अध्याय ८० वा - श्लोक ३१

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


कच्चिद्गुरुकुले वासं ब्रह्मन्स्मरसि नौ यतः । द्विजो विज्ञाय विज्ञेय तमसः पारमश्नुते ॥३१॥

अगा ब्राह्मणोत्तमा स्वामी । गुरुकुळीं म्हणिजे गुरूचे धामीं । कांहीं दिवस निष्कामकामी । शुश्रूषाधर्मी पैं होतों ॥५९॥
ज्या करणास्तव शुश्रूषापर । कित्तेक काळ गुरूचें घर । वसविलें तें निरंतर । तुझें अंतर स्मरतें कीं ॥२६०॥
गुरूपासूनि जाणिजे बरवें । नमनें प्रश्नें सेवनें भावें । जाणोनि घेतलिया तें आघवें । निस्तरावें अंधतम ॥६१॥
विवर्तरूप जो भवभ्रम । अहंतेपासूनि अंधतम । पर्यंत जो कां अतिदुर्गम । लाहिजे नुगम माजूनियां ॥६२॥
गुरुसेवनें निष्ठाबळें । गुरुप्रसादें विज्ञान विवळे । भ्रमतम जो हा भ्रम मावळे । मग मिळिजे केवळें अमृतत्वीं ॥६३॥
तुम्हां आम्हांतें एकचि समयीं । स्वमुखें बोधिलें असे गुरुगृहीं । अद्यापि भवभ्रमत वर्ते देहीं । जे समता नाहीं म्हणतसां ॥६४॥
अध्यारोपाचा अपवाद । करूनि चिदैक्य बोधिलें विशद । जिहीं ते गुरु अमृतप्रद । तयांचें पद स्मरतां कीं ॥२६५॥
बहुधा गुरु असतां सृष्टी । त्यामाजि निर्णीत गुरुत्रयकोटी । त्यांतही तृतीय सर्वां मुकुटीं । जो भवसंकटीं कैपक्षी ॥६६॥
बहुधा म्हणिजे कैसें कोण । गुरुत्रयाचें काय लक्षण । तारी भवतम निस्तरून । तो ही सकरुण अवधारा ॥६७॥

स वै सत्कर्मणाम साक्षाद्विजातेरिह संभवः आद्योंऽग यत्राश्रमिणां यथाहं ज्ञानदो गुरुः ॥३२॥

बहुधा माजी त्रिधा श्रेष्ठ । त्यांतही अमृतप्रद वरिष्ठ । ऐसें प्रतिपादी वैकुण्ठ । अंतरनिष्ठ अपरोक्ष ॥६८॥
प्रवृत्तिप्रवाहसाधन । मुख्य मर्त्या अन्नाच्छादन । तद्विद्येचें प्रबोधन । करिती म्हणून बहुधा तें ॥६९॥
गाणें नाचणें लिहिणें पठणें । शस्त्रास्त्रविद्या मल्लां भिडणें । उच्च अवघडीं अगम्य चढणें । किंवा उडणें नभोगर्भीं ॥२७०॥
कुलाल कार्मार दिवाकीर्ती । त्वष्टा शिल्पिक तांबट खाती । स्वर्नस्तेयादि अनेक जाती । जठरभरणार्थ शिक्षिती जे ॥७१॥
ऐसियांतेंही होऊनि शरण । गुरुत्वें पूजूनि धरिजे चरण । ऐसे बहुधा गुरु जे जाण । प्रवृत्तिप्रवीण निरूपिले ॥७२॥
चोरव्याघ्रादि दुर्घटमार्गीं । पडतां कृपाळु जो आपंगी । अल्पस्वल्प होऊनि संगी । दावी सवेगीं सत्पथ जो ॥७३॥
तेणें दिधलें जीवदान । यालागिं तोही गुरुत्वें मान्य । बुडतां काढी उदकांतून । तो त्या समान कीं ना हो ॥७४॥
उटजीं प्रदीप्त हिरण्यरेता । त्यामाजि गाढमूढ प्रसुप्तां । बोधवूनि काढी त्या करुणावंता । गुरुत्व तत्वता असे कीं ॥२७५॥
किंवा विषाक्तअन्नपान । सेवितां त्यागवी जो बोधून । तेणें दिधलें जीवदान । तैं तो पूर्ण गुरु नव्हे ॥७६॥
ऐसे सदय क्लेशापहारी । जीवदानी परोपकारी । पूज्य गुरुत्वाचिये हारीं । कथितां वैखरी अनावर ॥७७॥
ऐसे प्रवृत्तिप्रद बहुविध । त्यांमाजि निर्णीत जे कां त्रिविध । ऐका होऊनियां सावध । जे बोधी प्रबुद्ध श्रीकृष्ण ॥७८॥
जेणें स्ववीर्यें जननीजठरीं । उत्पन केलें स्थूळशरीरी । मग हे बहुविध बाह्याकारी । गुरुत्वाधिकारी पैं जाले ॥७९॥
यालागीं आदिगुरु तो पिता । अनन्यभावें त्यातें भजतां । मोक्षाधिकारी होय तत्वता । गुरु प्रथमता तो एक ॥२८०॥
द्वितीय वर्णाश्रमाधार । करी उपनयनादिसंस्कार । वेदाध्यापक स्वकर्माचार । बोधी साचार सन्मार्ग ॥८१॥
मंत्रयंत्रांचा उपदेष्टा । नाना प्रयोगागमचेष्टा । द्वितीय गुरूमाजि निष्ठा । सत्य अभीष्ठा बोधक जो ॥८२॥
आतां तृतीय उत्तम पुरुष । ज्ञानप्रद जो मी परेश । निरसीं भवभ्रमाचा दोष । बोधीं अपरोक्ष अमृतत्व ॥८३॥
सर्व वर्ण सर्वाश्रम । बोधूनि वोपी कैवल्यधाम । पूर्णकृपेचा कल्पद्रुम । तो पुरुषोत्तम मीचि स्वयें ॥८४॥
कर्मेपादेष्टा जो गुरु । तोही भवसागरीचेंचि तारूं । सत्कर्मा नियमाचारु । विषयव्यापाय पारुषवी ॥२८५॥
स्वरकथाश्रवणवीषय । त्यातें निषेधूनि आम्नाय । नियमें बोधूनि छेदी भवभय । जो कां सदय कारुणिक ॥८६॥
त्वगिन्द्रियांची लिप्सा स्पर्शीं । तेथ करूनि शास्त्रदर्शी । शिवों नेदी निषिद्धासी । कर्ममार्गासी अनुसरवी ॥८७॥
कामक्षोभें स्वैर कामिनी । आलिङ्गना हाव मनीं । तेथ वेदाज्ञा प्रबोधूनी । पाणिग्रहणीं प्रवर्तती ॥८८॥
जाती आम्नायशाखाशोध । गोत्रनक्षत्रनिर्णयें शुद्ध । पाहूनि विवाह करितां सिद्ध । होय बाध स्वैरत्वा ॥८९॥
ऐसी परीणीत पाणिग्रहणीं । यत्नें शोधूनि कीजे गृहिणी । तेथही जघनक्रियाचरणीं । नियमित रजनी ऋतुकाळीं ॥२९०॥
क्रुद्धा क्षामा सदोष रुग्णा । व्रतस्था गुर्विणी प्रबोधहीना । इत्यादि अयोग्या मैथुना । सदाचरणा माजिवड्या ॥९१॥
चक्षु स्वैर रूपासक्त । तेथही श्रुतीनें केला नियत । निषिद्धदर्शनीं अंधवत । शास्त्रसंकेत जाणोनी ॥९२॥
रसना लालस स्वैर रसा । परि वेदाज्ञा धरूनि शिरसा । निषिद्धा न सेवी पीयूषा । न टकी विषा श्रुतिपूता ॥९३॥
सुरभि पूति गंधद्वय । प्रशस्त जाणोनि आम्नाय । यथाधिकारें सेविता होय । मेषजप्राय स्वहितार्थी ॥९४॥
वदों नये तें न वदे वाणी । करूं नये तें न करी पाणी । न चलिजे तेथ न चाले चरणीं । अगम्यागमनीं न प्रवर्ते ॥२९५॥
मळोत्सर्ग न करिजे जेथ । सहसा मेहन न करी तेथ । शौचाचारीं अतंद्रित । रक्षी नियत वर्ष्मक्रिया ॥९६॥
देखोनि भवरोग अवघड । सद्वैद्य भेषज योजी दृढ । पथ्या नियमूनियां सांकड । वर्जी धड गोड वावडें ॥९७॥
तैसे वयसा भरी विषय । यथेष्टाचरणें देती निरय । तेथ कर्मोपदेष्टा जो गुरुवर्य । रक्षी आम्नाय नियमूनि ॥९८॥
ईश्वरवेदगुरूच्या वचनीं । विश्वासपूर्वक कर्माचरणीं । निष्कामनिष्ठा क्षणक्षणीं । करी क्षाळणी मनोमळा ॥९९॥
वर्णाश्रमासी जें कां उचित । तें आचरवी अतंद्रित । मजसारिखाचि तो गुरुनाथ । म्हणे समर्थ श्रीकृष्ण ॥३००॥
ज्ञानप्रद याहूनि श्रेष्ठ । म्हणतां शंका उपजली स्पष्ट । कर्मठ कैसेनि कनिष्ठ । तें संतुष्ट अवधारा ॥१॥
तरी सत्कर्माचिया आचरणीं । अहंता वाढे कर्मठपणीं । मग तो ज्ञाननिष्ठा न गणी । कर्मबंधनीं बद्धत्वें ॥२॥
आचारशीळ मानी श्रेष्ठ । इतरा मानी कर्मभ्रष्ट । सहसा नोहे ब्रह्मनिष्ठ । ज्ञानवरिष्ठ नावगमे ॥३॥
येर्‍हवी रक्षी अघसंघटीं । परंतु गोवी कर्मकचाटीं । अभेदापरीक्षपरिपाटी । ते हातवटी उमजेना ॥४॥
कुळस्त्रीधर्मयोनिरक्षण । कान्तेसींही तैसीच जाण । वर्ततां होय निःसंतान । पडे खान स्वसुखाची ॥३०५॥
योनिरक्षण सतीचें व्रत । नीवीमोक्षण करितां कान्त । वसनरहित शंकातीत । स्वसुखें क्रीडत कान्तेंसीं ॥६॥
तैसें सत्कर्म श्रुतिप्रणीत । आचरिजे चित्तशुद्ध्यर्थ । नितान्तनिर्मळ जालिया चित्त । होइजे संतत सन्मात्र ॥७॥
ज्ञानाग्निदग्धकर्माणि । गीतेमाजि हे भगवद्वाणी । ज्ञानें जाळितां कर्मश्रेणी । त्यां पंडित म्हणोनि बुध म्हणती ॥८॥
देहात्मबोधीं कर्मनिष्ठा । जीवात्मबोधीं ध्याननिष्ठा । आत्मावबोधीं स्वरूपनिष्ठा । हें कर्मठा उमजेना ॥९॥
कवचटोपेंसीं सन्नद्धपणीं । प्रतापें शत्रु भंगिजे रणीं । गृहा आलिया रहित वसनीं । सहित तरुणी पहुडावें ॥३१०॥
जंवरी न कढी शिल्लेटोप । तोंवरी दुर्लभ सुखाचा जल्प । तेंवि ज्ञानोदयीं कर्मसंकल्प । नोहे अल्प उपयोगी ॥११॥
गंगापूर लंघनासाठीं । माजि बांधिजे सांगडी पेटी । गंगा लंघिल्या धोदगे कटीं । ते उफराटी विडंबना ॥१२॥
कर्मठतेचा अहंकार । कीं फळाशेचा बीजाङ्कुर । या दोषास्तव गुरुत्व अपर । श्रेष्ठतर ज्ञानप्रद ॥१३॥
ज्ञानियाच्या ठायीं कर्म । द्विविध असे तें ऐका वर्म । लोकसंग्रहमात्र नियम । संप्रज्ञात समाधिस्था ॥१४॥
पूर्वकर्माचरण मोडी । समूळ देहभावाते तोडी । देह वर्ते प्रारब्ध प्रौढी । कर्म घडमोडी न स्मरतां ॥३१५॥
संप्रज्ञात असंप्रज्ञात । दोघे समान समाधिवंत । त्यांमाजि साधकांचें स्वहित । संप्रज्ञात संपादी ॥१६॥
संप्रज्ञातसमादिवंता । शरण जाऊनि मुमुक्षु स्वहिता । साधी म्हणोनि त्या श्रेष्ठता । वदला जनिता ब्रह्मयाचा ॥१७॥
जनिता केवळ संसारदानी । कर्मठ रक्षी अधःपतनीं । ज्ञानप्रद तो सायुज्यसदनीं । समरसौनी विलसवी ॥१८॥
करूनि सर्व संशयच्छेद । हृदयग्रंथींचा करी भेद । भस्में करी जो कर्में त्रिविध । तो ज्ञानद वर सर्वां ॥१९॥
वेदवादाच्या पुष्पित वाणी । उभयभोगांची उभारणी । बोधूनि गोंवी कर्माचरणीं । यास्तव गौणी त्या गुरुता ॥३२०॥
ज्ञानप्रद जो कां गुरु । केवळ भवार्णवींचें तारूं । उमाणी व्यतिरेकें संसारु । अतद्विचार बोधूनी ॥२१॥
अनादि अविद्येमाजि चैतन्य । पतिबिम्बूनी जालें भिन्न । अध्यारोपा वरपडून । विपरीत ज्ञान अवलंबी ॥२२॥
सत्य ज्ञान अनंत वस्तु । सच्चिदानंद आत्मा नित्यु । विचरे तयाचा केला अस्तु । मग विपरीत अवलंबी ॥२३॥
सत्य मानिलें जगद्भान । चिप्रकाशमय करणवयुन । विषयावाप्ति आनंद पूर्ण । विपरीत ज्ञान तें ऐसें ॥२४॥
विसरे वस्तव तरणीलोप । तैं हरिणां किरणीं सलिलारोप । की रज्जु न भासूनि भासे सर्प । भ्रमें भय कंप अनुभवी ॥३२५॥
तेंवि आपण सन्मय वस्तु । विसरूनि म्हणे मी वर्ष्म अवस्तु । अभेदबोधा करूनि अस्तु । भेद प्रशस्त दृढावी ॥२६॥
म्हणाल सूर्य भिन्न मृगें भिन्न । पूर्वदृष्ट भिन्न जीवन । तदारोप किरणीं करून । भांबावोनि भ्रमताती ॥२७॥
तैसें येथ नसतां त्रितय । आत्मा केवळ अद्वितीय । अध्यारोप कैसा होय । स्वप्रत्यय असतांची ॥२८॥
तरी माया अविद्या अंगीकारें । ईश्वर जीव द्वय उभारें । वास्तव आत्मत्वाच्या विसरें । बहुधा पसरे भेदभ्रम ॥२९॥
आपण एकला एकान्तीं । मिथ्या माया ते सुषुप्ती । अंगीकारितां स्वप्नभ्रान्ती । भ्रमची दिगंतीं भेदभ्रमें ॥३३०॥
तया स्वप्नामाजि गगन । पवन दहन जीवन भुवन । प्रतीतिगोचर तन्मात्रभान । अविद्यमान सत्य गमे ॥३१॥
आत्मप्रियत्वें चैतन्य मात्र । तेथ महाभूतादि तन्मात्र । स्वप्न अवास्तव क्षणभंगुर । प्रतीतिगोचर करी कीं ना ॥३२॥
तस्मात् प्रधान अंगीकारें । अध्यारोपें दृश्य उभारे । वास्तव आत्मत्वाच्या विसरें । उपजे मरे जीवपणें ॥३३॥
तया जननमरणा पोटीं । तापत्रयादि दुःखकोटी । लक्ष चौर्‍यायसी योनि संकटीं । भ्रमें घरटी देत असे ॥३४॥
रडे वोरडे आरडे खिरडे । खुरडूं न शके मागें पुढें । दुःखडोहीं बुडे अवघडे । परि निघणें न घडे तेथूनी ॥३३५॥
मातापित्यांच्या मूत्ररंध्रीं । जन्म पावे कुत्सित जठरीं । उकडे विष्ठामूत्रदाथरीं । नवमासवरी कोंडूनियां ॥३६॥
आड येतां खांडिती चिरिती । तैं उभयतांची अतिविपत्ति । दैवें जहालिया सुप्रसूति । लाहे निर्गति तेथूनी ॥३७॥
योनीबाहीर पडल्या पाठीं । यातना होती कोट्यानुकोटी । कोण्ही बोलूं न शके वोटीं । क्षुधा पोटीं जाकळितां ॥३८॥
प्रदीप्त होतां जठरानळा । उष्णहृव्यें देती गरळा । तेणें सबाह्य होतां हरळा । करी तळमळा टेहें टेहें ॥३९॥
कोमळगात्रासी चहूंकडे । तोडिती मत्कुनप्रमुख किडे । त्याचें निवारण करणे न घडे । कोणा पुढें वदों न शकें ॥३४०॥
वान्ति पित्त श्लेष्मा लाळ । विष्ठा मूत्र अमंगळ । चिळसी न धरीच अळुमाळ । सर्वकाळ चिवडीतसे ॥४१॥
दात डोळे गोवर देवी । हागी ओकी कश्मलप्रभावी । कुत्सित देती भेषजनांवीं । एवं आघवी विडंबना ॥४२॥
अस्ति ते जायते हे विकार । कथिले अत्यंत दुःखकर । वर्धते म्हणिजे वाढतां गात्र । यातनापात्र बहुसाल ॥४३॥
बाहेर खेळतां मारिती पोरें । विद्या प्रबोधीं जाचिती पितरें । जैसें निर्धन्याचें कुतरें । अनेक द्वारें वृथा फिरे ॥४४॥
जातिप्रमाणें संस्कारिती । प्रयत्नें वनिता मेळविती । भरणपोषणप्रवाहखंती । चिन्ता चित्तीं दिनरजनीं ॥३४५॥
लोकें वाढवी बहुमान । प्रयत्नपूर्वक मेळवी धन । पूर्वजांचें जीर्ण सदन । मोडूनि नूतन संपादी ॥४६॥
अवघड नवस देवांप्रती । इंगळीं चाले घेवोखेती । कडे कर्मरी वपा वाती । निम्ब नेसती स्त्रीपुरुषें ॥४७॥
ऐसिया नवसीं संतान होय । तैं ते नवस फेडूं जाय । थोर श्रीमंत सोयरे पाहे । तयांचे पाय आराधी ॥४८॥
घाघाट्यानें लेंकरें उजवी । मानसन्मानें लोकां भजवी । पूर्वजांची चर्या त्यजवी । कीर्ति गाजवी भूचक्रीं ॥४९॥
लग्नें मुहूर्तें वृत्ति व्यवहारें । मानसन्मानें लौकिकाचारें । जोडिलें धन वेंचे सारें । दंभें विचरे मग लोकीं ॥३५०॥
पादभाजाया खापर न मिळे । वरि वरि दावी बाह्य झळफळे । चाळवूनियां धनिक भोळे । काढी दिवाळें एकसरें ॥५१॥
मन धनिकाचें पदे बिरडें । खतीं लिहिलें व्याज वाढे । चतुर्थांश नियमूनि तोंडें । मारिती कोरडे नृपदूत ॥५२॥
बेडी बंदखानीं यातना । विकरा घाली वधूसंताना । टाकूनियां वृत्तिसदना । म्हणे जीवदाना मज दीजे ॥५३॥
खतीं लिहिलें वाढे व्याज । त्याची करिती ते बेरीज । नसे घ्यावया ऐवज । सांडूनि लाज भीक मागे ॥५४॥
सोयरिच्या जाय दारा । म्हणे माझी सोडवण करा - । लेंकी म्हणती निलाजिरा । पिसुणा घरा कां आला ॥३५५॥
म्हणे वेंचा भीड आपुली । बहुतां हस्तें ऐसिये काळीं । माझी मुक्तता पाहिजे केली । सुहृदीं सकळी मिळूनियां ॥५६॥
तंव ते नादरिती वचन । परते पावूनियां अपमान । करिती राजदूत ताडन । तैं दीर्घ रुदन अवलंबी ॥५७॥
आंगीं धनाचा होता ताठा । तेव्हां केल्या बहुत चेष्टा । जाला धनक्षयें करंटा । बारा वाटा कुटुंबातें ॥५८॥
ऐसे चिरकाळ भोगी क्लेश । शेवटीं मरे घेऊनियां विष । किंवा पळे सांडूनि देश । वसवी विदेश त्या भेणें ॥५९॥
ऐसिया संपत्ती विपत्ती । भोगितां त्रास नुपजे चित्तीं । निर्लज्ज हांव धरी पुढती । नुपजे विरक्ती विषयाची ॥३६०॥
ऐसे व्यापार बहुतां परी । परिहार करितां प्रतिवत्सरीं । पुनः पुन्हा पडे घोरीं । परि अंतरी न त्रासे ॥६१॥
असो मनुष्यदेहींची कथा । गाढव होऊनि दगड वहातां । किडे पडले पाठीच्या क्षता । तें दुखवतां तळमळी ॥६२॥
श्वान सूकर वृश्चिक व्याळ । रीस व्याघ्र वृक विडाळ । विष्ठा कृमी या योनि बहळ - । भोगी कुटिळ कर्मफळें ॥६३॥
पुढती मरे पुढती उपजे । योनिसंकटीं पुन्हा निर्बुजे । दैवें नरदेह लाभल्या लाजे । पुढती वोझें माथां घे ॥६४॥
जीवचैतन्य हें दशा । जन्ममरण पडतां वळसा । करुणा येतां श्रीपरेशा । सप्तपाशां छेद करी ॥३६५॥
अहंतेचा प्रथम पाश । स्त्रीपरिग्रह द्वितीय पाश । संततीचा तृतीय पाश । सद्नपाश चतुर्थ पैं ॥६६॥
स्वजनपाश पांचवा जाणा । धनपाश हा सहावा गणा । पाशषट्काच्या बंधना । आशापाश सप्तम हा ॥६७॥
कर्मपाश त्याहूनि दृढ । तो आठवा अतिअवघड । कृपा करी जैं गरुडारूढ । तैं सुरवाड सुटिकेचा ॥६८॥
तैं तो लाहे सज्जनसंगा । विरक्त होय भवसुखभोगा । हृदयीं वदनीं कमलारंगा । चिंती निःसंग होत्साता ॥६९॥
सेवूनि सद्गुरु करुणावंत । करी परिचर्या अतंद्रित । निष्काम अवंचक सप्रेमभक्त । देखूनि द्रवत गुरु हृदयीं ॥३७०॥
सद्गुरु होऊनि परमकृपाळ । म्हणे वत्सा तूं क्लेशबहळ । करिसी याचे अभीष्ट फळ । कोणतें केवळ वाञ्छिसी तूं ॥७१॥
येरु म्हणे मज कामना नाहीं । परंतु बुडालों भवदुःखडोहीं । येथूनि तारावें लवलाहीं । तारक नाहीं मज कोण्ही ॥७२॥
विरक्त आणि अवंचक भक्त । जाणूनि सद्गुरु बोधी स्वहित । म्हणे भवभ्रम हा अनृत । नित्यानित्य विवरीं पां ॥७३॥
दृश्य तितुकें पावे नाश । यथाकाळें ब्रह्मांडास । नाश होय पैं विशेष । मानी विश्वास गुरुवचनें ॥७४॥
नित्यानित्य वस्तुविचारे । म्हणे स्वामी मायिक न थरे । शाश्वत ब्रह्म केवळ खरें । कृपासागरें मज कथिजे ॥३७५॥
गुरु म्हणती अविनाश ब्रह्म । केवळ तें तूं कैवल्यधाम । अविद्याभ्रमें भोगिले श्रम । मरणजन्म भववळसा ॥७६॥
दैवें जाहलासी निवृत्तिपर । जातां तुजला नाभीकार । सविश्वासें ज्ञानविचार । ऐकूनि निस्तर भवजलधीं ॥७७॥
ईश्वरगुरूंची उपासना । प्रेमसद्भावें नवविधभजना । रंगूनि अवचूक दास्याचरणा । इत्यादि साधना न विसंबें ॥७८॥
इहीं साधनीं वीर्योत्तर । सिद्धि पावे योग सधर । निस्तरूनि भवसागर । तमसःपार पावसी ॥७९॥
ऐसा आश्वासूनि संतप्त । सद्गुरुनाथ करुणावंत । अतद्बोधें प्रबोधित । करी निवृत्त व्यतिरेकें ॥३८०॥
म्हणे वत्सा तूं आपण । विवरूनि सांगें मजला कोण । दृश्य नाशवंत म्हणोन । पूर्वींच हे खूण तुज कथिली ॥८१॥
ब्रह्मचिन्मात्र वस्तु सत्य । जगदाभास तद्विवर्त । विवर्ताची कैशी मात । तेही निवांत अवधारीं ॥८२॥
स्वतःसिद्ध संचली । नाहीं अणुमात्र विसंचली । तेथ विपरीत भा भासली । विवर्त बोली त्या नांव ॥८३॥
सूर्य अथवा सूर्यकिरणां । अणुमात्र पालट न होतां जाणा । बरडी मृगजल भासे हरणा । विवर्तसंज्ञा त्या म्हणिजे ॥८४॥
रज्जू न नसोनि भासे सर्प । शुक्ति न नसोनि रजतारोप । तेंवि वस्तूवरि विश्व अमुप । हा विवर्त्तजल्प अवगमिजे ॥३८५॥
चिदाभासे हा अध्यारोप । करूनि भोगी दुःख अमूप । अपवादें त्या करूनि लोप । करी चिद्रूप देशिकेंद्र ॥८६॥
दृश्य मिथ्या हें जाणोन । तूं मज सांगें आपण कोण । सप्तवितस्ति प्रमाण । शरीर म्हणोनि येरू वदे ॥८७॥
सद्गुरु म्हणती रे बाळका । साद्यंत देह तुज ठाउका । शताब्द जन्मानंतर देखा । न वसे देखा पुढें मागें ॥८८॥
मायाजनित जाले गुण । पंचभूतें त्यापासून । एवं अष्टधा प्रकृति जाण । भौतिकें तेथूनि बहु होती ॥८९॥
देहामाजी पंचभूतें । वसती कैसीं ऐक त्यातें । पृथग्पृथगें गुणासहितें । जाणोनि अहंते निरसावें ॥३९०॥
अस्ति नाडी मांस त्वचा । रोमेंसहित पंचकाचा । देहामाजि हा पृथ्वीचा । अंशसमुच्चय जाण पां ॥९१॥
अस्थी कीं तूं नाडी मांस । त्वचा रोम कीं कोणचा अंश । याचा करूनियां निरास । जाण चिदंश तूं पृथग ॥९२॥
रक्त शुक्र मूत्र लाळ । स्वेदादि आपपंचकमेळ । पंचभूतात्मक जाणिनि सकळ । तूं यांवेगळा चिद्रूप ॥९३॥
क्षुधा तृषा निद्रा तंद्रा । मैथुनादि तेजपंचक शिष्येंद्रा । तूं यांवेगळा चित्समुद्रा । केंवि या अभद्रा मी म्हणसी ॥९४॥
चलन वलन आकुंचन । धावण प्रसरण पचधा पवन । तूं यावेगळा चैतन्य । केंवि हें भिन्न मी म्हणसी ॥३९५॥
शोक मोह लज्जा भय । विषयानंदे पांचवा होय । पंचधा नभ हें जाणोन सोय । तूं सन्मय हें नव्हसी ॥९६॥
पंचभूतांचीं पंचकें पांच । जडांश विजातीय हे साच । अष्टधा प्रकृतींचा हा संच । स्थूळप्रपंच तूं नव्हसी ॥९७॥
स्थूळशरीर तुझें जाण । जागृति अवस्था नेत्रस्थान । याचा विश्वात्मा अभिमान । रजोगुणें स्थूळभोग ॥९८॥
ऋग्वेद जो वैखरी वाचा । विस्तार अकार मातृकेचा । आद्य चरण हा प्रणवाचा । साक्षी याचा तूं भिन्न ॥९९॥
एवं अष्टधा हे प्रकृती । अपर जीवरूपा इची विकृती । ऐक तयेची व्युत्पती । अतद्व्यावृत्ति सांख्योक्त ॥४००॥
अंतःकरण मन मनीषा । चित्त अहंकारादि पंचधा अंशा । आकाशात्मक जाण शिष्या । सत्य जनिता या कर्तृकरणां ॥१॥
निर्विकल्प स्फुरण अंतःकरण । संकल्पविकल्पात्मक तें मन । निश्चयात्मक बुद्धि जाण । अनुसंधानमय चित्त ॥२॥
अभिमानात्मक अहंकार । एकचि वृत्ति पृथगाकार । पंचभूताचे प्रकार । सत्वांकुर स्वगत पैं ॥३॥
अंतःकरणादेवता विष्णु । मनोदेवता निशारमणु । बुद्धिदेवता तो द्रुहिणु । नारायण चित्तपति ॥४॥
अहंकारस्वामी रुद्र । तो चेष्टवी तनु समग्र । शुभाशुभकर्मानुसार । आविष्कार जा क्रियमाणीं ॥४०५॥
यांचा साक्षी तूं चिन्मात्र । नव्हसी देवता न वृत्तिविकार । स्वगतभेद हें समग्र । दावीं साचार करूनियां ॥६॥
व्यान समान उदान प्रमुख । प्राणापानादि पवनात्मक । पंचधाचाळक चेष्टापंचक । तूं निष्टंक हें नव्हसी ॥७॥
स्थूळशरीर याचेंनि चळे । कल्पना भवभ्रमीं वावळे । यातें निरोधितां मावळे । प्रवृत्ति केवळ करणांची ॥८॥
आतां ज्ञानेंद्रियपंचक । घ्राण रसना चक्षुत्वक । विषयग्रहणीं श्रोत्रादिक । बाह्य सुखदुःख भोगविती ॥९॥
श्रोत्रेंद्र्याचें दैवत हरिता । वायु त्वगिंद्रियाचा पाता । स्वामी नेत्रेंद्रियाचा सविता । रसनाचाळिता तो वरुणा ॥४१०॥
अश्विनीकुमार घ्राणपती । तैजसज्ञान करणोत्पत्ती । पंचविषयाची इहीं ज्ञप्ती । तूं निश्चिती हे नव्हसी ॥११॥
इहें विवर्ता साच केलें । जीवचैतन्या भांबाविलें । सुखदुःखातें भोगविलें । पात्र केलें शुभा अशुभा ॥१२॥
ज्ञानकारणा कर्मप्रवृत्ति । पंचधा सलीलात्मक वृत्ती । वाक्पाणिपादोपस्थी । पाय्वादिकीं कर्मेंद्रियीं ॥१३॥
वाक्स्वामी तो हुताशन । पाणीपती तो संक्रंदन । पादेंद्र्यपती वामन । चाळी प्रजन प्रजापती ॥१४॥
इत्यादि पंच आवृत्ति । स्थूळदेहीं कर्मप्रवृत्ति । त्यागादानें विषयाप्रती । जे भजविती चिदाभासा ॥४१५॥
चेष्टा ज्ञान कर्म करणें । जेथें प्रकाशलीं रजोगुणें । कर्तृकरणां भोक्तेपणें । विषयभोगणें घडे इहीं ॥१६॥
शब्द स्पर्श रूप रस गंध । पार्थिवांश हे पंचविध । इहीं चिदंशा लाविला वेध । अपरोक्षबोध विसरविला ॥१७॥
एवं तन्मात्र हे पंच । जीवचैतन्यभ्रामक । इंद्रियद्वारा लिप्साजनक । तूं निष्टंक हें नव्हसी ॥१८॥
ऐसे पंचवीस विकार । अजड केवळ वृत्त्यंकुर । स्वगत विक्षेपशक्तिमात्र । विपरीत बोध दृढावी ॥१९॥
अष्टधा प्रकृतीची हे विकृती । जीवरूपा इतेंचि म्हणती । सूक्ष्मलिंग देह वदंती । वदती ग्रंथी विपश्चित ॥४२०॥
लिंगदेह कंठस्थान । स्वप्नावस्था तैजसाभिमान । प्रविविक्तभोग सत्वगुण । मध्यमा वाणी यदुर्वेद ॥२१॥
उकारमात्रा इयेतें म्हणिजे । प्रणवपाद हा द्वितीय गणिजे । येथ साक्षित्व मात्र तुझें । अहंकार ओझें वृथा वहासी ॥२२॥
जीवरूपा इयेचें नाम । काय म्हणोनि तें ऐकें वर्म । सर्वघटीं व्यापक व्योम । सर्वग ब्रह्म अद्वितीय ॥२३॥
परमसूक्ष्म पिंजिला तूळ । तंतु होय त्या भरितां पीळ । वोतप्रोत विणितां कुशळ । तैं तो सबळ पट होय ॥२४॥
पटत्वाचिया रूपा नांवा । तंतू वेगळे करूनि दावा । तेंवि या तत्वाचा मेळावा । रूढवी जीवा जीवत्वें ॥४२५॥
अन्यथाबोध विपरीतबोध । ते हे विक्षेपशक्ति द्विविध । स्थूळ सूक्ष्मदेहावबोध । विषयीं बद्ध जीव करी ॥२६॥
मूळ अज्ञान देहकारण । वास्तवबोधाचें आवरण । सुषुप्ति अवस्था हृदयस्थान । प्राज्ञ अभिमान पैं याचा ॥२७॥
तमोगुण पश्यंती वचा । सामक भोग आनंदाचा । विस्तार मकार मातृकेचा । चरण प्रणवींचा तृतीय हा ॥२८॥
येथ आत्मा प्रकर्षें अज्ञ । म्हणोनि म्हणिजे त्यातें प्राज्ञ । तूं तो नव्हसी चैतन्यघन । स्वसंवेद्य सन्मात्र ॥२९॥
दृश्यप्रवृत्तीचें विस्मरण । वास्तवस्वरूपावगमीं अनभिज्ञ । सुषुप्ति अवस्था तिये अभिधान । आत्मा प्राज्ञ जीमाजी ॥४३०॥
देहत्रयाचा व्यतिरेकें । दृश्य ऊमाणितां अशिके । तेथ अज्ञान भूमिके । माज साधकें निमज्जतां ॥३१॥
म्हणे स्वामिया सद्गुरुनाथा । तारिजे हस्त घेऊनि माथां । देहत्रयाचा निरास करितां । मज मी तत्वतां न बोधें ॥३२॥
सद्गुरु म्हणती देहद्वय । विपरीत अन्यथा बोधमय । अबोधमात्र तोचि तृतीय । स्वबोध तुरीय जाण पां ॥३३॥
जालिया दृश्याचा निरास । मग जाणिवेसीं कैचा पैस । इंद्रियद्वारा विद्याभ्यास । चित्प्रकाश त्या न कळे ॥३४॥
दृश्य व्यतिरेकें निरसलें । केवळ आत्मत्व मात्र उरलें । तें म अज कळेचि आपुलें । म्हणोनि कथिलें जरि शिष्या ॥४३५॥
तरि न कळे हें जातें कळलें । त्या कळण्या जेणें प्रकाशिलें । तेंचि वास्तव आत्मत्व पहिलें । जाण संचलें अपरोक्ष ॥३६॥
केवळ अज्ञान कारण देह । महाकारण तो ज्ञानमय । मूर्ध्निस्थान अवस्था तुरीय । प्रत्यगात्मा अभिमानी ॥३७॥
आनंदावभासभोग । अथर्वणवेद परा वाग । शुधसत्वसगुण हा चांग । ध्वनी अभंग अर्धमात्रा ॥३८॥
प्रणवाचा चतुर्थचरण । साक्षित्वाचें अधिष्ठान । साक्षित्वाच्या उपरमें जाण । केवळ उन्मन चिन्मात्र ॥३९॥
तो तूं चिन्मात्र वास्तवरूप । नव्हसी प्रपंच असदारोप । ऐसें प्रबोधी जो संकल्प । भवभ्रम विकल्प निरसूनी ॥४४०॥
करून वास्तवस्वरूपनिष्ठ । जन्ममरणाचे हरी जो कष्ट । तीहींमाजि तो वरिष्ठ । सद्गुरु स्पष्ट मीचि स्वयें ॥४१॥
जहदजहल्लक्षणाबोधें । वायांशबलांशाचिया रोधें । लक्ष्यशुद्धांश अभेदें । होइजेनु सुधें अमृतत्व ॥४२॥
अमृतत्व होणें याकारणें । राजयोग या मार्गा म्हणणें । येणें न होता परमकठिणें । दुर्घट साधनें हटादिकें ॥४३॥
याहूनि परम सुगममार्ग । जो कां सप्रेम भक्तियोग । व्याक्यविश्वास जेथें अभंग । सेवूनि सांग अवंचकत्वें ॥४४॥
शौक्ल सावित्र आणि दैक्ष । गुरुत्वाचे हे त्रिविधपक्ष । पिता आणि कर्माध्यक्ष । त्याहूनि अपरोक्षप्रद श्रेष्ठ ॥४४५॥
ऐसा जाणोनि दृढनिर्धारु । ज्ञानदायक जो मी गुरु । त्या मज भजूनि भवसागरु । तरती ते नर धीमंत ॥४६॥

N/A

References : N/A
Last Updated : June 06, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP