कथाकल्पतरू - स्तबक २ - अध्याय ७

'कथा कल्पतरू' या ग्रंथात चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, तसेच रामायण, महाभारत व श्रीमद्‍भागवत हे हिंदू धर्मिय वाङमय ओवीरूपाने वर्णिलेले आहे.


श्रीगणेशाय नमः ॥

आवडीं पुसे राजा भारत ॥ वैशंपायना तूं ज्ञानवंत ॥

मज आर्ताचा मनोरथ ॥ पुरविला तुवां ॥१॥

तरी बळिरावो भूपती ॥ कैसी पूजी वामनमूर्ती ॥

ते सांगावी सकल स्थिती ॥ कृपा करोनी ॥२॥

मग ह्मणे वैशंपायन ॥ राया तूं श्रोता विचक्षण ॥

तरी पुसिलिये पुसीचा प्रश्न ॥ ऐक आतां ॥३॥

बळीनें बटु बैसविला आसनीं ॥ शेजीं स्त्रिया असती दोन्ही ॥

चरण क्षाळण करोनी ॥ पूजिला विधिमंत्रें ॥४॥

माथां वंदिलें चरणतीर्थ ॥ मग केलें गंधाक्षत ॥

वस्त्रें देवोनि पूर्वदत्त ॥ संकल्पी रावो ॥५॥

उदकें भरोनि अंजुळिका ॥ ह्मणे तुमचीं तीन पदें भूमिका ॥

ते पावो आदिपुरुषा ॥ श्रीहरीसी ॥६॥

ह्मणोनि केला संकल्पावेश ॥ तंव तो जाहला आनवेश ॥

जो विराट्‌ आदिपुरुष ॥ तो विस्तारला दिसे ॥७॥

तयासि पाहतसे बळी ॥ तंव चरण गेले पाताळीं ॥

आणि एकवीस स्वर्गमंडळीं ॥ गेला मुकुट ॥८॥

सूर्य पूजी वक्षस्थळीं ॥ सोम तारा कंठनाळीं ॥

बाहूंनीं व्यापिलें सकळीं ॥ दिग्मंडळ तें ॥९॥

तयाची सांगतां वित्पत्ती ॥ ग्रंथ विस्तारेल गा भूपती ॥

मी सांगितलें संकलितीं ॥ स्वरुप तें ॥१०॥

जयाचें मन तो चंद्रमा ॥ बुद्धि बोलणें तरि ब्रह्मा ॥

आणि पाद त्रिविक्रमा ॥ बोलिजे मूर्ती ॥११॥

कौतुकें पाहतसे बळी ॥ ह्मणे बांधिली पुण्यजळाची पाळी ॥

सत्वबीजें देवसाळी ॥ पिकेल अमोघ ॥१२॥

ह्मणे माझिये वंशा समस्त ॥ हें पीक पुरेल गा सत्य ॥

यास्तव कर जोडोनि विनवीत ॥ बीजराशीसी ॥१३॥

ऐसें रुप तें महा अद्भुत ॥ तेणें मांडलें दानदत्त ॥

तंव पद येक जाहलें गणित ॥ भूमंडळींचें ॥१४॥

दुजा चरण उभारितां ॥ तो गेला एकवीस स्वर्गांवर्ता ॥

तेथें ब्रह्मांड भेदोनि सरिता ॥ निघाली गंगा ॥१५॥

जाणों बळीचे अध्वरीं ॥ स्तंभ उभारिला श्रीहरीं ॥

तेथें गंगावन अवधारीं ॥ शिखा जे ते ॥१६॥

कीं मज गमला संकेत ॥ द्वारीं स्तंभ असे अनंत ॥

तो राखोनि बळि भक्त ॥ येर दैत्य वधावे ॥१७॥

नातारी इंद्र स्थापिला राज्यपीठीं ॥ ह्मणवोनि गंगा मिरवे मुकुटीं ॥

कीं होम हवन याग पाठी ॥ करावे ब्राह्मणीं ॥१८॥

ह्मणोनि उभविली हे गुढी ॥ जे होमचर्या यागकुंडीं ॥

कीं सायुज्यतेची परवडी ॥ बळी पावे ॥१९॥

ऐसी ते चरणींची गंगा ॥ ध्वजा शोभे हरिस्तंभा ॥

ते पुण्यपवित्र महाभागा ॥ भागीरथी हे ॥२०॥

मग तिसरा उभारिला चरण ॥ ह्मणे आपुला पुरवीं गा पण ॥

ना तरी सत्व राहें सांडोन ॥ वेगळा आतां ॥२१॥

बळि थोर जाहला दुःखित ॥ ह्मणे बोलिला बोल नव्हे सत्य ॥

धर्मकीर्तीचा अधःपात ॥ जाहला आजी ॥२२॥

पैल हा आमुचा गुरु ॥ तो आतां हंसेल शुक्रु ॥

परि मग आठवला मंत्रु ॥ बळीसि पैं गा ॥२३॥

कीं सर्वांकारणें हें शरीर ॥ तें तंव भूमीसि कारण पात्र ॥

ह्मणोनि वोडविता जाहला शिर ॥ चरणातळीं ॥२४॥

माथां वंदिलें तुळसीदळ ॥ जेथें विष्णु असे केवळ ॥

सुस्नात होवोनि तयेवेळ ॥ चालिला सामोरा ॥२५॥

सवें चालिली विंध्यावळी राणी ॥ आणि दुजी जळपद्मिणी ॥

दोघी निघाल्या निर्वाणीं ॥ दक्षिणभागीं ॥२६॥

दोघीं नमस्कारिलें ब्राह्मणां ॥ मस्तक धरिलासे अर्पणा ॥

रावो ह्मणे आतां वामना ॥ ठेवीं चरण ॥२७॥

देवें मस्तकीं ठेविलें पद ॥ तें बळीसि वाटे अरविंद ॥

ब्रह्मादिकां जें असे वंद्य ॥ तें लाधलें बळीसी ॥२८॥

जैं मस्तकीं ठेविला चरण ॥ तैं देव ह्मणे पुरविला पण ॥

मग पुष्पें वर्षला चतुरानन ॥ देवांसहित ॥२९॥

तंव बळीचें सैन्य समस्त ॥ धाविन्नले कपटदैत्य ॥

त्रिशूळहस्तीं चक्रें तेथ ॥ जाती कपटरुपें ॥३०॥

परि तयांसि ह्मणे बळी ॥ इंद्रासि न मांडेल समफळी ॥

रेखा उचलेल कपाळीं ॥ तंव करा धीर ॥३१॥

मज जाहला शुक्राचा शाप ॥ आतां नचले इंद्रसि कोप ॥

त्याचे पाठीं आदिपुरुष ॥ उभा असे ॥३२॥

तैं सात्विकामागें तामस ॥ बळेंचि येतसे दैत्यमानस ॥

कीं अग्निजीवनीं समरस ॥ परि न सांडी भावो ॥३३॥

नातरी देवांची शस्त्रें ॥ दधीचीनें गिळीलीं उदकमात्रें ॥

त्यांचीं झालीं अस्थिमात्रें ॥ परि न सांडी भाव ॥३४॥

तेव्हा ह्मणे जन्मेजयो ॥ या दृष्टांताचा कोण भावो ॥

हा फेडावा संदेहो ॥ देवशस्त्रांचा ॥३५॥

मग ह्मणे वैशंपायन ॥ वृत्रासुर महा दारुण ॥

प्रसन्न करोनि त्रिनयन ॥ लाधला वर ॥३६॥

दैत्य ह्मणे जी महारुद्रा ॥ म्यां जिंकावे सुरवरां ॥

शक्रादि देवां समग्रां ॥ जिंकावें म्यां ॥३७॥

तेव्हां रुद्र ह्मणे तथास्तु ॥ तुज शस्त्रास्त्रीं नाहीं मृत्यु ॥

कीं निःशस्त्री तरी लोकांतु ॥ न देखों कोणी ॥३८॥

ऐसा तो उदेला असुर ॥ प्रसन्न जाणोनि शंकर ॥

तेणें पळविला सुरेश्वरु ॥ देवांसहित ॥३९॥

तया भेणें पळती सुरवर ॥ जाणोनि शिवाचा कृपाकर ॥

परि पाठी न सोडी असुर ॥ मारुं पाहे ॥४०॥

तंव झाली गगनवाणी ॥ कीं यासि प्रसन्न पिनाकपाणी ॥

शस्त्रें असतां तुमचे पाणीं ॥ न सांडी पाठी ॥४१॥

तंव इतुक्या अवसरीं ॥ दधीचि देखिला वनांतरीं ॥

तयासि शस्त्रें निरवोनि समग्रीं ॥ केलें पलायन ॥४२॥

देवां देखोनियां निःशस्त्रां ॥ दैत्यें सांडिली मोहरा ॥

मग राज्य करी अमरपुरा ॥ वृत्रासुर ॥४३॥

तेणें देव जाहले दुःखित ॥ इंद्रादि करुनि समस्त ॥

तों नारद आला तेथ ॥ देवांजवळी ॥४४॥

ह्मणे काहीं करावा दानधर्म ॥ कीं तपदानाचा आश्रम ॥

तयावांचोनि पूर्णकाम ॥ न फले तुमचा ॥४५॥

मग तपीं बैसले सुरवर ॥ संवत्सर दहा सहस्त्र ॥

जंव पुण्य सरे समग्र ॥ दैत्यनाथाचें ॥४६॥

इकडे देवांचीं त्यशक्तशस्त्रें ॥ तीं एकवटलीं समग्रें ॥

दैत्य नेतील ह्मणोनि ऋषेंश्वरें ॥ रचिला मंत्र ॥४७॥

कीं स्नाना जाईन गंगातटीं ॥ मागें शून्य आहे पर्णकुटी ॥

यास्तव शस्त्रांची करोनि पिठी ॥ घातली कमंडलीं ॥४८॥

तंव तीं विरालीं जीवनीं ॥ तें उदक प्राशी दधीचि मुनी ॥

मग तीं शरीराचे संधानीं ॥ भेदलीं अस्थींसी ॥४९॥

इकडे देवीं धाडिला नारद ॥ तो ब्रह्मयासि करी अनुवाद ॥

ह्मणे यासी कायजी प्रबंध ॥ करावा देखा ॥५०॥

मग ह्मणे चतुरानन ॥ यासी येक असे प्रश्न ॥

तरी दधीचीस देवीं प्रार्थोन ॥ मागावीं शस्त्रें ॥५१॥

तेणें वधिजेल तो असुर ॥ आणिक नाहीं यासि विचार ॥

मग तेथोनि आला ब्रह्मपुत्र ॥ देवांपाशीं ॥५२॥

तें श्रुत केलें सुरनाथा ॥ निवृत्त झाली देवांची चिंता ॥

मग दधीचिप्रति मागुता ॥ आला सुरेश्वर ॥५३॥

त्यासी ह्मणती सुरेश्वर ॥ आह्मां द्यावें जी हतियार ॥

तंव तो ह्मणे करोनि नीर ॥ प्राशिलेंसे म्यां ॥५४॥

चिंता वाटली देवनाथा ॥ तंव दधीचि झाला बोलता ॥

कीं विहित वंचिलिया नरकपाता ॥ जाइजे सत्य ॥५५॥

एकविश्वासें विश्वासे मैत्र ॥ आणि दुजा करी उपकारा ॥

तें ना ह्मणतां एक सहस्त्र ॥ भोगी रौरव ॥५६॥

शरीर सांडितां दुखविजे ॥ परि अंतीं ऐसेंचि होइजे ॥

शतवर्षें तरी ऋणवोझें ॥ न फिटे जीवा ॥५७॥

आतां तुमचीं तुह्मांसि शस्त्रें ॥ देवोनि उपकार होय शरीरें ॥

याहोनि तरी पुण्यें थोरें ॥ काय असती॥५८॥

तया शस्त्रांचें जें नीर ॥ तेणें भेदला अस्थिपंजर ॥

तरी तेंचि तूं घेईं शस्त्र ॥ सुरेश्वरा ॥५९॥

मग तयासि पडिला विचार ॥ कामधेनु बोलावी सुरेश्वर ॥

तिचे वदनें त्वचापदर ॥ केले वेगळे ॥६०॥

मग मांस त्यजोनि अस्थी ॥ घेतलें इंद्रें शीघ्रगती ॥

तेंचि वज्र झालें सुरपती ॥ अंगुळें बाविस ॥६१॥

तेणें वज्रें महाशस्त्रें ॥ वृत्र वधिला क्षणमात्रें ॥

मग राज्य केलें सुरेश्वरें ॥ अमरावतीचें ॥६२॥

तंव त्या दधीचीचा पुत्र ॥ सुमळु नामें महा उग्र ॥

तो आला वेगवत्तर ॥ ऐकोनियां ॥६३॥

तयासि दाटला चंडकोप ॥ ह्मणे मारिला माझा बाप ॥

तरि आतां घेईं शाप ॥ धेनुवे तूं ॥६४॥

रचिले पुत्र म्लेच्छ तामस ॥ ते कापितील तव मांस ॥

मुख असे तरी बारामास ॥ अपवित्र तुझें ॥६५॥

देवीं केला स्वहितासि यत्‍न ॥ दधीचीचा घेतला प्राण ॥

तरी तुमचें हरीन अवदान ॥ नावेक मी ॥६६॥

मुनि ह्मणे गा सुरनाथा ॥ तुवांचि मागें मारिला पिता ॥

ते विसरोनि दुःखव्यथा ॥ उपशमलों मी ॥६७॥

मग ह्मणे राजा भारत ॥ हा कायजी दुसरा वृत्तांत ॥

कैसा पूर्वीं चुकला सुरनाथ ॥ दधीचीसी ॥६८॥

ऐकोनि ह्मणे ऋषेश्वर ॥ दधीचि जाणे महामंत्र ॥

तो शिकावया अश्विनीकुमर ॥ आले तेथें ॥६९॥

ऋषी सांगतां महामंत्र ॥ तंव तेथें आला पुरंदर ॥

तो कोपोनि गेला शिर ॥ दधीचीचें ॥७०॥

मग त्या अश्विनीकुमरें ॥ अश्वाचें शिर आणिलें त्वरें ॥

तें लाविलें वेगवत्तरें ॥ दधीचीसी ॥७१॥

ते जाणती संजीवनी मंत्र ॥ तेणें जगविला ऋषेश्वर ॥

परि दधीचि न मानी अपकार ॥ सुरपतीचा ॥७२॥

ह्मणोनि हृदयींचा जो पवित्र ॥ तो न करी अनुपकार ॥

जैसी भूमि खंडिलिया विस्तार ॥ होय धान्याचा ॥७३॥

आणि जे जातीचे अपवित्र ॥ ते सांडिती कुळाचार ॥

जैसें दृषदाचें केलें पात्र ॥ तें न तरे जळीं ॥७४॥

परि दधीचीची ब्रह्महत्या ॥ ते जडली सुरनाथा ॥

मग बहुतीं मिळोनि प्रायश्चित्ता ॥ योजिला निर्णयो ॥७५॥

आणि त्या दधीचि मुनीनीं ॥ आपणचि देह दीधला वचनीं ॥

देवीं निर्णय योजिला ह्मणोनी ॥ तये वेळीं ॥७६॥

नातरी ब्रह्महत्येचें प्रायश्चित्त ॥ जे योजिती ते असत्य ॥

पाहा पां देव जाहले उद्युक्त ॥ तया उपाया ॥७७॥

ब्रह्महत्या महा दूषण ॥ तें भोगिल्याविण नटळे लांछन ॥

काहीं केलिया न सुटे जाण ॥ महा अरिष्ट ॥७८॥

मग समस्तीं करोनि विचार ॥ ह्मणती इंद्र जालिया अपवित्र ॥

त्या संसर्गें होईल संचार ॥ सकळिकांसी ॥७९॥

मग ते विचारुनि बाधा ॥ सकळीं केली चतुर्विधा ॥

प्रथम बोलाविल्या मुग्धा ॥ भागग्रहणा ॥८०॥

देवीं प्रार्थिल्या वनिता ॥ एक भाग घ्या हो दुष्कृता ॥

हत्येपासोनि सुरनाथा ॥ करावें पावन ॥८१॥

तंव त्या ह्मणती सुरपती ॥ आह्मां पुरुष सकामगती ॥

आमुचे वचनीं एकही मुहूर्तीं ॥ न राहती कीं ॥८२॥

आणि पुरुषार्थाची आर्तता ॥ आराणुक नाहीं गा सर्वथा ॥

तरी वेगळे वेळीं उभयतां ॥ नाहीं प्रीती ॥८३॥

आह्मां करावा अष्टगुण काम ॥ जैसा अग्निगर्भींचा धर्म ॥

तैसा अष्टौप्रहर रतिधर्म ॥ देइंजे आह्मां ॥८४॥

मग इंद्र ह्मणे तथास्तु ॥ तुह्मां अष्टगुण होईल मन्मथु ॥

परि रजस्वला हा संकेतु ॥ ब्रह्महत्येचा ॥८५॥

ह्मणोनि चारी दिवस अबळा ॥ स्त्री जालिया रजस्वला ॥

तैंच चांडाळीण गा भूपाळा ॥ पातकें तेणें ॥८६॥

मग इंद्र ह्मणे पुढती ॥ तुह्मासि येगुणेंचि होईल संतती ॥

मग त्यांचेनि पिंडदानें तीर्थीं ॥ उद्धराल तुह्मी ॥८७॥

आणि पतीची करितां भक्ती ॥ तेणें पातकां होईल निर्गती ॥

कीं पति निमालिया गती ॥ ब्रह्मचर्य ॥८८॥

मग बोलाविल्या सरिता ॥ भागु एक घ्यावा हो दुरिता ॥

त्या ह्मणती प्रवाहो सर्वथां ॥ चारीच भास ॥८९॥

इंद्र बोले वरदान ॥ तुमचें मानलें मज वचन ॥

तरी बारामास मिळेल जीवत ॥ सागरीं तुमचें ॥९०॥

मग तें पातक गा सुरपती ॥ संकल्पिलें नदींप्रती ॥

ह्मणोनि चारीमास असती ॥ अपवित्र नदी ॥९१॥

परि विशेषें नदीचा फेण ॥ तो इंद्रपातकांश जाण ॥

वर्षाव गेलिया पर्जन्य ॥ होती पवित्र ॥९२॥

तें उदक मिळालिया उदधी ॥ मग पवित्र होती नदी॥

परि चारमास गा सुबुद्धी ॥ न करावें वंदन ॥९३॥

परंतु कृष्णा गोदा भागीरथी ॥ या महानदी गा भूपती ॥

तयां निंदितां सुरपती ॥ ब्रह्महत्या ॥९४॥

मग बाहिला वैश्वानरु ॥ तूं चतुर्थ भाग घे अंगारु ॥

तंव बोलिला वीतिहोत्रु ॥ देवांप्रती ॥९५॥

येणें मी अपवित्र होईन सुरपती ॥ अपकीर्ती होईल जगतीं ॥

मग माझे मुखींच्या आहुती ॥ न घेती देव ॥९६॥

देव ह्मणती प्रहसन्नमुख ॥ तूं होईं गा सर्वभक्ष ॥

परि तुझिये मुखींचा पावक ॥ पवित्र आह्मां ॥९७॥

तया पातकाचा अनुक्रम ॥ इंद्रें संकल्पितां श्रम ॥

तो पातकांश बोलिजे धर्म ॥ प्रथम ज्वाळा ॥९८॥

मग चौथा चरण वृक्षांवरी ॥ इंद्रे घातला अवधारीं ॥

पिंपळावांचोनि तरुवरीं ॥ समस्तांसी ॥९९॥

तंव तरु विनविती वचन ॥ आह्मी अचळ अज्ञान ॥

मग आह्मां नातळे जन ॥ पातकें येणें ॥१००॥

आमुचें करिती छेदन ॥ तेव्हां आह्मां अंकुर ना पान ॥

तरी आह्मां द्यावें वरदान ॥ सुरेश्वरा जी ॥१॥

मग तथास्तु ह्मणे इंद्र ॥ तुमचा छेदिल्या शाखाभार ॥

तेणें फुटतील अंकुर ॥ बहुत तुह्मां ॥२॥

तुमच्या अंगींचिया शकलां ॥ तो ग्रास पावेल मजला ॥

तेणें टाळाल कुश्चळा ॥ पातकासी ॥३॥

तुमचें फळीं हरेल दुरित ॥ छायेसि निवतील अतीत ॥

परोपकारीं देह लागत ॥ येणेंचि गुणें ॥४॥

आतां असो हे ब्रह्महत्या ॥ सुरपतीची निवर्तली कृत्या ॥

मग स्वस्थाना गेले आपुल्या ॥ सकळ देव ॥५॥

हें असे नारद पुराणीं ॥ दुजी असे वेदवाणी ॥

उपनिषद बोलती मुनी ॥ द्वितीयपाढां ॥६॥

तैसाचि दाता निःसीम बळी ॥ न सांडी बोलिली बोली ॥

आतां असो हे संपादिली ॥ दधीचिमात ॥७॥

ऐसी बोलिली दृष्टांत भाषा ॥ ते जाणिजे दैत्यमानसा ॥

मग घालोनि वरुणपाशा ॥ बांधिला बळी ॥८॥

तंव विनवी विंध्यावळी ॥ जयजयाजी वनमाळी ॥

पूजा करितां कां जी बळी ॥ पावला बंधन ॥९॥

देव पूजितां पडे देउळ ॥ हें काय भक्तीचें कर्मफळ ॥

जैसें इंद्रद्युम्ना जाहलें फळ ॥ याचिये परी ॥११०॥

तंव ह्मणे जन्मेजयो ॥ इंद्रद्युम्न कोठील रावो ॥

तयासि जाहला अपावो ॥ कैसियापरी ॥११॥

मग ह्मणे ऋषेश्वर ॥ इंद्रद्युम्न महा पवित्र ॥

द्राविडदेशींचा नृपवर ॥ विष्णुभक्त ॥१२॥

तो महासिद्धी महाशीळ ॥ दानधर्मी अति प्रबळ ॥

हरिभक्ती वांचून वेळ ॥ न जाय त्याचा ॥१३॥

तो कोणे येके अवसरीं ॥ पुण्यनदीचे विस्तीर्ण तीरीं ॥

पूजा करोनि श्रीहरी ॥ ध्यानस्थ होता ॥१४॥

तेथें आला अगस्तिमुनी ॥ राव होता ध्यानचिंतनीं ॥

ऋषीसि न देखे नयनीं ॥ त्याचि गुणें ॥१५॥

तंव कोपला मुनि अगस्ती ॥ ह्मणे तुझी कायसी भक्ती ॥

मज आलिया रे दुर्मती ॥ न राहसी उभा ॥१६॥

तूं मातलासी विष्णुभक्तीं ॥ ह्मणोनि वनीं होसील हत्ती ॥

मग येवोनि काकुळती ॥ विनवी रावो ॥१७॥

ह्मणे मीं तुह्मां न देखिलें मुनी ॥ वायां शापिलें मजलागुनी ॥

तरी या शापाची धुणी ॥ कैसेन होय ॥१८॥

मुनि ह्मणे दृष्टीं देखतां अनंत ॥ त्याचा लागेल पद्महस्त ॥

तैं होईल मनोरथ ॥ पूर्ण तुझा ॥१९॥

मग तो इंद्रद्युम्न नृपती ॥ जाहला गजेंद्र हस्ती ॥

त्रिकूट नामें महापर्वतीं ॥ समुद्रतीरीं ॥१२०॥

ऐसे क्रमिले शत संवत्सर ॥ सवें करिणी आणि कुंजर ॥

तयां घेवोनि मेळकार ॥ आला उदकासी ॥२१॥

ऐसा तो सह परिवारीं ॥ उदका आला सरोवरीं ॥

तंव गज धरिला भीतरीं ॥ मगरानें पैं ॥२२॥

चरण आसुंडी कुंजर ॥ तंव अधिकचि वोढी मगर ॥

महाहस्ती लागले सहस्त्र ॥ परि न सोडी ॥२३॥

येरु आला काकुळती ॥ तंव आठवली पूर्वभक्ती ॥

मग चित्तीं आळविला श्रीपती ॥ जन्मांतरींचा ॥२४॥

तेथें मांडिला स्तुतिधांवा ॥ धांव धांव गा वैकुंठ देवा ॥

या मगराच्या मुखाकरवां ॥ करीं वेगळा ॥२५॥

जयजयाजी अभयंकरा ॥ गरुडध्वजा पीतांबरा ॥

शंख चक्र पद्म गदाधरा ॥ करमंडिता ॥२६॥

जयजयहो अनाथनाथा ॥ महाकाळा प्राणधाता ॥

धांव धांव गा अनंता ॥ शेषशयना ॥२७॥

तंव तो कृपेचा सागर ॥ गांजिला देखोनि गजेंद्र ॥

गरुडेंसिं आला वेगवत्तर ॥ सरोवरीं त्या ॥२८॥

गजेंद्र येतां काकुळती ॥ नेत्रीं देखिली मंगळमूर्ती ॥

श्रीवत्सलांछन वैजयंती ॥ कंठीं कौस्तुभ ॥२९॥

शंख चक्र गदा कमळ ॥ कंठीं वैजयंती माळ ॥

प्रसन्नवदन वरी झळाळ ॥ पीतांबराचा ॥१३०॥

ऐसा पावला श्रीअनंत ॥ हस्तीसि वोढी मदोन्मत्त ॥

तंव आला मगरासहित ॥ बाहेरि देखा ॥३१॥

मग तो झाला दिव्यशरीर ॥ हरपले पूर्व भावाचे विकार ॥

तंव पावले हरिकिंकर ॥ विमान घेवोनी ॥३२।

देवें उद्धरिला तोही मगर ॥ शापें जाहला होता जलचर ॥

ते गजेंद्र गंधर्ववीर ॥ विमानी बैसविले ॥३३॥

ऐसा उद्धरिला गजेंद्र ॥ तो द्राविडदेशींचा नृपवर ॥

तरी त्या इंद्रद्युम्ना ऋषेश्वर ॥ कोपला ऐसा ॥३४॥

तरी ऐशापरी गा भारता ॥ शुक्रें शापिलें दैत्यनाथा ॥

पूजा करितां गोपिनाथ ॥ बळि पावला बंधन ॥३५॥

देवासि ह्मणे बळिराजा ॥ स्वर्गीं आहे आमुचा आजा ॥

तो विनवील गरुडध्वजा ॥ आपें आपणची ॥३६॥

मग ह्मणे पाव गा प्रल्हादा ॥ मज झाली येवढी बाधा ॥

वरुणपाशीं विनापराधा ॥ बांधलों असें ॥३७॥

ऐसें स्मरण केलें काहीं ॥ तंव तो आला लवलाहीं ॥

तेणें बळि देखिला पाईं ॥ भगवंताचे ॥३८॥

बळीनें देखिला प्रल्हाद ॥ तंव तो जाहला सद्गद ॥

आणि प्रल्हादही वाचामंद ॥ जाहला तेव्हां ॥३९॥

मग बोले प्रल्हाद करुणा ॥ ह्मणे धांव गा चतुरानना ॥

विनवोनियां नारायणा ॥ सोडवीं बळीसी ॥१४०॥

तंव आला चतुरानन ॥ प्रल्हाद देखे दीनवदन ॥

आणि बळीसि केलें बंधन ॥ वरुणपाशीं ॥४१॥

ब्रह्मा ह्मणे गरुडध्वजा ॥ हा सत्वधीर बळिराजा ॥

येणें बोलिला बोल तुझा ॥ दीधला असे ॥४२॥

प्रल्हाद तुझा प्रीतिमंतु ॥ हे तरी जगप्रसिद्ध मातु ॥

त्याचा बळि हा असे नातु ॥ तुझा सेवक ॥४३॥

आतां प्रल्हादा देईं उचित ॥ बळि अन्याई नव्हे सत्य ॥

हे राज्य मागांचि समस्त ॥ दीधलें तुज ॥४४॥

तूं कृपाळुवा श्रीहरी ॥ आणि प्रल्हादाचा कैंवारी ॥

तरी बळिबंधनाची दोरी ॥ सोडीं आतां ॥४५॥

कृपा आली नारायणा ॥ मग बोले चतुरानना ॥

बळि सोडिला म्यां बंधना ॥ पासोनियां ॥४६॥

जयावरी माझी प्रीती ॥ त्याची मी हरीन सर्व संपत्ती ॥

निःस्पृह झालिया मुक्ती ॥ देणें तया ॥४७॥

कीं धनराज्याचेनि मदें ॥ ते न पावती ममपदें ॥

जैसा ज्वरित कुपथ्यमदें ॥ सांडी जीवा ॥४८॥

जरी करिती धनकल्पना॥ तरी राज्य देईं भक्तजनां ॥

हे कर्मींची विवंचना ॥ ब्रह्मीं तो उदासी ॥४९॥

जयां मागणें संतति संपत्ती ॥ त्यांहीं वोळंगावा पशुपती ॥

आमुची काय अल्पमती ॥ मुक्तीच देणें ॥१५०॥

याचा पाहिला निर्धार ॥ याचिये सम नाहीं उदार ॥

ज्याचे द्वारीं मी स्वकर ॥ वोडविला दाना ॥५१॥

आणि ह्मणे शारंगधर ॥ अमरावतीसि पाठवूनि इंद्र ॥

आतां बळी केला राज्यधर ॥ पाताळींचा ॥५२॥

अमरां देवोनि अमरावती ॥ प्रल्हादासि ह्मणे श्रीपती ॥

तुह्मीं रहावें गा समस्तीं ॥ पाताळासी ॥५३॥

बळीसि ह्मणे श्रीहरी ॥ आतां राज्य निर्भय करीं ॥

तुजजवळी निरंतरीं ॥ असेन मी ॥५४॥

बळि ह्मणे गा नारायणा ॥ येथें आह्मां काय भोजना ॥

तें सांगा जगज्जीवना ॥ आपुलें मुखे ॥५५॥

मग ह्मणे त्रिविक्रम ॥ जो वेदमंत्रेंविण धर्म ॥

तो तुह्मीं कीजे सकाम ॥ निरंतरीं ॥५६॥

आणि प्रतिवर्षीं दिपवाळि ॥ तैं तुझा आनंद भूमंडळीं ॥

अभ्यंग सौभाग्याचे मेळीं ॥ स्नानदानें ॥५७॥

इंद्रासि तुह्मीं केली चेष्टा ॥ ह्मणोनि मी जाहलों धाकुटा ॥

आतां ही करितां हटा ॥ पावसी दंड ॥५८॥

मग देवें दाखविलें बिळ ॥ तेव्हां पाताळा गेले सकळ ॥

बळि प्रल्हाद दैत्यकुळ ॥ राणि कुमरांसीं ॥५९॥

पुढें कितियेका काळीं ॥ अंतरीं इच्छा उपजली बळी ॥

कीं वैकुंठ सोडोनि पाताळीं ॥ राहिलों मी ॥१६०॥

आतां आह्मी झालों सबळ ॥ सांचलेंसे राज्यकुळ ॥

तरी अमरावती घेवों अर्धपळ ॥ नलगे आह्मां ॥६१॥

ऐसें बोलिला उत्तर ॥ तंव वरुणपाश पावले थोर ॥

बांधोनि पाडिलें शरीर ॥ धरणीवरी ॥६२॥

येथें दूषण न ठेवावें श्रोतां ॥ हे हरिवंशींची नागव्यथा ॥

वरुणपाशीं श्रीभागवता ॥ अष्टमस्कंधीं ॥६३॥

ते बळीसि उपजे व्यथा ॥ प्रयत्‍न नचले सर्वथा ॥

तंव पुढां देखिला अवचिता ॥ नारदमुनी ॥६४॥

बळी आणि दुजा प्रल्हाद ॥ तिसरा ब्रह्मसुत नारद ॥

तेथें जाहला वाग्वाद ॥ संगम तो ॥६५॥

देखोनि बळीची आपदा ॥ नारद ह्मणे गा प्रल्हादा ॥

हरिस्मरणा विण बाधा ॥ न टळे याची ॥६६॥

तुह्मीं निघतां पाताळीं ॥ काय बोलिला श्रीहरी ॥

तुवां इंद्रपदाची बळी ॥ न करावी कथा ॥६७॥

त्याचा जाहला आज्ञाभंग ॥ ह्मणोनि कोपला श्रीरंग ॥

त्यावांचोनि हा भुजंग ॥ ना तुटे कदा ॥६८॥

तरी करीं पां स्मरण ॥ ध्यान कीर्तन आणि नमन ॥

मग तुटोनि सर्पबंधन ॥ देखसी रुप ॥६९॥

तंव बळी करी स्तुती ॥ जयजयाजी कमळापती ॥

देवा गजेंद्राचिये गतीं ॥ पावें मज ॥१७०॥

कीं आकाश आणि धरणी ॥ तेज पवन आणि पाणी ॥

विश्वबंधना तवकरणी ॥ तरी तुटो बंधन ॥७१॥

जयजयाजी सर्वेशा ॥ अंबरीषा कोपला दुर्वासा ॥

त्यापरि सत्य करोनि तैसा ॥ पावें मज ॥७२॥

तूंचि सूक्ष्म आणि स्थूळ ॥ त्रिगुण आणि अकळ ॥

हा असे सत्यश्रुतिबोल ॥ तरी पावें वहिला ॥७३॥

तंव इतुक्या अवसरीं ॥ गरुडासहित मुरारी ॥

आला बळीचिये द्वारीं ॥ वैकुंठींहोनी ॥७४॥

अंबरीषा कोपतां दुर्वासा ॥ तेव्हां पावला गर्भवासा ॥

तोचि पावला नागपाशा ॥ बळीचिये ॥७५॥

गरुडाचिया पंखवातें ॥ बळि मुक्त झाला बंधनातें ॥

मग विनविलें दैत्यनाथें ॥ श्रीहरीसी ॥७६॥

बळि ह्मणे गा हृषीकेशी ॥ थोर पीडलों नागपाशीं ॥

तरी मजपासोनि अहर्निशीं ॥ नवजावें तुवां ॥७७॥

तैं पासोनि बळीचे द्वारीं ॥ सदा रक्षण असे श्रीहरी ॥

तोचि दुर्वासें द्वापारीं ॥ आणिला द्वारके ॥७८॥

परि बिळामध्यें येक कोटी ॥ सुदर्शनाचि फिरे घरटी ॥

जैसी वत्सालागीं श्वासदाटी ॥ धेनु जाय ॥७९॥

मुनि ह्मणे गा भारता ॥ त्वां पुसिली बळीची कथा ॥

तरी त्या बळीसि आणि अनंता ॥ ऐसी प्रीती ॥१८०॥

ऐसा जाहला वामनावतार ॥ देवदैत्यां रणसागर ॥

पुण्यराशी मेरु थोर ॥ उपमा थोरीं ॥८१॥

ऐसी असे हे धर्मकथा ॥ उद्धरे श्रोता आणि वक्ता ॥

पीडा पराजय सर्वथा ॥ न पावे कांहीं ॥८२॥

अपुत्रिकांसि पुत्रवृद्धी ॥ निर्धनासि धनाची सिद्धी ॥

जन्ममरणाची व्यथा व्याधी ॥ बाधों न शके ॥८३॥

श्रवणें नासती त्रिविध ताप ॥ ईश्वर जोडे आपें आप ॥

भक्ति ज्ञान आनंद अमूप ॥ वामनकीर्तनें होय पैं ॥८४॥

तेणें देखिलीं गंगा सागरु ॥ द्वादशलिंगें आणि मेरु ॥

जेणें ऐकिला पुण्यविचारु ॥ वामनाचा ॥८५॥

आतां असो हा बळिवामन ॥ पुढां सांगेल वैशंपायन ॥

तें परिसावें चित्त देऊन ॥ ह्मणे कृष्णयाज्ञवल्की ॥८६॥

इति श्रीकथाकल्पतरु ॥ द्वितीयस्तबक मनोहरु ॥

संपूर्ण वामन अवतारु ॥ सप्तमो‍ऽध्यायीं कथियेला ॥१८७॥

श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ शिवंभवतु ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP