अध्याय ४४ वा - श्लोक ३१ ते ३५

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


हतेषु मल्लवर्येषु विद्रुतेषु च भोजराट् । न्यवारयत्सतूर्याणि वाक्यं चेदमुवाच ह ॥३१॥

मल्लयूथप पावलें मरण । इतर पळाले घेऊनि प्राण । विजयी देखोनि रामकृष्ण । उद्विग्न मन कंसाचें ॥६९॥
ऐसा समय वर्तला असतां । कंसे दावूनि हस्तसंकेता । प्रेरूनियां निकट दूतां । वाद्यघोश राहविला ॥१७०॥
दुंदुभिपटहादि अनेक तुरें । रंगीं गर्जतां विचित्र गजरें । स्वपक्षभंगें आपुल्या करें । कंसें निकरें निवारिलीं ॥७१॥
वाद्यघोष राहिले असतां । कंस क्षोभें होय बोलता । तें बोलणें कौरवनाथा । संक्षेपता शुक सांगे ॥७२॥

निःसारयत दुर्वृत्तौ वसुदेवात्मजौ पुरात् । धनं हरत गोपानां नंदं बध्नीत दुर्मतिम् ॥३२॥

अरे हे वसुदेवाचे कुमर । दुष्ट दुर्वृत्त महाक्रूर । मथुरेबाहीर काढा सत्वर । अन्यायकर दुरात्मे ॥७३॥
महाकपटी दुष्ट नंद । लोहनिगडीं बांधोनि पद । यासि करा रे निर्बंध । गुप्तद्वंद्वकारक हा ॥७४॥
याचा व्रज लुटूनि आणा । हिरूनि घ्या रे धनगोधना । नागवूनियां गोपगणा । भणगें करूनि सोडा रे ॥१७५॥
कैसी नंदाची दुर्मति । मज वधावें कृष्णाहातीं । वसुदेव करावा मथुरापति । आपण क्षिति भोगावी ॥७६॥
यास्तव निगडीं कारागारीं । यातें रक्षा बरवे परी । आणिक आज्ञा काय करी । तेही चतुरीं परिसावी ॥७७॥

वसुदेवस्तु दुर्मेधा हन्यतामाश्वसत्तमः । उग्रसेनः पिता चापि सानुगः परपक्षगः ॥३३॥

सबाह्य निष्कपट दयाळ । सज्जन सत्तम पुण्यशीळ । यांहूनि इतर तो हा कुटिळ । वसुदेव केवळ असत्तम ॥७८॥
याची ऐका हो दुर्मेधा । मजसी करूनि साधुवादा । मनीं इच्छी माझिया वधा । युक्ति विविधा कापट्यें ॥७९॥
केवढें कैवाड करून । रक्षकांचे वंचूनि नयन । मध्यरात्रीं नगरीहून । व्रजीं नंदन लपविला ॥१८०॥
समस्तांसी करूनि चोरी । आणूनि नंदाची कुमारी । आठवी म्हणोनि माझे करीं । देऊनि मैत्री दाखविली ॥८१॥
मियां आपटितां ते गगना । गेली वदोनि शत्रुसूचना । निर्मळमनें दोघां जणां । बंदीहूनि सोडिलें ॥८२॥
माझें निष्कपट अंतर । सहसा नेणे कुजांतर । यांचा करूनि श्रमपरिहार । स्नेह साचार वाढविला ॥८३॥
या तिळासी ऐसें तेल । वसुदेव दुरात्मा केवळ । नेवोनि वधा रे तत्काळ । विलंब अळुमाळ न लावावा ॥८४॥
तैसाचि उग्रसेनही पिता । मिळोनि तत्पक्षीं तत्त्वतां । माझ्या इच्छी जीवघाता । धरूनि आस्था राज्याची ॥१८५॥
याच्या करूनि शिरच्छेदा । सानुगवर्ग अवघा वधां । द्वितीय आज्ञेच्या अनुवादा । करितां आपदा पावाल ॥८६॥
ऐसा निकट दूतांप्रति । क्षोभें आज्ञापी भोजपति । हें ऐकोनि जगत्पति । काय करिता जाहला ॥८७॥

एवं विकत्थमाने वे कंसे प्रकुपितोऽव्ययः । लघिम्नोत्पत्य तरसा मंचमुत्तुंगमारुहत् ॥३४॥

आयुष्य सरलिला सन्निपातें । जेंवि मुमुर्षु बरळे भलतें । तेंवि या दुरुक्ती कंसातें । वदतां श्रीकांतें परिसोनि ॥८८॥
अंतःकरणीं क्षोभ धरिला । समरीं मर्दितां महामल्लां । अव्यय म्हणिजे नाहीं श्रमला । विजयाथिला प्रतापी ॥८९॥
लघिमालाघवें उत्पवन । करूनि खगेंद्रासमान । परम उच्च मंचास्थान । नृपासन जे ठायीं ॥१९०॥
नावानिगे वीर सावध । शस्त्रास्त्रेंसीं सन्नद्ध बद्ध । भंवते उभे नृपासंनिध । गेला सक्रोध हरि तेथें ॥९१॥
तरसा म्हणिजे वेगवत्तर । हिमाद्रीवरी विद्युत्प्रहार । तेंवि सवेग कमलावर । मंचा उच्चतर वळघला ॥९२॥
येतां देखोनि जनार्दना । दचक बैसला कंसमना । पुढील कथेच्या निरूपणा । मात्स्यीरमणा शुक सांगे ॥९३॥

तमाविशंतमालोक्य मृत्युमात्मन आसनात् । मनस्वी सहसोत्थाय जगृहे सोऽसिचर्मणी ॥३५॥

राजा आणि निजासनीं । ऐश्वर्यमंडित वीरकंकणीं । कंस मनस्वी निर्भयपणीं । बोले क्षोभोनि निःशंक ॥९४॥
जैसा कुञ्जर मदोन्मत्त । स्वबळें कोणातें न गणित । तंव केसरी अकस्मात । येऊनि बैसत गंडस्थळीं ॥१९५॥
तेंवि आपुला जो कां मृत्यु । स्मरोनि नभोवाणीसंकेतु । तो हा आठवा देवकीसुतु । झगटला नधरत आंगेंसीं ॥९६॥
त्यातें देखोनि गजबजिला । आसनापासोनि सवेग उठिला । खङ्ग चर्म घेता झाला । रक्षावयाला आपणा ॥९७॥
कोश सांडूनि करवाळ । बाळतरणीहूनि तेजाळ । कंस परजी आणि वर्तुळ । अभेद खेटक वामकरें ॥९८॥
बंधु आणि पार्षदगण । क्रूर प्रतापी महातीक्ष्ण । समीप असतां कंसावीण । कोणी आंगवण करूं न शके ॥९९॥
परम कठिण मृत्युसंधि । समीप असतां आप्तमांदी । कोणा न करवे मोक्षणविधि । नेतां त्रिशुद्धि कृतांता ॥२००॥
तैसी पडतां कृष्णमिठी । कंसें खंडा वोडण मुष्टि । पडताळूनियां उठाउठी । उठला संकटीं संग्रामा ॥१॥

N/A

References : N/A
Last Updated : May 08, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP