अध्याय ४४ वा - श्लोक ६ ते १०

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


तद्बलाबलवद्युद्धं समेताः सर्वयोषितः । ऊचुः परस्परं राजन्सानुकंपा वरूथशः ॥६॥

पुरपुरंध्री परस्परें । ठायीं ठायीं निकरनिकरें । बोलती तें सदयोत्तरें । उत्तरोत्तरें परिसावीं ॥५९॥
जेवीं मदगज गोवत्सेंसीं । कीं द्विजकुमार राक्षसेंसीं । तेंवि लेंकुरें महामल्लासीं । द्वंद्वयुद्धासीं योजिलीं ॥६०॥
ऐसें सबळां अबळां युद्ध । देखोनि म्हणती हा प्रसाद । महा अन्याय धर्मरोध । अधर्म प्रसिद्ध ये ठायीं ॥६१॥

महानयं बताधर्म एषां राजसभासदाम् । ये बलाबलवद्युद्धं राज्ञोऽन्विच्छंति पश्यतः ॥७॥

महा अन्याय म्हणती नारी । राजसभासदांचे शिरीं । अबळां बलिष्ठां योजूनि समरीं । पाहती नेत्रीं कौतुक ॥६२॥
अबळां बलिष्ठां युद्ध प्रबळ । नृपें वारिजे तें तत्काळ । तोचि झालिया अधर्मशीळ । सवेग काळ त्या ग्रासी ॥६३॥
येथ अन्याय सभास्थानीं । बाळां बळिष्ठां समरांगणीं । युद्धीं योजूनि पाहती नयनीं । परि अधर्म कोणी न मनिती ॥६४॥
परी हें न मने ईश्वरासी । अन्याय रुचला भोजेंद्रासी । याचें फळ येचि दिवसीं । भोगील ऐसी जनचर्चा ॥६५॥
म्हणाल अन्याय कैसा येथ । तरी पाहती सदस्य सभानाथ । होवोनियां विचाररहित । युद्धवृत्तांत तो ऐका ॥६६॥

क्क वज्रसारसर्वांगौ मल्लौ शैलेंद्रसन्निभौ । क्क चातिसुकुमारांगौ किशोरौ नाप्तयौवनौ ॥८॥

चाणूर मुष्टिक महामल्ल । वज्रांगकठोर मंदरतुल्य । मल्लविद्येचें कौशल्य । तनुचापल्य अभ्यस्त ॥६७॥
क्रूरप्रतापी महादुर्घट । युद्धीं अनेक जिंकिले वाट । न भंगे समरीं धारिष्ट । महाधीर कोणीकडे ॥६८॥
कोणीकडे महा लेंकुरें । कोमळांगें नवनीताकारें । आंगीं नाहीं तारुण्यवारें । त्यांसीं निकरें हें युद्ध ॥६९॥
धर्मलंघन याचेंहि नाम । सभासदां हा अधर्म । भल्यांहीं ऐसें देखतां विषम । दुर्लभ क्षेम ते म्हणती ॥७०॥

धर्मव्यतिक्रमो ह्यस्य समाजस्य ध्रुवं भवेत् । यत्राधर्मः समुत्तिष्ठेन्न स्थेयं तत्र कर्हिचित् ॥९॥

अधर्म जये सभास्थानीं । तेथ बैसों नये सज्जनीं । उठोनि जावें झडझडोनी । बैसतां हानि सर्वस्वें ॥७१॥

न सभां प्रविशेत्प्राज्ञः सभ्यदोषाननुस्मरन् । अवब्रुन्विब्रुवन्नज्ञो नरः किल्मिषमश्नुते ॥१०॥

सभ्यांसहित सभानाथ । अधर्मरूपी असती जेथ । प्रज्ञावंतीं न वचिजे तेथ । अन्याय तत्कृत स्मरोनी ॥७२॥
प्रवेशतां तें सभास्थान । जाणोनि भिडेनें धरितां मौन । होय अधर्मसंक्रमण । श्रेष्ठालागून तद्योगें ॥७३॥
अज्ञान होवोनि न कळे म्हणतां । तथापि दूषण बैसे माथां । यालागीं भल्यांहीं आपुल्या स्वार्था । दुष्टसभे न वचावें ॥७४॥
उभयपक्षें दोषसंचार । यालागीं अधर्मसभागार । सांडूनि सज्जनीं साचार । अतिसत्वर निघावें ॥७५॥
पृथक्समुदायीं परस्परीं । ऐशा बोलती एकी नारी । तंव आणखी सदयोत्तरीं । वदती सुन्दरी तें ऐका ॥७६॥

N/A

References : N/A
Last Updated : May 08, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP