अध्याय ८० वा - श्लोक ६ ते १०

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


श्रीशुक उवाच - कृष्णस्याऽऽसीत्सखा कश्चिद्ब्राह्मणो ब्रह्मवित्तमः ।
विरक्त इन्द्रियार्थ्रेषु प्रशान्तात्मा जितेन्द्रियः ॥६॥

योगियांमाजि योगाग्रणी । ब्रह्मनिष्ठां चूडामणि । सर्वज्ञ वक्ता श्रीशुकमुनि । वदे तोषूनि कुरुवर्या ॥९६॥
भारतकुलाब्धिसंभवसोम । कुरुउडुगणामृतधाम । विष्णुरात जो कैवल्यकाम । श्रोता सत्तम परीक्षिती ॥९७॥
तयातें म्हणे शुकाचार्य । कृतप्रश्नार्थ होईं धुर्य । सादर श्रीकृष्णाचें वीर्य । परिसें आर्य प्रियतम जें ॥९८॥
कोणी एक ब्राह्मणोत्तम । ब्रह्मनिष्ठ मुनिसत्तम । इन्द्रियार्थ विरक्त परम । प्रशान्तात्मा जितेन्द्रिय ॥९९॥
ब्रह्म ऐसें वेदासि नाम । वेदत्रयीप्रतिपाद्य धर्म । त्या वेदाचें गात्रोत्तम । जें अध्यात्म ब्रह्मविद्या ॥१००॥
निष्कामवर्णाश्रमाचरण । अलोट ईश्वराज्ञा प्रमाण । तेणें विशुद्ध अंतःकरण । यास्तव श्रीकृष्ण ज्यासी सखा ॥१॥
सुषुप्ता स्वप्नींची साम्राज्यपदवी । तृषितां मृगां मृगजळ जेंवि । कीं कामुकां कामिनीध्यान गोंवी । तेंवि जग भ्रमवी भवभ्रम हा ॥२॥
तया भ्रमाचें निरसन ।  होतां अध्यात्मबोधेंकरून । तैं जागृता न बाधीच स्वप्न । वैराग्यसंपन्न तेंवि विषयी ॥३॥
पक्षी न भुलेचि मृगजळा । जरठ मुमूर्षु न चित्ती अबळा । तेंवि उभयभोगभ्रमसोहळा । उपजे कांटाळा मिथ्यत्वें ॥४॥
चालतां बोलतां शरीर मढें । तें आणिकाप्रती वृथाचि रडे । विषयभ्रमें भ्रमित वेडे । ऐसें सांकडे सांकडा ॥१०५॥
वास्तवबोधें मिथ्याविषय । म्हणोनि प्रशान्त जितेन्द्रिय । संकल्पशून्य मानस होय । तै म्हणों ये प्रशान्तात्मा ॥६॥
जेणें कल्पिलें चराचर । तें मन जाहलें कृष्णाकार । यालागि कृष्ण सखा साचार । तो मुनिवर तपोधन ॥७॥
राया म्हणसी विरक्त ऐसा । तयाचा योगक्षेम चाले कैसा । तो परियेसीं कौरवाधीशा । होय तैसा तुज कथितों ॥८॥

यदृच्छयोपपन्नेन वर्तमानो गृहाश्रमी । तस्य भार्या कुचैलस्य क्षुत्क्षामा च तथाविधा ॥७॥

अनायासें यदृच्छेंकरून । जें संपादे दैवोपपन्न । तेणें गृहस्थाश्रमाचरण । चालवी पूर्ण संतोषें ॥९॥
अयाचित व्रताचा नेम । गृहस्थाश्रमाचार निष्काम । सर्वांभूतीं भगवत्प्रेम । ब्रह्माध्यात्मपारग जे ॥११०॥
न पाहे जो प्रपंचाकडे । न म्हणे फार किंवा थोडें । जे जे काळीं जें जें जोडे । तितुकेन घडे तत्सिद्धि ॥११॥
वस्त्रखंडें अस्ताव्यस्त । रंगविरंग उचितानुचित । बहुता सूचिदोरकें ग्रथित । योजी संप्राप्त परिधानीं ॥१२॥
यालागिं तो कुचैलनामा । तयाची भार्या तयाचिसमा । विकळगात्रा जे क्षुत्क्षामा । अभंगनियमा दृढव्रता ॥१३॥
दृढव्रता म्हणाल कैशी । जितुकें अन्न जिये दिवशीं । प्राप्त तेणेंचि हव्यकव्यासी । समस्तांसी संतर्पी ॥१४॥
कान्त मानूनि निजदैवत । तदाराधनीं अतंद्रित । उपपन्नान्नें करी तृप्त । स्वयें निवान्त क्षुत्क्षामा ॥११५॥
चर्में मढिलें अस्थिपंजरा । वरी टळटळित उमटल्या शिरा । निःशेषता मांसरुधिरा । धैर्यें शरीरा वर्तवी ते ॥१६॥
वसनखंडें बांधूनि पोट । क्षुधेतृषेचे न मनी कष्ट । सुशील सदाचारनिष्ट । सुकृत यथेष्ट संपादी ॥१७॥
जैशा कळिकाळींचिया कळा । तैशी नोहे द्विजाची अबळा । वसनान्नावीण नोहे विकळा । परमसुशीळा पतिव्रता ॥१८॥
पतिशेजारीं सुखक्रीडणें । न संभवेचि अन्नेंविणें । पति संतुष्ट न करितां जिणें । निष्फळ म्हणे भूभार ॥१९॥

पतिव्रता पतिं प्राह ग्लायता वदनेन सा । हरिद्रा सीदमाना सा वेपमानाऽभिगम्य च ॥८॥

पतिव्रतेचा मुख्य नियम । अनुलक्षूनि पतीचे कर्म । तदनुसार वर्तवी वर्ष्म । स्वयें निर्मम निर्लोभ ॥१२०॥
ऐसी द्विजाची पतिव्रता । कोण्हे एके समयीं चित्ता - । माजि मानी निर्दैविता । न घडे कान्तार्चन मातें ॥२१॥
सर्वोपचारी कान्तार्चन । करूं इच्छी माझें मन । परी मी अभाग्य दैवहीन । मनोरथ पूर्ण केंवि होय ॥२२॥
ऐसें चित्तीं चिन्ती सती । तंव तो हृदयस्थ जगत्पती । कृपेनें द्रवूनि प्रेरी मती । ते सच्छ्रोतीं परिसावें ॥२३॥
म्हणे उपाय आहे एक । करूनि पाहूं तो नावेक । पूर्णकर्ता श्रीनायक । मनीं निष्टंक विवरूनियां ॥२४॥
उषःकाळादिरजनीप्रहर । पर्यंत सारूनि आह्निकाचार । शयनीं पहुडलिया भर्तार । जाहली सादर शुश्रूषणा ॥१२५॥
तये समयीं कान्ताप्रति । परम सभय करी विनती । कंपायमाना होत्साती । शंके अनुचितीं प्रवर्वतां ॥२६॥
निजकान्ताचें जें ऐश्वर्य । त्याहूनि तुच्छ अमरधुर्य । पतिव्रतांचें ऐसें धैर्य । हें अनार्य अनुचित पैं ॥२७॥
तथापि हृदयस्थें प्रेरिली । कीं सुकृतरेखा उदया आली । म्हणोनि बुद्धि अवलंबिली । दृढतर जाहली तद्योगें ॥२८॥
तोंड वाळलें काचरीपरी । दरिद्रें जर्जरता शरीरीं । भोगविकळता सर्व गात्रीं । भासे वक्त्रीं म्लानता ॥२९॥
ऐशी अवस्था जिये शरीरीं । पतिव्रता द्विजसुन्दरीं । कैसी स्वकात्ना विनती करी । ते अवधारीं कुरुवर्या ॥१३०॥

ननु ब्रह्मन्भगवतः सखा साक्षाच्छ्रियः पतिः । ब्रह्मण्यश्च शरण्यश्च भगवान्सात्वतर्षभः ॥९॥

म्हणे भगवंता ब्राह्मणोत्तमा । तुम्ही सदैव कथितां आम्हां । जें आपुला सखा हरि परमात्मा । ज्याची वामा विश्वश्री ॥३१॥
बहुतेक तुमचा सखा भगवंत । जो प्रत्यक्ष कमलाकान्त । ब्रह्मण्यत्वें ब्राह्मणभक्त । जो शरणागत नुपेक्षी ॥३२॥
शरणागता वज्रपंजर । ऐसा बिरुदाचा तोडर । भक्तपति यादवेश्वर । जो साचार निगमात्मा ॥३३॥
ऐसा सखा तुमचा असतां । कायसी आम्ह हे भवचिन्ता । अखंड ज्यातें हृदयीं स्मरतां । त्याप्रति जातां कां उशीर ॥३४॥

तमुपैहि महाभाग साधूनां च परायणम् । दास्यति द्रविणं भूरि सीदते ते कुटुंबिने ॥१०॥

ज्याचा सखा श्रीभगवान । त्या महाभाग संबोधन । देतां सखीचें निःशंक मन । सभाग्य पूर्ण हरिमंत्रें ॥१३५॥
म्हणे सभाग्य भो मम कान्ता । तुवां त्याप्रति जाइजे आतां । सर्वज्ञ सर्वात्मा तत्वता । जाणे वृत्तान्ता न सांगतां ॥३६॥
तो साधूंचा परायण । ज्यातें प्रियतम साधू पूर्ण । वंदी साधूंचे श्रीचरण । थोर लहान न म्हणूनी ॥३७॥
आपआपणा प्रियतमपणें । जेणें साधूसी सम्मानणें । तेणें देखतां तुजकारणें । तव वेदने जाणेल ॥३८॥
कुटुंबवत्सल अयाचित । दरिद्रदोषें वेदानाभूत । ब्रह्मनिष्ठ दृढव्रत । जाणोनि त्वरित तुजलागीं ॥३९॥
द्रविण म्हणिजे बहुत धन । देईल होउनी सुप्रसन्न । असतां सखा श्रीसंपन्न । भोगिजे दैन्य कासया ॥१४०॥
जावें नलगे देशान्तरीं । नांदतो अष्टयोजनें दुरी । परम कारुण श्रीहरी । ऐकें थोरी तूं त्याची ॥४१॥

N/A

References : N/A
Last Updated : June 06, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP