अध्याय ८० वा - श्लोक २१ ते २५

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


अग्रहीच्छिरसा राजन्भगवाँल्लोकपावनः । व्यलिम्पद्दिव्यगन्धेन चन्दनागुरुकुङ्कुमैः ॥२१॥

जे कां लोकत्रयपावनी । मस्तकी मिरवी पिनाकपाणी । त्रिपथगामिनी मंदाकिनी । प्रक्षाळवणी ज्या पदींचें ॥४॥
असो ज्याचिया नामस्मरणें । अघागेन्द्रां भस्म करणें । त्या श्रीकृष्णें शिरसा धरणें । पदावनेजन विप्राचें ॥२०५॥
प्रतिष्ठूनि कनकपीठीं । अर्ची सप्रेमें जगजेठी । अगुरु केशर चंदनघृष्टि । तें चर्ची बोटीं दिव्य गंध ॥६॥
प्राणसखा जिवलगमित्र । तत्पूजनीं प्रेमादर । तिलक रेखूनि मनोहर । मलयागर विलेपिला ॥७॥
दिव्य सुगंधपरिमळरोळा । अरर्द्र उठीवरी केला उधळा । वरी अर्पिल्या मंदारमाळा । अक्षता सुढाळा शोभविल्या ॥८॥

धूपैः सुरभिभिर्मित्रं प्रदीपावलिभिर्मुदा । अर्चित्वावेद्य ताम्बूलं गां च स्वागतमब्रवीत् ॥२२॥

सुरवरसेव्य दशाङ्गधूप । अनळीं योजूनि धरी समीप । पोतासप्रमुख बहुविध दीप । करी साक्षेप दीपावळी ॥९॥
अमृताहूनि जो विशेष । तैसा नैवेद्य अर्पिला सुरस । गंडूषपात्रीं आंचवणास । देऊनि मुखवास समर्पिला ॥२१०॥
रोचक पाचक रसाळ फळें । ताम्बूल दिधला त्रयोदशमेळें । धेनु अर्पूनि मग पुशिलें । स्वागत देवें द्विजा प्रति ॥११॥
स्वामि येतां मार्गीं श्रमला । येरु म्हणे दर्शनें श्रम परिहरला । दक्षिणे ठेवूनि तुळसीदळा । करी सोज्वळा नीराजनें ॥१२॥
पुष्पाञ्जली वाहूनि मुकुटीं । स्तुतिस्तवनें मधुर गोठी । मस्तक ठेवूनि पादपीठीं । सुखसंतुष्टी पावविला ॥१३॥
परम अघटित आश्चर्यकर । घटनापटुतर जगदीश्वर । देखूनि चक्ति विधि शंकर । नरसुरमुनिवरशक्रेंसीं ॥१४॥
तें अवधारीं कौरवराया । कोणतें आश्चर्य गमलें तया । मजही उत्साह सांगावया । कारण विस्मया जाणोनी ॥२१५॥

कुचैलं मलिनं क्षामं द्विजं धमनिसन्ततम् । देवी पर्यचरद्भैमीचामरव्यजनेन वै ॥२३॥

वस्त्रखंडें ग्रथितें जीर्ण । या लागिं कुचैल तो ब्राह्मण । क्षुप्तिपासापीडित दीन । परम म्लान मलिनाङ्ग ॥१६॥
केवळ अस्थींचा पांजरा । टळटळीत दिसती शिरा । ऐसियातें व्यजनवारा । घाली सुन्दरा वैदर्भी ॥१७॥
जयेचे कृपेचा अपाङ्गपात । व्हावया सुरवर आर्त्तभूत । मुनिवर तपश्चर्यानिरत । जगन्माता भीमकी ते ॥१८॥
सर्वाभरणीं विराजमान । दिव्य कनकाम्बर परिधान । रत्नदंडी चामर धरून । वीजी ब्राह्मणा अघटित हें ॥१९॥
विस्मय गमला कवणाप्रति । तोही पर्सें परीक्षिती । परमाह्लाद पावोनि चित्तीं । श्रीशुक कथीं तें ऐका ॥२२०॥

अन्तःपुरजनो दृष्ट्वा कृष्णेनामलकीर्तिना । विस्मितोऽभूदतिप्रीत्या अवधूतं सभाजितम् ॥२४॥

अंतःपुरनिवासिजन । विस्मित जाला तें देखून । केवळ अवधूत ब्राह्मण । श्रीभगवान स्वयें अर्ची ॥२१॥
ज्या कृष्णाची अमळ कीर्ति । सनकादि वैकुण्ठभुवनीं गाती । सुरवर मुनिवर निगम प्रभृति । त्रिजगीं स्मरती स्वहितार्थ ॥२२॥
तया कृष्णानें ब्राह्मण । अवधूत गूढलिङ्गी पूर्ण । कुचैल म्हणिजे विवर्णवसन । त्यातें पूजून तोषविलें ॥२३॥
अमलकीर्ति श्रीकृष्णानें । प्रीतिपूर्वक अंतःकरणें । ब्राह्मणा अवधूता कारणें । अतिसम्मानें पूजिलें ॥२४॥

किमनेन कृतं पुण्यमवधूतेन भिक्षुणा । श्रिया हीनेन लोकेऽस्मिन्गर्हितेनाधमेन च ॥२५॥

ऐसें देखूनि अंतःपुरीं । निवासनिष्ठा ज्या नरनारी । म्हणती यानें जन्मान्तरीं । सुकृतसामग्री संग्रहिली ॥२२५॥
या अवधूत ब्राह्मणें । पूर्वीं जोडिलीं कोण पुण्यें । ऐसियातें कमलारमणें । अतिसम्मानें पूजियलें ॥२६॥
केवळ भिकारी भिक्षुक । श्रिया हीन दरिद्री रंक । लोकीं निंद्य जो सकळंक । नीच याचक अधम हा ॥२७॥
येणें केलें सुकृत काय । तेणें पुण्यें त्रैलोक्यराय । सम्मानूनि पूजिता होय । परमाश्चर्य हेंचि गमे ॥२८॥
शालिग्राम न भजे शंखा । बृहस्पति न भजे मूर्खा । भू न भजे नीच याचका । श्रीनायका अनर्ह हें ॥२९॥
श्रीकृष्णाचें स्वरूप काये । तो जा पूजी कवण्या न्यानें । अंतःपुरजन बोलता होये । परमाश्चर्यें तें ऐका ॥२३०॥

N/A

References : N/A
Last Updated : June 06, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP