मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्री गणेश प्रताप|
क्रीडाखंड अध्याय ३१

श्री गणेश प्रताप - क्रीडाखंड अध्याय ३१

सर्व कीर्तीने युक्त, सर्व देवाधिदेवांमध्ये श्रेष्ठ अशा अत्यंत प्रिय असलेल्या श्रीगजाननाच्या स्तुतीपर हा ग्रंथ आहे.


श्रीगणेशाय नमः । श्रीसरस्वत्यै नमः । श्रीगुरुभ्यो नमः । श्रीक्षेत्रपालाय नमः ।

श्रोते परिसा सावधान । गजाननाची कथा गहन ।

तेणें तुटेल भवबंधन । द्या जी अवधान प्रेमभरें ॥१॥

वामदेवें शापियेला । क्रौंचगंधर्व मूषक जाहला ।

अकस्मात येऊनि पडला । तेणें देखिला मुन्याश्रम ॥२॥

निघोनि आश्रमीं पराशराचे । भक्षण केलें सर्व धान्याचें ।

तुकडे केले सर्व वसनांचे । कुंड घराचें पोखरिलें ॥३॥

पुस्तकाचे करंडिले भार । पुच्छघातें पाडी तरुवर ।

चुं चुं शब्द भयंकर । करोनि अंबर गाजवी ॥४॥

त्यातें पाहून शक्तिकुमर । करिता जाहला हाहाःकार ।

म्हणे काय करुं विचार । सर्वेश्वर क्षोभला कैसा ॥५॥

पर्वताकार हा उंदिर । कोण करील याचा संहार ।

ऐसें ऐकतां तो कुमर । देववर बोलतसे ॥६॥

जगत्कर्ता मी तुझा तनय । असतां तूतें भय काय ।

न मानी मूषकाचें भय । महाकाय मी असे ॥७॥

बांधोनियां उंदिराशी । त्यातें आणीन तुजपाशी ।

गजाननें टांकोन पाशाशी । उंदिर कंठाशी आकर्षिला ॥८॥

गळां पाश घालोन उंदिर । वोढोन आणिला तेणें सत्वर ।

श्वास कोंडोन मुखकवर । म्हणे कहर वर्षला कैसा ॥९॥

मुखें कोरिलें पर्वताशी । कंठीं बांधिलें कोणी मजशीं ।

ऐसा खेद करितां त्याशी । जाहला मानसीं विचार पैं ॥१०॥

जो मज बांधणार । तोच होय सर्वेश्वर ।

मग स्तवन करी उंदिर । तेणें लंबोदर तुष्ट जाहला ॥११॥

मूषकासि वदे भवभयभंग । उंदिरा आतां वर माग ।

तो म्हणे तूंच माग लगबग । देईन मी गा वर तूतें ॥१२॥

ऐकतां गजानन म्हणे तयाशी । जरीं तूं माते वर देशी ।

पृष्टीवरी वाहोन मजशी । माझे आज्ञेसि पाळी सदां ॥१३॥

तथास्तु म्हणे तो उंदिर । तयासि सोडी सर्वेश्वर ।

ऐसें ऐकतां सत्यवतीकुमर । पुन्हां प्रश्न करीतसे ॥१४॥

मूषकें पूर्वीं पापसुकृत । काय केलें अत्यद्भुत ।

तें सांगे विष्णुसुत । कृपा करोनि मजलागीं ॥१५॥

विधि म्हणे ऐक आतां । सांगतों त्याचे पापचरिता ।

जेणें पावला मूषकता । एकदंता प्रिय जाहला ॥१६॥

मेरु शिखरीं नामें सौभर । तपस्वी आहे मुनिवर ।

त्याचें कलत्र अतिसुंदर । प्रियपात्र तयासी ॥१७॥

मनोमयी नामें चातुर्यखाणी । सौंदर्योदधीची लहरी रमणी ।

संज्ञा रती रंभा इंद्रायणी । पाहोनि लाजती जियेतें ॥१८॥

महासाध्वी पतिव्रता । ईश्वरवत मानी निजभर्ता ।

ऐसी ती वर्तत असतां । काय जाहलें तें ऐक ॥१९॥

सौभरी नित्यकर्म करोनी । समिधा आणावया गेला वनीं ।

त्याचे मागें त्याची मानिनी । करी सदनीं गृहधंदा ॥२०॥

तंव क्रौंचगंधर्व तेथें पातला । त्याणें अवलोकिली ती बाला ।

मन्मथशरें हृदयीं भेदला । कर धरिला त्याणें तिचा ॥२१॥

गंधर्व म्हणे वो नितंबिनी । चल आतां एकांतस्थानीं ।

थरथरोनी कांपे ती मानिनी । बोले वचनी तयाते ॥२२॥

मी कन्या तुझी ताता। नको दुष्ट बुद्धी धरुं आतां ।

ही गोष्ट माझे स्वामीस कळतां । अनर्थता होईल रे ॥२३॥

जारकर्मी दोष बहुत । येणें होईल नरक प्राप्त ।

तूं तर आहेस ज्ञानवंत । पाहा मनांत शोधोनियां ॥२४॥

न तूं सोडशील माते जरीं । स्त्रीहत्या करीन तुजवरी ।

ऐसें बोलोन रुदन करी । दुराचारी न सोडी तीतें ॥२५॥

तंव पातला सौभरमुनी । गंधर्वें तीतें दिल्हें सोडुनी ।

त्याचें कर्म पाहोनि नयनीं । जाहला मनीं संतप्त तो ॥२६॥

ऋषि म्हणे गंधर्वातें । दुष्टा घे माझे शापातें ।

मूषक होवोनि फिर वनातें । ऐकतां पायांतें लागला ॥२७॥

शरण पातल्याची दया येऊन । ऋषि बोले उश्शाप वचन ।

तुझे पृष्ठीं गजानन बैसून । करील पावन पापिष्टां ॥२८॥

ऐसा ऋषी उश्‍शाप बोलला । तेणें तो गणेशपात्र जाहला ।

गजाननें बांधोन आणिला । तो पाहिला ऋषिवर्यें ॥२९॥

ह्मणे हा परमात्मा सनातन । पुत्रत्व पावला गजानन ।

जाहलें कुळाचें उद्धरण । मज पावन तेणें केलें ॥३०॥

नव वर्षांचा जाहला गजानन । तो एके दिवसीं जगन्मोहन ।

पराशरातें बोले वचन । करीन हनन सिंदुराचें ॥३१॥

परी तुह्मी माझे मस्तकावर । ताता ठेवा वरदकर ।

ऐकोनियां मुनीश्वर । बोले उत्तर तयातें ॥३२॥

कौतुकाविष्ट होती बाळ । तेव्हां मागती चंद्रमंडळ ।

तैसें बालभावें तुझे बोल । लागती कुशल कर्णातें ॥३३॥

ज्याचे नासाश्वासें पर्वत । कांपताति तरुवत ।

पादघातें करुन कांपवित । अचला बा क्षणक्षणा ॥३४॥

तूं तर नव वर्षांचा बाळक । मारीन म्हणसी असुरनायक ।

हें मज वाटतें बा कौतुक । न कळे कर्तृत्व तुझें मला ॥३५॥

परी माझे अनुग्रहान । आतां करी असुरकंदन ।

त्याचे मस्तकीं कर ठेऊन । विजयी होवोनि येई ह्मणे ॥३६॥

मुनीचा लागतां वरदकर । आनंदला लंबोदर ।

मुनीस करोनि नमस्कार । मूषकावर आरुढला ॥३७॥

सिंदुराचे नगरा समीप । वेगें पातला गणाधिप ।

गर्जना करोनि धराकंप । करिता जाहला तेधवां ॥३८॥

त्याचा ऐकोन भीमरव । क्षोभ पावले सप्तार्णव ।

विशीर्ण जाहले तेव्हां ग्राव । असुर सर्व कांपती ॥३९॥

कितीक असुर पडले मूर्च्छित । कितीक पडले होऊन प्रेत ।

सिंदुरासुर तेव्हां कांपत । पडे मूर्च्छित तेधवां ॥४०॥

मूर्च्छा सांवरोन बैसला वेगें । सेवकांसि भरे रागें ।

कोण आरडतो पहा वेगें । लागवेगें धांवती तें ॥४१॥

त्याहीं पाहतां गजानन । ते भय पावले सेवकजन ।

त्यासि बोलती मधुरवचन । तुह्मी कोठून आलेत हो ॥४२॥

नववर्षांचें आहे वय । दिसतो तुमचा सुंदर काय ।

शब्द ऐकतां आम्हांसि भय । पावतों कीं प्रभूसह ॥४३॥

त्रैलोक्यसंहारक दिसे शक्ती । ऐसी ऐकतां त्याची उक्ती ।

त्यातें बोले मंगलमूर्ती । म्हणे गणपती मी असें ॥४४॥

शिवपुत्र मी त्रैलोक्यपती । पराशरगृहीं वरती होती ।

संहारावया दुष्टांप्रती । मी गणपती आलो असें ॥४५॥

गजानन नाम आहे मजशी । युद्ध करीन तुमचे प्रभूशीं ।

जाऊनि सांगा लौकर याशी । ये युद्धासि सिद्ध होउनी ॥४६॥

ऐसें ऐकतां त्याचें वचन । येऊन सांगती स्वामीलागुन ।

करावया दुष्ट हनन । शिवनंदन आला असे ॥४७॥

सांप्रत करणार तुजशी रण । तूं असावें सावधान ।

सिंदूर बोले त्यासि हांसून । तयालागुन ज्ञान नसे ॥४८॥

सिंहापासीं मशक भिडे । हें तव अद्भुत कैसें घडे ।

त्याचें बोलणें दिसे कोरडें । काय मज पुढें बाळक तो ॥४९॥

आतां करा युद्धाची तयारी । माझा पराक्रम पहा तरीं ।

निघे गर्जना करीत भारी । नगराबाहेरी निघाला ॥५०॥

पाहूनियां गजवदन । हृदय जाहलें कंपायमान ।

बोले तयासि धीर धरुन । ह्मणे तान्हें बाळक तूं ॥५१॥

तुवां पिवोनि मातृस्तन । मुलांत खेळावें कौतुकें करुन ।

युद्धासि आलास काय म्हणून । जा परतोन घरासि रे ॥५२॥

मातें भिवोन केशवादि सुर । पळाले टांकोन निजमंदिर ।

तूं मरण पावतां मातापितर । करितील थोर शोक कीरे ॥५३॥

ऐकोन त्याचें ऐसें वचन । गजानन बोले सुहास्यवदन ।

मानसी विचार केल्यावांचुन । दुष्टा वचन बोलतोसी ॥५४॥

करावया भूभारहरण । मी अवतरलों गजकर्ण ।

येऊनियां मातें शरण । चुकवी मरण आपलें ॥५५॥

विपरीत होतां कालावसर । विपरीत घडतें सर्व साचार ।

राक्षसांचा नाश वान्नर । करिते जाहले पूर्वीं पैं ॥५६॥

स्तंभामधून नारायण । प्रगटला नरसिंहरुपें करुन ।

तेणें केलें असुरकंदन । नखें करुन क्षणमात्रें ॥५७॥

लघुतर असतो पावक । परीं नगर जाळी सकळिक ।

मी तुझा जाण अंतक । हो सावध धीर धरी ॥५८॥

ऐसें बोलोन गजानन । तेव्हां जाहला सहस्त्र वदन ।

सहस्त्रपाद सहस्त्रचरण । सहस्त्र नयन जाहला ॥५९॥

ऐसें अवलंबूनि विराटरुप । रणांगणीं उभा गणाधिप ।

पाहतां दैत्य हृदयी कंप । तेव्हां अमुप संचरला ॥६०॥

धरोनियां धैर्य मोठें । खड्‌ग हाणूं धांवे नेटें ।

गजाननें तेव्हां करसंपुटे । धरोनि त्यातें रगडिला ॥६१॥

त्याचें रक्त लाविलें आननीं । सिंदुरवदन जाहला तेथुनी ।

सिंदूर प्रिय तयापासुनी । मोक्षदानी जाहला ॥६२॥

करितां सिंदुरासुराचें मर्दन । सकळ देव आले धांऊन ।

वर्षुं लागले सुमनघन । करिती स्तवन आनंदभरें ॥६३॥

दुंदुभी दुमदुमती निराळी । परस्पर भेटे देवमंडळी ।

अप्सरा नाचती तयेवेळीं । आनंदे टाळी देव वाहती ॥६४॥

जयजयकार करोनि पाही । देव भरिती दिशा दाही ।

दुःख कवणासि उरलें नाही । सत्कर्म सोयी प्रगटली ॥६५॥

सिंदुरासुराचें ऐकोन निधन । धांवत पातले भूभुजजन ।

ऋषि पावले वेगेंकरुन । घेती दर्शन विनायकाचें ॥६६॥

अमर द्विज अवनीपती । गजाननाचें पूजन करिती ।

प्रेमभरें करिती स्तुती । यथामती करोनियां ॥६७॥

जयजयाजी दुःखदमना । आदिपुरुषा सनातना ।

जगद्वयापका निरंजना । भवभयभंजना सुखाब्धे ॥६८॥

अनंतनामा अनंतचरिता । अनंतनाभी अनंतपूजिता ।

अनंतवत्क्रा अनंतसुता । अनंतमुखा अनंतारे ॥६९॥

विश्वाद्यका विनायका । विश्वमया विश्वपालका ।

विश्वात्मया विश्वशिक्षका । विश्वव्यापका विश्वपती ॥७०॥

विश्वधारा विश्वसारा । विश्वनाथा विश्ववरा ।

विश्वजीवा विश्वपरा । विश्वहरा विश्वपते ॥७१॥

मायातीता मायापती । मायाहेतू मायागती ।

मायाशमना मायाकृती । मायामती नाश करे ॥७२॥

विष्णू रवी विधि हर । वरुण वायू कुबेर ।

गण गंधर्व अप्सरा किन्नर । चराचर अवघाचि तूं ॥७३॥

वेदां ठाव नाहीं कळला । तो प्रत्यक्ष नयनीं देखिला ।

येणें धन्यत्व वाटे आम्हाला । करितों तुला नमस्कार ॥७४॥

विधि म्हणे सत्यवतीसुता । सिंदुरासुराचा वध होतां ।

जगीं विस्तारली प्रसन्नता । दुःखवार्ता हरपली ॥७५॥

सुरांनीं करोनियां प्रासाद । तेथें स्थापिला आनंदकंद ।

जो भक्तांतें मोक्षप्रद । दर्शनें सहज होतसे ॥७६॥

वरेण्य राजा आला तेथें । तेणें पाहोन गजाननातें ।

कर जोडोनि विनवि त्यातें । अश्रू नयनातें आणोनियां ॥७७॥

म्हणे माझे काय प्राक्तन । घरीं पातलें विश्वनिधान ।

मूढत्वभावें तयालागुन । टांकिलें नेऊन वनामाजी ॥७८॥

हातीं लागला चिंतामणी । दैवयोगें मूढमणी ।

दूर दिधला भिरकाउनी । तैसेम येथें जाहलें ॥७९॥

ऐसा ऐकोन त्याचा शोक । प्रसन्नवदन विनायक ।

चतुर्भुजीं नरनायक । आलिंगिला तयानें ॥८०॥

प्रसन्नात्मा तयासि बोले । तुम्ही पूर्वीं तप केलें ।

पुत्रत्व मातें मागीतलें । तें सत्य केलें येधवां ॥८१॥

तुमचे गृहीं अवतरोन । केलें सिंदुरासुराचें हनन ।

ऐसें त्याचें ऐकतां वचन । राजा प्रार्थी तयातें ॥८२॥

संसारीं पाहिलीं सुखदुःखें । आतां मागतों हेंच हरिखें ।

मोक्षमार्गीं सुख देखें । हेंचि सुमुखें द्यावें मज ॥८३॥

तुटोनियां मायाबंधा । अंतीं त्वत्पदा पावेन ।

ऐसें करीं गजान । कृपा करुन येधवां ॥८४॥

ऐकोनियां तयाच्या बोला । ज्ञानसागर संतोषला ।

गीतार्थ त्याला उपदेशिला । उद्धार केला राजयाचा ॥८५॥

मग येऊनि अंबेपाशीं । पुत्रसोहळा भोगवी तिशीं ।

वक्ता विनवी श्रोतयाशीं । भजा तयासीं प्रेमभरें ॥८६॥

गजाननासि शरण गेले । ते सुखदुःख अंतरले ।

ऐसें प्रत्यक्ष वेद बोले । तेंच सांगितलें तुम्हाप्रती ॥८७॥

स्वस्ति श्रीगणेशप्रतापग्रंथ । श्रीगणेशपुराणसंमत ।

क्रीडाखंड रसभरित । एकत्रिंशोध्याय गोड हा ॥८८॥अध्याय॥३१॥ओव्या॥८८॥

अध्याय एकतिसावा समाप्त

N/A

References : N/A
Last Updated : September 22, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP