कथाकल्पतरू - स्तबक २ - अध्याय २

'कथा कल्पतरू' या ग्रंथात चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, तसेच रामायण, महाभारत व श्रीमद्‍भागवत हे हिंदू धर्मिय वाङमय ओवीरूपाने वर्णिलेले आहे.


श्रीगणेशाय नमः ॥

जन्मेजय राजा भारती ॥ वैशंपायन वेदमूर्ती ॥

या दोघांसी सुखसंगती ॥ घडली येकीं ॥१॥

या दोहींचा वाक्संबंधु ॥ प्रेमसुखाचा अनुवादु ॥

तो ऐका हो आनंदु ॥ हरिकथेचा ॥२॥

जैसा गगनीं सुधांशु ॥ कमळा मेळवी अंशें अंशु ॥

कीं सागरीं होय उल्हासु ॥ चंद्रोदयीं ॥३॥

जन्मेजय राजा श्रोता ॥ आणि वैशंपायन वक्ता ॥

ह्मणे राया हे कृष्णकथा ॥ तापत्रयहारिणी ॥४॥

मग राव ह्मणे ऋषेश्वरा ॥ कृष्णें सांडिली मथुरा ॥

सिंधुतीरीं कां समग्रां ॥ नेलें यादवांसी ॥५॥

येवढी सांडूनि वसुंधरा ॥ सप्तद्वीपा महापुरा ॥

ते सांडूनि सिंधुतीरा ॥ कां गेले देव ॥६॥

हें कैसें जाहलें चरित्र ॥ तें सांगाजी सविस्तर ॥

हे कथा परम पवित्र ॥ सांगा मज ॥७॥

तंव ह्मणे वैशंपायन ॥ जरासंध उदेला दारुण ॥

तया भेणें नारायण ॥ निघाला सागरीं ॥८॥

तेणें सत्रा घाले घातले ॥ दारुण युद्धातें केलें ॥

तेणें भेणें वसविलें ॥ द्वारकापुर ॥९॥

तरी ऐसें जाहलें श्रीधरा ॥ तुवां पुसिलें या चरित्रा ॥

राहणें जाहलें शार्ङगधरा ॥ ऐशियास्तव ॥१०॥

तंव तो ह्मणे भारत ॥ हा मज सांगा वृत्तांत॥

कीं कृष्णजरासंधा अनर्थ ॥ वाढला कां ॥११॥

मग ह्मणे वैशंपायन ॥ कंस उग्रसेनाचा नंदन ॥

तो मारिला महा दारुण ॥ दुराचारी ॥१२॥

कृष्ण राजा ह्मणे मामा ॥ परि श्रुत असे पुरुषोत्तमा ॥

तो मारोनि राज्यधर्मा ॥ स्थापिला उग्रसेन ॥१३॥

ऋषीस पुसे जन्मेजयो ॥ येवढा ज्ञाता कृष्णदेवो ॥

तरि मातुळा मारोनि जयो ॥ मिरवों नये ॥१४॥

मग ह्मणे मुनीश्वर ॥ हा मातुळ नोहे गा असुर ॥

दमीलदैत्याचा कुमर ॥ कंस जाण ॥१५॥

हें श्रुत असे नारदा ॥ तेणें सांगितलें गोविंदा ॥

ह्मणोनि नाहीं गा बाधा ॥ कंसवधाची ॥१६॥

कोणे एके शुभकाळीं ॥ वसंत बाणला वनस्थळीं ॥

तंव खेळावया जळकेली ॥ आला उग्रसेन ॥१७॥

इकडे घरीं त्याची वनिता ॥ आणिकही स्त्रिया बहुता ॥

क्रीडा करितां नृपनाथा ॥ क्रमिले दिवस ॥१८॥

स्त्री जाणोनि रजस्वली ॥ राव गेला खेळों व्याहाळी ॥

तंव दमील आला तयेस्थळीं ॥ सत्वरगती ॥१९॥

धरोनि उग्रसेनाचा वेष ॥ उभा ठाकला सन्मुख॥

ह्मणे देईं सुरतसुख ॥ सुंदरी मज ॥२०॥

मग ह्मणे प्राणेश्वरी ॥ मी तंव असे अनधिकारी ॥

ह्मणोनि हें कर्म असुरी॥ करुं नये कीं ॥२१॥

हें तुह्मां असे विदित ॥ सैन्य सांडोनि आलेति धांवत ॥

ह्मणोनि होय विस्मित॥ मनामाजी ॥२२॥

मग बोलिला असुर ॥ हा काहीं न करीं विचार ॥

मज उपजला विरहज्वर ॥ तवसंगाचा ॥२३॥

व्यतीपात भद्रा कुहरीं॥ अग्नि लागे जरी मंदिरीं ॥

तरी जीवन तयावरी ॥ सांडूं नये कीं ॥२४॥

ऐसी अनेकां उत्तरीं ॥ वश करोनि नानापरी ॥

मग भोगिली सुंदरी॥ दमीलदैत्यें ॥२५॥

मग सरला रतिविलास ॥ तोचि गर्भ राहिला कंस ॥

असुरें धरिला दैत्यवेष ॥ तेथोनि निघतां ॥२६॥

पाहतां ह्मणे कंसमाता ॥ मी तो सत्य पतिव्रता ॥

प्राण सांडीन रे आतां ॥ तुजवरी दैत्या ॥२७॥

तयेसि ह्मणे असुर ॥ पतिव्रता तूं निर्धार॥

कीं त्वां भोगिला भ्रतार ॥ पतिवेषेंची ॥२८॥

परि तुज लाधेल जो सुत ॥ महाकाळासि तो अजित ॥

येरी ह्मणे तववंशनिःपात ॥ करील देवो ॥२९॥

ऐसा हा दैत्यनंदन ॥ तें जाणे पूर्ण श्रीकृष्ण ॥

ह्मणोनि कंस वधोनि उग्रसेन ॥ स्थापिला भद्रीं ॥३०॥

पुढें भेटलीं मातापिता ॥ तंव आठवर्षें कृष्णनाथा ॥

मग व्रतबंध जाहला उभयतां ॥ रामकृष्णासी ॥३१॥

करावया विद्या पठण ॥ उज्जनीस आले दोघेजण ॥

तेथें सेविले गुरुचरण ॥ सांदीपनाचे ॥३२॥

दोघे जाहले विद्यार्थी ॥ तिसरा सुदामा सांगाती ॥

चौसष्ट दिवशीं वेदश्रुती ॥ जाहलीं शास्त्रें ॥३३॥

मग लागोनि गुरुचरणा ॥ विनवीतसे कृष्णराणा ॥

कांहीं मागा जी गुरुदक्षिणा ॥ गुरुपणाची ॥३४॥

तो जाणितला ऐसे चिन्हीं ॥ कृष्ण वोळखिला सांदीपनीं ॥

मग बोलिला आल्हादवचनीं ॥ कृष्णाप्रती ॥३५॥

ह्मणे सरस्वतीसागरतीरीं ॥ तेथें प्रभास पुण्यक्षेत्रीं ॥

पोंहतां नेला जळचरीं ॥ पुत्र माझा ॥३६॥

तोचि द्यावा गुरुदक्षिणा ॥ येर सर्व असे कृष्णा ॥

तिहींप्रकारिंचे ऋणा ॥ सोडवीं बापा ॥३७॥

ऐकतां निघाला कृष्णराणा ॥ सिंधूसि करी विज्ञापना ॥

ह्मणे देईंगा नंदना ॥ सांदीपनाचिया ॥३८॥

मग तयासि ह्मणे सागर ॥ पांचजन्य शंखासुर ॥

तेणें नेला ब्रह्मकुमर ॥ उदकामाजी ॥३९॥

सागरीं प्रवेशला हरी ॥ शंखा धांडोळिलें नानापरी ॥

तंव देखिला दुराचारी ॥ पांचजन्य ॥४०॥

शोधोनियां सर्व सिंधु ॥ पांचजन्याचा केला वधु ॥

उदर चिरोनि पाहे गोविंदु ॥ ब्रह्मबाळकासी ॥४१॥

परि तयासि न देखे उदरीं ॥ मग तेंचि वाद्य घेवोनि करीं ॥

शंख स्फुरोनि विचारी ॥ मनामाजी॥४२॥

तंव तया ब्रह्मबालका ॥ यमें नेलें यमलोका ॥

ऐसे जाणितलें विवेका ॥ नारायणें ॥४३॥

कृष्ण गेला यमाप्रती ॥ तंव शरण आला दक्षिणापती ॥

कर जोडोनि विनंती ॥ करीत असे ॥४४॥

यमासि बोले गोपिनाथ ॥ देईंरे सांदीपनाचा सुत ॥

येरें आणोनि त्वरित ॥ दीधला पुत्र ॥४५॥

परतोनि आला कृष्णराणा ॥ पुत्र दीधला गुरुदक्षिणा ॥

मग वंदोनि गुरुचरणा ॥ आला मथुरे ॥४६॥

इकडे कंसाचिया नारी ॥ जरासंधाच्या कुमरी ॥

दोघी गेल्या आपुले माहेरीं ॥ पितयापासीं ॥४७॥

सांगितली हरीची विवंचना ॥ राज्य दीधलें उग्रसेना ॥

कंसासि करोनि अश्रुसिंचना ॥ आलों आह्मीं ॥४८॥

तुजसारिखा असतां पिता ॥ आह्मां वैधव्य आलें ताता ॥

तरि काष्ठें खाऊं आतां ॥ तुजदेखतां ॥४९॥

मग तयांसि ह्मणे जरासंध ॥ इतुका न करावा खेद ॥

आतां तोडीन मूळकंद ॥ यादवांचा ॥५०॥

हा मारुनि मथुरादेश ॥ अंगप्रौढीं करुं उद्वस ॥

तैं कुडाविला जाणा कंस ॥ पति तुमचा ॥५१॥

मग मांडिला प्रबोधु ॥ सैन्य मेळवी जरासंधु ॥

जाणों उलथला जळसिंधु ॥ सैन्यवेषें ॥५२॥

शाल्व दमघोष जरासंध ॥ पौंड्रक वासुदेव महामद ॥

येकलव्य अंगुष्ठछेद ॥ द्रोणशिष्य तो ॥५३॥

दंतवक्र विदूरथ ॥ कलिंगरावो अद्भुत ॥

दुसरा काशीश्वर विख्यात ॥ महाबाहो ॥५४॥

आणिक पृथ्वीचे भूपाळ ॥ सैन्येंसिं आणिले सकळ ॥

तेवीस अक्षौहिणी दळ ॥ गणती त्याची ॥५५॥

तंव मथुरे आला नारदु ॥ कृष्णासि करी अनुवादु ॥

ह्मणे तुह्मांवरी जरासंधु ॥ कोपोनि आला ॥५६॥

तेणें लोक जाहले सावध ॥ तंव आला जरासंध ॥

नगर वेढोनि केला प्रबंध ॥ यादवांशीं ॥५७॥

सुटले अश्वांचे किंकाट थोर ॥ मध्यें धनुष्यांचे टणत्कार ॥

रणवाद्यांचेनि अंबर ॥ दुमदुमिलें ॥५८॥

येकमेकांसि हांकारित ॥ नगर अवघें खळबळत ॥

यादव झाले भयभीत ॥ बापुडे ते ॥५९॥

मग वर्षले शिळाशिखरीं ॥ जैसा कां गोवर्धनगिरी ॥

तैसी मांडिली महामारी ॥ मथुरेवरी ॥६०॥

रात्रीमाजी राखिलें नगर ॥ तंव पूर्वेसि फुटले रविकर ॥

मग देखिलें सैन्य समग्र ॥ श्रीकृष्णदेवें ॥६१॥

झोंबती वीर चहूंकडां ॥ अग्नि टाकिती धडाधडां ॥

गाई फोडिती हंबरडा ॥ नगरामाजी ॥६२॥

लोक ह्मणती गेली मथुरा ॥ वित्तेंसीं सांपडलों तस्करां ॥

वायां मारिलें कंसासुरा ॥ कृष्णा तुवां ॥६३॥

येक ह्मणती अज्ञान केवळ ॥ आतां होवोनि ठेलें बाळ ॥

यदूचें मारविलें कुळ ॥ कृष्णा तुवां ॥६४॥

येक ह्मणती गोकुळा ॥ येणें मारविलें महाबळां ॥

तें काय यमुनेजळा ॥ वाहावलें ॥६५॥

तंव बळदेव बोले गोविंदा ॥ लोक बोलती अपवादा ॥

तुह्मीं आवरावें जरासंधा ॥ मी मारीन सैन्य ॥६६॥

तंव शार्ङगधनुष्य भाते ॥ हल मुसळ धाडिलें सुरनाथें ॥

परि हरिवंशींचिये कथे ॥ असे गरुड ॥६७॥

सैन्यासि देवोनि नाभिकार ॥ निघाले कृष्णबळिभद्र ॥

जाणों त्रिपुरारी महारुद्र ॥ कोपला जैसा ॥६८॥

हाणीत चालिले यदुकुमर ॥ जैसे कमळांवरी कुंजर ॥

आणि कापित सुटलें चक्र ॥ तया सैन्यासी ॥६९॥

येक फुटलें बाणसर ॥ तें आंगीं जाहलें धुसार ॥

जाणों फडा काढिती विखार ॥ रणभूमीसी ॥७०॥

मग फुटला सैन्यसागर ॥ लोटले अशुद्धांचे पुर ॥

तो रणसागरींचा पोहणार ॥ कृष्णदेवो ॥७१॥

मोडला जाणोनि कटकबंध ॥ मग धांवला जरासंध ॥

तंव उठावला हलायुध ॥ तयावरी ॥७२॥

दोघे नवनागसहस्त्रबळी ॥ परि हे उपमा थोडी समेळीं ॥

दोघां मांडली हातफळी ॥ उसणघायीं ॥७३॥

कोपोनियां हालयुध ॥ मुसळें हाणिला जरासंध ॥

तंव अंबरीं जाहला शब्द ॥ नको नको गा ॥७४॥

तुमचेनि नाहीं यासि मरण ॥ वायां जाईल मुसळसंधान ॥

मग वोसरले आपण ॥ हरिवंशमतें ॥७५॥

श्रीभागवतींचा अनुवाद ॥ जीवंत धरिला जरासंध ॥

वरुणपाशीं बांधिला सुबुद्ध ॥ बळिभद्र देवें ॥७६॥

करोनि सैन्याची बोहरी ॥ जरासंधा सोडवी श्रीहरी ॥

ऐसा सत्रावेळां याचिपरी ॥ आला जरासंध ॥७७॥

बलभद्रासि ह्मणे मुरारी ॥ हा आणील पृथ्वीचे वैरी ॥

तुह्मासि देईल आखरीं ॥ सांभाळुनी ॥७८॥

एक पडिले समरंगणीं ॥ ते गेले स्वर्गभुवनीं ॥

एक पळाले जीव घेवोनी ॥ देशाप्रती ॥७९॥

मग तो गेला जरासंध ॥ मागुती घेतला कटकबंध ॥

तंव तो ऐकिला भेद ॥ यादवीं सकळीं ॥८०॥

यादवांसि ह्मणे विकद्रु ॥ आतां न धरवे धीरु ॥

जैं जाहले कृष्णबळिभद्रु ॥ तैंचिसर्व अनर्थ ॥८१॥

आजि सत्रावरुषेंवरी ॥ झाली देशाची बोहरी ॥

उद्वस झाली मथुरानगरी ॥ यांचेनि योगें ॥८२॥

हे न मारिते कंसासुरा ॥ तरी जरासंध कां मोडिता मथुरा ॥

आतां आपुला पाठिवारा ॥ करुं सकळ ॥८३॥

हे हरिवंशींची कथा ॥ श्रुत जाहलें गोपिनाथा ॥

मग विनविलें समस्तां ॥ रामकृष्णें ॥८४॥

विकद्रूसि ह्मणे बळदेवो ॥ आमुचेनि तुह्मां उपद्रवो ॥

तरि आतां सांभाळा गांवो ॥ आपुला तुह्मी ॥८५॥

मग निकट दक्षिणेच्या मोहरा ॥ आले कर्‍हाड कोल्हापुरा ॥

मार्गीं भेटले महावीरा ॥ परशुरामासी ॥८६॥

हातीं मिरवे कामधेनु ॥ खांदी परम धनुष्यबाणु ॥

वटवृक्षातळीं भार्गवनंदनु ॥ देखिला कृष्णें ॥८७॥

मग धांवोनि लागला पायीं ॥ येरें आलिंगिला दोहीं बाहीं ॥

जाणों चंद्रार्कां लवलाहीं ॥ जाहली भेटी ॥८८॥

हरि ह्मणे गा अविनाशा ॥ जरासंधें घातला वळसा ॥

ह्मणोनि आलों वनवासा ॥ तुजपाशीं ॥८९॥

मग ह्मणे भृगुनंदन ॥ तूं सहस्त्रपाणी सहस्त्रनयन ॥

हें मजसीं कां लपवोन ॥ बोलसी कृष्णा ॥९०॥

तूं सच्चिदानंदघन ॥ बाह्याभ्यंतरीं परिपूर्ण ॥

तुझें पाविजे दर्शन ॥ भक्तिभाग्यें ॥९१॥

जैसें शीतकाळीं मुरे शीत ॥ तैसें तूं ब्रह्म मूर्तिमंत ॥

सर्वांभूती अससी व्याप्त ॥ तूंचि देवा ॥९२॥

येकब्रह्मगोळ शिखरीं ॥ चोदा भुवनें तुह्मां उदरीं ॥

तरी आतां कैचे वैरी ॥ तुजसीं येर ॥९३॥

जरासंधाचेनि भेणें ॥ तुवां वनवास घेणें ॥

तरी कर्पुराचेनि बाणें ॥ धाके अग्नि कैसा ॥९४॥

तुवां केलासे अनुग्रहो ॥ आह्मां भेटीचा धरिला मोहो ॥

तुझी लीला वळखणें ठावो ॥ तूंचि जाणसी ॥९५॥

मग सारोनि नित्यनेम ॥ कामधेनु दुही परशुराम ॥

तया क्षीरामृतें कृष्णराम ॥ आरोगिते जाहले ॥९६॥

तयांसि ह्मणे मुनिरावो ॥ कर्‍हाड हा तुमचाचि ठावो ॥

येथें असे श्रृगालवासुदेवो ॥ तुमचेनि वेषें ॥९७॥

तो महादुष्ट दुराचारी ॥ चतुर्भुज जाहला कुसरी ॥

दोन सिद्धी दोन कुहरीं ॥ द्वारकेचे ॥९८॥

तयाचा तूं करीं निःपात ॥ भद्रीं बैसवीं त्याचा सुत ॥

पैल गोमाचल पर्वत ॥ तेथें रहावें तुह्मी ॥९९॥

तो उंच महापर्वत ॥ इंद्रासि परम अजित ॥

सूर्याचा अडके रथ ॥ भ्रमण करितां ॥१००॥

मग तो करावया भूमिगत ॥ ह्मणोनि आला गोपिनाथ ॥

जरासंधा भेणें वृत्तांत ॥ जाहला हा ॥१॥

संतोषोनि भृगुपती ॥ परस्परें जाहली स्तुती ॥

मग गेला सागराप्रती ॥ वैतरणीसी ॥२॥

इकडे हरि आला श्रृगालपुरीं ॥ शंख त्राहाटिला वक्रीं ॥

तंव ऐकिलें बाहेरी ॥ श्रृगालवासुदेवें ॥३॥

तेणें देखिला यदुराज ॥ ह्मणे हा कैंचा चतुर्भुज ॥

शंखचक्रगदाविराज ॥ मीचि असें ॥४॥

मग तयासि ह्मणे मुरारी ॥ वेगें सांडीं आमुची नगरी ॥

जाईं जाईं रे बाहेरी ॥ बाळकेंसीं ॥५॥

बळदेव तयासि बोलत ॥ ह्मणे त्यजीं रे आमुचे हस्त ॥

ते दीधलिया राज्य स्वस्थ ॥ भोगीं तूं ॥६॥

तंव तो ह्मणे रे गोवळा ॥ हें कां बोलतोसि बरळा ॥

मज कोप आलिया श्रृंगाळा ॥ तुज राखे कवण ॥७॥

ह्मणोनि आला समरंगणीं ॥ हरीसि विंधिला अमित बाणीं ॥

परि तो धनुर्धरशिरोमणी ॥ वारी वेगें ॥८॥

मग कृष्णें सोडिलें चक्र ॥ भुजा निवटोनि पाडिलें शिर ॥

कीं गजासि लागतां महाविखार ॥ उरे केवीं ॥९॥

तंव तयाची मुख्यराणी ॥ येवोनि लागली हरिचरणीं ॥

पति दुष्टभावाची करणी ॥ भोगिली तयेनें ॥११०॥

ह्मणोनि पुढें घातला कुमर ॥ ह्मणे हा तुमचा जी किंकर ॥

तुमचेंचि हें पूर्वील नगर ॥ परि रक्षूं आह्मीं ॥११॥

मग तो भक्तराजकृपाळु ॥ दैत्यदानवां वडवानळु ॥

तेथें स्थापितसे बाळु ॥ श्रृगाळाचा ॥१२॥

इकडे ऐकिलें जरासंधें ॥ कीं मथुरा सांडिली गोविंदें ॥

ते दक्षिणेस गेले भेदें ॥ रामकृष्ण ॥१३॥

मग त्वरें सांडिली मथुरा ॥ आले दक्षिणेच्या मोहरा ॥

तयांसि देखतां डोंगरा ॥ वेंधले देव ॥१४॥

हरुषें ह्मणे जरासंध ॥ आतां सांपडला गोविंद ॥

मग घातला कटकबंध॥ गोमाचळासी ॥१५॥

राजे घातले पर्वताभागीं ॥ तृण दारु रचिलीं वेगीं ॥

भोंवती लाविली आगी ॥ पर्वतासी ॥१६॥

जाणों उघडिला तृतीयनेत्र ॥ तेंविं प्रगटला अंगार ॥

शिळा सांडितसे डोंगर ॥ अग्निभेणें ॥१७॥

अग्निज्वाळांचेनि धाकें ॥ पशुपक्षी वानरादिकें ॥

शिरीं चढलीं अनेकें ॥ तया प्रळयीं ॥१८॥

मग आयुधें चिंती श्रीपती ॥ तंव तीं धाडी सुरपती ॥

शस्त्रें आलिया हातीं ॥ उडाले दोघे ॥१९॥

जैसा सिंधु उल्लंघी वायुपुत्र ॥ तैसा कटकीं पडला बळिभद्र ॥

जाणों लंकेमाजी वानर ॥ पेटला महामारी॥१२०॥

बापरे वीरशिरोमणी ॥ येकला वीर तेवीस क्षोणी ॥

मारीत चालिला समरंगणीं ॥ गजभारांसी ॥२१॥

भंगला देखोनि कटकबंध ॥ वेगें धांवला जरासंध ॥

जैसा भीम आणि सिंध ॥ प्रतापरुद्र ॥२२॥

राम आणि जरासंध ॥ मिळाले जाणोनि गोविंद ॥

हरावया सकळांचा खेद ॥ रचिला मंत्र ॥२३॥

पर्वत चुरिला पायांतळीं ॥ गोमंत घातला पाताळीं ॥

अग्नि ग्रासिला कल्लोळीं ॥ सागराच्या ॥२४॥

येवढें आख्यान केलें हरी ॥ तें गोवें बोलिजे सिंधुतीरीं ॥

मग चक्र घेवोनि महामारीं ॥ निघाला कृष्ण ॥२५॥

केले धडमुंडांचे निःपात ॥ येरजीवां होतसे विपरीत ॥

त्यांसि होवोनि चारी हात ॥ जाती वैकुंठीं ॥२६॥

नेतां शिणलीं विमानें ॥ एक पळाले जीवभेणें ॥

परि रामजरासंधाचें उणें ॥ मांडिलें युद्ध ॥२७॥

येकमेकां हाणिती कोडें ॥ कोपें टाकिती धोंडी झाडें ॥

मुसळ उचलिलें सहस्त्रफडें ॥ हाणावयासी ॥२८॥

तंव अंबरीं जाहला शब्द ॥ नको नको बळदेवा खेद ॥

तुझेनि हस्तें नाहीं वध ॥ जरासंधासी ॥२९॥

मग वोहोटला रणसिंधु ॥ देशा गेला जरसंधु ॥

तेथोनि आले रामगोविंदु ॥ मथुरे प्रती ॥१३०॥

तंव मुनीसि ह्मणे नृपनाथ ॥ दक्षिणेसि कां गेला अनंत ॥

गोमंत केला पाताळवंत ॥ काय कारण ॥३१॥

मग मुनि बोले वचन ॥ गोमंत गगनचुंबित वदन ॥

सूर्यासि करितां भ्रमण ॥ अडखळे रथ ॥३२॥

तें सूर्यें कथिलें इंद्रा ॥ तेणें वज्र घातलें गिरिवरा ॥

परि त्वचामात्रही नरेंद्रा ॥ न तुटे त्याची ॥३३॥

ऐसा तो गोमंताचळु ॥ तेणें इंद्र केला निर्बळु॥

ह्मणोनि आला गोपाळु ॥ दाटावयासी ॥३४॥

आतां असो हे गोमंतकथा ॥ काळयवन येईल आतां ॥

तें ऐकावें श्रोतां ॥ ह्मणे कृष्णयाज्ञवल्की ॥३५॥

इति श्रीकथाकल्पतरु ॥ द्वितीयस्तबक मनोहरु ॥

जरासंधआख्यानप्रकारु ॥ द्वितीयोऽध्यायीं कथियेला ॥१३६॥

श्रीरुक्मिणीरमणार्पणमस्तु ॥

॥ इति द्वितीयोऽध्यायः समाप्तः ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP