मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्री गणेश प्रताप|
क्रीडाखंड अध्याय २

श्री गणेश प्रताप - क्रीडाखंड अध्याय २

सर्व कीर्तीने युक्त, सर्व देवाधिदेवांमध्ये श्रेष्ठ अशा अत्यंत प्रिय असलेल्या श्रीगजाननाच्या स्तुतीपर हा ग्रंथ आहे.


श्रीगणेशाय नमः । श्रीसरस्वत्यै नमः । श्रीगुरुभ्यो नमः । श्रीक्षेत्रपालाय नमः ।

जयजय निजभक्तानंदवर्धना । शरणागतजनार्तिविच्छेदना । अगम्या रे गजानना । कश्यपनंदना महोत्कटा ॥१॥

लीलावतार धरोनिया । निजभक्त रक्षिसी देवराया । यदर्थ मी शरण त्वत्पाया । लावी काया सार्थकी ही ॥२॥

श्रोते आता अवधारा । गणेशकथा श्रवण करा । तेणे पावाल पैलपारा । येरझारा चुकतील पै ॥३॥

कश्यपगृही आदिपुरुष । अवतरता आनंद विशेष । वर्णिता पुरेना शेष । सहस्त्रमुखे करोनिया ॥४॥

वसिष्ठ वामदेवादि मुनी । कश्यपासि पुत्र जाहला हे ऐकुनी । येते जाहले धावूनी । अदितीभुवनी तेधवा ॥५॥

ऋषिगण येता ऐकून । सामोरा धावे धातृनंदन । ब्राह्मणाते वंदन करून । आसन त्यांसि निवेदी ॥६॥

कश्यप म्हणे धन्यधन्य । अवलोकिता हे विश्वमान्य । मग फळेमूळे देऊनि वन्य । पुष्पमाळा समर्पिल्या ॥७॥

पुसोनिया कुशलार्थ । आगमन जाहले किमर्थ । माझे पुरले सकलअर्थ । कृतकृत्यार्थ स्वाश्रमी ॥८॥

ऐकोनि त्याची विनयवाणी । ऋषि संतोषले अंतःकरणी । तुझे पुत्रसोहळ्याची शिराणी । अवलोकनार्थ पातलो ॥९॥

अदिती-बालकासि घेऊन । प्रीतीने करवी स्तनपान । आवडीने करी मुखचुंबन । अंकी घेऊन डोलवीतसे ॥१०॥

त्रैलोक्यसुंदर मनमोहन । बालकाते अवलोकुन । वसिष्ठ म्हणे अदितीलागुन । दैवे निधान पावलीस ॥११॥

परमात्मा हा अनंत । स्वये जाहला तुझा सुत । भूभार हरण करील निश्चित । साधुभक्ता पाळील पै ॥१२॥

करील दुष्टांचा संव्हार । उतरील अवनीचा भार । करूनि लीला अपार । करील उद्धार भक्तांचा ॥१३॥

द्वात्रिशल्लक्षणोपेत । यासि उत्पात होती बहुत । ते स्वपराक्रमे करील शांत । पुरवील हेत देवांचे ॥१४॥

करिता मातेचे स्तनपान । कथिले निज भविष्य ऐकुन । बालक हास्यवदन करून । ऋषीस अवलोकन करी तेव्हा ॥१५॥

मग करूनि बालकाचा स्तव । प्रदक्षिणा करी भूदेव । म्हणती दू देवाधिदेव । भूभार सर्व हरी आता ॥१६॥

करूनिया नमस्कार । जाते जाहले ऋषिवर । कश्यप पावला प्रमोद अपार । प्रालब्ध थोर म्हणे माझे ॥१७॥

झणी दृष्ट लागेल याशी । लिंबलोण उतरोन बाळाशी । तीट लावोन ह्रदयाशी । धरी सुताशी प्रेमभरे ॥१८॥

न्हाणोनिया पायांवरी । कुरळजावळ सर्सावी करी । पाळणा घालोनिया सुंदरी । धरोनिया दोरी हालवीतसे ॥१९॥

बालकछंदे करी रुदन । अदिती निजवी धापटून । पूर्णब्रह्म सनातन । न कळे महिमान तयाचे ॥२०॥

जो विश्वाच्या करी पाळणा । त्याचे शयनार्थ योजिला पालणा । रुदन ऐकूनि मातेसि करुणा । येउनी क्षणक्षणा हालवी ॥२१॥

जो विश्वाचे करी भरण । मातृस्तंन्ये त्यासि पोषण । निजभक्तांची आवडी पूर्ण । जगद्भूषण करीतसे ॥२२॥

प्राप्त सप्तममास बाळकाला । उजवे कुशीत कलथला । थोर आनंद देवमातेला । उत्साह केला बहुत तिणे ॥२३॥

बालकाचे अभ्युदयार्थ । ब्राह्मणासि दीधला बहुत अर्थ । कश्यप विप्रा भोजन देत । आशीर्वाद देती विप्र तेव्हा ॥२४॥

रांगो लागला अष्टमासी । संतोष वाटे अदितीसी । धुळी माखता अंगासी । माता वस्त्रेसी पुसतसे ॥२५॥

आणोनि सोडी मध्य घरात । पुन्हा चपळ रांगत । महोत्कट जाय अंगणात । मग खेळत धुळीमाजी ॥२६॥

धुळी उचलोनिया जावळात । घालोनि गदगदा हासत । माया येऊनिया त्वरित । उचलोनि घेत कडेवरी ॥२७॥

पल्लवे पुसोनि मुखकमळ । करे सर्सावी जावळ । न्हाणोनिया त्याचे कुरळ । पुन्हा वेल्हाळ स्वच्छ करी ॥२८॥

मग आडवा घेऊनि अंकी । प्रेमे स्तन घाली मुखी । सुंदर आनन अवलोकी । तेणे सुखी नेत्र तिचे ॥२९॥

अदिती म्हणे कश्यपाशी । जाणे असे गृहधंद्याशी । कोण खेळवील आता याशी । राजसाशी कौतुके ॥३०॥

एके दिवसी कश्यप जाया । महोत्कटाशी न्हाणोनिया । अंगणी करोनि शीतळ छाया । घाली मायातल्पक येथे ॥३१॥

चिमणे पलंगी मृद्वास्तरण । त्यावरी निजवी विश्वभूषण । वरी घालोनिया पांघुरण । जननी गेली गृहकार्या ॥३२॥

ऋषि गुंतला स्वकार्याशी । माता गेली गृहकृत्याशी । विरजानामे राक्षसी । फिरता बाळासि देखिले तिणे ॥३३॥

उचलोनिया अदितीसुत । तिणे टाकिला मुखात । गिळोनि गेली अकस्मात । पक्वजंबू फळापरी ॥३४॥

भक्षोनिया बाळकाशी । आकाशपंथे गेली राक्षसी । तृषा लागली बहुत तिशी । म्हणोनि भूमीशी उतरली ॥३५॥

यथेष्ट करिता अंबूप्राशन । कुक्षीत शूल दारुण । उठोनिया पंचप्राण । कासावीस जाहले ॥३६॥

गडबडा भूमीवरी लोळे । मग वटारोनिया डोळे । प्राण सोडिला तयेवेळे । पडले प्रेत नदीतीरी ॥३७॥

बाळक तिचे फोडोनि उदर । येऊनि क्रीडे वक्षस्थळावर । येरीकडे जो विचार । काय जाहला तो ऐका ॥३८॥

गृहकृत्य सारोनिया सुंदरी । येऊनि पाहे जो बाहेरी । पुत्र न दिसे पलंगावरी । म्हणोनि घाबरी जाहली ॥३९॥

जाऊनि पुसे शेजारिणीशी । कोणी आणिले की माझे बाळाशी । ती म्हणे रिक्तपलंगाशी । मी मघांशी पाहिले ॥४०॥

घरोघरी शोध करित । परी न सापडे तेव्हा सुत । कपाळ पिटोनि रुदन करित । हाक फोडित अट्टहास्ये ॥४१॥

आता होते बाळ तान्हे । कोणी नेले गे पापिष्ठाने । किंवा भक्षिले निशाचराने । की पाखराने झडपिले ॥४२॥

पान्हा दाटला गे स्तनाशी । आता पाजू हा कवणाशी । कोणी दावा गे तान्हयाशी । आणा राजसाशी शोधोनिया ॥४३॥

कष्टे पावले निधान । चोरोनि नेले तस्करान । उणे पाहिले दैवान । दैवाने नाही रक्षिले ॥४४॥

कैसी क्षोभली गे कुलदेवता । रक्षिले नाही तिणे सुता । मूर्छित पडली कश्यपकांता । भोवती वनिता मिळाल्या ॥४५॥

जन शोधिती घरोघरी । मग निघाले ग्रामाबाहेरी । शोधीत पातले नदीतीरी । तव निशाचरी पडली असे ॥४६॥

अर्धयोजने विस्तीर्ण । तिचे प्रेत पडले दारुण । जन पाहोनि पळती जाण । धीट पाहती दुरोनिया ॥४७॥

तव तिचे कुचप्रदेसी । क्रीडता देखिले बाळकाशी । मृत पडली ती राक्षसी । हे लोकानी पाहिले ॥४८॥

अदिती तेथे करी रुदन । आणि मिळाले नागरिकजन । धीट ते पुढे सर्साऊन । कश्यप नंदना उचलिती ॥४९॥

आणोनि दीधला मातेपाशी । तिणे ह्रदयी कवळिले त्याशी । म्हणे दैवे वाचलाशी । म्हणऊनि भेटलासी तान्हया ॥५०॥

प्रेमे करी मुखचुंबन । मंदिरी आली मग घेऊन । तव पातला ब्रह्मनंदन । संध्यास्नान करोनिया ॥५१॥

अदिती म्हणे प्राणेश्वरा । राक्षसीने नेले कुमरा । दैवे वाचले ऐशा उत्तरा । ऐकोनि ऋषि आश्चर्य करी ॥५२॥

मुनी म्हणे विनायके । यासि रक्षिले दैवकौतुके । म्हणोनि धावोनिया हरिखे । उचलोनि घेतला पित्याने ॥५३॥

कश्यप म्हणे वो सुंदरी । यासि विसंबू नको क्षणभरी । सदा खेळवी ह्रदयमंदिरी । अरिष्टे भारी यासि येत ॥५४॥

ऋषीनी जे भविष्य कथिले । ते प्रत्ययासि आज आले । गणेशे याशि सखे रक्षिले । अरिष्ट टळले घोरतर ॥५५॥

स्वस्तिवाचनपूर्वक शांती । करोनि अर्चिला गणपती । मग उभयता तयासि जपती । जाऊ न देती बाहेर कदा ॥५६॥

अदिती प्रेमे पुत्रलालन । करिता गुंतले विनायकी मन । नावडे त्या वाचोनि आन । विषयी मन न शिरे तिचे ॥५७॥

आसनी शयनी तयाते । माता न विसंबे विनायकाते । काय वर्णावे तिचे भाग्याते । परमात्म्याते सेवीतसे ॥५८॥

एके दिवसी अदिती सुंदरी । निजपुत्राते घेऊनि कडेवरी । स्नेहभावे लालन करी । मुखचुंबी कौतुकाने ॥५९॥

तव धुंधुर आणि उद्धत । दोघे असुर अत्यद्भुत । विनायकाचा करावया घात । कपट बहुत करिती ते ॥६०॥

घेऊनिया शुकाचा वेष । त्याही लक्षिला परमपुरुष । पाखरे पाहाता महोत्कट तोष । पावोन मातेस म्हणतसे ॥६१॥

माते पाहे हे पोपट । काय वर्णावे यांचे घाट । पक्ष चित्रविचित्र सुभट । मज चोखट दिसती गे ॥६२॥

हे राघू मजला दे खेळावया । म्हणोनि करी रुदन त्यासि माया । म्हणे रडू नको बा तान्हया । धरोन पाया आण त्यांस ॥६३॥

त्यांचे जाणोनिया महाकपट । कडेखाली उतरे महोत्कट । झेप घालोनिया बळकट । ग्रीवा त्यांची धरीतसे ॥६४॥

मान आवळिता विनायके । प्राण सोडिले त्याणी निके । मुक्त होवोनि परमहरिखे । त्याचे पदी पावले ते ॥६५॥

जेव्हा पोपटानी प्राण सोडिले । तेव्हा राक्षस मृत पडले । असंभाव्य ते पाहाता लोक भ्याले । पळू लागले दशदिशा ॥६६॥

अदिते धाके आक्रंदत । उचलोनि सुताशी पळवित । नेत्री गळती अश्रुपात । म्हणे अनर्थ चुकला गे ॥६७॥

आता राघू दिसत होते । इतक्यात राक्षसांची पडली प्रेते । ईश्वरे रक्षिले तान्हयाते । या असुराते संहारुनी ॥६८॥

मिळोनिया भूदेवगण । करिती त्या राक्षसांचे खंडण । दूर टाकिती तेव्हा नेऊन । स्नाने करूनि येती घरा ॥६८॥

कश्यपे केली अरिष्टशांती । मुद ओवाळून टाकी अदिती । निजचरणाची काढोन माती । भाळाप्रति लावी त्याचे ॥७०॥

तीन वर्षे सरोन गेली । वेदाब्दाची दशा लागली । मग लीला प्रभूने केली । ती ऐके वहिली सोमकांता ॥७१॥

सोमवती आणि व्यतीपात । पर्वणी पातली पुण्यवंत । अदिती स्नानालागी निघत । शिष्यसुत समवेत पै ॥७२॥

कासारी जावोनि कश्यप गोरटी । महोत्कटाते ठेवी तटी । आपण जळात स्नानासाठी । शिरती जाहली तेधवा ॥७३॥

तळ्याचे काठी क्रीडे विश्वपती । जळी स्नान करी अदिती सती । भविष्य जाणोनिया जगत्पती । काय करिता जाहला ॥७४॥

कासारी तो पडला जगत्पती । घाबरी धरू पाहे त्यास अदिती । तव सुसरे त्याचे चरणाप्रती । धरोनि बाळ नेले जळी ॥७५॥

पुत्र जळी बुडाला पाहुन । शोके अदिती जळी जाहली म्लान । बुडू लागली हे शिष्यी अवलोकुन । बाहेर ओढून काढिती तीते ॥७६॥

अदितीस बाहेर काढिले । मगराने बाळ जळी नेले । महोत्कटाने सामर्थ्य प्रगटिले । ओढोन आणिले सुसराशी ॥७७॥

जळाबाहेर काढोनि मगर । आपटिता जाहला तेव्हा चूर । त्यातून एक तेजस्वी पुरुषवर । उत्पन्न जाहला तेधवा ॥७८॥

जोडोनिया दोन्ही कर । महोत्कटासि घाली नमस्कार । त्यासि विचारी कश्यपकुमर । कोण तुम्ही देवांपरी ॥७९॥

येरू म्हणे पुरुषोत्तमा । चित्ररथ जाणे माझे नामा । शाप पावोन मंगलधामा । सुसर जाहलो जळामध्ये ॥८०॥

तयासि पुसे विश्वकारण । शाप होण्याचे काय कारण । गंधर्व म्हणे ऐक सावधान । माझे गहनकर्म देवा ॥८१॥

माझे घरी विवाहसंभ्रम । होता म्हणोनि विप्रोत्तम । भृगू पातता मी अधम । नाही पूजिले तयाते ॥८२॥

तेणे ब्राह्मण परम क्षोभला । तत्काळ माते शापिता जाहला । मग मी धरिता त्याचे चरणाला । मग बोलिला उश्शाप तो ॥८३॥

अदितीगृही सनातन । होईल कश्यपाचा नंदन । तो करील तुझे शापमोचन । सत्य वचन माझे हे ॥८४॥

ते आज प्रत्ययास आले । परब्रह्म मी अवलोकिले । तेणे माझे सार्थक जाहले । मन निवाले अवलोकिता ॥८५॥

मग करोनि महोत्कटाशि नमन । ह्रदयी करोनि त्याचे ध्यान । गंधर्व पावला निजस्थान । माय उचलोन पुत्रास घे ॥८६॥

सपुत्र शिष्यासहित । अदिती तेव्हा घरी येत । सप्रेम पतीते सांगे मात । दैवे सुत वाचला हो ॥८७॥

मुनि म्हणे जिवलगे ऐक । कोठे विसंबू नको विनायक । हा चपळ गे बारी बाळक । विश्वव्यापक जगदात्मा ॥८८॥

जयजयाजी विश्वरक्षका । अदितीकुमरा विरजांतका । अप्रमेया भक्तपालका । विश्वनायका परात्परा ॥८९॥

स्वस्तिश्रीगणेशप्रतापग्रंथ । श्रीगणेशपुराणसंमत । क्रीडाखंड रसभरित । द्वितीयोध्याय गोड हा ॥९०॥

अध्याय ॥२॥ श्रीगजाननार्पणमस्तु ॥ शुभंभवतु ॥

अध्याय दुसरा समाप्त

N/A

References : N/A
Last Updated : September 22, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP