अध्याय सातवा - श्लोक १५१ ते २००

श्रीधरस्वामी रचित ’ श्रीरामविजय ’ ग्रंथाचे पारायण केल्याने जीवनातील वनवास संपून सुख प्राप्त होते.


म्हणे अहल्ये धांव धांव झडकरी ॥ म्हणोन आंग टाकिलें धरणीवरी ॥ येरी धांवोन आली द्वारीं ॥ हृदयीं धरी तयातें ॥५१॥

कापट्य नेणे महासती ॥ हृदयीं निर्मळ जैशी भागीरथी ॥ परम खेद करी चित्तीं ॥ नयनीं वाहती अश्रुपात ॥५२॥

अहल्येनें वेगें उचलिला ॥ नेऊन मंचकावरी पहुडविला ॥ म्हणे प्रिये प्राण चालिला ॥ अंगसंग देईं वेगें ॥५३॥

येरी म्हणे स्वामी आजि ग्रहण ॥ मध्यान्हास आला चंडकिरण ॥ महाराज तुम्ही शास्त्रज्ञ पूर्ण ॥ विचारून पाहावें ॥५४॥

येरू म्हणे तुज शास्त्रासीं काय कारण ॥ माझें वचन तुज प्रमाण ॥ तंव ते सतीशिरोरत्न ॥ अवश्य म्हणे ते काळीं ॥५५॥

अहल्या इंद्र दोघांजणी ॥ शयन केलें एके शयनीं ॥ तंव गौतम नित्य नेम सारुनी ॥ आश्रमासी पातला ॥५६॥

म्हणे अहल्ये उघडीं वो द्वार ॥ येरी घाबरी सांवरी वस्त्र ॥ म्हणे कोणरे तूं दुराचार ॥ तो म्हणे अमरेंद्र जाण मी ॥५७॥

म्हणे रे अपवित्रा काय केलें ॥ श्रोत्रियाचें पात्र कां स्पर्शिलें ॥ तुझें थोरपण दग्ध जाहलें ॥ कर्म केलें विपरीत ॥५८॥

रति जाहली कीं परिपूर्ण ॥ वेगीं जाय तूं येथून ॥ मग अहल्या कपाट उघडी धांवोन ॥ तंव गौतम दृष्टीं देखिला ॥५९॥

अहल्येस ऋषि कैसा भासला ॥ की कल्पांतींचा सूर्य प्रकटला ॥ कीं अपर्णावर कोपला ॥ तृतीय नेत्र उघडोनियां ॥१६०॥

तो इंद्र पळतां शापिला वेगें ॥ तुझें अंगीं होतील सहस्र भगें ॥ नपुंसक होऊन वागे ॥ परद्वारिया पतिता तूं ॥६१॥

तंव ते अहल्या कामिनी ॥ थरथरां कांपे ऋषीस देखोनि ॥ जैसी महावातें कमळिणी ॥ उलथोन पडों पाहें पैं ॥६२॥

ग्रहणीं काळवंडें वासरमणि ॥ तैशी मुखींची कळा गेली उतरोनि ॥ परम कोपायमान मुनि ॥ अहल्येसी शापित ॥६३॥

हो तुझें शरीर शिळावत ॥ जड होऊन पडो अरण्यांत ॥ साठीसहस्रवर्षेंपर्यंत ॥ राहें मूर्च्छित होऊनियां ॥६४॥

शाप ऐकातांच लवलाहें ॥ धांवोनि धरी ऋषीचे पाय ॥ म्हणे महाराजा विचारूनि पाहे ॥ कापट्य केलें चांडाळें ॥६५॥

जाणोनियां पाकशासन ॥ जरी म्यां दिले असेल भोगदान ॥ तरी माझें शरीर हो शतचूर्ण ॥ ठकविलें पूर्ण पतितानें ॥६६॥

ऋषि म्हणे तुवां जाणोन ॥ शापिला नाहीं पाकशासन ॥ रति झाली कीं परिपूर्ण ॥ जाय म्हणोन बोललीस ॥६७॥

येरी म्हणे नेणोनि घडलें पाप ॥ मज उपजला पश्र्चाताप ॥ तपोनिधी पुण्यरूप ॥ देईं उःशाप सर्वथा ॥६८॥

अहल्या परम दीनवदन ॥ नेत्रीं वाहे अश्रुजीवन ॥ द्रवलें गौतमाचें मन ॥ काय वचन बोलिला ॥६९॥

म्हणे रविकुळीं अवतरेल नारायण ॥ कौसल्यात्मज रघुनंदन ॥ त्याच्या पदरजप्रतापेंकरून ॥ उद्धरोन मज पावसी ॥१७०॥

आतां होईं तूं चंडशिळा ॥ जड पाषाण परम सबळा ॥ वचन ऐकतांचि तात्काळा ॥ अहल्या मूर्च्छित पडियेली ॥७१॥

शरीर पडलें अचेतन ॥ अंग सर्व जाहलें पाषाण ॥ केश नेत्र नासिका स्तन ॥ जाहले कठिणरूप तेव्हां ॥७२॥

प्राण गोळा होऊनि समस्त ॥ आकर्षोंनि राहिली गुप्त ॥ गौतम आपुले दृष्टीं पाहत ॥ पाषाणवत् अहिल्या ॥७३॥

मग आठवूनि अहिल्येचे गुण ॥ गौतमासि आले रुदन ॥ म्हणे अहल्ये ऐसें गुणनिधान ॥ कैसें टाकून जाऊं मी ॥७४॥

तीस नेणोन घडलें पाप ॥ म्यां तर दिधला दीर्घ शाप ॥ आतां करावया जाईन तप ॥ इजसमीप कोणी नाहीं ॥७५॥

येथें सर्प व्याघ्रादि जीवजाती ॥ ईस शिळा देखोन पीडा करिती ॥ चंपककळिका अहल्या सती ॥ परम खेद पावेल ॥७६॥

मग ऋषि शाप देत वनासी ॥ जे जीवमात्र येतील अहल्येपाशीं ॥ ते गतप्राण होतील निश्र्चयेंसी ॥ कोणी शिळेसी न पहावें ॥७७॥

ऐसें ऐकतां शापवचन ॥ एक वृक्ष वेगळे करून ॥ पिपीलिकादि गज व्याघ्र संपूर्ण ॥ गेले पळून ते काळीं ॥७८॥

मग तो महाऋषि गौतम ॥ सतीचा खेद करी परम ॥ पावला तो बद्रिकाश्रम ॥ अनुष्ठान करीत बैसला ॥७९॥

म्हणे कामें नाडिला पाकशासन ॥ मज क्रोधें नागविलें पूर्ण ॥ इंद्र-अहल्येसीं शापितां जाण ॥ तपक्षय जाहला ॥१८०॥

इकडे इंद्र मयूर होऊन अरण्यांत ॥ अनुतापें हिंडे रुदन करित ॥ मग समस्त देवीं अमरनाथ ॥ गोतमापाशीं आणिला ॥८१॥

सुरवरीं बहुत प्रार्थून ॥ केलें इंद्राचें शापमोचन ॥ गौतम बोले प्रसन्नवदन ॥ सहस्रनयन तूं होशील ॥८२॥

शक्र सहस्रनेत्र जाहला ॥ निजपदा तत्काळ पावला ॥ तैपासोन हे अहल्या शिळा ॥ आजवरी जाहली होती ॥८३॥

रामा तुझे पडतां चरणरज ॥ अहल्या दिव्यरूप जाहल सहज ॥ श्रीरामा पहावया तुज ॥ सजीव सतेज जाहली ॥८४॥

कौशिकें सांगतां हें पूर्वकथन ॥ आश्र्चर्य करी रघुनंदन ॥ कौशिकासी प्रतिवचन ॥ काय बोलता जाहला ॥८५॥

म्यां काय केलें असें आचरण ॥ माझ्या पदरजें उद्धरे पाषाण ॥ कौशिक म्हणे तुझे चरण ॥ त्यांचें वैभव रामा हें ॥८६॥

असो रघुवीर तये काळीं ॥ ऋषिसहित आला तियेजवळी ॥ पदर सांवरोनि उठिली ॥ अहल्या देवी तेधवां ॥८७॥

मस्तकींचे मोकळे कबरीभार ॥ सांवरोनि वीरगुंठी बांधी सत्वर ॥ नेत्रीं न्याहाळित रघुवीर ॥ विधिसुता समोर पातली ॥८८॥

जो दशरथाचा महत्पुण्यमेरु ॥ जो कां लावण्यामृतसागरु ॥ जो जगवंद्य जगद्रुरु ॥ अहल्येनें देखिला ॥८९॥

जो मृडानीपतीचें हृदयरत्न ॥ जो इंद्रादिदेवांचें देवतार्चन ॥ जो जलजोद्भवाचें ध्येय पूर्ण ॥ नारदादिकांचें गुह्य जें ॥१९०॥

जे सनकादिकांची आराध्य मूर्ति ॥ चारी साही वर्णिती ज्याची कीर्ति ॥ तो नेत्रीं देखिला रघुपति ॥ प्रेम चित्तीं न समाये ॥९१॥

अष्टभावें दाटोन ब्रह्मकन्या ॥ साष्टांग नमी राजीवनयना ॥ तो श्रीराम बोले सुवचना ॥ माते ऊठ झडकरीं ॥९२॥

ऐसें ऐकतां ते वेळीं ॥ कमलोद्भवकन्या उठली ॥ जैसी कोकिळा गर्जे वसंतकाळीं ॥ तैसी स्तवन करीतसे ॥९३॥

म्हणे जयजय रामा करुणासमुद्रा ॥ हे दशरथे प्रतापरुद्रा ॥ हे जगद्रुरु श्रीरामचंद्रा ॥ मज चकोरलागीं उदय तुझा ॥९४॥

हे राघवा पुराणपुरुषा ॥ हे जगत्पालका अनंतवेषा ॥ हे कौसल्यात्मजा चंडांशा ॥ निसरली निशा तव उदयीं ॥९५॥

हे विद्वज्जनमानसमांदुसरत्ना ॥ हे ताटिकांतक नरवीर पंचनना ॥ तुझ्या नामप्रतापाची ऐकतां गर्जना ॥ पापवारणा संहार ॥९६॥

श्रीरामा तूं भवरोगवैद्य सुजाण ॥ मात्रा देऊन निजचरणरेण ॥ दोषक्षयरोग दवडोन ॥ अक्षय केलें मजलागीं ॥९७॥

साठसहस्रवर्षेंपर्यंत ॥ अहंदेहभूतें झडपिलें यथार्थ ॥ तूं पंचाक्षरीं रघुनाथ ॥ भूतें समस्त पळालीं ॥९८॥

साठसहस्रवर्षेंवरी ॥ जळतां चिंतेच्या वणव्याभीतरीं ॥ तूं मेघ वर्षतां झडकरी ॥ आजि पूर्ण निवाल्यें ॥९९॥

माझ्या कुरळकेशेंकरून ॥ राघवा झाडीन तुझे चरण ॥ तुजवरून ओंवाळून ॥ काय टाकीन माझी हे ॥२००॥

N/A

References : N/A
Last Updated : March 23, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP