अध्याय ८० वा - श्लोक ४१ ते ४५

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


एतदेव हि सच्छिष्यैः कर्तव्यं गुरुनिष्कृतम् । यद्वै विशुद्धभावेन सर्वार्थात्मार्पणं गुरौ ॥४१॥

नियमाचरण म्हणाल कैसे । तरी इतुकेंचि जाणावें विश्वासें । गुरुप्रत्युपकरणमिसें । तनुवाङ्मानसें विनटावें ॥५३०॥
कायावाचा मनें द्रविणें । पदार्थमात्रें उपचारभरणें । सद्गुरूसी शरण जाणें । इतुकेंचि करणें आवश्यक ॥३१॥
सच्छिष्यांहीं ऐसियापरी । सद्गुरूप्रति प्रत्युपकारीं । तनुवाङ्मनें सर्वोपचारीं । अवंचक प्रकारें भजिजे पैं ॥३२॥
परम विशुद्ध भावेंकरून । सर्वार्थ साधती ज्यापासून । तो देह सद्गुरूसी समर्पून । भजिजे अनन्य सद्भावें ॥३३॥
इतुकेनि गुरुभजनाची सिद्धी । सिद्धी गेलीचि हें त्रिशुद्धी । जाणिजे सच्छिष्यीं प्रबुद्धीं । वृथा उपाधी यावीण त्या ॥३४॥
न लगती पहावे अनाध्याय । न लगे शिक्षा सांप्रदाय । अवंचकभावें भजतां हृदय । वसविती आम्नाय गुरुवरें ॥५३५॥
श्रुतिस्मृतिमय मंत्रमाळा । चौदा विद्या चौसष्टी कळा । गुरुप्रसादें हृदयकमळा । येती अमळा शिष्याचिया ॥३६॥
ऐसा देऊनि नाभीकार । आश्वासूनि निजानुचर । मुखावरूनि उतरूनिं कर । आणिलें सत्वर सदनासी ॥३७॥
कृपापल्लवें परिमार्जिलें । अमृतदृष्टी अवलोकिलें । क्लेशकर्दमा प्रक्षाळिलें । मग जे बोलिलें तें ऐका ॥३८॥

तुष्टोऽहं भो द्विज श्रेष्ठाः सत्याः सन्तु मनोरथाः । चन्दास्ययातयामानि भवंत्विह परत्र च ॥४२॥

म्हणे भोभो द्विजोत्तम हो । तुमचा मनोरथ पूर्णता लाहो । देखोनि अगाध अवंचक भावो । तुटलों पहा हो मी तुम्हां ॥३९॥
अवंचकभावें परिचर्येतें । तुम्हीं संतुष्ट केलें मातें । साफल्य तुमच्या मनोरथातें । सत्यत्व लाहो मम वरें ॥५४०॥
माझिया आशीर्वादें करून । तुमचे मनोरथ येथून पूर्ण । सत्यसाचार मद्वरदान । ब्रह्मा लंघन करूं न शके ॥४१॥
एक तोषलिया सद्गुरु । तोष पावती विधिहर शक्र । किंबहुना हें चराचर । गुरुवरतोषें संतोषे ॥४२॥
मुनिसुर सद्गुरूचे अवयव । प्रणव सद्गुरूचा वक्प्रभव । सद्गुरुवाक्याचे समुदाव । ते आम्नाय जाणावे ॥४३॥
सकळ तीर्थांचिया श्रेणी । वसती सद्गुरूच्या चरणीं । स्वयें तेथिंच्या पवित्रपणीं । जगदघहरणीं पटु होती ॥४४॥
तस्मात तोषवितां देशिका । तोष होय विश्वात्मका । तुमचिया निष्ठा अवंचका । देखोन संतोख पावलों ॥५४५॥
येथूनि तुमचे मनोरथ । मद्वारदानें सत्य होत । इतुकें बोलूनि सद्गुरुनाथ । वर वोपीत कृपेनें ॥४६॥
वाजसनेयादि कण्वपठितें । छंदें अयातयाम समस्तें । तैत्तिरीयादिशाखाधीतें । यातमानें मुनि म्हणती ॥४७॥
कण्वशाखीं जाणोनि कुमरां । अयातयामा छंदोनिकरा । कृपेनें स्पर्शूनि आमुच्या शिरा । वोपिली गिरा गर्जूनी ॥४८॥
अयातयामें मद्वरदानें । छंदें प्रकटती तुमच्या वदनें । इहामुत्र साफल्य तेणें । आशीर्वचनें पैं माझ्या ॥४९॥
अयातयामाची व्युत्पत्ती । परिसा व्याकरणसंमती । शिजलीं अन्नें प्रहराअंतीं । निःसार होती विरसत्वें ॥५५०॥
धगधगीत उष्ण वाफा । निघती अन्नांतूनि घपघपां । कव्ययज्ञीं तें उष्मपां । पितरां प्रियतम सरसत्वें ॥५१॥
यातयाम जें विगतसार । हव्यकव्यीं निर्जर पितर । न सेविती नीरसतर । ऐसें साचार श्रुतिगदित ॥५२॥
यातयामान्न विगतसार । तैसे निःसार पदार्थमात्र । यातयाम हा नामोच्चार । वदती कविवर गौणत्वें ॥५३॥
तस्मात् अयातयाम छंदें । संसारवीर्योत्तरें जीं विशदें । प्रसन्न होऊनि परमानंदें । देशिकें वरदें प्रबोधिलीं ॥५४॥
तियें तत्काळ हृदयकमळीं । प्रकटलीं जैसा अंशुमाळी । स्वप्रकाशें नभोमंडळीं । त्रिजग उजळी उगवूनी ॥५५५॥
तैसे निगमागम अवग्र । हृदयीं प्रकाशले समग्र । ऐसा अनुग्रहचमत्कार । द्विजोत्तमा तुज स्मरतो कीं ॥५६॥

इत्थंविधान्यनेकानि वसतां गुरुवेश्मसु । गुरोरनुग्रहेणैव पुमान्पूर्णः प्रशान्तये ॥४३॥

एके दिवशींची किंचित्सेवा । ते मात्र स्मरली म्यां भूदेवा । ऐसा शुश्रूषानिकर अघवा । प्रकट न करावा निजवदनें ॥५७॥
याचिऐशीं बहुविध कर्में । अघटितघटितें अतिदुर्गमें । गुरुदुर्गमें गुरुमंदिरीं वसतां प्रेमें । तियें तुज नियमें स्मरती कीं ॥५८॥
मानसपूजा हे अनुदिनीं । नित्यनेमें आमुचे मनीं । ध्यानस्थे बैसोनि एकासनीं । करूं गुरुसदनीं परिचर्या ॥५९॥
अल्प कांहीं घडली पूर्वीं । तितुकी सप्रेम स्मरूनि जीवीं । आह्निकाचारें ते आघवी । मनोमय बरवी करूं सदा ॥५६०॥
यास्तव विसर न पडे आम्हां । माजि अवगमे नित्य नेमा । म्हणोनि प्रश्न तुज द्विजोत्तमा । स्मरसी कीं ना हा केला ॥६१॥
गुरुशुश्रूषा सप्रेमभजनीं । गुरुसंतोष संपादूनी । प्रसन्न केलिया कैवल्यदानीं । सर्व साधनीं साफल्य ॥६२॥
गुरूच्या पूर्ण अनुग्रहें करून । चारी पुरुषार्थ साधती जाण । पुरुषासी प्रशमाचें कारण । गुरुशुश्रूषण मुख्यत्वें ॥६३॥
गुरुशुश्रूषेवीण इतरें । साधनें नव्हती वीर्योत्तरें । हें वर्म जाणोनियां चतुरें । गुरुपरिचर्ये विनटावें ॥६४॥
ऐसें पूर्वीं गुरुसेवन । घडलें तुम्हां आम्हां लागून । पूर्णकृपेनें ब्रह्मनिर्वाण । उभयां समान प्रबोधिलें ॥५६५॥
अद्यापि कायसा भ्रवभ्रम । तुम्ही केवळ पूर्णकाम । तुम्हां आम्हां भेद विषम । सहसा अणुमात्र असेना ॥६६॥
ऐशी भगवन्मुखींची वाणी । ब्राह्मणें परिसोनियां श्रवणीं । म्हणे सहाध्यायी चक्रपाणी । कवण्या पुण्यें मज आतां ॥६७॥

ब्राह्मण उवाच - किमस्माभिरनिर्वृत्तं देवदेव जगद्गुरो । भवता सत्यकामेन येषां वासो गुरावभूत् ॥४४॥

ब्राह्मण म्हणे भो शेषशायी । मज हें गुरुदास्य घडलें नाहीं । जगद्गुरु तूं सर्वां देहीं । जाणसी सर्वही हृदयस्थ ॥६८॥
सकळदेवांसी तूं भजनीय । देवदेवोत्तम आर्या आर्य । तुझेनि सहवासें गुरुदास्यकार्य । घडलें कीं ना मी नेणें ॥६९॥
सत्यसंकल्प सत्यकाम । पूर्णचैतन्य कैवल्यधाम । तुझेनि समागमें गुर्वाश्रम । आम्हीं सप्रेम वसविला ॥५७०॥
तेव्हां काय न घडलें आम्हां । सर्वही घडलें पुरुषोत्तमा । तुझिया सहवासाचा महिमा । नेणे ब्रह्मा शिव शक्र ॥७१॥
ज्या आम्हासि गुरूच्या सदनीं । समागम तुझा चक्रपाणि । कोण्या पुण्यें जाला म्हणोनी । हृदयभुवनीं विस्मित मी ॥७२॥
आम्हांसि घडला तव संगम । हाचि गुरूचा अनुग्रह परम । तूं प्रत्यक्ष कैवल्यधाम । कल्पद्रुम प्रणतांचा ॥७३॥
गुरुपरिचर्या आचरून । कृपेनें शिक्षित केले जन । सत्प्रवृत्तिप्रतिपादन । भवनिस्तरणें प्रबोधिलें ॥७४॥
येर्‍हवीं तुझें जें वास्तव । पाहतां स्वरूप सावयव । मर्त्यनाट्याचें लाघव । तेंचि हें सर्व अवधारीं ॥५७५॥

यस्य च्छंदोमयं ब्रह्म देह आवपनं विभो । श्रेयसां तस्य गुरुषु वासोऽत्यंतविडंबनम् ॥४५॥

छंदोमय जें वेदाख्य ब्रह्म । श्रेयस्कराचा जेथूनि जन्म । तें ज्या तुझें मूर्त्त वर्ष्म । हें जाणती वर्म विपश्चित ॥७६॥
त्या तुज निगमाध्ययनासाठीं । वसूनि शिष्यत्वें गुरुच्या मठीं । करणें परिचर्याराहटी । हे तव गोठी अवगणीची ॥७७॥
मनुष्यनाट्या संपादणी । तुझी अवघी हे चक्रपाणी । गुरुपरिचर्याविडंबनीं । भवनिस्तरणीं कृतनौकां ॥७८॥
ऐसा ब्राह्मण ते अवसरीं । श्रीकृष्णातें मधुरोत्तरीं । वदला तेणें अभ्यंतरीं । परमानंद हरि मानी ॥७९॥
कृष्ण तोषूनि आपुले जीवीं । म्हणे हा ब्राह्मण पूर्णानुभवी । सहसा न गुते भववैभवीं । भेटला केंवीं दैवबळें ॥५८०॥
याचें दर्शन श्रेयस्कर । आम्हां घडला लाभ थोर । ऐसें हृत्कमळीं श्रीधर । मानूनि सादर त्या पुसलें ॥८१॥
पुढिले अध्यायीं ते कथा । परीक्षितीतें श्रीशुक वक्ता । निरूपील ते सावध श्रोतां । एकाग्रता परिसावी ॥८२॥
तें हें श्रीमद्भागवत । अठरासहस्रश्लोकपरिमित । परमहंस रमती जेथ । शुकपरीक्षितिसंवाद ॥८३॥
तो हा अशीतितमाध्याय ।  गुरुपरिचर्या यादवराय । भेटतां स्वाध्यायी द्विजवर्य । पुसता जाला ते कथिली ॥८४॥
या वरी एकाशीतितम । अध्याय उपायिला उत्तम । अपूर्व निर्मूनि हेमधाम । वोपी विश्राम पतिव्रते ॥५८५॥
सद्गुरुपरिचर्येच्या श्रेणी । जो आचरला प्रेमेंकरूनी । तो प्रत्यक्ष प्रतिष्ठानीं । अवतरूनि विराजला ॥८६॥
गुरुसेवेची हृदयीं गोडी । म्हणोनि श्रीकृष्णा अतिआवडी । खांदा वाहूनि कावडी । वाहे परवडी जल सदनीं ॥८७॥
परिचर्येतें अतंद्रित । उगाळूनि श्रीखंड बहुत । अर्पी म्हणोनि नामसंकेत । कृष्ण श्रीखंड्या जन वदनीं ॥८८॥
चिदानंदें सर्वकाळीं । स्वानंदभरित नामावळी । गोविन्द जपतां हृदयकमळीं । होय होळी कळीमळाची ॥८९॥
गोविन्दाचे स्मरतां पाय । दयार्नव परिपूर्णता लाहे । हरिवरदाचा वक्ता होय । हे निजसोय गुरुभजनीं ॥५९०॥
गौतमीच्या दक्षिणतटीं । वसतां पिपीलिके माजि स्वमठीं । कृष्णद्विजाच्या मिथा गोठी । कथिली राहाटी गुरुगृहींची ॥५९१॥
इति श्रीमद्भागवते महापुराणेऽष्टादशसाहस्त्र्यां पारमहंस्यांसंहितायां दशमस्कंधे श्रीशुकपरीक्षित्संवादे हरिवरदाटीकायां दयार्णवानुचरविरचितायां भगवद्ब्राह्मणसंवादे गुरुपरिचर्यानुस्मरणं नामाशीतितमो‍ऽध्यायः ॥८०॥
कालयुक्ताक्षिके भाद्रे द्वितीया वद्य भास्करे । द्विजाधोक्षजसंवादनामाध्यायः समापितः ॥१॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ श्लोक ॥४५॥ टीका ओव्या ॥५९१॥ एवं संख्या ॥६३७॥ ( ऐशींवा अध्याय मिळून ओवी संख्या ३६२०६ )

ऐशींवा अध्याय समाप्त.

N/A

References : N/A
Last Updated : June 06, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP