मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|बृहत्संहिता|
अध्याय ४

बृहत्संहिता - अध्याय ४

शके ८८८ फाल्गुन कृष्ण द्वितीया गुरुवारी उत्पलनामकाने ही टीका केली.


॥ अथ चंद्रचार: ॥

सूर्याचे खाली राहणारा जो चंद्र त्याचे अर्ध सूर्याच्या तेजाने नित्य श्वेत असते. (ज्या गोलकभागी सुर्यकिरण पडतात ते शुभ्र होते.) दुसरे अर्ध त्याचेच छायेने नित्य कृष्ण असते ॥
याविषयी द्दष्टंत - घागर उन्हात ठेविली असता ज्या भागी सूर्यकिरण पडतात तो पांढरा दिसतो व सुदरा भाग त्या घागरीच्या छायेने कृष्णवर्ण दिसतो. तसे चंद्रबिंब होय ॥१॥

उदकमय चंद्रीं सूर्याचे किरण संलग्न होऊन ते किरण रात्रिसंबंधी अंधकाराचा नाश करतात. जसे आरशावरील किरण गृहाच्या मध्यभागच्या अंधकाराचा नाश करितात ॥२॥

चंद्र, सूर्याच्या खालचा समभाग जसजसा सोडतो तसतसा पश्चिमेस शुक्लत्व (पांढरेपणा) धारण करतो. त्या प्रकारेच चंद्राचा सूर्याप्रमाणे अधोभागापासून (पश्चिमेकडून) उदय होतो (प्रकाशित होतो) ॥
हेच स्पष्ट सांगतो ॥ सूर्याच्या अधोभागी चंद्र अमवास्यांती येतो. त्या गोलाचे सूर्याचे सन्मुख अर्ध शुभ्र होते व दुसरे अध:स्थित अर्ध कृष्णवर्ण होते. नंतर प्रतिपाअदितिथींस जसजसा स्वाभाविक सूर्यापासून प्राङमुख, शीघ्रगतित्वास्तव, जातो तसतसा द्दष्टीस पडणारा अधोभाग शुभ्र होतो ॥३॥

या पूर्वोक्त प्रकारे प्रतिदिवशी दुसर्‍या जागी जाण्याने चंद्राच्या शुक्लत्वाची वृद्धि होते (जसजसा राशि भोगितो तशीतशी चंद्राच्या शुक्लत्वाची वृद्धि अधिक होते) अपराण्डी खालच्या भामी घटाप्रमाणे चंद्राची वृद्धि अधिक होते ॥तात्पर्य॥
चंद्र जसा सूर्याचे पुढे प्राङमुख राशि भोगीत जातो तशी शुक्लत्वाची वृद्धि होते. ती शुक्लपक्षी अष्टमीस सूर्यापासून राशित्रयांतराने अर्धी शुक्ल वृद्धि होते पुढे वृद्धि होते होत पौर्णिमेच्या अंती समार्धीं (सहा राशीस) चंद्र जातो तेव्हा पूर्ण होतो. नंतर जसजसा सूर्याजवळ जातो तसतसा कमी होऊन वद्य अष्तमीस अर्धा होऊन अमावस्येच्या अंती सर्व बिंब कृष्ण होते ॥४॥

चंद्र ज्येष्ठा, मूळ, पूर्वाषाढा, या नक्षत्रांचे दक्षिणभागाने जाईल तर बीजे, जलचरप्राणी व वने यांचा नाश आणि अग्निभय करील. अर्थात उत्तरभागाने गेला तर शुभ होय ॥५॥

चंद्र विशाख व अनुराधा यांचे दक्षिण बाजूने गेला तर अनिष्ट होय. मघा व विशाखा यांचे मधून गेला तर प्रशस्त आणि उत्तरभागाकडून गेला तरी प्रशस्त (शुभ) होय ॥६॥

रेवती, अश्विनी, भरणी, कृत्तिका, रोहिणी, मृग या नक्षत्री चंद्र न येताच संयोग होतो म्ह. मागील नक्षत्री असता नक्षत्र तारेबरोबर होतो ॥
आर्द्रादि अनुराधांत १२ नक्षत्री तारेच्या मध्ययोगी संयोग होतो. ज्येष्ठादि उत्तराभाद्रपदात ९ नक्षत्र भोगून पुढे गेल्यावर चंद्राचा योग होतो. तात्पर्य. ज्या दिवशी उत्तराभाद्रपदा नक्षत्र असेल त्या दिवशी रेवतीच्या तारेबरोबर चंद्र असतो अशी ६ नक्षत्रे. आर्द्रापासून १२ नक्षत्री त्यांच्याच तारांबरोबर असतो. मूळ दिवसनक्षत्र असता ज्येष्ठेच्या तारांबरोबर चंद्र असतो अशी ९ नक्षत्रे ॥७॥

चंद्राची शृंगे किंचित उंच व विस्तीर्ण असली तर ते, नौ संस्थान होय. ते झाले असता नाविक (नावाडी) लोकांस पीडा व इतर सर्व लोकांस सुख होते ॥८॥

चंद्राचे उत्तरेकडील शृंग अर्धोनत असता, लांगलसंस्थान होते. ते झाले असता, शेती लोकांस पीडा होते व कारणावांचून परस्पर राजांची प्रीति (सख्य) होते व इतर लोकांचे कल्याणा आणि सुभिक्ष (ध्यान्याची सवंगाई) होते ॥९॥

चंद्राचे दक्षिणशृंग अर्धोनत असता, दुष्ट लांगलनामक संस्थान होते. ते झाले तर पांडयदेशच्या राजाचा नास होतो व ते सैन्यांच्या यात्रेविषयी (शत्रूवर जाण्याविषयी) उद्योग करिते ॥१०॥

समशृंग चंद्र असता, प्रथम दिवसा (प्रतिपदा) सारखी सुक्षिक्ष, कल्याण, जलवृष्टि ही होतील. दंडाकार चंद्र प्रथम दिवशी दिसला असता, गाईस पीडा होईल. व राजे भयंकर दंड करतील ॥११॥

नुष्यासारखे चंद्राचे संस्थान असता युद्धे होतील; परंतु जिकडे धनुष्याची दोरी असेल त्या दिशेकडच्यांचा जय होईल. चंद्ररेखा दक्षिणोत्तर विस्तीर्ण जर दिसेल तर ते युगसंस्थान, ते झाले तर भूमिकंप होतो ॥१२॥

पूर्वोक्तयुगसंस्थानीच दक्षिणशृंगाग्री किंचित उंच असेल तर, तो चंद्र पार्श्वशायी होय. तो झाला तर व्यापारी लोकांचा नाश करितो व वृष्टीचा अभाव (अवर्षण) करितो ॥१३॥

दोहो शृंगांच्या बरोबरीच्या उंचीपासून जर चंद्राचे शृंग अधोमुख होईल तर ते आवर्जितनामक संस्थान होय. असे द्दष्टिगोचर झाले असता, दुर्भिक्ष होते. व गोधनाचा नाश होतो ॥१४॥

चंद्राच्या सभोवती अखंड रेषा दिसेल तर ते कुंडाख्य संस्थान होय. असे द्दष्टिगोचर झाले असता मांडलिक राजांचा स्वस्थानत्याग होईल ॥१५॥

सांगितलेल्या नौ इत्यादि स्थानांचा अभाव असता उत्तरेकडे चंद्राचे शृंग उच्च असले तर कल्याण व वृष्टि करणारे होय. दक्षिणेकडचे शृंग उंच असले तर दुर्भिक्ष व भयकारक होय ॥१६॥

एकशृंग अथवा नष्टशृंग किंवा खाली लवलेले शृंग असा चंद्र शुक्ल द्वितीयेस जो एकच मनुष्य पाहील त्यास मृत्यु होईल ॥१७॥

चंद्राचा संस्थानप्रकार सांगितला आता पुढे रूपे सांगतो. फारच लहान चंद्रस्वरूप दुर्भिक्षकारक व फार मोठे स्वरूप सुभिक्षकारक होय ॥१८॥

जो मध्यमस्वरूपचंद्र तो वज्रसंस्थ. तो क्षुद्भय (दुर्भिक्ष) व राजांचा उद्योग (शत्रूंवर स्वारी) कारक होतो. मृदंगरूप चंद्र कल्याण व सुभिक्षकारक होय ॥१९॥

विस्तीर्णबिंब चंद्र राजाची लक्ष्मी वाढवितो. स्थूल (घन) मूर्तिचंद्र सुभिक्षकारक होय. अघनमूर्ति चंद्र दुर्भिक्षकारक होय ॥२०॥

चंद्राचे शृंग भौमाने ताडित असता, म्लेच्छदेशस्थ कुत्सित राजांचा नाश होतो. शनैश्वराने ताडित असता, युद्ध व दुर्भिक्ष होते. बुधाने ताडित असता, अनावृष्टि व दुर्भिक्ष होते. गुरूने ताडित असता, श्रेष्ठराजांचा नाश होतो. शुक्राने ताडित चंद्राचे शृंग असता, स्वल्प (लहान) राजांचा नाश होतो. या भौमादि ग्रहकृत शृंगताडनाचे फल शुक्लपक्षी अल्प होते व कृष्णपक्षी जसे सांगितले तसे (बहुत) होते ॥२१॥

शुक्र चंद्रबिंबाच्या मधून गेला तर, मगध, यवन, पुलिंद या देशच्या लोकांचा नाशा होतो व नेपाल देशाचा नाशा होतो. शृंगि, मरु, कच्छ, सुराष्ट, मद्र, पांचाल, कैकय, कुलूनक, पुरुषभक्षण करणारे व उशीनर देशच्या लोकांचा नाश होतो. ही सर्व फले सात महिन्यांपर्यंत होतात ॥२२॥

चंद्र, गुरूने भिन्न असता, गांधार, सौवीरक, सिंधु, कीर, या देशी राहाणार्‍या लोकांस व व्रीहयादि धान्ये, पर्वत, द्रविडडेशाचे राजे, ब्राम्हाण या सर्वांस दहा महिनेपर्यंत पीडा होते ॥२३॥

चंद्र, भौमाने भेदित असता, अश्वादि वाहनांसहवर्तमान उद्युक्त (जयेच्छु) राजांचा; त्रिगर्त, मालवा, कुलिंद या देशचे लोकांचा; समुदायांमध्ये श्रेष्ठांचा; शिबिदेशस्थ लोकांचा, अयोध्यावासी राजांचा; कुरुदेशस्थ लोकांचा; मत्स्यदेश व शुक्तिदेश यांच्या राजांचा; क्षत्रियांमध्ये श्रेष्ठांचा षण्मासपर्यंत नाश होतो ॥२४॥

चंद्र, शनीने भेदित बिंब असता, योद्धे (शूर) लोकांचा, प्रधानांचा, कुरु देशस्थ लोकांसहवर्तमान पूर्वेकडील राजांचा; अर्जुनायन लोकांचा दहा महिनेपर्यंत पीडेने नाश होतो ॥२५॥

बुध, चंद्रबिंबाते भेदनकरून जाईल तर, मगधदेश, माथुरदेश यांमध्ये राहणार्‍या लोकांचा व वेणानामक नदीच्या तीरी राहणार्‍या लोकांचा नाश होईल. पूर्वोक्त देशादिकाते सोडून अन्य देशादिकी कृतयुगाप्रमाणे सुख होईल ॥२६॥

धूमकेतूने चंद्र भिन्न असता, कल्याण, आरोग्य, सुभिक्ष यांचा नाश व आयुधाने वाचणारे (शिपाई, शूर) यांचा नाश होतो. आणि चोरांस फार पीडा होते ॥२७॥

चंद्रग्रहण असता त्याचे सन्मुख उल्का जाईल तर ज्या राजाच्या जन्मनक्षत्रास तो तसा चंद्र असेल त्या राजाचा नाश होतो ॥२८॥

भस्मतुल्यवर्ण, (मलिन) परुष, (अतिरूक्ष) आरक्तशरीर, किरणांनी रहित, कृष्णशरीर, फुटलेला, कंपित असा चंद्र दुर्भिक्ष, युद्ध, रोग, चोर यांचे भय करतो ॥२९॥

बर्फ, कुंदपुष्प, पांढरे कमल,  स्फटिक, यांसारखा शुभ्र चंद्र व पार्वतीने, आपला पति जो सदाशिव त्याच्या संतोषार्थ रात्रीच्याठायी फार प्रयत्नाने, निर्मळ केलेला, असा चंद्र (स्वच्छ चंद्र) द्दष्टीस पडेल तर सर्व जगताचे कल्याण होईल ॥३०॥

चंद्र, कुमुद (कमल), मृणाल (कमलाची देटी) व मोत्यांचा हार यांसारख्या वर्णाचा (शुभ्र) असेल, व त्याची प्रतिपदादि तिथिनियमाप्रमाणे क्षय किंवा वृद्धि होईल. आणि विकाररहित (कंपनादिदोषरहित) गति, अविकृतबिंब, व अविकृतीकरणयुक्त असा चंद्र असेल तर मनुष्यांस सुखकारक होतो ॥३१॥

शुक्लपक्षी चंद्राची वृद्धि होत असेल तर ब्राम्हाण, क्षत्रिय व प्रजा यांची वृद्धि होईल. या शुक्लपक्षीच चंद्राची हानि (क्षय) क्षीण होईल तर ब्राम्हाणादिकांची हानि होईल. या शुक्लपक्षीच समता म्ह. वृद्धिहानीचा अभाव असता, त्या ब्राम्हाणादिकांची समता होईल. हेच फल कृष्णपक्षी विपरीत जाणावे ॥३२॥

॥ इति चंद्रचार: ॥

N/A

References : N/A
Last Updated : February 18, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP