अध्याय दहावा - श्लोक २०१ ते २३९

श्रीधरस्वामी रचित ’ श्रीरामविजय ’ ग्रंथाचे पारायण केल्याने जीवनातील वनवास संपून सुख प्राप्त होते.


तत्काळ उभा केला रथ ॥ सकळ जनांसी हात जोडित ॥ म्हणे शिरीं आहे राजा दशरथ ॥ निजगृहीं स्वस्थ राहावें ॥१॥

आम्ही सेवितों घोर कानन ॥ तुम्हांसी तेथे न घडे आगमन ॥ आम्ही सत्वर येती परतोन ॥ चतुर्दश वर्षें होतांचि ॥२॥

ऐसें श्रीरामें विनविलें ॥ लोक भिडेनें अवघे परतले ॥ रुदन करीत अयोध्येस आले ॥ शोकें जाहले निस्तेज ॥३॥

तरी श्रीरामभक्त ब्राह्मण ॥ अग्निहोत्री पंडित सज्ञान ॥ त्यांवरी प्रलयचि वर्तला पूर्ण ॥ प्रियप्राण राघवाचे जे ॥४॥

ते सर्वथा न सोडिती रामातें ॥ म्हणती आम्ही येऊं काननातें ॥ बहुत प्रर्थिलें रघुनाथ ॥ परी कदा न राहती ॥५॥

रथाखालीं उतरून ॥ धरी ब्राह्मणांचे चरण ॥ ते म्हणती गेलिया प्राण ॥ तुज सोडूं राघवा ॥६॥

रघुनाथासी म्हणे सुमित्रासुत ॥ ब्राह्मण श्रम पावले समस्त ॥ आज यांसाठीं राहावें येथ ॥ अहल्योद्धारा राघवा ॥७॥

असो वासरमणि गेला अस्ता ॥ अयोध्येंत काय जाहली अवस्था ॥ स्त्रियांनीं धरून दशरथा ॥ कैकयीसदनाप्रति गेल्या ॥८॥

कौसल्या सुमित्रा आदिकरून ॥ बसती दशरथासी वेष्टून ॥ सदना समस्त दीपेंविण ॥ भणभणित दिसती पैं ॥९॥

बाहेर जातां रघुनाथ ॥ अवदशा प्रवेशली नगरांत ॥ जैसा विवेक जातां यथार्थ ॥ अज्ञान हृदयीं प्रवेशे ॥२१०॥

राण्या आणि दशरथ ॥ प्राण द्यावया होऊनि उदित ॥ महाविष आणिलें त्वरित ॥ जे स्पर्शतां घात करी प्राणाचा ॥११॥

तंव तो वसिष्ठ श्रीगुरुनाथ ॥ म्हणे सहसा न कीजे आत्मघात ॥ मग वाल्मीकाचा मूळकाव्यार्थ ॥ समस्तांसी सांगितला ॥१२॥

सहपरिवारें दशग्रीव ॥ वधून बंदींचे सोडवील देव ॥ चतुर्दश वर्षांनी राघव ॥ गजरें येईल स्वधामा ॥१३॥

जरी मी असत्य बोलेन ॥ तरी श्रीरघुनाथाची आण ॥ गुरुवचन मानुनि प्रमाण ॥ विषपान वर्जियेलें ॥१४॥

इकडे वनीं राहिला जगदुद्धार ॥ तो पद्मोद्भवजनक उदार ॥ स्मरारि मित्र रघुवीर ॥ सकळविप्रवेष्टित ॥१५॥

रात्र जाहली तीन प्रहर ॥ रथवेष्टित निजले द्विजवर ॥ जैसा उड्डगणवेष्टित रोहिणीवर ॥ कीं किरणचक्रीं चंडांशु ॥१६॥

निद्रार्णवीं निमग्न ब्राह्मण ॥ ऐसें जाणोनि सीतारमण ॥ सौमित्रासी म्हणे रथ वेगेंकरून ॥ येथोनियां काढीं कां ॥१७॥

काया जैसी असोन ॥ केव्हां जाय न कळे प्राण ॥ तैसा रथारूढ रघुनंदन ॥ न लागतां क्षण पैं गेला ॥१८॥

अयोध्येकडे दावूनि माग ॥ मग रथ मुरडिला सवेग ॥ जैसा अमृतहरणी स्वर्ग ॥ खगनायक आक्रमी ॥१९॥

असो आकाशमार्गीं रथ ॥ श़ृंगवेरापाशीं उतरत ॥ मानससरोवरीं अकस्मात ॥ राजहंस बैसले जैसे ॥२२०॥

तेथें गुहकाचा आश्रम निर्मळ ॥ पुढें वाहे जान्हवीजळ ॥ देखोनियां प्रातःकाळ ॥ घननीळ स्नान करी ॥२१॥

पाहूनियां भागीरथी ॥ म्हणे सूर्यवंशीं भगीरथ नृपति ॥ तेणें प्रार्थूनि नानारीतीं ॥ जगदुद्धारा आणिली ॥२२॥

कीं शिवमुकुटींची शुभ्र माळा ॥ प्रसाद दिधला शीघ्रकाळा ॥ फोडून ब्रह्मकटाह सकळा ॥ परब्रह्मजळ लोटलें ॥२३॥

ब्रह्मा पुरंदर उमावर ॥ ऋषीगण गंधर्व फणिवर ॥ देखतां जान्हवीचें नीर ॥ स्तुति अपार करिती पैं ॥२४॥

दृष्टीं पाहतां जान्हवीनीर ॥ सहस्र जन्मींचें पातक समग्र ॥ शुष्क दग्ध वन वैश्र्वानर ॥ अघ सर्व जळे तेंवी ॥२५॥

ऐसी ते सगरकुळतारिणी ॥ राम लक्ष्मण स्तावोनी ॥ स्नान करिती ते क्षणीं ॥ सीता सुमंत सर्वही ॥२६॥

नित्यकर्म सारूनि सकळीं ॥ न्यग्रोधवृक्षाचिये तळीं ॥ श्रीराम बैसें ते वेळीं ॥ तृणशेज घालूनियां ॥२७॥

वटदुग्ध घालोनि तये वेळीं ॥ रघुवीर मस्तकीं जटा वळी ॥ भस्मचर्चित चंद्रमौळी ॥ तैसा ते काळीं राम दिसे ॥२८॥

असो इकडे ब्राह्मण समस्त ॥ जागे होऊनि जंव पाहत ॥ तों रथासहित रघुनाथ ॥ गेला निश्र्चित समजलें ॥२९॥

परम खेद करिती ब्राह्मण ॥ निद्रा नव्हे हा अनर्थ पूर्ण ॥ हातींचा गेला रघुनंदन ॥ आनंदघन जगद्रुरु ॥२३०॥

अज्ञान पांघरूण पडलिया ॥ मग आत्माराम न ये प्रत्यया ॥ न दिसे जवळ असोनियां ॥ दुर्घट माया पडली हे ॥३१॥

एक म्हणती राम करुणाघन ॥ दशरथ राव सोडील प्राण ॥ म्हणोनि गेला परतोन ॥ सीताजीवन जगदात्मा ॥३२॥

तों रथचक्रांचा मार्ग ॥ अयोध्येकडे दिसे सवेग ॥ ब्राह्मण धावती काढिती माग ॥ परम आनंदले मनीं पैं ॥३३॥

हर्षयुक्त ब्राह्मण ॥ प्रवेशले अयोध्यापट्टण ॥ तों तेथें नाहीं रघुनंदन ॥ भवबंधनच्छेदक जो ॥३४॥

सकळ मंगळभोग वर्जूनि ॥ ब्राह्मण बैसलें निरंजनीं ॥ म्हणती श्रीरामदर्शनावांचोनि ॥ प्रवेश सदनीं न करूंचि ॥३५॥

आतां जान्हवीजवळ लंघून ॥ कैसा जाईल रघुनंदन ॥ ती कथा कौतुकें श्रवण ॥ सज्जन करोत आदरें ॥३६॥

अहो श्रीरामविजय ग्रंथ ॥ हें केवळ स्वानंदामृत ॥ संत हे निर्जर समस्त ॥ ब्रह्मानंदें सेविती ॥३७॥

रविकलमंडणा राघवेंद्रा ॥ ब्रह्मानंदा ज्ञानसमुद्रा ॥ श्रीधरवरदा अतिउदारा ॥ निर्विकारा अभंगा ॥३८॥

स्वति श्रीरामविजय ग्रंथ सुंदर ॥ संमत वाल्मिकनाटकाधार ॥ सदा परिसोत भक्त चतुर ॥ दशमाध्याय गोड हा ॥२३९॥

श्रीरामचंद्रार्पणमस्तु ॥ अध्याय ॥१०॥ ओंव्या ॥२३९॥

N/A

References : N/A
Last Updated : March 23, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP