरण करूनि हनुमंत ॥ लोटला तेव्हां अग्निआंत ॥ उडीसरसा अग्नि शांत ॥ परम अद्भुत वर्तलें ॥६॥

वानर म्हणती कच्चें जाहलें ॥ काष्ठढीग पुढती रचिले ॥ आकाश कवळिलें ज्वाळें ॥ दिशा धूमें दाटल्या ॥७॥

सपक्ष नग येत अकस्मात ॥ तैसा लोटला हनुमंत ॥ तात्काळ जाहला अग्नि शांत ॥ न दिसे किंचित कोठें पैं ॥८॥

ऐसेंच केले तीन वेळ ॥ परी न मरे अंजनीबाळ ॥ आश्र्चर्य करिती कपी सकळ ॥ वर्णिती बळ मारुतीचें ॥९॥

कपी म्हणती हनुमंता ॥ आम्हांसी मरो दे तरी आतां ॥ येरू म्हणे सागरीं तत्वतां ॥ प्राण देऊं चला हो ॥२१०॥

तेथोन निघाले वानर ॥ तों समीप देखिला सरितेश्र्वर ॥ चिंताक्रांत वायुकुमर ॥ ध्यानस्थ बैसला एकीकडे ॥११॥

वरकड ते वानरगण ॥ चिंतातुर करिती शयन ॥ तों संपाती मुख पसरून ॥ भक्षावया पातला ॥१२॥

अरुणपुत्र तो पक्षी थोर ॥ जटायूचा ज्येष्ठ सहोदर ॥ मुख पसरोनि भयंकर ॥ वानरांसी भेडसावी ॥१३॥

जवळ देखोनि संपाती ॥ कपी एकमेकांसी बोलती ॥ जटायूसारिखा निश्र्चितीं ॥ दिसतसे द्विजराज हा ॥१४॥

म्हणती अनायासेंकरून ॥ आम्हांसी आलें जवळी मरण ॥ मग आठवून रघुनंदन ॥ नामस्मरणें गर्जती ॥१५॥

ज्याचें नाम घेतां संकटीं ॥ निर्विघ्न होय सकळ सृष्टी ॥ अपाय ते उपाय शेवटीं ॥ दुःख तें सुख होय ॥१६॥

असो नामघोषें कपी गर्जती ॥ तों पक्ष फुटले सपातीप्रती ॥ तेणें लोटांगण घातले क्षितीं ॥ जयजयकारेंकरूनियां ॥१७॥

म्हणे धन्य धन्य तुम्ही वानर ॥ केला माझा आजि उद्धार ॥ कोठें आहे रघुवीर ॥ माझा सहोदर तेथें असे ॥१८॥

बहुत दिवस जाहले ॥ परी त्याचा समाचार न कळे ॥ तों कपिवर बोलिले ॥ जटायु मारिला रावणें ॥१९॥

पितृव्य म्हणोनि रघुनाथ ॥ जटायूसी होता मानित ॥ त्याची उत्तरक्रिया समस्त ॥ राघवें केली निजांगें ॥२२०॥

जटायूचें सार्थक केलें ॥ संपातीनें आंग धरणीवरी टाकिलें ॥ म्हणे अहा ओखटें जाहलें ॥ दिशा शून्य बंधूविणें ॥२१॥

सूर्यमंडळ पहावयालागोनि ॥ दोघे गेलों होतो उडोनि ॥ तैं म्यां पक्षांखाली घालूनि ॥ जिवलग आपुला वांचविला ॥२२॥

माझे पक्ष दग्ध जाहले ते वेळीं ॥ मग म्यां भयें हांक फोडिली ॥ सूर्यरथीं अरुणें ऐकिली ॥ स्नेहेंकरूनि कळवळला ॥२३॥

मग सूर्यासी प्रार्थून ॥ वर दिधला मजलागून ॥ रामदूतांचें होतां दर्शन ॥ पक्ष संपूर्ण फुटतील ॥२४॥

जैसा पक्षहीन पर्वत ॥ तैसा पडिलों होतों येथ ॥ आजि पक्ष आले अकस्मात ॥ तुमच्या प्रतापें करूनियां ॥२५॥

हा चंद्रगिरि पर्वत ॥ ऐथें चंद्रनामा आहे महंत ॥ तो सद्रुरु माझा यथार्थ ॥ मज वेदांतज्ञान सांगे ॥२६॥

असो संपाती पुसे वानरातें ॥ कोठें जातां येणें पंथें ॥ कपी म्हणती सीताशुद्धीतें ॥ करूं जातों पक्षींद्रा ॥२७॥

संपाती मग बोलत ॥ पैल ते लंका दिसत ॥ सीता सती अशोकवनांत ॥ बैसली असे ध्यानस्थ ॥२८॥

तरी तुम्हीं समस्त वानरीं ॥ बैसावें माझिये पृष्ठीवरी ॥ नेऊन घालीन पैलपारीं ॥ लंकेमाजी येधवां ॥२९॥

अथवा एकोत्तरशत माझे सुत ॥ पृथक् पृथक् बैसा समस्त ॥ मग म्हणे जांबुवंत ॥ मार्गचि सांग आम्हांतें ॥२३०॥

संपाती बोले वचन ॥ ऐलतीरीं मलयागिरिचंदन ॥ त्याची शाखा शतयोजन ॥ लंकेमाजी प्रवेशली ॥३१॥

परी तेथें कृष्णसर्प असती ॥ तेथें तुमची न चले गती ॥ शतयोजन सरितापती ॥ लंकेसी परिघ आडवा ॥३२॥

नमस्कार करोनि वानरांसी ॥ संपाती गेला निजाश्रमासी ॥ मग कपी बैसले विचारासी ॥ जांबुवंतासहित पैं ॥३३॥

सागराचें जीवन ॥ रुंद असे शतयोजन ॥ उडावया सामर्थ्य पूर्ण ॥ कोणा किती सांगा तें ॥३४॥

परस्परें ते वानर ॥ करिती उडावयाचा विचार ॥ शतयोजनें समुद्र ॥ उडवे कोणासी एकदां ॥३५॥

जांबुवंत म्हणे मी जाईन ॥ परी भागले माझे चरण ॥ मी आणि वैद्य सुषेण ॥ दोघेजण श्रमलों बहु ॥३६॥

बळीचिये अद्भुत ॥ त्रिविक्रम जाहला वैकुंठनाथ ॥ सात प्रदक्षिणा एके दिवसांत ॥ केल्या आम्ही साक्षेपें ॥३७॥

तेणें भागले बहुत चरण ॥ त्याहीवरी वृद्धपण ॥ आणिक एकदां मेरूवरून ॥ उडी घातली म्यां तळवटीं ॥३८॥

तेव्हां सूर्यरथींचें चक्र ॥ मांडीस झगटलें जेवीं वज्र ॥ तेणें व्यथा अहोरात्र ॥ वृद्धपणीं जाचीतसे ॥३९॥

याकरितां नवजाय उड्डाण ॥ मग बोले वालिनंदन ॥ मी तेथें जाईन उडोन ॥ परी बाळ नेणतें ॥२४०॥

वानर म्हणती करावें काय ॥ या पैलतीरा कोण जाय ॥ जांबुवंत म्हणे वायुतनय ॥ याचे पाय धरा आतां ॥४१॥

तंव तो अंजनीचा नंदन ॥ करीत बैसला रामध्यान ॥ वानर घालिती लोटांगण ॥ करिती स्तवन मारुतीचें ॥४२॥

वानर म्हणती हनुमंतासी ॥ तूं सांग सखया किती उडसी ॥ हंसें आलें मारुतीसी ॥ काय तयांसी बोलिला ॥४३॥

अंजनी जैं मज प्रसवली ॥ बाळभूक बहु लागली । तैं लक्ष योजनें उडी घातली ॥ गभस्तीवरी अकस्मात ॥४४॥

ऐसें वचन ऐकिलें ॥ वानर चरणीं लागले ॥ राघवें बळ संपूर्ण ओळखिलें ॥ तरीच मुद्रा दीधली ॥४५॥

तरी आपुलें कार्य आतां ॥ सत्वर साधीं हनुमंता ॥ ऐसें म्हणतां कपिनाथा ॥ स्फुरण आलें ते काळीं ॥४६॥

हनुमंत म्हणे वानरासी ॥ तुम्हीं पर्वत धरा पोटेंसी ॥ माझिया अंगवातें घंघाटेंसीं ॥ समुद्रांत पडाल कीं ॥४७॥

झाडें खोडें वानर कवळित ॥ महेंद्रपर्वतीं चढे हनुमंत ॥ जांबुवंतादि वानर समस्त ॥ कौतुक पाहती मारुतीचें ॥४८॥

अघवे जे कां वानर ॥ त्यांसी पुसोन वायुकुमर ॥ आधीं पुच्छाचा फडत्कार ॥ गाजविला हनुमंतें ॥४९॥

हृदयीं केलें रामस्मरण ॥ शक्तिदाता तूं म्हणोन ॥ अहंकर्ता भाव गाळून ॥ मन निमग्न रघुनाथीं ॥२५०॥

तो परात्पर राजहंस ॥ जो रविकुळदिनेश ॥ ब्रह्मानंद पुराणपुरुष ॥ हृदयीं आठविला मारुतीनें ॥५१॥

रामविजय ग्रंथ वरिष्ठ ॥ षड्रसान्नांचें भरलें ताट ॥ ज्यांसी श्रवणाची क्षुधा उत्कट ॥ ते जेवोत आदरें ॥५२॥

किष्किंधाकांड येथें संपलें ॥ पुढें सुंदरकांड आरंभिलें ॥ ग्रंथाचें पूर्वार्ध जाहलें ॥ उत्तरार्ध परिसा आतां ॥५३॥

ब्रह्मानंदा जानकीजीवना ॥ श्रीधरवरदा जगद्भूषणा ॥ अज अजिता अव्यय निर्गुणा ॥ अक्षय अभंग अव्यया ॥५४॥

स्वति श्रीरामविजय ग्रंथ सुंदर ॥ संमत वाल्मिकीनाटकाधार ॥ सदा परिसोत भक्त चतुर ॥ अष्टादशाध्याय गोड हा ॥२५५॥

अध्याय ॥१८॥ ओंव्या २५५ ॥ ॥ ॥ ॥ ॥ ॥

N/A

References : N/A
Last Updated : April 09, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP