अध्याय तिसरा - श्लोक १ से ५०

श्रीधरस्वामी रचित ’ श्रीरामविजय ’ ग्रंथाचे पारायण केल्याने जीवनातील वनवास संपून सुख प्राप्त होते.


श्रीगणेशाय नमः ॥ तुम्ही संत श्रोते भाविक ॥ कविमुद्रारत्नपरीक्षक ॥ श्रोता देखोनि मृगांक ॥ वक्ता सोमकांत पाझरे ॥१॥

तुम्ही बोधसमुद्रींचीं मुक्तें पवित्रें ॥ कीं चैतन्यनभींची दिव्य नक्षत्रें ॥ की वैराग्यवनींचीं सुमनें विचित्रें ॥ संतरूपें विकासलीं ॥२॥

निवडलीं रामकथामृतपात्रें ॥ की ज्ञानभरित पिकलीं क्षेत्रें ॥ कीं भजनपंथींचीं सरोवरें ॥ संतरूपें भरिलीं हो ॥३॥

कीं भवजलदजालप्रभंजन ॥ अज्ञानतिमिरच्छेदक चंडकिरण ॥ जो कां मदगजविदारक पंचानन ॥ मत्सरकाननदहन जो ॥४॥

रामविजय ग्रंथ वैरगर ॥ साहित्यरत्नें निघती अपार ॥ हीं तुम्ही अंगिकारावीं वारंवार ॥ कासयासी प्रार्थावें ॥५॥

कमळकोशींचा मकरंद बरा ॥ हें नलगे सांगावें भ्रमरा ॥ राजहंसासी घे मुक्तचारा ॥ ऐसें किमर्थ प्रार्थावें ॥६॥

शीतळ होई चंद्रमंडळा ॥ कासया सांगावें वेळोवेळां ॥ मित्रासी प्रकाश आगळा ॥ पाडीं कासया म्हणावें ॥७॥

संतांसी धरा क्षमा शांती ॥ ऐसें वदे तोचि मंदमती ॥ प्रेमळासी करीं भक्ती ॥ सांगावें नलगेचि हें ॥८॥

तैसे पंडित तुम्ही ज्ञानघन ॥ करा सुरस रामकथाश्रवण ॥ हें वारंवार म्हणतां दूषण ॥ वक्त्यासी झगटेल ॥९॥

असो पूर्वाध्यायीं कथा निश्र्चिती ॥ सांगितली रावणाची उत्पत्ति ॥ कौसल्या दशरथ अयोध्येप्रति ॥ नेऊनि विधीनें स्थापिलीं ॥१०॥

सूर्यवंशभूषण अद्भत ॥ अयोध्यापति राजा दशरथ ॥ ज्याची पट्टराणी विख्यात ॥ कुशल बहुत कौसल्या ॥११॥

सुमित्रा कैकयी स्वरूपवंत ॥ दोघींस वरी राव दशरथ ॥ आणीक सातशें परिणीत ॥ भोगांगना सुंदरा ॥१२॥

ज्ञानकळा कौसल्या सती ॥ सुमित्रा केवळ सद्भक्ती ॥ कैकयी ते कपटप्रकृती ॥ रजतमयुक्त सर्वदा ॥१३॥

केवळ विवेक मूर्तिमंत ॥ तोचि अजसुत दशरथ ॥ जो परमयोद्धा रणपंडित ॥ धनुर्विद्या सर्व जाणे ॥१४॥

अंधारामाजी शब्द उठतां ॥ तेथेचि बाण मारी अवचिता ॥ धन्य त्याची हस्तकुशलता ॥ वीर दशरथाऐसा नसे ॥१५॥

परी पोटीं नसे पुत्रसंतान ॥ तेणें राजेंद्र असे उद्विग्न ॥ पुत्राविण शून्य सदन ॥ बोलती शास्त्रज्ञ पंडित ॥१६॥

शरीर जैसें प्राणाविण ॥ तारुण्याविण पंचबाण ॥ दयेविण व्यर्थ ज्ञान ॥ शांतीवांचून वैराग्य ॥१७॥

संपत्ति जैशी धर्मेविण ॥ पंडितावांचून सभासदन ॥ कीं करणीविण व्यर्थ ज्ञान ॥ दीपेंविण मंदिर जेंवी ॥१८॥

कीं वेदांतज्ञानावांचून ॥ कोरडी व्युत्पत्ति व्यर्थ ज्ञान ॥ कीं सत्पात्रावांचून दान ॥ कीं स्नेहेंविण बंधु जैसा ॥१९॥

कीं जळेंविण वापिका ॥ कीं नृपाविण नगर देखा ॥ कीं नासिकाविण मुखा ॥ शोभा जैसी न येचि ॥२०॥

कीं फळेंविण तरुवर ॥ कीं रामस्मरणाविण मंदिर ॥ तैसा पुत्राविण वंश पवित्र ॥ सर्वथा पावन नव्हेचि ॥२१॥

असो राजा दशरथ ॥ संततीलागीं चिंताक्रांत ॥ सदा विपिनें गहन हिंडत ॥ मृगयामिषेंकरोनियां ॥२२॥

नावडे छत्रसिंहासन ॥ नावडे चातुर्यकळा गायन ॥ बहुत केले प्रयत्न ॥ परी संतान नव्हेचि ॥२३॥

तों दशरथें स्वप्न देखिलें ॥ दोघे पुरुष आपण वधिले ॥ आणि एके स्त्रियेसी मारिलें ॥ अपराधेंविण तत्त्वतां ॥२४॥

गजबजोनि उठला त्वरित ॥ कोणासी न बोले मूकवत ॥ वसिष्ठगृहास जाऊन त्वरित ॥ नमोनि स्वप्न सांगतसे ॥२५॥

गुरु बोले हें दुष्ट स्वप्न ॥ तीन श्र्वापदें येईं वधोन ॥ मग याची शांति करून ॥ दोषनिवारण करावें ॥२६॥

गुरुआज्ञेनें ते दिवशी ॥ राजेंद्र निघाला मृगयेसी ॥ वासरमणि गेला अस्तासी ॥ परी श्र्वापद न सांपडे ॥२७॥

पडला अत्यंत अंधकार ॥ एकला हिंडे नृपवर ॥ धनुष्यासी लावून शर ॥ शोधी कांतार तेधवां ॥२८॥

तों एका सरोवराचे तीरीं ॥ राजा गुप्त बैसे वृक्षावरी ॥ कानाडी ओढूनि ते अवसरीं ॥ कर्णीं ऐके सांचोल ॥२९॥

तों ते मार्गीं श्रावण ॥ आला मायबाप घेऊन ॥ दिवसा बहुत विघ्नें आणि उष्ण ॥ म्हणोनि रात्रीं गमन करी ॥३०॥

दोघें वृद्धें खांदीं घेऊनी ॥ श्रावण तीर्थें हिंडे मेदिनी ॥ त्या सरोवराचे तीरीं येऊनी ॥ उभा राहिला नावेक ॥३१॥

तों तीं वृद्धें म्हणती श्रावणा ॥ आम्हां करवी उदकपाना ॥ ऐकतां ऐसिया वचना ॥ कावड खालीं ठेविली ॥३२॥

हातीं कमंडलु घेऊन ॥ जीवनांत प्रवेशला श्रावण ॥ दशरथें सांचोल ऐकोन ॥ निर्वाण बाण सोडिला ॥३३॥

सपक्ष बाण हृदयीं भेदला ॥ हातींचा कमंडलु खालीं पडला ॥ देह भूमीवरी टाकिला ॥ प्राण चालिला श्रावणाचा ॥३४॥

म्हणे कोणे सभाग्याचा बाण ॥ करीत आला रामस्मरण ॥ हृदय निवालें संपूर्ण ॥ केलें पावन मजलागीं ॥३५॥

ऐकोनि मनुष्याचें वचन ॥ नृपवर जवळी आला धांवोन ॥ तंव तो पडिलासे श्रावण ॥ रामस्तवत करीतचि ॥३६॥

मग म्हणे कर्म पापकारी ॥ पडली हत्त्या मजवरी ॥ श्रावण म्हणे राया न करीं ॥ खेद कांहीं सर्वथा ॥३७॥

माझीं मायबापें वृद्धें दीन ॥ तयांसी करवीं उदकपान ॥ मग मी सोडीन प्राण ॥ सत्य जाण राजेंद्रा ॥३८॥

दोघें वृद्धें अत्यंत पाहीं ॥ त्यांचे सेवेसी कोणी नाहीं ॥ दशरथ गहिंवरला हृदयीं ॥ शोकाकुलित जाहला ॥३९॥

श्रावण म्हणे दशरथा ॥ उदक दोघां पाजूनि त्वरिता ॥ मग हे सांगावी वार्ता ॥ नाहीं तरी प्राण त्यागिती ॥४०॥

उदक नेतां अयोध्याराणा ॥ वृद्धें म्हणती बा रे श्रावणा ॥ तंव तो न बोलेचि वचना ॥ कांही केलिया सर्वथा ॥४१॥

कांरे श्रावणा न बोलसी ॥ उदक मागितलें येवढे निशीं ॥ बा रे म्हणोनि कोपलासी ॥ शीणलासी पाडसा ॥४२॥

उदयाचळीं मावळेल मित्र ॥ शेष सांडील भूभिभार ॥ तीव्र तपेल रोहिणीवर ॥ तरी क्रोध अणुमात्र न ये तूतें ॥४३॥

जैसें गंगेचें निर्मळ जीवन ॥ तैसें श्रावणा तुझें मन ॥ तान्हया कां रे न बोलसी वचन ॥ राजा ऐकोनि गहिंवरे ॥४४॥

मग अजराजपुत्र बोलिला ॥ म्यां अवचितां श्रावण वधिला ॥ तंव तिहीं धरणीवर देह टाकिला ॥ प्राण जाहला कासाविस ॥४५॥

आठवोनि श्रावणाचे गुण ॥ दोघें आक्रंदती दीनवदन ॥ ऐसा पुत्र हें त्रिभुवन ॥ शोधितांही न सांपडे ॥४६॥

आहा रे पुत्रा श्रावणा ॥ गंभीरा गुणनिधाना ॥ आमुचे प्राण करिती प्रयाणा ॥ श्रावणा वदन दावीं कां ॥४७॥

या ब्रह्मांडमंडपांत ॥ श्रावणाऐसा नाहीं सुत ॥ जैसीं लक्ष्मी आणि वैकुंठनाथ ॥ तैसीं भावित मातापिता ॥४८॥

जो न करी मातृपितृभजन ॥ जळो त्याचें ब्रह्मज्ञान ॥ तो षट्शास्त्रें आला पढून ॥ तरी त्याचें दर्शन न व्हावें ॥४९॥

त्याचें जप तप अनुष्ठान ॥ दान अध्ययन श्रवण मनन ॥ कळा चातुर्य व्यर्थ ज्ञान ॥ जैसें भाषण मद्यपियाचें ॥५०॥

N/A

References : N/A
Last Updated : March 11, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP