अध्याय पहिला - श्लोक १५१ से २०७

श्रीधरस्वामी रचित ’ श्रीरामविजय ’ ग्रंथाचे पारायण केल्याने जीवनातील वनवास संपून सुख प्राप्त होते.


टोणपियाचा वृक्ष जाहला ॥ तों नारद बहुकाळें पातला ॥ त्या तरुवरा खाली उभा राहिला ॥ श्रवणीं ऐकिला नामघोष ॥५१॥

वारुळाचे छिद्रांमधुनी ॥ रामनामाची मधुरध्वनी ॥ चातुर्यसमुद्र नारदमुनी ॥ जाणिलें मनी वृत्त सर्व ॥५२॥

मग उकरोनियां वारुळ ॥ बाहेर काढिला तो पुण्यशीळ ॥ वर्मकळा रगडून तात्काळ ॥ सावध केला तेधवां ॥५३॥

जैसा भूमीवरी अर्क उतरला ॥ तैसा श्रीगुरुनारद देखिला ॥ धांवोन चरणकमळा लागला ॥ पापाचा जाहला संहार ॥५४॥

नाम जपतां श्रीरामाचें ॥ दोष गेले अनंत जन्मांचे ॥ जैसे पर्वत तृणाचे ॥ अग्निसंगें भस्म होती ॥५५॥

पापें जळावया समस्त ॥ नामामाजी प्रताप बहुत ॥ नामाचेनि न जळे निश्र्चित ॥ ऐसें पाप नसेचि ॥५६॥

वाल्मीकें केली जीं पापें ॥ तीं भस्म जाहलीं नामप्रतापें ॥ नामापुढें अनेक तपें ॥ तुच्छ ऐसें जाणिजे ॥५७॥

जैसा पर्वत होतां संदीप्त ॥ मृगाद्विजगण न राहती तेथ ॥ तैसीं नामाग्नीपुढें समस्त ॥ पापारण्यें भस्म होती ॥५८॥

जैसी स्वप्नीं घडली दुष्कृतें बहुत जागृतीं अवधीं मिथ्याभूत ॥ तैसे रामनामें समस्त ॥ पापसमूह भस्म होती ॥५९॥

तोंवरी तमाची दाटणी ॥ जों नुगवे वासरमणी ॥ तोंवरीच मद कीजे वारणीं ॥ जोंवरी सिंह नाहीं देखिला ॥१६०॥

सिंधु गर्जे तोंवरीच पाहीं ॥ जो कलशोद्भव देखिला नाहीं ॥ तोंवरी भूतांची परम घाई ॥ जों मंत्रवादि न देखिला ॥६१॥

तोंवरीच पापांचा संभार ॥ जों नामीं न धरी आदर ॥ नामप्रताप अद्भुत थोर ॥ तरला साचार वाल्मीक ॥६२॥

असो वाल्मीक म्हणे गुरुनाथा ॥ जरी कृपा कराल सर्वथा ॥ तरी रामचरित्रकथा ॥ सविस्तर करीन मी ॥६३॥

ऐसें ऐकतां नारदमुनी ॥ परम संतोषला अंतःकरणीं ॥ वरदहस्त ठेवोनियां मूर्ध्नीं ॥ वदला तें श्रवणीं आकर्णिजे ॥६४॥

साठी सहस्त्र वरुषांवरी ॥ विष्णु अवतरेल दशरथउदरीं ॥ तयाचें तूं भविष्य करीं ॥ शतकोटी सविस्तर ॥६५॥

जन्मकर्मलीला सर्व ॥ जे जे तूं वदसील भाव ॥ तैसाच वर्तेल राघव ॥ अवतारठेव अभिनव पैं ॥६६॥

शतकोटी ग्रंथ वाल्मीकें निर्मिला ॥सुरस रस दिव्य ओतिला ॥ तिहीं लोकांसी कलह लागला ॥ व्यवहार गेला शिवापाशीं ॥६७॥

परम चतुर कैलासनाथ ॥ तीं ठायीं समान वांटिला ग्रंथ ॥ शेवटीं दोन अक्षरें उरलीं यथार्थ ॥ कंठीं धरिली उमावरें ॥६८॥

शीतळ उपचार पूर्वीं केले ॥ परी ते नाहीं सफळ जाहले ॥ चंद्रबिंब शिरीं धरिलें ॥ जटेंत आकळिलें गंगेसी ॥६९॥

हिमनगकन्या शीतळ सुंदर ॥ अर्धां अर्धांगीं धरी कर्पूरगौर ॥ ठायीं ठायीं वेष्टिले फणिवर ॥ शीतळ थोर म्हणोनियां ॥१७०॥

गजचर्म अत्यंत शीतळ ॥ तेंही पांघरे जाश्र्वनीळ ॥ परी न राहे हळाहळ ॥ जाळी प्रबळ अधिकचि ॥७१॥

मग हा ग्रंथ निवडितां थोर ॥ दोन अक्षरें निवडिलीं साचार ॥ तीं कंठीं धरितांचि उमावर ॥ शीतळ शरीर जाहलें ॥७२॥

हृदयीं आठविला रघूत्तम ॥ मुखी स्मरतां रामनाम ॥ मध्यें हळाहळ परम ॥ भयभीत जाहलें ॥७३॥

मुखीं नाम हृदयीं राम ॥ दाहकत्व सांडूनि जाहलें शम ॥ भूषणरूप होऊनि परम ॥ शिवकंठीं मिरवलें ॥७४॥

नामें तरला वाल्मीक ॥ नामे तरले ब्रह्मादिक ॥ शीतळ जाहला कैलासनायक ॥ महिमा अद्भुत न वर्णवे ॥७५॥

किती गोड म्हणावा सुधारस ॥ किती वाड म्हणावें आकाश ॥ तेजस्वी परम चंडांश ॥ किती म्हणोनी वर्णावा ॥७६॥

पृथ्वीस उपमा काय द्यावी ॥ पाताळखोली किती सांगावी ॥ कनकाद्रीची उंची किती वर्णावी ॥ तैसी नामाची पदवी अपार ॥७७॥

किती वर्णावा विष्णूचा प्रताप ॥ काय सांगावें शंकराचें तप ॥ तैसा रामनाममहिमा अमूप ॥ न वर्णवेचि सर्वथा ॥७८॥

प्राकृतभाषा म्हणोनि ॥ अव्हेर न करावा पंडितजनीं ॥ जैसीं कृष्णावेणीचीं तीरें दोन्ही ॥ परी उदक एकचि जाणिजे ॥७९॥

असो वाल्मीकें रचिला ग्रंथ ॥ भारद्वाजाचे मुखें समस्त ॥ असंख्य ऋषि श्रवण करित ब्रह्मानंदें करूनियां ॥१८०॥

हेचि कथा कैलासीं ॥ शिव सांगे हैमवतीसी ॥ पाताळीं काद्रवेयकुळासी ॥ भोगींद्र सांगे हेचि कथा ॥८१॥

घटोद्भवाचे मुखीं दिवसरजनी ॥ ऋषी श्रवण करिती कर्दळीवनीं ॥ किंपुरुषखडीं स्वमुखेंकरूनी ॥ वानरांसी सांगे हनुमंत ॥८२॥

नारदाप्रती सरसिजोद्भव ॥ सांगे रामकथा अभिनव ॥ बदरिकाश्रमीं ऋषि सर्व ॥ व्यासमुखें ऐकती ॥८३॥

तेचि प्राकृत भाषेंत निवाडे ॥ श्रीधर वर्णीं संतापुढें ॥ जैसे बाळचाळे वेडेवांकुडे ॥ परी आवडी जननीसी ॥८४॥

तैसें प्राकृत आणि संस्कृत ॥ दोहींमाजी एकचि अर्थ ॥ जैसा दोही स्त्रियांचा एक नाथ ॥ दोन हस्त एकाचेचि ॥८५॥

दोन्ही दाढा एकचि स्वर ॥ पाहणार एक दोन नेत्र ॥ किंवा दोन पात्रांत पवित्र ॥ एकचि दुग्ध घातलें ॥८६॥

जैसें त्रिवेणीचें भरलें उदक ॥ दोन पात्रीं गोडी एक ॥ एक सुवर्णकूपिका अलोलिक ॥ एक ताम्रधातृची घडियेली ॥८७॥

दोनी कूपिका नेऊनि देख ॥ रामेश्र्वरासी केला अभिषेक ॥ दोन्ही धातु परी उदक एक ॥ देवासी समचि आवडती ॥८८॥

अबळां न कळे संस्कृत वाणी ॥ जैसें आडांतील निर्मळ पाणी ॥ परी दोरपात्रावांचोनी ॥ अशक्त जनां केवीं निघे ॥८९॥

तों तडागासी येतां त्वरें ॥ तत्काळचि तृषा हरे ॥ आबालजन तारावया ईश्र्वरें ॥ प्राकृत ग्रंथ निर्मिले ॥१९०॥

मुख्य संस्कृत पहावें ॥ परी तें अबळा नेणवे ॥ महागज कैसा बांधवे ॥ कमळतंतू घेऊनियां ॥९१॥

सर्वांस मान्य गीर्वाण ॥ जरी असेल पूर्वपुण्य ॥ तरीच तेथीचें होय ज्ञान ॥ आबालजन केवीं तरती ॥९२॥

उत्तम वस्त्रें लेत नृपती ॥ तीं दुर्बळांसी प्राप्त न होती ॥ मग ते घोंगडीच पांघरती ॥ शीतउष्ण निवारणा ॥९३॥

जैसें दधि मंथितां बहुत ॥ त्यांतून निघे नवनीत ॥ कीं स्वातीजळापासोन अद्भूत ॥ मुक्तफळें निपजती ॥९४॥

कीं इक्षुदंडाचे पोटीं शर्करा ॥ रसनेस गोडी तेचि विचारा ॥ कीं राजापासोन राजपुत्रा ॥ मान्यता होय बहुतचि ॥९५॥

महाराष्ट्रवचनें निश्र्चित ॥ परी अत्यंत रसभरित ॥ मधुमक्षिकांचे मुखीं स्रवत ॥ मधु सुरस जैसे कां ॥९६॥

गीवार्ण हें शशिमंडळ अद्भुत ॥ त्याची प्रभा ते हे प्राकृत ॥ संस्कृत ग्रंथ वर्णिती पंडित ॥ अर्थ प्राकृत करिती कीं ॥९७॥

अर्कवृक्षीं मधुघट ॥ जरी भरितील यथेष्ट ॥ तरी गिरीकंदरीं करावया कष्ट ॥ काय कारण धांवावें ॥९८॥

सिकतेमाजी दिव्य रत्न ॥ जरी सापडे न करितां प्रयत्न ॥ तरी चतुरीं करावें जनत ॥ किंवा अव्हेर करावा ॥९९॥

कष्टेंविण राज्य आलें हातां ॥ तरी काय ओसांडावें तत्त्वतां ॥ प्राकृतभाषीं ऐकोनी कथा ॥ लाभ श्रोतां घेईजे तेवीं ॥२००॥

मुक्तफळांची उत्तम माळा ॥ वरी सुगंध सुटला आगळा ॥ तरी चतुरी का न घालावी गळां ॥ अति आवडी करोनीयां ॥१॥

आधींच इक्षुदंड गोड ॥ वरी आलें साखरेचें घड ॥ तैशी रघुनाथकथा सुरवाड ॥ त्यावरी साहित्य पुरविलें ॥२॥

आतां श्रोतीं सावधान ॥ वाल्मीकमहाराज गेले कथून ॥ तेचि रामकथा संपूर्ण ॥ मूळापासून ऐकिजे ॥३॥

दृष्टीं न पाहतां अवघा ग्रंथ ॥ उगाच दोष ठेविती अकस्मात ॥ ते शतमूर्ख जाणिजे निश्र्चित ॥ नव्हती पंडित विवेकी ॥४॥

ग्रंथा नाम रामविजय ॥ श्रवणें सदा पाविजे जय ॥ चिंतित मनोरथ सिद्ध होय ॥ एक आवर्तन करितांचि ॥५॥

आदिपुरुष श्रीअवधूत ॥ तोचि हा ब्रह्मानंद यथार्थ ॥ श्रीधरवरदें अद्भुत ॥ महिमा कोणा न वर्णवे ॥६॥

इति श्रीरामविजयग्रंथ सुंदर ॥ समत वाल्मीकनाटकाधार ॥ सदा परिसोत भक्त चतुर ॥ प्रथमाध्याय गोड हा ॥२०७॥

॥श्रीरामचंद्रार्पणमस्तु॥

N/A

References : N/A
Last Updated : March 10, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP