कथाकल्पतरू - स्तबक २ - अध्याय ५

'कथा कल्पतरू' या ग्रंथात चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, तसेच रामायण, महाभारत व श्रीमद्‍भागवत हे हिंदू धर्मिय वाङमय ओवीरूपाने वर्णिलेले आहे.


श्रीगणेशाय नमः ॥

जन्मेजयराजा भारती ॥ वैशंपायन वेदमूर्ती ॥

तयांसि करी विनंती ॥ कर जोडोनी ॥१॥

सांगा समुद्रमंथनाची कथा ॥ कैसें रुप धरिलें पूर्णता ॥

तेणें भुलविलें देवदैत्यां ॥ कैसियापरी ॥२॥

हें सांगाजी पूर्ण कथन ॥ जेणें संतोषी होय मन ॥

आणि निवतील हे श्रवण ॥ नामघोषें ॥३॥

मग ह्मणे वैशंपायन ॥ बरवा केला सिंगा प्रश्न ॥

तरी ऐकें सावधान ॥ कथा हे गा ॥४॥

पूर्वीं देव आणि दैत्य ॥ विचार करिती एकमत ॥

जे समुद्र मंथोनि समस्त ॥ काढूं रत्‍नें ॥ ५॥

दिव्यपर्वतींचे तरुवर ॥ आणिते झाले सुरवर ॥

सुगंधद्रव्यांचे अपार ॥ आणिती द्रुम ॥६॥

मग आणिला मंदराचळ ॥ देवीं दैत्यीं अळुमाळ ॥

जड जाणोनि महा शैल ॥ सांडिला मार्गीं ॥७॥

ह्मणोनि धांवला गोपाळ ॥ गरुडावरी घातला अचळ ॥

जैसी रवि उचलितां वेळ ॥ नलगे गौळणीसी ॥८॥

मग वासुकीचें करोनि मांदिरें ॥ देव वोढिती उत्तरे ॥

आणि दैत्य लागले मोहरे ॥ वासुकीच्या ॥९॥

उभयतां मंथिती समुद्रजळ ॥ तंव वासुकी वमी गरळ ॥

तेंचि उठिलें हळाहळ ॥ मुखींहोनी ॥१०॥

तयाची उठिली महाज्वाळ ॥ उभयवर्गीं जाळी सकळ ॥

मग तें गिळिलें हळाहळ ॥ महादेवें ॥११॥

त्या समुद्राचे मंथनें ॥ निघालीं चवदा महा रत्‍नें ॥

जीं अमरलोकींचीं भूषणें ॥ सिंधुजातें ॥१२॥

रंभा कौस्तुभ ऐरावती ॥ शंख श्री आणि निशापती ॥

अमृत मदिरा अश्वजाती ॥ उच्चैःश्रवा ॥१३॥

कामधेनु पारिजातक ॥ धन्वंतरी हरिधनु देख ॥

सकळां मागें महाविष ॥ निघालें तें ॥१४॥

ऐरावतीचे पदसंघटणीं ॥ नागवेली निघाली मंथनीं ॥

तें रत्‍न जाणोनि वज्रपाणी ॥ नेत अमरावतीसी ॥१५॥

नागु नाम भद्रजाती ॥ ह्मणोनि नाग कन्या बोलती ॥

परि सर्पांपासाव उत्पत्ती ॥ हें लटिकें राया ॥१६॥

ते नेतां अमरपुरीं ॥ काहीं बीज पडिलें सिंधुतीरीं ॥

मग ते विस्तारली सुंदरी ॥ नागवेली ॥१७॥

समुद्रमंथन करितेवेळीं ॥ मंदराचळ गेला पाताळीं ॥

तो कूर्मरुपें वनमाळी ॥ धरिता होय ॥१८॥

पर्वताचे महाभारां ॥ पाताळीं जातां वसुंधरा ॥

तेधवां कांसवरुपें श्रीधरा ॥ धरणें पडलें ॥१९॥

तें अद्यापि आहे चिन्ह ॥ कांसवपृष्ठी जे कठीण ॥

घुसळितां लागलें ऊन ॥ बुड पर्वताचें ॥२०॥

रत्‍नें काढिलीं समस्तां ॥ तंव दैत्य झोंबले अमृता ॥

मदिरा न घेती सर्वथा ॥ दोनीवर्ग ॥२१॥

कलह मांडला उभयांसी ॥ समस्त गेले शिवापाशीं ॥

नेवोनियां माधवासी ॥ गौतमीतीरा ॥२२॥

मग तयांसि ह्मणे श्रीपती ॥ तुह्मीं सकळीं बैसावें पंक्तीं ॥

एक येईल मध्यवर्ती ॥ तो वाढील अमृत ॥२३॥

तें मानवलें दोघांमनीं ॥ देवें रुप धरिलें मोहिनी ॥

येता जाहला दुरोनी ॥ स्त्रीचे वेषें ॥२४॥

तयेसि देखोनि समस्त ॥ कामें भुलले देव दैत्य ॥

मग ते ह्मणती अमृत ॥ वाढीं आह्मां ॥२५॥

तयेनें रचिलें पुढां पात्र ॥ दैत्य दुश्चित्त कामातुर ॥

तयांसि देतसे मदिर ॥ मोहिनीमाया ॥२६॥

आणि देवांचिये पंक्ती ॥ पात्रें भरिलीं अमृतीं ॥

तंव राहू बैसला पांथीं ॥ देवांमाजी ॥२७॥

तें चंद्रें सांगितलें नारायणा ॥ पैल हा दैत्ययाती जाणा ॥

राहू दाविला नेत्रखुणां ॥ मोहिनीसी ॥२८॥

तंव तेणें केलें प्राशन ॥ मग देवी कोपली आपण ॥

तानवड काढिलें सुदर्शन ॥ कर्णपुटींचें ॥२९॥

तेणें हाणितलें कंठनाळीं ॥ धड पाडिलें भूमंडळीं ॥

शीर तुटोनि गेलें पोकळीं ॥ आकाशपंथें ॥३०॥

धड चालिलें उफराटें ॥ पश्चिमसमुद्राचिये वाटे ॥

देवदैत्य झाले हिंपुटे ॥ पळती धाकें ॥३१॥

रुंडासि हाणिती त्रिशूळें ॥ परि तें अधिकचि उसळे ॥

पृथ्वी वाटीन ह्मणोनि चालिलें ॥ पश्चिमपंथें ॥३२॥

त्रिशूळ घातला धडाचे उदरीं ॥ परी तें नावरे त्रिपुरारी ॥

ऐसें ह्मणतां ह्माळसाडोंगरीं ॥ आलें धड ॥३३॥

तंव अंबरीं जाहली वाचा ॥ कीं हृदयीं अमृत असे याच्या ॥

तें काढितां अप्रयासा ॥ होईल कार्य ॥३४॥

अंगुष्ठ घातला कंठनाळीं ॥ गरळ उखळिलें हृदयकमळीं ॥

अंगुष्ठ काढितांचि खालीं ॥ निघालें अमृत ॥३५॥

मग तया हृदयींच्या नीरा ॥ संगम झाला हृदयक्षीरा ॥

तेचि नामें जाहली प्रवरा ॥ पुण्यनदी हे ॥३६॥

तेचि ह्मणिजे पयोष्णी ॥ हें असे मार्कंडेयपुराणीं ॥

तें सांगतसें वचनीं ॥ ऋषिमतेंसीं ॥३७॥

मग ते चालिली पूर्वपंथें ॥ धद घेवोनि सांगातें ॥

तैं गौतमी आली तेथें ॥ पयोष्णीपाशीं ॥३८॥

जे ऋषिदेखतां समग्रां ॥ गौतमें विनविलें महारुद्रा ॥

तेणें न्यावया पूर्वसमुद्रा ॥ केला नेम ॥३९॥

हें तुझे चरणींचें नीर ॥ मज मिळेल तरी मी पवित्र ॥

ऐसें ह्मणतांचि सुंदर ॥ जाहली उत्तरे ॥४०॥

परि गौतमीचे संगमीं ॥ ते सत्य विष्णुमोहिनी ॥

ह्माळसा धड चेपोनी ॥ बैसली असे ॥४१॥

ह्मणोनि राहूचंद्रासि वैर ॥ चंद्रें दाखविलें छिद्र ॥

ग्रहण होतसे निरंतर ॥ येणें विचारें ॥४२॥

तें राहूचें शिरकमळ ॥ कुटोनि त्याचें केलें मुसळ ॥

तेंचि शस्त्र महाबळ ॥ धरी महामाया ॥४३॥

हे लटिकी नव्हे बोली ॥ जे ग्रहण लागे शशिमंडळीं ॥

तें मुसळ झोंबतसे काळीं ॥ प्रतिबिंबास ॥४४॥

आणिक काहीं कारण ॥ कीं देवांचें झालें वरदान ॥

जेणें दाविलें तुझें मरण ॥ त्यासीच ग्रासावें ॥४५॥

ह्मणोनि देशा नाम धनवट ॥ प्रवरा हे वाहे उद्भट ॥

पयोष्णी जात वरिष्ठ ॥ विष्णुह्माळसा ते ॥४६॥

मग दैत्यांचे पांथिअंतीं ॥ मधुपात्र टाकिलें क्षिती ॥

तेचि जाहली मधुमती ॥ नाम नदी ते ॥४७॥

रुद्र ह्मणे ह्माळसा तूं सर्वत्र ॥ तुझा बोलिजे अगमपार ॥

तेंचि जाहलें गुणनाम थोर ॥ ह्माळसादेवी ॥४८॥

मग सोम आणि सविता तेथें ॥ धाकें केलीं दोन तीर्थें ॥

ग्रहणपीडेचिये व्यथे ॥ व्हावें सुस्नात ॥४९॥

हें ह्माळसेचें आख्यान ॥ संकलित केलें संपूर्ण ॥

स्मरणमात्रें दोष दारुण ॥ नासती ग्रहपीडा ॥५०॥

ते विष्णुरुप मोहिनी ॥ हें आहे मार्कंडेयपुराणीं ॥

ते म्यां बोलिली वाणी ॥ तुजप्रती ॥५१॥

मग दिवस गेलिया बहुतें ॥ शंकर ह्मणे विष्णूतें ॥

मोहिनीचें रुप मातें ॥ दाखवीं हरी ॥५२॥

कैसे देव आणि दैत्य ॥ तुवां मोहिले समस्त ॥

तें रुप पाहों उत्कंठित ॥ जाहलें मन माझें ॥५३॥

विष्णु ह्मणे अहो त्रिपुरारी ॥ तें गेलें तेचि अवसरीं ॥

परि रुद्र ह्मणे मुरारी ॥ न बोलें ऐसें ॥५४॥

मग विष्णु जाहला अदृश्य ॥ मांडिला मायेचा नट वेष ॥

वनश्री रचोनि वैकुंठाधीश ॥ जाहला मोहिनी ॥५५॥

रचिले पुण्यतरुवर ॥ वापी कूप सरोवर ॥

हंस चातक मयूर ॥ पक्षीकुळें ॥५६॥

कमलपत्रांचे छत्राकार ॥ मध्यें मयूर नृत्याकार ॥

कोकिळा गाती सुस्वर ॥ वसंतासवें ॥५७॥

वृक्ष दाटले दूरवरी ॥ फळीं पुष्पीं लवले भारीं ॥

पवनासि निघतां बाहेरी ॥ थोर कष्ट ॥५८॥

आतां असो हे वल्गना ॥ कंदुक झेलीत आली अंगना ॥

कीं कटाक्षबाणें त्रिभुवना ॥ मोहों शके ॥५९॥

सकळ श्रृंगारें आथिली ॥ अंचळ घाली करकमळीं ॥

तेणें दिसे उरस्थळीं ॥ कामबीज ॥६०॥

कंदुक टाकिला भूमीवरी ॥ सवेंच झेली अंबरीं ॥

लावण्यमातेचियापरी ॥ खेळे क्रीडा ॥६१॥

गातां कंठ अति सुस्वर ॥ देखोनि भुलला ईश्वर ॥

नृत्य करितां पदर ॥ उडाला करींचा ॥६२॥

तेव्हां उघडे जानुजघन ॥ शिवें देखिले सर्वज्ञ ॥

तंव लाजेनें झांकी नयन ॥ उमादेवी ॥६३॥

मग लाज सोडोनि धूर्जटी ॥ तयेसि करीत असे गोष्टी ॥

उमा असतांही नेहटी ॥ बैसला देवो ॥६४॥

स्वरुपें भुलला ईश्वर ॥ ह्मणे इशीं करीन बलात्कार ॥

तंव ते पळाली कामातुर ॥ जाणोनि रुद्र ॥६५॥

मग रुद्र धांवे पाठोपाठीं ॥ तेणें सहज सुटली कांसोटी ॥

लिंग आदळतां कटवटीं ॥ सांडलें वीर्य ॥६६॥

ऐसें केलें पृथ्वीअटण ॥ वीर्य विखुरलें संपूर्ण ॥

तेंचि पारद झालें जाण ॥ धातुमूळ ॥६७॥

रुद्रवीर्य सांडलें क्षिती ॥ तेणें झाली कामशांती ॥

मग परतला पशुपती ॥ अनुतापतेजें ॥६८॥

लज्जारुप जाहला थोर ॥ माथां घातलें व्याघ्रांबर ॥

तंव उमेपाशीं शारंगधर ॥ देखिला उभा ॥६९॥

अच्युतासि ह्मणे महारुद्र ॥ मी अपराधी अविचार ॥

अबुद्धीनें कामसंचार ॥ जाहला होता ॥७०॥

तें तुवां चुकविलें श्रीपती ॥ मज आणिलें उमेप्रती ॥

तुझिया मोहमोहनशक्ती ॥ जाणवती कवणा ॥७१॥

परस्परें झाली स्तुती ॥ दोघे गेले स्वस्थानाप्रती ॥

ते असे गा हे मोहनशक्ती ॥ विरोचनासी ॥७२॥

मग ह्मणे जन्मेजयो ॥ सांगा पुढील अन्वयो ॥

मोहिनीचा तरी संदेहो ॥ फेडिला तुह्मीं ॥७३॥

जैसा अमिषा लागोनी ॥ वेगीं मत्स्य पावे जीवनीं ॥

तैसा उठिला तत्क्षणीं ॥ विरोचन तो ॥७४॥

तंव ते उभी असे मंगळा ॥ रावो ह्मणे तूं कवणाची बाळा ॥

जन्मकथा जाति कुळा ॥ सांगें वहिली ॥७५॥

ती ह्मणे मज नाठवे मातापिता ॥ आणि वर नाहीं सर्वथा ॥

जातीकुळ उभयतां ॥ नाठवे मज ॥७६॥

मग राव ह्मणे अवधारीं ॥ तूं निराश्रित निरंतरीं ॥

तरी माझ्या अंगसंगें संसारीं ॥ भोगीं सुख ॥७७॥

सकळ राणियां भीतरीं ॥ तव आज्ञा पाळीन सुंदरी ॥

ऐसी आण वाहें निर्धारीं ॥ तुझीचगे ॥७८॥

तुझिया बोलाविणें पाणी ॥ मी न घेईं हो कामिनी ॥

किंवा राज्य देतां द्विजदानीं ॥ न वर्जीं मी ॥७९॥

ऐसा जाणोनि अवसर ॥ मग काढिला मधुर स्वर ॥

ह्मणे तुमचा असेल निर्धार ॥ तरी मानलें मज ॥८०॥

म्यां जे करावी विनंती ॥ ती न घालावी मागुती ॥

हा बोल आठवोनि चित्तीं ॥ द्यावी भाक ॥८१॥

ऐसें दोघां मानलें मन ॥ तयेसि दीधलें भाष्यदान ॥

मग लावोनि गांधर्वलग्न ॥ आणिली घरा ॥८२॥

राया कामाचिये चंडके ॥ प्राणी दुष्टसुष्ट न देखे ॥

जातीकुळासि नोळखे ॥ अभिलाषगुणें ॥८३॥

ऐसी ते नगरा आणितां ॥ भोगपत्‍नी गा भारता ॥

तंव पुत्र जाहला बहुता ॥ दिवसीं एक ॥८४॥

तयासि नाम ठेविलें बळी ॥ जो विष्णूचा अंगमेळी ॥

तो वैष्णव आदिदैत्यकुळीं ॥ बोलिजे पवित्र ॥८५॥

पुत्र जाहला परियेसीं ॥ मग विश्वासिला स्त्रियेसी ॥

अनुसरला जाणोनि मानसीं ॥ विचारिलें देवें ॥८६॥

ह्मणे पुत्रसंतती लागोनी ॥ म्यां व्रत धरिलें अलोणी ॥

अभ्यंगस्नाना ठेविलें पाणी ॥ तुह्मांलागीं ॥८७॥

तरी माझेनि करकमळें ॥ तुमचा माथा मर्दीन चांपेलें ॥

उत्तीर्ण होइंजे माझेनि बोलें ॥ कुळदेवतेचें ॥८८॥

राव ह्मणे न घडे सर्वथा ॥ येरी ह्मणे भाष्य जातें वृथा ॥

मग मुकुट काढोनि खालता ॥ ठेविला जानुवरी ॥८९॥

वाटिये घालोनि चांपेल ॥ हातीं मर्दिलें अळुमाळ ॥

क्रीडा करितां अंगुष्ठकमळ ॥ रोविलें माथां ॥९०॥

त्रिभुवनींचा घातला भार ॥ नाभीं उमटला श्रीकर ॥

तेथें मेदमांसाचा पुर ॥ वाहावलासे ॥९१॥

तंव देवीं केला जयजयकार ॥ थोर आनंदला सुरेश्वर ॥

ऐसी बुद्धि अगोचर ॥ तयादेवाची ॥९२॥

मुकुटा हाणोनियां लाता ॥ रत्‍नें विखुरलीं त्वरिता ॥

ह्मणोनि स्त्रियेनें तेल माथां ॥ न घालावें पुरुषाचे ॥९३॥

रविदत्त तया वज्रमुकुटा ॥ चूर्ण करोनि शतवाटां ॥

अष्टदिशांचिया पाटां ॥ टाकिलीं रत्‍नें ॥९४॥

मग काढोनि अंगुष्ठा ॥ रुप दाविलें वैकुंठा ॥

तंव राउळीं झाला हाकाटा ॥ महा थोर ॥९५॥

हे नारदपुराणींची कथा ॥ तुज निरोपिली गा भारता ॥

परि पद्मपुराणींची कथा ॥ ते अनारिसी ॥९६॥

आतां पुढिलिया अर्था ॥ चित्त देईं गा नृपनाथा ॥

बळि उदरामाजि असतां ॥ मारिला विरोचन ॥९७॥

तेथें आला नारदमुनी ॥ ह्मणे उदर पाहें चक्रपाणी ॥

निंद्य केलें तुवां त्रिभुवनीं ॥ लोकांमाजी ॥९८॥

तेणें लज्जा जाहली वैकुंठा ॥ वामचरण झाडिला रागिटा ॥

तंव बळी जन्मला अंगुष्ठा ॥ श्रीहरीचे ॥९९॥

तें उसणें काढावया हरी ॥ नारदासि ह्मणे रीघ सरोवरीं ॥

स्नान करितां झाली नारी ॥ नारदी ते ॥१००॥

मग अदृश्य झाला हरी ॥ तंव ते यक्षें वरिली नारी ॥

तेथें साठीसंवत्सर उदरीं ॥ झाले नारदाचे ॥१॥

ऐसा चालवितां घराचारु ॥ तंव तेथें आला श्रीवरु ॥

नारद करुनि अतिस्मरु ॥ नेला विष्णुलोका ॥२॥

मग ते विष्णूची अर्धकळा ॥ राज्यीं बैसविलें बळीला ॥

जो पवित्र असे आगळा ॥ वाटिवेचा ॥३॥

तेणें मनीं धरोनि अहंता ॥ आणि धर्माची सदा वार्ता ॥

तप करोनि जगन्नाथा ॥ प्रसन्न केला ॥४॥

बळि ह्मणेजी त्रिपुरारी ॥ मी दृष्टीं न पाहें यमपुरी ॥

आणि शस्त्रास्त्रें क्षेत्रीं ॥ सर्व जिंकावे ॥५॥

तयासि रुद्र ह्मणे तथास्तु ॥ माथां ठेविला वरद हस्तु ॥

मग नगरा आला दैत्यनाथु ॥ महाबळी ॥६॥

मग बोलाविले पुरोहित ॥ शुक्रादि द्विज विख्यात ॥

राज्यीं बैसविला कामार्थ ॥ ज्योतिषीवर्गीं ॥७॥

विश्वजित नामें अध्वर ॥ करिता झाला शुक्रविप्र ॥

तंव पूर्णाहुतीं निघाला रहंवर ॥ कुंडांतुनी ॥८॥

धनुष्य आणि अक्षय भाते ॥ कवच अभेद सर्वांतें ॥

कमळमाळा सुवाससहितें ॥ निघाला रथ ॥९॥

तो निघाला ब्रह्मप्रसाद ॥ जो सुरनरांसि अभेद ॥

ऐसें देखोनि आनंद ॥ झाला बळीसी ॥११०॥

मग दैत्य मेळविले समस्त ॥ राज्य केलें आनंदभरित ॥

ऐसे दिन असंख्यात ॥ गेले तया ॥११॥

तया बळीसि राज्य करितां ॥ कोणा नाहीं व्याधि व्यथा ॥

पापाची स्वल्पही वार्ता ॥ नायकिजे कानीं ॥१२॥

सदा प्रजांचें पाळण ॥ नीतिमार्गाचें उपार्जन ॥

शत्रुभाव लोक जन ॥ नेणती काहीं ॥१३॥

सदा हरिहरांचीं कीर्तनें ॥ ऐसें राज्य केलें तेणें ॥

तंव आला तत्क्षणें ॥ जरासंध ॥१४॥

काळयवन आणि केशी ॥ शिकवूं लागले बळीसी ॥

कीं उणें आणिलें दैत्यवंशीं ॥ वैष्णवा तुवां ॥१५॥

तुज प्रसन्न महादेव ॥ तरी आठवीं पूर्वभाव ॥

जेणें पूर्वजां केला क्षय ॥ तो जिंकावा ॥१६॥

तुजसारिखा महाबळी ॥ उपजलासि दैत्यकुळीं ॥

आणि आह्मांसारिखे जवळी ॥ सैन्यपाळ ॥१७॥

विष्णु पळाला तुजभेणें ॥ क्षीरसागरीं केलें शयन ॥

तरी आतां मारुं इंद्रभुवन ॥ देवांसहित ॥१८॥

तें आलें बळीच्या मना ॥ मग मेळविली दैत्यसेना ॥

तयेसि नाहीं गणना ॥ अपरंपार ॥१९॥

चतुर्दश भुवनीं भूमंडळीं ॥ अतळवितळीं सुतळीं ॥

दैत्य आणाया तयेवेळीं ॥ धाडिले दूत ॥१२०॥

ऐसें जाणोनि पूर्ववैर ॥ तेथें पावले महा असुर ॥

जे प्रौढीचे थोरथोर ॥ प्रतापीये ॥२१॥

प्रल्हाद आणि ककुंदु ॥ कुंभक आणि अनार्‍हदु ॥

चतुर्मुख आणि मेघनादु ॥ रिठासुर तो ॥२२॥

सहस्त्रबाहू सुनाभ ॥ सहस्त्रजेठी आणि निकुंभ ॥

काळयवन जरासंध ॥ आणि वज्रबाहो ॥२३॥

गजोदर कुंभकर्ण ॥ शिरोध्वज शतलोचन ॥

मेनक आणि बाण ॥ मकरासुर तो ॥२४॥

सुसर्प आणि विरुपाक्ष ॥ यक्षमी आणि सुमुख ॥

बाळक आणि कांचनाक्ष ॥ धनंजय तो ॥२५॥

नमुचीसुत शंबरासुर ॥ हयग्रीव पुलोमा असुर ॥

असिलोमा चंद्रभास्कर ॥ वृत्रासुर येकचक्र तो ॥२६॥

ऐसे आले असंख्यात ॥ हें हरिवंशींचें मत ॥

तेथें मिळालें समस्त ॥ दैत्यसैन्य ॥२७॥

तें नारदा झालें श्रुत ॥ इंद्रासि ह्मणे कां पां निश्चित ॥

दैत्य आले समस्त ॥ तुजवरी गा ॥२८॥

पहा पहा मेरुपाठारीं ॥ बळिराजा सैन्यभारीं ॥

घेवों पाहती अमरपुरी ॥ हाचि बोल ॥२९॥

मग तो उठिला सुरेश्वर ॥ मेळवी देवपरिवार ॥

ब्रह्मा आणि ईश्वर ॥ वांचोनि हरी ॥१३०॥

विश्वे देव आणि समुद्र ॥ यक्ष किन्नर अकरा रुद्र ॥

मृत्यु आणि गंधर्व ॥ राजऋषी ते ॥३१॥

कुबेर वरुण पर्वत ॥ सिद्धचारण अवधूत ॥

गणादि मिळाले समस्त ॥ विद्याधर पैं ॥३२॥

अष्टदिशांचें दिक्पाळ ॥ अष्टवसु महाबळ ॥

अमित मिळालें देवदळ ॥ इंद्रापाशीं ॥३३॥

तंव दैत्य आले निकट ॥ महाबळिये सुभट ॥

नादें दुमदुमिलें त्रिकुट ॥ दोहीं दळांचेनी ॥३४॥

हा सांगतां सकल विस्तारु ॥ तरी नावरे कथाकल्पतरु ॥

परि संकलित सांगों विचारु ॥ भारता तुज ॥३५॥

परम झालें तुंबळ ॥ जाणों मिळाले अचळ ॥

तैसा झाला आदळ ॥ दोहीं दळांसी ॥३६॥

झाले धडमुंडांचे चूर ॥ सैन्य आटलें समग्र ॥

मग उठिले महावीर ॥ दोहींदळींचे ॥३७॥

तंव देवीं धाडिला काळ ॥ हातीं देवोनि त्रिशूळ ॥

तो प्रल्हादें करोनि विकळ ॥ पाडिला रणीं ॥३८॥

देवीं धाडिला असे चंद्र ॥ त्यावरी उठावला चंद्रभास्कर ॥

तेणें पळविला सीतकर ॥ संग्रामीं देखा ॥३९॥

तंव उठिला मारुत ऐका ॥ तो हयग्रीवें मोडिला देखा ॥

वायु पळविला निमिष्यें एका ॥ पुलोमा यानें ॥१४०॥

मग उठिला अश्विनीदेवो ॥ तो वृत्रें पळविला महाबाहो ॥

रणींचा भंगिला निधीरावो ॥ अनुर दैत्यें ॥४१॥

मग उठिला देववरुण ॥ तो विप्रचित्तें नेला पिटोन ॥

रणींचा पळविला कृशान ॥ दैत्यसेनें ॥४२॥

नमुचीनें मोडिला प्रवीरु ॥ केशीनें पळविला गुरु ॥

बाणें पळविला रंगभीरु ॥ शीतकरासुरें ॥४३॥

विश्वकर्मा पळवी दैत्यमाये ॥ तंव भगन्यु अधिकचि भयें ॥

तैं देखिले दैत्यरायें ॥ पळतां देव ॥४४॥

तैं विरोचन होता सांगातें ॥ हें हरिवंशींचेनि मतें ॥

परि या विपरीत कथेतें ॥ सांगणें लागे ॥४५॥

मग देव समस्त भागले ॥ महायुद्धीं श्रमें त्रासले ॥

इंद्रामागें लपोनि राहिले ॥ समस्त देव ॥४६॥

तेव्हां बोले बळिराजा ॥ इंद्रा सांभाळीं घेईं झुंजा ॥

आतां जाणवेल तुझा ॥ पराक्रम ॥४७॥

मग इंद्र आला रणभूमी ॥ तों वाचा जाहली गगनग्रामीं ॥

इंद्रा पळेंरे संग्रामीं ॥ रिघों नको ॥४८॥

तंव बोले बृहस्पती ॥ हे वाचा सत्य सुरपती ॥

बळीपुढें अमरावती ॥ न राखवे तुज ॥४९॥

हा तुज योग्य नव्हे सर्वथा ॥ संहार करील समस्तां ॥

ऐसी ऐकोनियां वार्ता ॥ पळे इंद्र ॥१५०॥

पळाले देव जीवभ्रांतीं ॥ त्यांहीं सांडिली अमरावती ॥

जेथें असती कश्यप अदिती ॥ तेथें गेले ॥५१॥

त्यांही सर्व युद्धाची वार्ता ॥ निरोपिली ब्रह्मसुता ॥

कश्यप झाला बोलता ॥ इंद्राप्रती ॥५२॥

ह्मणे आमुचा ब्रह्मा पिता ॥ तयासि भेटें गा बुद्धिमंता ॥

तो मार्ग अमरनाथा ॥ सांगेल सत्य ॥५३॥

मग निघाले ब्रह्मलोका ॥ वेगीं भेटले चतुर्मुखा ॥

सुरपतीची कर्मरेखा ॥ केली कथन ॥५४॥

तयांसि सांगे अष्टबाहो ॥ एक असे गा उपावो ॥

तुमचा तो फेडील संदेहो ॥ युद्धाविणें ॥५५॥

हातीं घेवोनि भक्तिभावो ॥ रचील एक उपावो ॥

तयावांचोनि आणिक ठावो ॥ न देखों आह्मी ॥५६॥

तो असे क्षीरसागरीं ॥ निद्रिस्थ शेषाचे अरुवारीं ॥

ज्या नाम बोलिजे दैत्यारी ॥ नारायण ॥५७॥

तयासि जाइंजे शरण ॥ सर्वभावें कीजे चिंतन ॥

तो करील कार्य जाण ॥ तुमचें पैं गा ॥५८॥

कश्यपा तूं अवधारीं ॥ सवें न्यावी अदिती सुंदरी ॥

तया सागराचे तीरीं ॥ पंचतीर्थ तें ॥५९॥

आणि सवें न्यावा सुरपती ॥ तुह्मीं करावी तपस्तुती ॥

तंव ध्वनी उपजेल अवचितीं ॥ अंतराळीं ॥१६०॥

तोचि जाणावा श्रीहरी ॥ प्रसन्न वचनें अंतराळीं ॥

बोलावें आमुच्या उदरीं ॥ यावें तुह्मीं ॥६१॥

ऐसा सांगतां विचार ॥ त्यांहीं आटोपिला क्षीरसागर ॥

तपदानाचा विचार ॥ करावयासी ॥६२॥

आतां असो हे पुढती ॥ अमरीं सोडिली अमरावती ॥

यावरी ऐका वामन उत्पत्ती ॥ ह्मणे कृष्णयाज्ञवल्की ॥६३॥

इति श्रीकथाकल्पतरु ॥ द्वितीयस्तबक मनोहरु ॥

विरोचनबळिप्रकारविस्तारु ॥ पंचमोऽध्यायीं कथियेला ॥१६४॥श्रीकृष्णार्पणमस्तु॥

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP