कथाकल्पतरू - स्तबक २ - अध्याय ३

'कथा कल्पतरू' या ग्रंथात चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, तसेच रामायण, महाभारत व श्रीमद्‍भागवत हे हिंदू धर्मिय वाङमय ओवीरूपाने वर्णिलेले आहे.


श्रीगणेशाय नमः ॥

जनमेजयो ह्मणे गा मुनी ॥ पुढें कैसी जाहली करणी ॥

तें सांगाजी बोधवचनीं ॥ मजप्रती ॥१॥

कैसा काळयवन आणिला ॥ त्यासी उपाय काय जाहला ॥

तो सांगाजी वहिला ॥ वृत्तांत मज ॥२॥

मग ह्मणे वैशंपायन ॥ राया परिस आतां वचन ॥

जरासंध देशा जाऊन ॥ काय करी ॥३॥

जाहला जाणोनि अपमान ॥ बोलाविला काळयवन ॥

मागुती आला चालोन ॥ जरासंध ॥४॥

तो यवनाचे नगरीं ॥ काळयवन राज्य करी ॥

ऋषिवरदानें महाभारीं ॥ अजिंक्य तो ॥५॥

तंव तेथें गेला नारद ॥ काळयवनासि करी अनुवाद ॥

ह्मणे पीतवस्त्राचा गोविंद ॥ जाण निरुता ॥६॥

मेघश्याम चतुर्भुज ॥ करीं कमळ गदा अंबुज ॥

कंठीं कौस्तुभ मणि विराज ॥ जाणिजे तुवां ॥७॥

तनु सुरेख सुनीळ ॥ करचरण जैसे रातोत्पल ॥

मुकुटीं नवरत्‍नांचे झळाळ ॥ हृदयीं विप्रपद ॥८॥

गळां वैजयंती माळा ॥ तुलसीमंजिरीवरी मेखळा ॥

तो जाणावा गा भूपाळा ॥ श्रीकृष्णदेवो ॥९॥

ऐसा वोळखावा लक्षणीं ॥ त्यासि युद्धकरिता नाहीं कोणी ॥

ऐसें सांगे नारदमुनी ॥ काळयवनासी ॥१०॥

तूं ऋषीचा वरदानी ॥ तुज न पुरती यादवकोणी ॥

तरी यादवांसि भिडतां रणीं ॥ भय नसे तुज ॥११॥

ऐसा करोनि अनुवाद ॥ जरासंधाजवळी गेला नारद ॥

तयाप्रति सांगे भेद ॥ सकळ त्याचा ॥१२॥

राया आलिया यवनवीर ॥ तो यादवांचा करील संहार ॥

त्यासी नचले प्रतिकार ॥ जुंझावयाचा ॥१३॥

मुनीसि ह्मणे जरासंधवीर ॥ त्यासि कोणाचा असे वर ॥

तंव बोले ब्रह्मकुमर ॥ जरासंधासी ॥१४॥

गर्गाचार्य महामुनी ॥ नित्य लोहचूर्णाचिये भक्षणीं ॥

दहासहस्त्र वर्षें अनुष्ठानीं ॥ राहिला तो ॥१५॥

त्यासि यादवीं दीधली कुमरी ॥ ते पूर्ण तारुण्यें उपवरी ॥

परि गर्ग ब्रह्मचारी ॥ न पाहे तियेसी ॥१६॥

ऐसा तो मुनी विख्यात ॥ यादवांचा असे जामात ॥

परि स्त्रियेसि नेदी एकांत ॥ तापसपणें ॥१७॥

तंव कोणे एके काळीं ॥ शालंकीं मांडिली रळी ॥

कीं हा नपुंसक सर्वकाळीं ॥ ह्मणती तया ॥१८॥

ऐसें तेणें ऐकतां कानीं ॥ मग खवळला तो मुनी ॥

निघाला होवोनि साभिमानी ॥ रुद्रसेवे ॥१९॥

नित्य सेवी लोहचूर्ण ॥ केलें द्वादशवर्षें धूम्रपान ॥

तंव रुद्र जाहला प्रसन्न ॥ ह्मणे माग काहीं ॥२०॥

मुनि ह्मणे देवा महेशा ॥ मज पुत्र दे गा ऐसा ॥

जो या यादवांचिया वंशा ॥ जिंकों शके ॥२१॥

मग रुद्र ह्मणे तथास्तु ॥ पुरेल मनींचा मनोरथु॥

ऐसें ह्मणोनि जगन्नाथु ॥ अदृश्य जाहला ॥२२॥

मुनि हर्षें झाला निर्भर ॥ गांवा येतां ऋषेश्वर ॥

यवनें केला पाहुणेर ॥ गर्गमुनीसी ॥२३॥

तयाचिया लाहोनि सन्माना ॥ हर्ष जाहला ब्राह्मणा ॥

ह्मणे इच्छित माग यवना ॥ प्रसन्न झालों ॥२४॥

मग ह्मणे यवनराजा ॥ मज नाहीं पुत्रप्रजा ॥

स्त्रिया असती वांझा ॥ आमुचे घरीं ॥२५॥

त्या यवनाची मुख्य राणी ॥ काळी नामें गुणनिधानी ॥

ती धाडिली श्रृंगारोनी ॥ ऋषीजवळी ॥२६॥

येरें मंत्रोनि अक्षरीं ॥ पुत्र रचिला तिचे उदरीं ॥

मग निघाला गर्गाचारी ॥ तेथोनियां ॥२७॥

ऐसा तो जन्मला दारुण ॥ त्या यवनरायाचा नंदन ॥

रुपें सांवळा काळयवन ॥ नाम तयाचें ॥२८॥

राया आतां तो काळयवन ॥ यादवांचें कुळदहन ॥

ऐसा नारदें सांगितला प्रश्न ॥ जरासंधासी ॥२९॥

तुज नागवती कृष्णबळिभद्र ॥ तरी आणीं यवनपुत्र ॥

तो करील निश्चयें संहार ॥ यादवांचा ॥३०॥

नीलकंठाचें वरदान ॥ आणि गर्गऋषीचा नंदन ॥

ऐसा असे तो काळयवन ॥ ब्रह्मपुत्र ॥३१॥

मग मिळोनि समस्तीं ॥ भाट पाठविला यवनाप्रती ॥

मागोनि आणिला त्वरितीं ॥ काळयवन ॥३२॥

तयासि झुंजतां रणीं ॥ काहीं नकरावी काचणी ॥

ऐसें सांगोनि नारदमुनी ॥ आला कृष्णाप्रती ॥३३॥

ह्मणे तो येतसे तुझा वैरी ॥ वेगीं सांडी मथुरानगरी ॥

ऐसें सांगोनि झडकरी ॥ गेला नारद ॥३४॥

मग कृष्ण आणि बळिभद्र ॥ यादवां सांगती विचार ॥

काळयवनासवें धीर ॥ नव्हे आह्मां ॥३५॥

हे समस्त मथुरानगरी ॥ नेवोनि घालारे डोंगरीं ॥

सकळांहीं निघावें गौभारीं ॥ बाळकेंसीं ॥३६॥

मग बोले विकुद्रु वीर ॥ कृष्णा तूं येवढा झुंजार ॥

तरि काळयवनाभेणें सागर ॥ सेवितोसि कां ॥३७॥

मग बोले कृष्णराणा ॥ मी येकला मारुं कवणा ॥

येकला सिंह तरी गजग्रामा ॥ भिवोंशके ॥३८॥

ह्मणोनि दाखवावया दृष्टांत ॥ सर्प आणवी गोपिनाथ ॥

घटीं घातला धुंधुवात ॥ महाफणी ॥३९॥

मग वस्त्रें बांधोनि त्या वेळीं ॥ धाडिला काळयवना जवळी ॥

हे वस्तु तुह्मां वनमाळीं ॥ धाडिली असे ॥४०॥

दृष्टीं पाहे यवननाथ ॥ तंव सर्प देखिला धुंधुवात ॥

मग विचारोनि मनांत ॥ रचिला मंत्र ॥४१॥

जे कृष्ण आहे सर्पवंत ॥ हा आह्मां जाणविला दृष्टांत ॥

तरी बहुतांसि काय मदोन्मत्त ॥ पुरों शके ॥४२॥

मग आणोनि पिपीलिका ॥ लक्षकोटी त्या अनेका ॥

घटीं घालोनियां मुखा ॥ बांधिलें वस्त्रें ॥४३॥

तो धाडिला मथुरेप्रती ॥ कृष्ण मुख सोडोनि पाहती ॥

तंव वेगळालिया अस्थी ॥ सर्पाचिया ॥४४॥

यादवां ह्मणे यदुनंदन ॥ मज नागवील काळयवन ॥

आतां पळाल तरी प्राण ॥ वांचेल तुमचा ॥४५॥

मी येकला न पुरें समस्तां ॥ हें आणिलें तेणें दृष्टांता ॥

हे हरिवंशींची कथा ॥ सांगितली ॥४६॥

तंव आले कृष्णाचे हेर ॥ ह्मणती आलें परचक्र ॥

पुढां येताति महाभार ॥ काळयवनाचे ॥४७॥

मग कृष्ण ह्मणे बळिभद्रा ॥ मी येकला राहीन घरा ॥

तुह्मीं यादवप्रजा समग्रा ॥ घेवोनि जावें ॥४८॥

समुद्राचिये निकट तीरीं ॥ रचिली द्वारकानगरी ॥

तेथें जावोनि समग्रीं ॥ राहावें तुह्मीं ॥४९॥

मग बोलाविला वैनत ॥ तयासि सांगे गोपिनाथ ॥

नगर रचावें क्षणांत ॥ समुद्रतीरीं ॥५०॥

तेणें आणोनि विश्वकर्मा ॥ रचिलें नगर वैकुंठउपमा ॥

कनक रत्‍नांची चित्रधामा ॥ देत वोप ॥५१॥

मग लोकां दीधला निघावा ॥ कृष्ण सांगे बळदेवा ॥

अश्वरथेंसीं यादवां ॥ न्यावें द्वारके ॥५२॥

मग ते निघाले समस्त ॥ आपुलाले घेऊनि अश्वरथ ॥

हें भागवतीचें मत ॥ बोलिलों असे ॥५३॥

परि पुराणीं विष्णूचेनि मतें ॥ कीं रात्री नेलीं निद्रिस्थें ॥

पेवें ठेवे मंडप वित्तें ॥ बाळकेंसीं ॥५४॥

मग सरलिया सुषुप्ति अवस्था ॥ गोधनें सोडिलीं पाहाटां ॥

तंव समुद्रजळाचा भोंवता ॥ देखिला वेढा ॥५५॥

परि जाहला हाहाःकार ॥ ह्मणती प्रळय मांडिला थोर ॥

कीं मथुरेवांचूनि समग्र ॥ बुडाला देश ॥५६॥

आतां हेंही विरेल डिखळ ॥ ह्मणोनि बाळकां झोंबती सकळ ॥

मग ठेवे काढोनि अचळ ॥ धरिती पोटीं ॥५७॥

तें श्रुत जाहलें बळिभद्रा ॥ तेणें नगरीं केली पुकारा ॥

जे कृष्णें आणिली मथुरा ॥ रात्रिमध्यें ॥५८॥

पाहती नगरींची खुण ॥ तंव तेचि वृक्ष तेंचि अंगण ॥

पेवें पाली द्रव्यकण ॥ तेंचि असे ॥५९॥

मग होवोनि विस्मित ॥ लोक जाहले निश्चिंत ॥

ह्मणती कृष्ण परमदैवत ॥ यादवकुळीं ॥६०॥

ऐसा तो लीलालाघवी ॥ येका निजवी येका जागवी ॥

हें सांगितलें स्वभावीं ॥ कथेसारिखें ॥६१॥

तो असे सहजसमर्थ ॥ येकला येक अनंत ॥

हे स्तुति करितां ग्रंथ ॥ नपुरे मज ॥६२॥

द्वारके पाठविला संकर्षण ॥ आपण येकला श्रीकृष्ण ॥

तंव आला काळयवन ॥ मथुरेवरी ॥६३॥

कृष्ण देखिला नगरद्वारीं ॥ मेघवर्ण पीतांबरधारी ॥

ह्मणे हाचि निश्चयें श्रीहरी ॥ नारदखुणें ॥६४॥

जरी यासि करुं तुंबळ ॥ तरी सवें नाहीं दळ ॥

रथेंसीं झुंजों तरी भूपाळ ॥ हांसती मज ॥६५॥

हा असे चरणचाली ॥ मग आपण उतरे रथाखालीं ॥

ह्मणे जरासंध बांधला कालीं ॥ तोचि हरी हा ॥६६॥

आणि मारिला कंसासुर ॥ तूं तंव दैत्यवनाचा कुठार ॥

तरी आतां करीन संहार ॥ तुझिया कुळाचा ॥६७॥

कृष्णाहातीं न देखे शस्त्र ॥ आपणही ठेवी धनुष्यशर ॥

मग धांविन्नला शीघ्र ॥ धरावयासी ॥६८॥

मागुल्या पाउलीं कृष्णनाथ ॥ लीलेनें निघाला चालत ॥

तंव धांवला गर्गसुत ॥ हरिमागें ॥६९॥

हातावितीचें अंतर ॥ काहीं धांवे काहीं स्थिर ॥

कृष्णासि घालूं पाहे कर ॥ काळयवन ॥७०॥

आतां धरीन ह्मणे हरी ॥ ऐसा नेला गिरिकंदरीं ॥

तंव सैन्य अंतरलें दूरी ॥ काळयवनाचें ॥७१॥

गणगंधर्व ब्रह्मचारी ॥ योगी धरिती नानापरी ॥

परि जवळी असतांहि शरीरीं ॥ दूर तयां जो ॥७२॥

तो एका दूरी एका जवळी ॥ दुरावितां नाहीं वेगळी ॥

आतां असो हे दिव्य बोली ॥ परमार्थाची ॥७३॥

पूर्वभक्तीचा पुढार ॥ तें जाणोनि गेला शारंगधर ॥

जेथें निद्रिस्थ असे अंगार ॥ मुचुकुंद पैं ॥७४॥

तो मांधातयाचा सुत ॥ सूर्यवंशींचा नृपनाथ ॥

मुचुकुंदनामें विख्यात ॥ अठ्ठावीस युगें ॥७५॥

तो जाणोनि पूर्ण भक्त ॥ पूर्वबोल करावया सत्य ॥

ह्मणोनि आला अनंत ॥ तया स्थाना ॥७६॥

आणि वधावा काळयवन ॥ युद्धाविणें घ्यावा प्राण ॥

ह्मणोनि आला श्रीकृष्ण ॥ तया स्थानीं ॥७७॥

मग आपुला कटिबंध ॥ तेणें झांकिला मुचुकुंद ॥

पीतांबर टाकोनि गोविंद ॥ अदृश्य जाहला ॥७८॥

मागां येतसे काळयवन ॥ जैसा पतंग दीप देखोन ॥

कीं नदी जाय धांवोन ॥ सागराप्रती ॥७९॥

येवोनियां काळयवन ॥ मुचुकुंदासि ह्मणे हाचि श्रीकृष्ण ॥

ह्मणोनि हाणितला चरण ॥ हृदयावरी ॥८०॥

जैसा पेटारींचा फुंकिला फणी ॥ कीं कुंडीं चेतविला अग्नी ॥

अथवा नेत्र उघडी शूळपाणी ॥ मदनावरी ॥८१॥

जंव उघडिला नेत्रबुबुळ ॥ तंव निघाला अग्निकल्लोळ ॥

काळयवनाचें तात्काळ ॥ झालें भस्म ॥८२॥

मग भोंवतें पाहे मुचुकुंद ॥ ह्मणे मज कोणें केलें सावध ॥

जीवीं होतसे आनंद ॥ कवणेगुणें ॥८३॥

कोटि सूर्यांचें महातेज ॥ प्रभा फांकली असे चोज ॥

आणि हा पीतांबर मज ॥ दीधला कवणें ॥८४॥

जंव करी दृष्टिन्याहाळा ॥ तंव देखिलें नंदगोपाळा ॥

चतुर्भुज ब्रह्मगोळा ॥ विरुढला जो ॥८५॥

शंख चक्र गदा कमळ ॥ कंठीं कौस्तुभ वैजयंती माळ ॥

मेघश्याम वरी झळाळ ॥ पीतांबराचा ॥८६॥

चरणीं ब्रीदाचा तोडर ॥ प्रथम वयसा निमासुर ॥

कर्णीं कुंडलें मकराकार ॥ माथां दिव्यमुकुट ॥८७॥

ह्मणे काय देखतसें स्वप्न ॥ तंव झालें मागील ज्ञान ॥

मग घातलें लोटांगण ॥ गोविंदचरणीं ॥८८॥

प्रेमें केला जयजयकार ॥ ह्मणे आज मी जाहलों पवित्र ॥

मज द्यावजी नाभिकार ॥ देववाणीचा ॥८९॥

मग बोलिला श्रीअनंत ॥ तुझा पूर्ण होईल मनोरथ ॥

कैवल्य पावसील ह्मणोनि हात ॥ ठेविला मस्तकीं ॥९०॥

आतां जाईं स्वस्थानाप्रती ॥ देहाची करीं निवृत्ती ॥

मग पावसि स्वयंज्योती ॥ सत्य जाण ॥९१॥

ऐसा देवोनियां वर ॥ केला दुष्टाचा संहार ॥

तेथोनि गेला शारंगधर ॥ द्वारकेसी ॥९२॥

मग ह्मणे जन्मेजयो ॥ येक असे जी संदेहो ॥

मुचुकुंदासि कृष्णदेवो ॥ भेटला कवणेगुणें ॥९३॥

कैसा मागील पुढार ॥ कवणाचा असे जी वर ॥

अठ्ठावीस युगें नृपवर ॥ निद्रिस्थ कां ॥९४॥

तंव ह्मणे वैशंपायन ॥ सूर्यवंशमुकुटरत्‍न ॥

इक्ष्वाकुरायाचा नंदन ॥ मांधाता जो ॥९५॥

त्या मांधातयाचा सुत ॥ मुचुकुंद नामें विख्यात ॥

तो राज्य करी नृपनाथ ॥ अयोध्येचें ॥९६॥

तंव उठला दैत्य तारक ॥ तयासि प्रसन्न चतुर्मुख ॥

मग पळविला त्रिलोक ॥ तेणें असुरें ॥९७॥

संवत्सर साठीसहस्त्र ॥ झुंजले देव आणि असुर ॥

परि देव पळाले समग्र ॥ दैत्यभेणें ॥९८॥

ते सांगावी सविस्तर कथा ॥ तरि ग्रंथ न पुरे लिहितां ॥

दृष्टांत देइजे समस्ता ॥ तारकासुराचा ॥९९॥

देवीं सांडिली अमरावती ॥ तों नारदें सांगितलें त्यांप्रती ॥

कीं भूमंडळींचा नृपती ॥ मुचुकुंद नामा ॥१००॥

त्याचे पुण्यासि नाहीं पार ॥ तपव्रतांचा कनकाचळ ॥

आणि समरंगणीं धनुर्धर ॥ नाहीं दुजा ॥१॥

तो कासेभाषेचा निर्मळ ॥ आचारनिष्ठ धर्मशीळ ॥

पराक्रमें रक्षील भूपाळ ॥ अमरावती हे ॥२॥

मग तो घालोनि विमानीं ॥ मुचुकुंद आणिला वज्रपाणीं ॥

तया निरविली राजधानी ॥ अमरावती ते ॥३॥

तो धनुर्धरशिरोमणी ॥ तारकासि झुंजे समरंगणीं ॥

दोन युगेंवरी नयनीं ॥ नाहीं निद्रा ॥४॥

तो घेऊं पाहे अमरावती ॥ तयासि बाणीं पिटी नृपती ॥

जैसे ज्ञानियापुढें दुर्मती ॥ राहों न शकती ॥५॥

पुढें जन्मला रुद्रकुमर ॥ जो बोलिजे षड्‌वक्र ॥

मग तेणें वधिला असुर ॥ तारकासुर तो ॥६॥

मुचुकुंदासि विनवी शचीनाथ ॥ राया तूं श्रमलासि बहुत ॥

तरि मागावें गा उचित ॥ प्रसन्न झालों ॥७॥

येरु ह्मणे द्यावें कैवल्यदान ॥ येर तवप्रसादें असे संपूर्ण ॥

तंव देव ह्मणती हें वचन ॥ बोलिलासि वायां ॥८॥

त्याचा ब्रह्मादिकां नकळे पार ॥ तेथें आह्मी कायसे सुरवर ॥

परि तुवां कष्ट केले अपार ॥ तरी ऐक गा ॥९॥

महाविष्णूचेनि दर्शनें ॥ तें तूं पावसी आणिके गुणें ॥

तरि द्वापारीं भेटलिया खुणें ॥ हरि वोळखावा ॥११०॥

चतुर्भुज वैजयंती ॥ कंठीं कौस्तुभ महा दीप्ती ॥

श्रीवत्सलांछन अंगकांती ॥ मेघवर्ण ॥११॥

शंख पद्म गदा चक्र ॥ जया परिधान पीतांबर ॥

हें सांगितलें समग्र ॥ खुणें तयासी ॥१२॥

मग ह्मणे नृपनाथ ॥ स्वलोक तरी निमाला समस्त ॥

आतां काय जाऊं तेथ ॥ अयोध्येसी ॥१३॥

मी शिणलों असें झुंजारीं ॥ जागिन्नलों दिवसरात्रीं ॥

तरी निद्रा द्यावी जी शरीरीं ॥ अनंत वर्षें ॥१४॥

मग ह्मणती देव समस्त ॥ तुज करील जो जागृत ॥

तो होईल भस्मभूत ॥ सत्य जाण ॥१५॥

मुचुकुंद आला मृत्युभुवना ॥ अठ्ठावीस युगें केलें शयना ॥

इतुक्यांत भेटला यादवसणा ॥ निद्रांतीं तया ॥१६॥

ऐसा सांगितला वृत्तांत ॥ तंव आणिक पुसे भारत ॥

कैसा जन्मला रुद्रसुत ॥ षण्मुख तो ॥१७॥

मग तयासि ह्मणे मुनी ॥ रुद्रें पर्णिली भवानी ॥

परि दोघां असे विघडणी ॥ तपःश्रियेची ॥१८॥

ऐसें जाणोनि विपरीत ॥ देव ह्मणती समस्त ॥

रुद्रसुतावांचोनि जैत ॥ नये आह्मां ॥१९॥

देवीं विचारोनि सकळीं ॥ अग्नि पाठविला शिवाजवळी ॥

कीं कामें चेतवोनि चंद्रमौळी ॥ भेटवीं उमा ॥१२०॥

मग तो आला कृशान ॥ तंव ध्यानस्थ पंचानन ॥

रुप आला पालटोन ॥ मयूराचें ॥२१॥

तेणें मांडिलें तांडवनृत्य ॥ पिसें वाजवी स्वर सप्त ॥

तेणें नादें झाला जागृत ॥ महादेवो ॥२२॥

दृष्टीं पाहे पशुपती ॥ तंव मयूर नाचतसे गीतीं ॥

तेणें उपजली कामप्रीती ॥ विरहानळें ॥२३॥

मग नृत्याचे समरसीं ॥ संतोष जाहला मानसीं ॥

तेणें वोलंडला तापसी ॥ अमोघ वीर्य ॥२४॥

तें वीर्य लोटलें वसुंधरे ॥ परि काहीं प्राशिलें मयूरें ॥

जठर भरोनि वक्त्रें ॥ सांडिलें काहीं ॥२५॥

तेथें आली शैलनंदिनी ॥ ह्मणे भली गे तूं मेदिनी ॥

या बीजाची असें धनी ॥ मीचि येकी ॥२६॥

ऐसी तूं वो लंपट क्षिती ॥ मग शाप बोलिली पार्वती ॥

कीं तुज भोगितील भूपती ॥ असंख्यात ॥२७॥

मग बोले वसुंधरा ॥ म्यां प्रार्थिलें नाहीं रुद्रा ॥

मज सर्वांचिया आधारा ॥ रचिलें देवें ॥२८॥

मज नाहीं शत्रुमित्र ॥ चंदन हो कां अंगार ॥

अमृत आणि विखार ॥ समान मज ॥२९॥

मज त्वां शापिलें अकारण ॥ आतां घेईं प्रतिवचन ॥

तुझ्या उदरीं प्रजादान ॥ नव्हे रुद्राचें ॥१३०॥

जें कां मयूराचें वमन ॥ तें जाहलें शुद्ध कांचन ॥

दुजें वमनाचें आन ॥ तें जाहलें रुपें ॥३१॥

ऐशा झालिया सप्त धातु ॥ हे रामायणींची मातु ॥

पद्मपुराणींचा वृत्तांतु ॥ अनारिसा हा ॥३२॥

तेथें ब्राह्मणाचेनि वेषें ॥ अग्नि आला असे भिक्षे ॥

तो अतीत जाऊं नये विन्मुखें ॥ जाणितलें उमेनें ॥३३॥

मग रुद्रवीर्य होतें पात्रीं ॥ ते तयासि घातली माधोकरी ॥

तें अमृत ह्मणोनि उदरीं ॥ घालीत अग्नी ॥३४॥

तेणें वाढलें त्याचें उदर ॥ रुद्रबीज महा थोर ॥

तेणें कृश जाहलें शरीर ॥ अग्निपुरुषाचें ॥३५॥

तंव सप्तऋषींच्या युवती ॥ वांचोनियां अरुंधती ॥

साही आल्या गंगेप्रती ॥ स्नानालागीं ॥३६॥

त्या माघमासीं ऋतुमंता ॥ आंगीं झालिया सुस्नाता ॥

सीर्ते तयांसि पावे व्यथा ॥ तैं आलिंगिला अग्नी ॥३७॥

वीर्य संचरलें इंद्रियद्वारीं ॥ तोचि गर्भ राहिला सुंदरी ॥

दृष्टीं पाहती तंव उदरीं ॥ अनारिसें दिसे ॥३८॥

कीं आह्मां देखती प्राणेश्वर ॥ तैं कोपतील साचार ॥

ह्मणोनि उदरें चिरोनि समग्र ॥ सांडिती गर्भां ॥३९॥

आणिक असे पुराणांतरीं ॥ कीं गर्भ सांडिला रोमरंध्रीं ॥

जान्हवीच्या पुण्यतीरीं ॥ कुशांमाजी ॥१४०॥

मग त्या गर्भांचिया अंबिका ॥ तप साधनें गेल्या परलोका ॥

त्या गगनीं जाहल्या कृत्तिका ॥ साही जणी ॥४१॥

तीं आंगें एकवटलीं समग्रें ॥ एक पिंड सहा वक्त्रें ॥

तंव देखिलें शब्दमात्रें ॥ नारददेवें ॥४२॥

तेणें तो रुद्रबालक ॥ उमेसि दाखविला तारकांतक ॥

ह्मणे स्तनीं लावोनि कार्तिक ॥ वाढवीं दुर्गें ॥४३॥

ऐसा जन्मला रुद्रसुत ॥ जो दैत्यकुळासि धूमकेत ॥

मग येवोनि सुरनाथ ॥ नेला षण्मुख तो ॥४४॥

तेव्हां मांडलें युद्ध घोर ॥ जाणों मिळाले मेरुमांदार ॥

तैं मांडला असे पुढार ॥ देवदैत्यांचा ॥४५॥

आतां असो हा विस्तारु ॥ सांगतां न सरे वीरु ॥

पुढें असे कथाकल्पतरु ॥ बोलणें ग्रंथ ॥४६॥

जैसे गरुडाचे पक्षवातीं ॥ सर्पांचे पाय पोटीं जाती ॥

तैसी दैत्यासि केली भ्रांती ॥ षडाननें ॥४७॥

यापरि जन्मला रुद्रसुत ॥ सुखी जाहला सुरनाथ ॥

पुढें पुसेल भारत ॥ आणिक कांहीं ॥४८॥

वधिला तो तारकासुर ॥ पुष्पें वर्षला सुरेश्वर ॥

देवीं केला जयजयकार ॥ षडाननासी ॥४९॥

आतां ऐका पुण्यावन ॥ द्वारावतीचें आख्यान ॥

तें मुक्तीचें मूलस्थान ॥ ह्मणे कृष्णयाज्ञवल्की ॥१५०॥

इति श्रीकथाकल्पतरु ॥ द्वितीयस्तबक मनोहरु ॥

षडाननजन्मप्रकारु ॥ तृतीयो‍ऽध्यायीं कथियेला ॥१५१॥

श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP