अध्याय पंधरावा - श्लोक १५१ ते २००

श्रीधरस्वामी रचित ’ श्रीरामविजय ’ ग्रंथाचे पारायण केल्याने जीवनातील वनवास संपून सुख प्राप्त होते.


सीता म्हणे श्रीरामा ॥ अपर्णावरमनविश्रामा ॥ पद्मजातजनका पूर्णब्रह्मा ॥ धांवें आतां लौकरी ॥५१॥

हे ताटिकांतका रघुवीरा ॥ हे मखपाळका समरधीरा ॥ अहल्योद्धारा परम उदारा ॥ धांवें सत्वर ये वेळे ॥५२॥

रावण हा सर्प दारुण ॥ जिव्हारीं झोंबला जातो प्राण ॥ तूं सुर्पणवहना गारुडी पूर्ण ॥ झडप घालोनि पावें वेगीं ॥५३॥

रावण नव्हे हा सबळ मातंग ॥ पंचानना धांव तूं सवेग ॥ वियोगानळें जाळिलें सर्वांग ॥ करुणाघन वर्षें तूं ॥५४॥

जो परम साधु सुमित्रासुत ॥ पवित्र जैसा केवळ आदित्य ॥ त्यासी छळितां रघुनाथ ॥ मज अंतरला आतांचि ॥५५॥

जो करील साधूचे छळण ॥ नसतेंच ठेवी त्यासी दूषण ॥ तरी जन्मोजन्मीं वंशखंडण ॥ नरक दारुण भोगील तो ॥५६॥

साधुछळक दुराचारी ॥ त्याचे भारें कांपे धरित्री ॥ ईश्र्वर सर्व दोष क्षमा करी ॥ तारी भवसागरीं पतिता ॥५७॥

परी पतित जो संतछळक ॥ त्यासी दुःखें भोगवी अनेक ॥ त्या दुष्टाचें न पहावें मुख ॥ पापी निष्टंक साधुद्रोही ॥५८॥

दरिद्र दुःख विघ्नें बहुत ॥ त्यावरीच कोसळती समस्त ॥ सध्यां मजचि आला प्रचीत ॥ राक्षस नेत धरोनियां ॥५९॥

जानकीचे विलाप ऐकोन ॥ चराचर जीव करिती रुदन ॥ जटायु धांविन्नला देखोन ॥ क्षोभला पूर्ण काळ जैसा ॥१६०॥

काया थोर गिरिसमान ॥ वज्रचंचू परम तीक्ष्ण ॥ तिखट नखें विद्रुमवर्ण ॥ रावणावरी कोसळला ॥६१॥

जटायु म्हणे रे दुर्जना ॥ महानिष्ठुरा खळा मलिना ॥ सांडीं वेगीं श्रीरामललना ॥ नाहीं तरी प्राणा मुकशील ॥६२॥

दीपाचे पोटीं होय काजळ ॥ तैसा तूं ब्रह्मवंशीं चांडाळ ॥ तुझें छेदिन शिरकमळ ॥ सांडीं वेल्हाळ जानकी ॥६३॥

कासया केलें वेदाध्ययन ॥ काय कोरडें ब्रह्मज्ञान ॥ जळो तुझें तपाचरण ॥ शिवभजन व्यर्थ गेलें ॥६४॥

जो जगवंद्य जगदुद्धार ॥ त्याची वस्तु नेसी तूं तस्कर ॥ तुझें कर्ण नासिक समग्र ॥ छेदोनि आजि टाकीन ॥६५॥

असो धनुष्य घेऊन रावण ॥ जटायूवरी सोडी बाण ॥ येरू चंचुघातें करून ॥ शर मोडोन टाकीत ॥६६॥

तों रिता जाहला तूणीर ॥ जटायूस न लागे एक शर ॥ परम प्रतापी तो अरुणपुत्र ॥ केलें विचित्र ते काळीं ॥६७॥

चंचुघातें परम दारुण ॥ मारिले अश्र्व मोडिला स्यंदन ॥ सारथियाचें शिर छेदोन ॥ न लागतां क्षण पैं नेलें ॥६८॥

मुकुट धनुष्य तूणीर ॥ झडप घालोनि नेलें समग्र ॥ चूर्ण केले वस्त्रालंकार ॥ दशकंधर नग्न उभा ॥६९॥

रावणमस्तकीचे केश ॥ उपडोनि टाकिले निःशेष ॥ क्षपणिक जैसा लंकेश ॥ निःशस्त्री नग्न उभा असे तो ॥७०॥

गगनींहून अकस्मात ॥ रावणावर पडे जैसा पर्वत ॥ चंचुघातें समस्त ॥ मस्तकें दाही फोडिलीं ॥७१॥

रुधिरें जाहला बंबाळ ॥ जैसा कुंकुमें माखिला शैल ॥ सांडिली जानकी वेल्हाळ ॥ घेतला पळ रावणें ॥७२॥

हृदयीं बोध ठसावतां समग्र ॥ निःशेष पळे अहंकार ॥ सीता टाकोनि दशकंधर ॥ पळे तैसा भयेंचि ॥७३॥

मनीं विचारी लंकानाथ ॥ पांखरें मज गांजलें बहुत ॥ मग उभा राहोनि तेथें ॥ पाचारीत जटायूतें ॥७४॥

म्हणे तुज रघुनाथाची आण ॥ सांगें तुझें मृत्युंग कोण ॥ मीहि सांगतों आपुलें मरण ॥ युद्धकंदन मग करूं ॥७५॥

जटायु म्हणे पक्ष उपडितां ॥ मज मृत्यु तेव्हांचि तत्वतां ॥ तुझें मरण लंकानाथा ॥ तैसेंच सांगें त्वरेनें ॥७६॥

येरू म्हणे चरणांगुष्ठ फोडितां ॥ मी मृत्यु पावेन क्षण न लागतां ॥ जटायु यावयासी हाता ॥ राक्षसें केला उपाय ॥७७॥

जटायूनें धांवूनि आंवळिला ॥ दशमुखाचा अंगुष्ठ फोडिला ॥ येरें झेंप घालोनि ते वेळां ॥ दोनी पक्ष उपडिले ॥७८॥

भडभडा चालिलें रुधिर ॥ कासावीस जाहला तो द्विजवर ॥ म्हणे केव्हां येईल रघुवीर ॥ हा समाचार सांगेन तया ॥७९॥

स्कंदतातमित्रांगना ॥ स्कंधीं घेउनि राक्षसराणा ॥ गति थोडी वाटे पावना ॥ निराळमार्गें तेवीं जाय ॥१८०॥

जटायूकारणें अत्यंत ॥ जनकतनयना शोक करित ॥ निजकरें ललाट पिटित ॥ आक्रंदत दीर्घस्वरें ॥८१॥

म्हणे जटायु भक्त पूर्ण ॥ मजकारणें वेंचिला प्राण ॥ मी रामपितृव्य म्हणोन ॥ दशरथासमान मानिला ॥८२॥

ऐसी सीता शोक करित ॥ रावण निराळमार्गे जात ॥ तों मातंग पर्वतावरी अद्भुत ॥ पांच वानर उभे असती ॥८३॥

सुग्रीव नळ नीळ जांबुवंत ॥ पांचवा महारुद्र हनुमंत ॥ ज्याचा बळप्रताप उद्भुत ॥ व्यासवाल्मिकीं वर्णिला ॥८४॥

उपजतांचि बाळपणीं ॥ क्षणें आकळिला जेणें तरणी ॥ इंद्रादिक निर्जर समरांगणीं ॥ जर्जर केले प्रतापें ॥८५॥

अंतरिक्षें जातां दशकंधर ॥ जानकी फाडी चीरपदर ॥ अलंकार बांधोनि समग्र ॥ मारुतीकडे टाकिले ॥८६॥

ते ग्रंथि घेऊन हनुमंतें ॥ निराळमार्गें पाहे वरुतें ॥ तों राक्षस जाय गगनपंथे ॥ जानकीतें घेवोनि ॥८७॥

हांक फोडीत सुंदरा ॥ धांव रामा राजीवनेत्रा ॥ घनश्यामा कोमळगात्रा ॥ वंद्य त्रिनेत्रा विधीतें ॥८८॥

हे राम जगदंकुरकंदा ॥ हे ताटिकांतका ब्रह्मानंदा ॥ हे राक्षसांतका जगद्वंद्या ॥ पाव एकदां मजलागीं ॥८९॥

ऐसें ऐकतां हनुमंत ॥ मनीं आवेशला अत्यंत ॥ म्हणे कोणा सभाग्याची वस्त ॥ राक्षस नेतो चोरूनि ॥१९०॥

मारोनिया रजनीचर ॥ सोडवूं आतां हे सुंदर ॥ तिचा शोधीत येईल भ्रातार ॥ देऊं तयासी साक्षेपें ॥९१॥

जैसा देखतां वारण ॥ अकस्मात पडे पंचानन ॥ भयभीत जाहला रावण ॥ म्हणे हें विघ्न दूसरें ॥९२॥

मारुतीचें उड्डाण अद्भुत ॥ गेला ध्रुवमंडळापर्यंत ॥ तों रावण प्रवेशला लंकेत ॥ अदृश्य होत क्षणमात्रें ॥९३॥

काळाचे दाढेंत पडतां उरला ॥ सर्पमुखींचा मूषक पळाला ॥ मृगेंद्रकवेंतून वांचला ॥ पूर्वभाग्यें जंबुक ॥९४॥

व्यर्थ गेले कपीचें उड्डाण ॥ मनीं म्हणे अंजनीनंदन ॥ पुढें याचा सूड घेईन ॥ बहुत गांजीन राक्षसां ॥९५॥

मग अवनिजेचे अलंकार ॥ अवनिगर्भीं ठेवीत वानर ॥ इकडे लंकेंत दशकंधर ॥ काय करिता जाहला ॥९६॥

परम सबळ अठरा राक्षस ॥ त्यांसी अज्ञापी लंकेश ॥ म्हणे जाऊनि पंचवटीस ॥ शोधा रामासी साक्षेपें ॥९७॥

राघवा आणि लक्ष्मणा ॥ वधोनि यावें दोघांजणां ॥ त्यांहीं मस्तकीं वंदोनि आज्ञा ॥ उत्तरपंथें चालिले ॥९८॥

कीं काळें बोलावूं पाठविले ॥ आयुष्यसिंधूचें जळ आटलें ॥ कीं मृत्युपरीस चालिले ॥ स्थळ पहावया रावणा ॥९९॥

रावण सीतेसी एकांतीं नेऊन मग बहुत प्रार्थीं ॥ पायीं लागे लंकापती ॥ काकुळती येतसे ॥२००॥

N/A

References : N/A
Last Updated : March 31, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP