मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्री गणेश प्रताप|
अध्याय ३

श्री गणेश प्रताप - अध्याय ३

सर्व कीर्तीने युक्त, सर्व देवाधिदेवांमध्ये श्रेष्ठ अशा अत्यंत प्रिय असलेल्या श्रीगजाननाच्या स्तुतीपर हा ग्रंथ आहे.


श्रीगणेशायनमः ॥ श्रीललितांबा प्रसन्न ॥

श्रोते परिसा सावधान ॥ सूत सांगे ऋषीलागून । हेमकंठ प्रजा घेऊन । स्वनगरी गेल्यावरी ॥१॥

ज्ञानगम्य आणि सुबल । दोघे अमात्य सेवासुशील । सुधर्मा समवेत नृपाल । महदारण्यी प्रवेशला ॥२॥

पुढे देखिले रम्य वन । तेथे चौघे विश्रांती पाऊन । त्यापुढे सरोवर अवलोकन । करिता मन निवाले ॥३॥

विस्तीर्ण सरोवरी निर्मल जल । जैसे साधूचे ह्रदय केवल । शतपत्रे सहस्त्रदले विशाल । कुमुदोत्पले विकासिली ॥४॥

वरी रुंजती षट्‌पद । आनंदे सेविति आमोद । हंस कारंडव पक्षि भेद । मंजुळ शब्द करिताती ॥५॥

मातंगापरी जीवनी सुसर । कमठे तळपती मत्स्यभार । पंकी आरडती दर्दुर । तेणे नीर दुमदुमिले ॥६॥

सभोवती कदलीवन । द्राक्षामंडप ते सुघन । सुमनवल्ली विकीर्ण सुमन । सुवासे मन सुख पावे ॥७॥

आमलक जंबीर अक्रोड ताल । जंबू अश्वत्थ वट तमाल । कपित्थ निंब देवदार रसाल । तरु विशाल उंचावले ॥८॥

आम्र अर्जुन अशोक तिवस । सांग पीपरी तुते सुरस । शामा अक्षपिस्तेफणस । सावकाश उंचावले ॥९॥

केतकी गुलछबी गुलाब जाती । तगर कण्हेरी जुई मालती । चंपकादि सुमने विकासती । त्रिकाल गती साजिरी ॥१०॥

वृक्ष गेले भेदीत गगन । वरी शब्द करिती पक्षिगण । शत कोकिलांचे सुटले मौन । वसंते वन शृंगारिले ॥११॥

हंसपक्षी श्येन बक । घुमघुमती पारवे बोलती शुक । नाना शब्दे चिमण्या काक । अलोलिक गर्जती ॥१२॥

सारिका चक्रवाक मयूर । तांडव करिताति सदार । खंजरी टकलिंग गृध्र घार । तैसे सुतारपक्षी पै ॥१३॥

ससे सांबरे वनगाई । भेकरे हरिणे ठाई ठाई । गोळांगुळे सुकर पाही । जंबूक गेंडे अपार ॥१४॥

सिंह मातंग बिडाल । कोलिस्त गवे बागुल । रीस व्याघ्र अजा शल । स्वइच्छे नकुल हिंडती ॥१५॥

भुजंग फुंपावती धुधुःकारे । मस्तकी मणीतेजभारे । ऐसे वन पाहून नरेंद्रे । राहिला तेव्हा त्या वनी ॥१६॥

क्षुत्‌ तृट्‌ मृत्यू भयही न । उपमे इंद्राचे नंदनवन । पाहून संतोषले मन । प्राशिले जीवन सकळिक ॥१७॥

मग करोनिया स्नान । नित्यकर्मे देवतार्चन । कंदफळेकरून भोजन । क्षुधाशमन तेणे केले ॥१८॥

कंदफळे मुळालागी । अमात्य गेले तयाप्रसंगी । सन्निध राहिली कोमलांगी । सुधर्मा जगी पवित्र जी ॥१९॥

कोमल वालुका भूदेशी । निद्रा लागली रायाशी । पादसंवाहन करीत सरशी । सुधर्म सती बैसली ॥२०॥

तव तेथे उदककाम । भृगुनंदन ब्राह्मणोत्तम । आला जैसा मूर्तिमंत काम । अति उत्तम लावण्य जो ॥२१॥

अंग तेजे जैसा तरणी । भरिता सरोवरींचे पाणी । पाहोनि त्याते सुधर्मा रमणी । अंतकरणी संतोषली ॥२२॥

मनी विचारी सुधर्मासती । अम्हा होय हा सुखमूर्ती । याचे अनुग्रहेकरून निश्चिती । क्लेशगती खंडेल पै ॥२३॥

सुधर्मा म्हणे गा मन्मथमूर्ती । कवण माता तुझी सती । कवणेस्थानी तुमची स्थिती । मजप्रती सांगावे ॥२४॥

तुझी रूपतेजोरेखा । पाहोनि पावले अत्यंत सुखा । काय नाम तुझे बालका । म्हणती जनका काय तुझे ॥२५॥

ऐकोनि तिचे मंजुल बोल । कृपेने द्रवला ऋषीचा बाल । उभा राहोनिया निश्चल । सकल वृत्त सांगतसे ॥२६॥

बालक म्हणे नितंबिनी । पुलोमा नामे माझी जननी । पिता भृगु महामुनि । च्यवन जनी मज बोलती ॥२७॥

तुम्ही सांगाल कोठील कोण । तू तर लावण्य अति सुलक्षण । पाहता तुझे वदन जाण । सुखपूर्ण नयनाशी ॥२८॥

कनकलतिके प्रसन्नवदने । कुरलकुंतले खंजरीट नयने । हरिकटिमध्ये सुंदरललने । मणिमयसदने सुंदरी ॥२९॥

तू स्वये रमणि ऐशी । गलितकुष्ठि पुरुष सेविशी । काय म्हणावे तुझे पित्याशी । बंधू जननी मूर्ख तुझे ॥३०॥

वर्षाकाली द्रवे गिरी । तैसा पूय वाहे याचे शरीरी । क्रिमि पडोनि दुर्गंधी भारी । वनांतरी भरली असे ॥३१॥

तुझे माता पिता जनी । विचार न करिता तुज कामिनी । गलितकुष्ठ्याशी अर्पुनी । अमित धनी विकिले की ॥३२॥

ऐशियाचा करोनि त्याग ॥ पाहे भलता उत्तमांग । तरीच पावशील सुख चांग । संसाररंग भोगिसी ॥३३॥

बालकाचे वचन ऐकोनी । गहिवरोनिया मानिनी । दुःखाश्रु आणोनि लोचनी । मधुरवचनी बोलतसे ॥३४॥

सुधर्मा म्हणे बालका ऐक । आमचे सकल दैव कौतुक । माझा पति मेदिनी नायक । सोमकांत नाम विख्यात जनी ॥३५॥

अंगतेजे तारापती । उणा याशी म्हणोनि निश्चिती । सोमकांत नाम गती । जगी भूपति पावला ॥३६॥

सदाचरण गुणसंपन्न । धीर उदार शौर्यनिधान । परि पूर्वील कर्मगती गहन । कुष्ठसंपन्न तेणे जाहला ॥३७॥

दुःख पावोनि अत्यंत शरीरी । राज्य वोपोनि सत्पुत्र करी । आलो आम्ही वनांतरी । दुष्कर्मगिरी भोगावया ॥३८॥

अरळ सुमन मंचकावरी । जो पूर्वी सुखे शयन करी । तो हा पहुडला वाळुकेवरी । कर्मपरी ऐशी असे ॥३९॥

दुग्धसर्पियुक्त षड्रसान्न । आप्त विप्रांसह भोजन । करी जो तो वर्जून अन्न । कडू तुरट भक्षी फळे ॥४०॥

जो आनंदसमुद्री निमग्न । तो हा गलितकुष्ठी होऊन । दुःखे बुडाला अनुदिन । कर्म गहन वोढवले ॥४१॥

या दुःखसागराहून । तरू कसे गा भृगुनंदन । ऐसे ऐकोनि तिचे वचन । दुःखे मन आकळिले ॥४२॥

तैसीच उदके भरोनि झारी । तो प्रवेशला निजमंदिरी । परी त्याचे दुःख अंतरी । मौन धरी म्लानमुखे ॥४३॥

मुख कोमाइले राजस । पाहोनि भृगु पुसे पुत्रास । का बा जाहलासि उदास । काय जीवास दुःख तुझ्या ॥४४॥

च्यवन म्हणे ऐक ताता । सरोवरी उदक भरिता । तव तेथे लावण्यवनिता । कुष्ठी भर्ता तिजलागी ॥४५॥

पाहोनि ऐसे विपरीत । तिज म्या पुसला वृत्तांत । तिणे कथिले दुःख बहुत । तेणे दुःखित मी जाहलो ॥४६॥

सौराष्ट्रींचा महिपति पवित्र । गलितकुष्ठे तो दुःखपात्र । घेऊनि दोनि अमात्य कलत्र । दुःखे वनी आला असे ॥४७॥

ऐकोनि पुत्राची सद्गद वाणी । भृगु द्रवला अंतःकरणी । जो परोपकारी अग्रगणी । करुणावचनी बोलिला ॥४८॥

पुत्रा जावोनि सत्वरगती । अमात्य दारासह भूपती । आणी का निजाश्रमाप्रती । प्रेमप्रीती करोनिया ॥४९॥

ऐसे ऐकोनि ऋषिबाळक । सुधर्मा अवलोकनोत्सुक । त्वरित जावोनि नरनायक । अभयवचने गौरवी ॥५०॥

म्हणे उठा आता त्वरित । तुमचे दुःख खंडेल निश्चित । चला आमचे आश्रमात । माझा तात बाहतो तुम्ही ॥५१॥

ऐकोनि त्याची पियूषवाणी । आनंद न माये अंतःकरणी । वंदोनि तयाशी लोटांगणी । चरणी मिठी घालिती ते ॥५२॥

तेथूनि निघाली रूपराशी । संगे घेऊनि सामात्य पतीशी । पातली भृगूचे आश्रमाशी । सुख मनाशी अत्यंत ॥५३॥

पवित्र भृग्वाश्रममंडळ । निर्वैर प्राणी तेथे सकल । व्याघ्र गाई सर्प नकुल । एकमेळी क्रीडती ॥५४॥

बकुल चंपक पुन्नागपंक्ती । कुटजसुमने विराजती । गुलाब पालाश जुइ मालती । चमेली जाई प्रफुल्ल सदा ॥५५॥

खर्जुरी फणस नारळी । सुरस काजू अंजीर पोफळी । पक्वापक्व फळेयुक्त केळी । रसाळ फळी साजिर्‍या ॥५६॥

सुगंधवायू वाहे सदा । शीतोष्णाची नसे आपदा । धनधान्य सुखसंपदा । इंद्रपदासारिखी ॥५७॥

मंत्रघोषे शास्त्रवादे । गर्जताति ऋषींची वृंदे । उभे राहोनिया एकपदे । स्वछंदे तप करिताती ॥५८॥

कोणी करिती पंचाग्निसाधन । कोणी बसले धरूनि ध्यान । वेदांतवाक्ये समाधान । पावोनि उगे कितीक ते ॥५९॥

तेथे व्याघ्रमृगचर्मासनी । आदित्य तेजे जैसा गगनी । दैदीप्य तेजे भृगु मनी । अवलोकुनि आनंदले ॥६०॥

घालोनिया लोटांगणे । कर जोडोनि चौघेजणे । राजा सद्गद अंतःकरणे । ऋषीकारणे स्तवीतसे ॥६१॥

काय तुमचा अगाध महिमा । व्याघ्री सांडिले हिंसा धर्मा । वाट नाहीच तेथे अधर्मा । तेजोधामा तवाश्रमी ॥६२॥

मी तो आजन्मप्रभृती । पाप आचरलो नाही निश्चिती । परी पूर्वील कर्माची ही गती । मजप्रति पावली ॥६३॥

परम भाग्योदयेकरून । तुमचे जाहले दर्शन । आता करी मज पावन । कृपाळु मन करूनिया ॥६४॥

ऐसे पाहूनि त्याचे क्लेश । ना भी म्हणे त्याशी मुनीश । माझे आश्रमी दुःखपाश । प्राणिया अशेष असेना ॥६५॥

वनी तुम्ही श्रमलेती । आता येथे करा विश्रांती । मंगलस्नाने तयाप्रती । अती प्रीती करविली ॥६६॥

विनयभावे येऊनि पुलोमा । अंतरी नेवोनिया सुधर्मा । म्हणे साजणी पावलीस श्रमा । पूर्वकर्मानुसार पै ॥६७॥

धन्य तू पतिव्रता माउली । मग तिची वेणी सोडिली । सुगंध तैले जटा उकली । गात्रे मर्दिली सुस्नेहे ॥६८॥

घालोनिया मंगलस्नान । षड्रस स्निग्धान्न भोजन । अमृतोपम उदकप्राशन । देवोनि मन सुखी केले ॥६९॥

कोमळ मंचकी सुखशय्या । घालूनि पहुडविले तया । क्षणभरि विश्रांति घेउनिया । मुनिपाया लागले ॥७०॥

मग तो मुनी करुणासागर । चौघांस बसऊनि समोर । ध्यानयोगे करूनि विचार । पूर्वाचार शोधितसे ॥७१॥

भृगु म्हणे सोमकांताशी । ऐके आपुले पूर्वकर्माशी । विंध्याचलसमीप देशी । कोल्हार नगराशी बोलती ॥७२॥

तेथे चिद्रूप नामे वैश्य । भाग्यशाली सकलगुणेश । सुगा नामे तयास । भार्या होती कुलवधू ॥७३॥

लावण्यपणे रम्य ललना । सुशीला पतिव्रता सुलोचना । अनुसरोनि पतिवचना । अन्य मना न जाणे ॥७४॥

तू पूर्वी तिचे उदरी । पुत्रत्व पावलाशि निर्धारी । कामद नाम संस्कारी । तयाशी ठेविले कौतुके ॥७५॥

करोनिया बहुत लालन । मग त्याची यौवनावस्था पाहून । विवाह केला कौतुकेकरून । बहुत धन खर्चोन्या ॥७६॥

तिचे नाम कुटुंबिनी । ठेविते जाहले कौतुकेकरुनी । मृगाक्षी सुंदर नितंबिनी । तुझे भजनी सदर ॥७७॥

वस्त्रालंकारमंडित काया । कुटुंबिनी तुझी जाया । अनुदिनी तुजशी रमोनिया । पुत्रवती जाहली ॥७८॥

पंच कन्या सप्त पुत्र । तेणे युक्त तुझे कलत्र । कुटुंबिनी नाम पवित्र । केले सत्य तियेने ॥७९॥

ऐसे काही दिवस गेले । तुझे पित्याशी मरण आले । मातेने सहगमन केले । ते पावले परत्र गती ॥८०॥

त्याचे मागे मदोन्मत्त । तू रूपयौवनमदगर्वित । वडिलोपार्जित धन समस्त । खर्च बहुत त्वा केला ॥८१॥

ठेवोनिया वारवधूशी । मद्यपाने तिशी रमशी । परदारा गमनेशी । सर्व धनाचा नाश केला ॥८२॥

गृहविक्रय करूनी । तेहि द्रव्य तुवा नासुनी । अन्नवस्त्राविण कुटुंबिनी । परसदनी ठेविली ॥८३॥

गृही नसे किंचित अन्न । लेकरे करिती रुदन । तुवा कुटुंब त्याग करून । स्वेच्छागमन पै केले ॥८४॥

घेऊनि बाळके सुकुमारी । जाती जाहली पितृमंदिरी । तू वंशकंटक दुराचारी । अन्य नगरी राहिलाशी ॥८५॥

जैसा मदोन्मत्त करी । तैसा राहोनि त्या नगरी । घरोघरी करोनि चोरी । जनापकारी सर्वदा ॥८६॥

भोगिल्या अनेक परनारी । द्यूतकर्मी कलहकारी । असत्य भाषणे दुराचारी । सदाचारी दुःख तुझे ॥८७॥

त्या ग्रामचारी जनास । तुवा दिधला बहुत त्रास । त्याही सांगोनि राजयास । बाहेर तूते घातले ॥८८॥

मग तू प्रवेशोनि वन । चोरसमुदाय साह्य घेऊन । पांथस्थाचा नाश करून । अपार धन मेळविले ॥८९॥

सद्बाल स्त्रिया ब्राह्मण । यांचे करोनिया हनन । वनी उभविले रम्य सदन । तेथे अनुदिन राहिलासी ॥९०॥

शोध करित तुझी ललना । अपत्यांसहित पातली सदना । मग सत्कारूनि निजांगना । अलंकारिली भूषणी ॥९१॥

मृग ससे मत्स्य बक । सारस गोधा कोकिलादिक । कुक्कुट वानर सांबरे वृक । जीव अनेक वधियेले ॥९२॥

मारोनि नित्य मार्गस्थ जन । करिशी त्यांचे द्रव्य हरण । त्यांचे मासे कुटुंबपोषण । केल्या हरण परदारा ॥९३॥

एके दिवशी गुणवर्धन । करीत असता मार्गे गमन । अकस्मात तुवा येऊन । करे ब्राह्मण धरियेला ॥९४॥

ब्राह्मण कापे थरथरा । म्हणे ऐक वचन चोरा । मी केली दुसरी दारा । अतिसुंदरी गुणवती ॥९५॥

नको करू माझा वधू । घरी नवोढा कुलवधू । तिशी होईल दुःखसंबंधू । सौभाग्यसिंधू रक्ष तिचा ॥९६॥

प्रथम दारा मरण पावली । पुन्हा दुसरी प्रयत्ने केली । तिशी माझी स्पृहा गुंतली । तनु सापडली तुझे हाती ॥९७॥

जो भयापासोनि होय त्राता । तोहि होय त्याचा पिता । मज मारू नको सर्वथा । नरकपंथा जाऊ नको ॥९८॥

करिशी ऐसे पाप दारुण । याचा अधिकारी तूच जाण । दारा पुत्र सुह्रदगण । विभागी कवण पापाशी ॥९९॥

ब्राह्मण होवोनि दीनवदन । रडे जीवित्वाचे आशेकरून । परि न द्रवले तुझे मन । म्हणशी ज्ञान कळले तुझे ॥१००॥

हे काय मज नाही ठाऊके । म्हणोनि उपदेशिशी कौतुके । पालथे कुंभी घालिता उदके । मूर्ख लोके म्हणिजे तो ॥१॥

मद्यपियास तत्वज्ञान । मतिमंदाशि पांडित्यकथन । तैसे माझे ठाई धर्मवचन । मूर्ख म्हणुन उपदेशिशी ॥२॥

लज्जा भय कामातुराशी । बंधू माता अर्थसक्ताशी । शुद्धाचार काकाशी । द्यूतरताशी सत्य कैचे ॥३॥

नव्हे स्त्रियांशी कामशांति । धैर्य तैसे क्लीबाप्रती । क्षमा करील सर्पजाती । हे निश्चिती घडेना ॥४॥

तैसी तुझी धर्मनीती । न ऐके मी निश्चिती । घेईन तुजे प्राणाप्रती । वृथा बडबड न करावी ॥५॥

ऐसा करोनि अनुवाद । केलास त्याचा शिरच्छेद । ऐसे मारिलेस ब्राह्मणवृंद । लक्षानुलक्ष तुवा वनी ॥६॥

गेले तारुण्याचे दिवस । जरा पावली शरीरास । मग होवोनि कासाविस । जाहलास आधीन कुटुंबाचे ॥७॥

पुत्र दासी सेवकजन । करू लागले अपमान । मग मनी खिन्न होवोन । विचारी मन प्रवर्तले ॥८॥

मग आमंत्रण पाठऊनि वनी । हाकलून आणिले महामुनी । त्यांते चोरे नमस्कारुनी । विनयभावे बोलिला ॥९॥

धनदाने तुम्हाशी । देतो ग्रहण करा यांशी । ऋषि म्हणती तयासी । अम्हाशी दान नलगे तुझे ॥११०॥

घेता पतिताचे दान । त्याचे पातक विभाग पाऊन । रौरवी जाऊ सकलजन । नलगे दान तुझे आम्हा ॥११॥

ऐसे बोलता द्विजवरी । पातकभये खोचला अंतरी । ब्राह्मण जाऊन निजमंदिरी । स्नान करिती सचिल ॥१२॥

मग तू विचारिसी मनी । काय करावे धनालागुनी । देता वर्जिले मुनीनीं । व्यय कशानी होईल ॥१३॥

मग तेथे गणेशालय । जीर्ण होते कुष्टकाय । त्याचा उद्धार करोनि नय । मग तू अत्यंत धरियेला ॥१४॥

चार शिखरांचे देऊळ । रत्‍नखचित मंडप विशाळ । मुक्त प्रवाळ रत्‍ने तेजाळ । खांब विपुल शोभविले ॥१५॥

भोवता परिघ रत्‍नखचित । च्यार गोपुरे तोरणांचित । त्या भोवती विराजत । पुष्पवाटिका शीतलजळे ॥१६॥

केले गणेश देवालय । सकल धनाचा केला व्यय । मग तू पावलासि यमालय । टाकोनि काय चोराचा ॥१७॥

यमदूत मारिती निष्ठुरघाते । कंटक टोचिती अंगाते । घालिती घोर नरकाते । मग तेथे तळमळसी ॥१८॥

सांडसे तोडिती मांस । पाषाणे हाणिती मस्तकास । ओणवा करूनि बहुवस । शिखा पायास बांधिती ॥१९॥

बांधोनिया तिरवट पाशी । तुज नेले यमापाशी । यमे बोलाऊनि चित्रगुप्ताशी । पापपुण्या गणियेले ॥१२०॥

मग दीनवत्सल धर्मराज । समोर उभा करोनि तुज । म्हणे भोगिसी पापपुंज । किंवा भोगिसी पुण्य आधी ॥२१॥

मग तुवा विचार करोनि चित्ती । भोगीन आधी पुण्यगती । म्हणता यमे तुजप्रती । राजकुळी जन्मविले ॥२२॥

रम्य प्रासाद बांधिता जाण । शरीरी पावले रम्यपण । चंद्रापरी अंगवण । काया सगुण जाहली ॥२३॥

गणपतीसी राजोपचार । अर्पिता पावलासि राज्यभार । परि मागील दुरित दुर्धर । कष्टतर तेणे तुज ॥२४॥

ऐसी ऐकता जन्मांतर गोष्टी । राजा जाहला महाकष्टी । कृपा उपजोनिया पोटी । भृगू दृष्टी पाहतसे ॥२५॥

घडता साधूची संगती । पापे देही त्रास पावती । पक्षिरूपे बाहेर पडती । मग डंखिती रायाते ॥२६॥

नाना वर्णे भयंकरे । शरीरातूनि बाहेर पाखरे । येऊनिया चमत्कारे । तडातडा तोडिती शरीरासी ॥२७॥

पंखे झडपोनि शरीर । मांस तोडिती अपार । तेणे दुःख पाऊनि थोर । नरवीर रुदक करी ॥२८॥

घालोनिया लोटांगण । भृगूशी म्हणे शरण शरण । यापासूनि करी रक्षण । मज मरण सध्या आले ॥२९॥

मग तो ऋषी करुणाघन । हुंकारे जाळी पक्षिगण । मग राजा स्वस्थ होऊन । कर जोडोन उभा असे ॥१३०॥

वक्ता विनवी श्रोतयांशी । भृगु सांगोन पुराणाशी । खंडिल पापाच्या महाराशी । राजयाशी करील मुक्त ॥३१॥

गणेशकथा मंदाकिनी । अनंतजन्मापापहारिणी । येथे सुस्नात होता जनी । जन्ममरण दुरावती ॥३२॥

जयजय गजवदना । आदिपुरुषा निरंजना । पुढे करवी पद्यरचना । येईल मना तैसी तुझे ॥३३॥

स्वस्तिश्रीगणेशप्रताप अद्‌भुत । उपासनाखंड रसभरित । श्रोते श्रवण करा गोड बहुत । तृतीयोध्याय गोड हा ॥१३४॥

अध्याय ३ ॥ ओव्या ॥१३४॥

N/A

References : N/A
Last Updated : September 21, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP