TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|बृहत्संहिता|
अध्याय ९

बृहत्संहिता - अध्याय ९

शके ८८८ फाल्गुन कृष्ण द्वितीया गुरुवारी उत्पलनामकाने ही टीका केली.


अथशुक्रचार:
॥ अथशुक्रचार: ॥

नाग, गज, ऐरावत, वृषभ, गो, जरद्नव, मृग, अज, दहन हे नऊ मार्ग अश्विन्यादि तीन तीन नक्षत्रांही होतात असे कोणी ज्योतिर्वेत्ते म्हणतात ॥१॥

स्वाती. भरणी, कृत्तिका या तीन नक्षत्रांची नागविथी (नागमार्ग) होय. रोहिणी, मृगशीर्ष, आर्द्रा गजवीथी; पुनर्वसु, पुष्य, आश्लेषा ऐरावतवीथी; मघा, पूर्वा, उत्तरा वृषभवीथी; अश्विनी, रेवती, पूर्वाभा०, उत्तराभा०, गोवीथी; श्रवण, धनिष्ठा शततारका, जारद्नवीवीथी; अनुराधा, ज्येष्ठा, मूळ मृगवीथी; हस्त; विशाखा, चित्रा अजवीथी; पूर्वाषा० उत्तराषा०, दहनावीथी; या प्रकारेकरून २७ नक्षत्रांच्या ९ वीथी (मार्ग) आहेत ॥२॥३॥

त्या नागादि नऊ वीथींमध्येही तीन तीन अनुक्रमाने उत्तर, मध्य व दक्षिण या मार्गांत आहेत. त्या उत्तरादि मार्गस्थ तीन तीन वीथींतही एकेक उत्तर, मध्य व दक्षिण यांकडे रहाणार अशी होय. (हेच स्पष्ट करून सांगतो) नाग, गज, ऐरावत हया तीन वीथी उत्तरेस होत. त्यांमध्येही नाग उत्तरेच्या उत्तरेस, गज उत्तरेच्या मध्ये, ऐरावत उत्तरेच्या दक्षिणेस; वृषभा, गो, जारद्नवी हया ३ मध्ये. त्यांत वृषभा मध्याच्या उत्तरेस, गो मध्याच्या मध्ये, जारद्रवी मध्याच्या दक्षिणेस; मृगा, अजा, दहना हया ३ दक्षिणेस. त्यांमध्येही मृगा दक्षिणेच्या उत्तरेस, अजा दक्षिणेच्या मध्ये, दहना दक्षिणेच्या दक्षिणेस याप्रमाणे वीथी जाणाव्या ॥४॥

कोणी आचार्य, नक्षत्रमार्गाप्रमाणेच वीथीमार्ग सांगतात. कारण तशाच नक्षत्रांच्या तारा दक्षिण, उत्तर, मध्य अशा आहेत. यास्तव तसेच वीथीमार्गही जाणावे असे म्हणतात ॥५॥

भरणादि नऊ नक्षत्रांचा उत्तरमार्ग, पूर्वाफल्गुनी इत्यादि नऊ नक्षत्रांचा मध्यमार्ग, पूर्वाषाढादि नऊ नक्षत्रांचा दक्षिणमार्ग. काही आचार्यांनी असे मार्ग विवरण केले आहेत ॥६॥

नक्षत्रग्रहादिविषयक जे शास्त्र ते ज्योति:शास्त्र होय. हे वेदोक्तशास्त्र आहे. यास्तव वेदावाचून समजत नाही. म्हणून आम्हास मतभेदांविषयी विकल्प करणे (हे योग्य हे अयोग्य असे म्हणणे) योग्य (न्याय) नाही. कारण सर्व मुनि त्रिकालज्ञ होत, यास्तव जसे ज्यांस वाटले तसे त्यांनी लिहिले असावे म्हणून बहुतऋषींचे मत सांगतो ॥७॥

शुक्र, नाग, गज, ऐरावत हया उत्तरवीथीत असून जर अस्त किंवा उदय पावेल तर सुभिक्ष व कल्याण करील. मध्यवीथीमध्ये मध्यफल करील. दक्षिणवीथीमध्ये असून उदयास्त होतील तर अशुभ करील ॥८॥

शुक्राची उत्तरादिवीथीत अत्युत्तमादि नऊ फले अनुक्रमाने सांगावी. ती अशी की, नागा अत्युत्तमा, गजा उत्तमा, ऐरावता काही कमी उत्तमा, वृषभा समा, गो मध्या, जारद्रवी काही अधमा, मृगा अधमा, अजा कष्टा, दहना अतिकष्टा अशा होत ॥९॥

भरणीपूर्वक चार नक्षत्रांचे प्रथमंडल होय. हे वंग, अंग, महिष, बाल्हिक, कलिंग या देशांमध्ये भय उत्पन्न करणारे होय ॥१०॥

य मंडलामध्ये उदय पावलेल्या शुक्रावरून दुसरा ग्रह जाईल तर भद्राश्व, शूरसेन, यौधेयक, कोटिवर्ष या देशांतील लोक व तेथील राजे यांचा नाश होतो ॥११॥

आर्द्रादि ४ नक्षत्रांचे द्वितीय मंडल; ते बहुत उदक व धान्य यांची संपत्ति करिते. ब्राम्हाणांस वि विशेषेकरून दुर्जनांस अशुभ होय ॥१२॥

पूर्वोक्तमंडलामध्ये अन्यग्रहाने रुद्ध (स्तंभित) शुक्र, असता तो म्लेच्छ, अरण्यवासी, अश्वजीवी, गाई बाळगणारे, गोनर्ददेशचे जन, नीच, शूद्र, वैदेहजन या सर्वांप्रत उपद्रव देतो ॥१३॥

मघादि पांच नक्षत्रांचे तिसरे मंडल. यात उदय पावलेला शुक्र धान्यांचा नाश करील. दुर्भिक्ष व चोर यांचे भय उत्पन्न करील. नीचांचे प्राधान्य व वर्णसंकर याते करील ॥१४॥

मघादि पंचकामध्ये जन्यग्रहाने शुक्र, रुद्ध असता आविक (ऊर्णावस्त्रे,) शबर (भिल्ल,) शूद्र, पुंड्रदेशस्थ,  अपरांत्यदेशस्थ, शूलिक, (त्रिशूल धारण करणारे लोक) वनेचर, द्राविड, समुद्रतीरवासी लोक या सर्वांचा नाश करितो ॥१५॥

स्वात्यादि तीन नक्षत्रांचे चतुर्थ मंडल, हे अभयकारक व ब्राम्हाण, क्षत्रिय, सुभिक्ष यांची वृद्धि व मित्रभेद यांते करिते ॥१६॥

या मंडलामध्ये अन्यग्रहाने रुद्ध (स्तंभित) शुक्र असता, किरातदेशाधिपतीस मृत्यु होतो. इक्ष्वाकुदेशस्वामी, गुहावासी, अवंतिवासी, पुलिंद (रानटी लोक) तंगणसंज्ञक, शूरसेन (मथुरा प्रांतस्थ) या लोकांते चूर्णत्व प्राप्त होते ॥१७॥

ज्येष्ठापूर्वक पाच नक्षत्रांचे पाचवे मंडल; हे दुर्भिक्ष, चोर, रोग यांते करणारे व काश्मीर, अश्मक, मत्स्य या देशांतील लोक; चारुदेवीनामक नदीच्या तीरी राहणारे लोक, अवंतीनगरवासी लोक, या सर्वांस पीडा करिते ॥१८॥

या मंडलामध्ये जर दुसरा ग्रह शुक्राप्रत आरोहण करील (रोध करील) तर द्रविड, आभीर, आंबष्ठ, त्रिगर्त, सौराष्ट्र, सिंधु, सौवीर या देशांतील लोकांचा नाश होईल व काशी राजाचा वध होईल ॥१९॥

धनिष्ठादि सहा नक्षत्रांचे सहावे मंडल; हे शुभ होय. बहुत धन, गाईंचे समुदाय, आकुल (उद्योगयुक्त,) बहुत धान्य, यांनी युक्त असे लोक होतील व कोठेकोठे भयही होईल ॥२०॥

या मंडलामध्ये जर दुसरा ग्रह शुक्राप्रत आरोहण करील तर शूलिक, गांधार, अवंति या देशांतील लोकांस पीडा होईल. वैदेह राजाचा वध होईल व प्रत्यंत, यवन, शक, दास, या लोकांची वृद्धि होईल ॥२१॥

पश्चिमदिशेस स्वात्यादि व ज्येष्ठादि ही दोन मंडले शुभ होत. पूर्वादिशेस मघादि मंडल शुभ होय. शेष राहिलेली तीन मंडले पूर्वी जशी फले सांगितली तशीच देणारी होत ॥२२॥

सूर्यास्तापूर्वी दिवसास शुक्र द्दष्टिगोचर झाला तर भय, दुर्भिक्ष, रोग यांते करणारा होय. मध्यान्ही संचद्रशुक्र द्दष्टीस पडला तर राजे, सैन्य, नगरे यांचा भेद होतो ॥२३॥

कृत्तिका नक्षत्राते भेदून (तारांमधून) शुक्र जाईल तर, नद्यांस अति महापूर येतील, तेणेकरून उंच सखल हे काही दिसणार नाही ॥२४॥

रोहिणीनक्षत्राचा शकट (गाडा) भेद करून शुक्र जाईल तर, भूमि ब्रम्हाहत्यादि पातकयुक्त होऊन केश, हाडांचे तुकडे, यानी मिश्रित (काळीपांढरी) होऊन; म्हणजे मनुष्यसंहार होऊन; कापालासारखे (शिवभक्तासारखे) व्रत धारण करते ॥२५॥

शुक्र, मृगशीर्ष नक्षत्रास गेला तर मधुरादि रस व धान्ये यांचा नाश करितो. आर्द्रा न० गेला तर कोशल, कलिंगया देशांत राहणारे लोकांचा नाश करितो व अतिवृष्टिही करितो ॥२६॥

शुक्र, पुनर्वसुनक्षत्री असता, अश्मक व वैदर्भ या देशस्थ लोकांस मोठा उपद्रव होतो. पुण्यस्थित असता बहुत वृष्टि होते. विद्याधारसंज्ञक देवयोनीच्या समुदायांचा नाश होतो ॥२७॥

शुक्र, आश्लेषानक्षत्री असता, लोकांस संपांपासून पीडा होते. तसाच मघा नक्षत्राचा भेद करीत असता, महामात्र (हत्तीचा महात) यास दूषित करितो व बहुत वृष्टिही करितो ॥२८॥

शुक्र, पूर्वाफल्गुनी नक्षत्री असता, शबर व पुलिंद राजांचा नाश करितो. वृष्टि चांगली होते. उत्तरा फ० नक्षत्री असता, कुरु, जंगल (स्वल्पोदक स्थान) व पांचाल या देशांतील लोकांचा नाश करितो व वृष्टिही होते ॥२९॥

हस्तनक्षत्री शुक्र असता, कुरुदेशस्थलोक, चितारी, यांस पीडा होते व अवर्षणही होते. चित्रानक्षत्री शुक्र असता, कूपकार (विहिरी बांधणारे) व पक्षी यांस पीडा व उत्तमवृष्टि होते ॥३०॥

स्वातीनक्षत्री शुक्र असता, बहुत जलवृष्टि होईल. व दूत, व्यापारी, नावाडी यांस उपद्रव होईल. विशाखानक्षत्री शुक्र असता उत्तम वृष्टि होईल व व्यापारी लोकांस भय होईल ॥३१॥

अनुराधानक्षत्री शुक्र अ. क्षत्रियांस उपद्रव होतो. ज्येष्ठानक्षत्री शुक्र असता क्षत्रियमुख्यांस उपद्रव होतो. मूलनक्षत्री शुक्र असता मौलिक (द्रव्ये विकणारे) व वैद्य यांस उपद्रव होतो. व या अनुराधादि तीन नक्षत्री शुक्र असता अवर्षणही होते ॥३२॥

पूर्वाषाढानक्षत्री शुक्र असता उदकातील प्राणी अथवा द्रव्ये यांस पीडा होते. उत्तराषाढानक्षत्री शुक्र असता रोग बहुत होतील. श्रवणनक्षत्री शुक्र असता कानास रोग होतो. धनिष्ठानक्षत्री शुक्र असता पाखंडी (वेदबाहय) लोकांस पीडा होते ॥३३॥

शततारका नक्षत्री शुक्र अ० मधपान करणारांस पीडा होते. पूर्व भाद्रपदा न० शुक्र अ० जुगार खेळून त्या पैशावर वाचणारांस पीडा होते. व कुरु, पांचाल देशस्थ लोकांसही पीडा होते व वृष्टि बहुत होते ॥३४॥

उत्तराभाद्रपदा नक्षत्री शुक्र अ० फले व मूले यांस पीडा होते. रेवती नक्षत्री शुक्र अ० पथिकांस पीडा होते. अश्विनी न० शुक्र अ० अश्वपतींस पीडा होते. भरणी न० शुक्र अ० किरात व यवन या लोकांस पीडा होते ॥३५॥

शुक्र, कृष्णपक्षी चतुर्दशी, अमावास्या, अष्टमी या तिथींस उदय किंवा अस्त जेव्हा पावेल तेव्हा सर्व भूमी उदकमय अशी दिसेल (अतिवृष्टि होईल ॥३६॥)
 
बृहस्पति आणि शुक्र यांतून कोणताही एक ग्रह पश्चिमेस व कोणताही एक ग्रह पूर्वेस असून परस्पर सप्तमरशिगत ज्याकाळी असतील त्याकाळी लोक रोगभय व शोक यांनी पीडित होतील व इंद्राने सोडलेल्या उदकाते पाहणार नाहीत (वृष्टि होणार नाही) ॥३७॥

बृहस्पति,बुध, भौम, शनि हे सर्व ग्रह शुक्राचे अग्रभागी जेव्हा राहतील तेव्हा मनुष्य, सर्प, विद्याधर (देवयोनिवि०) सुहृद (मित्र) मित्रभावाते सोडतील, ब्राम्हाण वेदोक्त यज्ञादिकर्मांते करणार नाहीत, इंद्र अल्पही उदक देणार नाही (वृष्टि होणार नाही) व पर्वतांची मस्तके वज्राने (विजेने) भेदन करील (पर्वतांवर वीज पडेल) ॥३९॥

शनैश्वर, शुक्राचे पुढे राहिला असता यवन, मार्जार, हत्ती, गर्दभ, महिषी, कृष्णधान्ये, डुकर, रानटीलोक, शूद्र व दक्षिणापथ (दक्षिणेकडील लोक) हे सर्व नेत्ररोग व वायु यांनी उत्पन्न झालेल्या दोषांनी नाशाप्रत पावतील ॥४०॥

शुक्र, भौम पुढे असता अग्नि, युद्ध, दुर्भिक्ष, अवर्षण व चोर । यांहीकरून प्रजांचा नाश करितो. व जंगमस्थावर जगत, उत्तरस्थलोक यांचा नाश करितो. आणि सर्व दिशा अग्नि, वीज, धूळ यांहीकरून पीडित (दु:खित) होतात ॥४१॥

शुक्र, बृहस्पति पुढे अ०, सर्व शुक्लपदार्थ व ब्राम्हाण, गाई, देव यांची गृहे व पूर्वदिशा या सर्वांचा नाश करितो मेघ गारांची वृष्टि करितात. तसेच लोकांच्या कंठी रोग होतील व शरद्दतूंतील धान्य बहुत होइल ॥४२॥

अस्तंगत किंवा उदित बुध, शुक्राचे पुढे असेल तर वृष्टि होईल व ज्वरादि रोग, पित्तजकावीळ यांतेही करितो. ग्रीष्मऋतूंतील धान्ये उत्तम होतात. संन्यासी (वनस्थ), अग्निहोत्री, वैद्य, मल्ल, घोडे, वैश्य, गाई, अश्वादिवाहनसहित राजे पीतवर्ण द्रव्ये व पश्चिमदिशा या सर्वांचा नाश करितो ॥४३॥

शुक्राचा, अग्नीसारखा वर्ण अ० अग्निभय, रक्तवर्ण अ० शस्त्रभय, सुवर्णाच्या कसोटीसारखा वर्ण अ० रोग, हिरवा (पोपटी,) पिंगट वर्ण अ० श्वास व कास हे रोग होतात व भस्मवर्ण, रखरखीत व कृष्णवर्ण असता पाऊस पडत नाही. (अवर्षण होते) ॥४४॥

दधि, कुमुदपुष्प, चंद्र यांसारखी कांति धारण करणारा; स्पष्ट व चकचकीत अशा किरणांचा व बृहच्छरीर (मोठा तारा,) नक्षत्रांच्या उत्तरेइकडून जाणारा, उत्पातरहित, युद्धात जय पावलेला असा शुक्र कृतयुग करणारा होतो (लोक, व्याधि, दारिद्रय, शोक यांनी रहित होतात) ॥४५॥


॥ इतिबृहत्संहितायांशुक्रचारोनामनवमोध्याय: ॥९॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2015-02-18T03:56:04.9000000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

side note

  •  
  • = marginal note 
  • स्त्री. समासटीप 
RANDOM WORD

Did you know?

What is Gotra?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site