मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|बृहत्संहिता|
अध्याय २

बृहत्संहिता - अध्याय २

शके ८८८ फाल्गुन कृष्ण द्वितीया गुरुवारी उत्पलनामकाने ही टीका केली.


यानंतर सांवत्सर (दैवज्ञ) याचे स्वरूप सांगतो. तो सांवत्सर कुलीन, पाहिला असता सुख उत्पन्न करणारा, नम्रवेष, खरे बोलणारा, निंदा न करणारा, शत्रुमित्रांच्याठाई तुल्य, अतिसंलग्न व पुष्ट अशा आहेत शरीरसंधि ज्याच्या असा, अव्यंग, हात, पाय, नखे, नेत्र, ओष्ठ, दांत, कान, ललाट, भिवया, मस्तक ही सुंदर आहेत ज्याची असा, शरीर सुंदर आहे ज्याचे असा, गंभीर व उदात्त (मोठा) आहे शब्द ज्याचा असा ज्योतिषी (जोशी) असावा. कारण बहुधा शरीराच्या आकाराप्रमाणे गुण किंवा दोष उत्पन्न होतात ॥

त्या सांवत्सराच्या शरीरामध्ये गुण असावे ते - शुद्ध, (शास्त्रोक्त शौचानुष्ठान कर्ता व अलोभी) चतुर, शीघ्र कार्य करणारा, शास्त्रानुसार प्रशस्त बोलणारा, पूर्वापरसंबंधाने उत्तर देणारा, सर्व देशव्यवहार व कालस्वरूप जाणणारा, निर्मलचित, सभेमध्ये त्यक्तभय, त्याच्या बरोबर अध्ययन करणारांस अजेय, शिक्षित, (इंगित जाणणारा) व्यसन (गीत, वाद्य, नृत्य, स्त्री, द्यूतादि) रहित वेदोक्त मंत्रपाठविनियोग जाणनारा, शांतिकविद्याभिज्ञ, पौष्टिकविद्याभिज्ञ, आभिचार (जारणमारणादि) विद्याभिज्ञ, नित्यनैमित्तिकादि क्रियांगे जाणणारा, देवपूजा, व्रते, उपवास इत्यादिकांच्याठाई तत्पर, ग्रहगणितादिकाने आश्चर्य उत्पादक आहे ज्ञानसामर्थ्य ज्याचे असा, विचारलेल्या अर्थाते सांगणारा, उत्पातसूचित अशुभविषयी न विचारता सांगणारा ग्रहगणित (पंचसिद्धांत) फलग्रंथ (जातकादि ग्रंथ) यांचा अर्थ जाणणारा ॥

त्या ग्रहगणितामध्ये पौलिश, रोमक, वासिष्ठ, सौर, पैतामह (ब्रम्हा) असे ५ सिद्धांत आहेत. हे पाच सिद्धांत जाणणारा;  युग, वर्ष, अयन, ऋतु, मास, पक्ष, अहोरात्र, प्रहर, मुहूर्त, नाडी (घटिका) विनाडी (पल) प्राण (श्वासोच्छवास) त्रुटि (दोन निमेष), आणि त्याचे अवयव इत्यादि कालप्रमाणाते व मेषादिराशिप्रमाणातेही जाणणारा; सौर, सावन, नाक्षत्र, चांद्र, या चारप्रकारच्या महिन्यांते व अधिमास क्षयमास यांच्या स्वभावाचे कारण जाणणारा; ६० संवत्सर, युग, मास, दिन, होरा, यांच्या स्वामीची प्रवृत्ति व निवृत्ति जाणणारा ॥

सौरादि मासांचे साद्दश्य असाद्दश्य, योग्यायोग्यत्वाचे प्रतिपादन करण्यास कुशल असा, सिद्धांतभेद जाणणारा, अयननिंवृत्ति म्ह. दक्षिणेस व उत्तरेस सूर्याचे गमनयाते प्रत्यक्ष ज्ञानाने जणणारा, विषुववृत्तजाणता, उदितांश जाणणारा, तुरीयंत्रादि छायायंत्रे जलयंत्रे आणि वेध यांचे साम्याते जाणता, सूर्यादिक ग्रहांच्या शीघ्र, मंद, याम्योत्तर, नीच - उच्च अशा गतींचे कारण जाणणारा;  सूर्यचंद्रांच्या ग्रहणांमध्ये ग्रहणाचा आरंभ, मोक्ष, दिशा, प्रमाण, स्थिती, खग्रास, वर्ण, इत्यादिक आदेश यांचा व भावीग्रहयोग, ग्रहयुद्धे यांते सांगणारा ॥

प्रत्येक ग्रहाचे भ्रमणाची योजने व कक्षा (कर्ण) यांचे प्रमाण जाणणारा, प्रत्येक देशाच्या योजनांच्या पमाणाविषयी कुशल; भूगोल, नक्षत्रगणाचे भ्रमण व संस्थान इत्यादि जाणणारा; ध्रुवोन्नतीचा अवलंबक दिवसव्यास (अहोरात्र्यर्ध,) चरखंडकाल, मेषादि राशींचे उदय (लग्न) छायेवरून इष्टघटी करण इत्यादिक, व लग्नकाल करण यांचा जाणणारा; नानाप्रकारच्या उक्तप्रश्नांच्या भेदज्ञानाने ज्याची उत्तम वाणी झाली असा; कसोटीवर घासून किंवा तापवून किंवा तोडून शुद्ध केलेल्या सुवर्णासारखे अत्यंत स्वच्छ केलेल्या शास्त्राचा वक्ता; असा जो तो गणितशास्त्र जाणणारा होतो ॥

जो मनुष्य शास्त्रोक्त अर्थाते प्रतिपादन करीत नाही, कोणी प्रश्र केला असता एकाही प्रश्नाचे उत्तर देत नाही व शिष्यांसही पढवीत नाही तो शास्त्रार्थ जाणणारा कसा म्हणावा ॥१॥

जो मनुष्य ग्रंथाचा अर्थ अन्य असून दुसराच अर्थ करितो व गणितही निराळेच करितो तो अबुध (मूर्ख) होय, तो मनुष्य पितामह (आजा) याप्रत जाऊन, वैश्येचे गुण (नखदशन नखक्षत सीत्कारादिक) याहीकरून मातेची स्तुती करितो ॥२॥

गणितस्कंध चांगला जाणला; छाया व जलयंत्र यांनी लग्न चांगले जाणले असता; होरार्थ (लग्न) सुस्थिर असता; सांगणाराची वाणी निष्फल (मिथ्या) होत नाही ॥३॥

पुरुष नौकेतून जात असता, वायूच्या वेगाने परतीरास कदाचित जाईल; परंतु हा कालपुरुषाख्य (ज्योति:शास्त्ररूप) जो महार्णव (मोठा समुद्र) याच्या परतीरास मुनीवाचून कोणी कधीही मनानेसुद्धा जाणार नाही. ऋषि मात्र जाईल ॥४॥

होरा (जातक) शास्त्रामध्येही केवळ वक्रानुवक्रास्तमयोदयादिकच सांगितले नाहीत जितके होराशास्त्राचे भेद तितकेही सांगितले. ते हे :--- राशि, होरा, द्रेक्काण, (राशित्रिभाग) नवांश, द्वादशांश, त्रिशांश, बलाबलविचार, ग्रहांचे दिग्बल, स्थानबल, कालबल, चेष्टाबल, इत्यादि अनेक प्रकारच्या बलांचा विचार; वातपित्तादि प्रकृति, धातु (मृन्मांसमेदोस्थिमज्जारेत,) ताम्रादिद्रव्य, ब्राम्हादि जाति, यांचा विचार; गर्भाधान, गर्भमोक्षसमय यांवरून आश्चर्यकारक जे नालवेष्टितादिक प्रत्यय (दाखले) त्यांचे कथन, अरिष्टाध्याय, जीवितप्रमाण, दशा, अंतर्दशा, अष्टक, वर्ग, राजयोग,  चंद्रयोग, द्विग्रहादियोगांची शुभाशुभफले, आश्रयभावाचे अवलोकन, निर्याणगति अनूक तात्कालिक प्रश्न शुभाशुभांची निमित्ते, विवाहहादिक कर्मांचें करण (कारण)

यात्रेच्याठायी (प्रयाणी) तिथि, (प्रतिपदादि) रव्यादिवार, बवादि करणे, अश्विन्यादि नक्षत्रे, अहोरात्र इ. मुहूर्त, यांची फले; मेषादि तात्कलिक लग्ने, योगाध्यायोक्त योग, देहस्पंदन (देहस्फुरण,) स्वप्न विजयार्थस्नान, ग्रहयज्ञ, गुहयकपूजन, अग्निचिन्हा, हत्ती, घोडा यांचे चेष्टित, सैन्याचा (मी पुढे इत्यादि) बाद व चेष्टा व उत्साह इत्यादि करणे, संधिविग्रहादि षाडगुण्य, सामदानादि उपाय, शुभाशुभ शकुन, सैन्य राहाण्यास योग्य भूमि, प्रस्थानाग्निकर्मी शुभाशुभ, प्रधान, बातमीदार, दूत, पारधी, यांचे यथाकाली प्रयोग, शत्रूंच्या किल्लयांच्या प्राप्तीचे उपाय, इत्यादिक होराशास्त्राचे भेद आचार्यांनी सांगितले.

जगतामध्ये विस्तारित, बुद्धीच्याठाई चित्रासारखे, ह्रदयाच्याठाई ठसलेले असे ज्याचे गणितशास्त्र आहे त्याच्या उक्ति (भाषणे) कधीही निष्फल होत नाहीत ॥५॥

सूर्यादि ग्रहांचे चार (गतिवशाने शुभाशुभ कथन,) त्या चारांमध्येही ग्रहांची प्रकृति (स्वभाव,) विकार, जगताचे प्रमाण, शुक्लादिवर्ण, करिण व त्यांची कांति, आकार, अस्त, उदय, दक्षिणोत्तर मध्यममार्ग, मार्गमध्य, भौमादिकांचे वक्रत्व, मार्गत्व, नक्षत्रांबरोबर ग्रहांचासंयोग, चार, इत्यादिकांनी फले होतात. नक्षत्रकूर्मविभागाने देशांमध्ये फले होतात. अगस्तिचार, वसिष्ठादि सप्तऋषिचार, ग्रहाणांभक्तय: (देशद्रव्याणि प्राणिनामाधिपत्यं,) नक्षत्रव्यूह: (द्रव्यजनाधिपत्यं,) ग्रहशृंगाटकं (ताराग्रहांचे शृंगाटकसंस्थानाने शुभाशुभज्ञान,) ग्रहांचे युद्ध, ग्रहांचा चंद्राशी समागम, ग्रहांच्या वर्षाधिपत्याने फले, मेघगर्भलक्षण, रोहिणीचा चंद्राशी योग, तसाच स्वातियोग, व पूर्वाषाढायोग, सद्योवृष्टिलक्षण, पुष्प व लतांचे लक्षण, (वृक्षादिकांच्या फलपुष्पसमृद्धीने लोकांमध्ये शुभाशुभ कथन) परिघि (प्रतिसूर्याचे) लक्षण, असेच वायूचे लक्षण, उल्कापात व दिग्दाह याचे लक्षण, भूकंप, संध्याराग, गंधर्वनगरलक्षण, रजोलक्षण, उल्कापात वि दिग्दाह याचे लक्षण, भूकंप, संध्याराग, गंधर्वनगरलक्षण, रजोलक्षण, निर्घातलक्षण, अर्घकांड (राशीवरून द्रव्याचे महर्घत्वादि) सस्यजातक, इंद्रध्वजपूजा, इंद्रधनुष्याचे लक्षण, वास्तुविद्या (गृहांचे लक्षण,) प्राण्यांच्या अंगस्पर्शाने शुभाशुभज्ञान, काकचेष्टि, शाकुनचक्र, मृगचेष्टित, अश्वचेष्टित, वातचक्र, (अष्टदिशांमध्ये फिरणार्‍या वाय़ूचे लक्षण,) चेवळाची रचना, प्रतिमालक्षण, (देवप्रतिमांचे लक्षण,) वृक्षांची चिकित्सा, दगार्गल (जलप्राप्ति,) नीराजन (शांतिकर्म) अथवा नीरांजन, मंत्रपूतजलाने अंजन (क्षेपण, स्पर्शन;) खंजन पक्ष्याचे लक्षण, उत्पातशांति, मयूरचित्रक, घृतकंबल (पुष्यस्नान) खढ्गपरीक्षा, पट्ट (नृपकुमुट) याची परीक्षा, कुक्कुट, कूर्म, गो, मेंढा, अश्व, गज, पुरुष, स्त्री, यांची लक्षणे अंत:पुरस्त्रियांचे लक्षण, पिटक (फोड) यांचे लक्षण, उपानत् (वाहणावगैरे) यांचा छेद, वस्त्रछेद, चामरदंडपरीक्षा, शय्यासनाचे लक्षण, हीरकादि रत्नाची परीक्षा, दीपाची परीक्षा, दंतकाष्ठादिकांवरून शुभाशुभ निमित्ते, व सर्व जगताची सामान्य निमित्ते,  पुरुषापुरुषाप्रति जी शुभाशुभ लक्शह्णे ती, तशीच राजाच्याठाई जी लक्षणे ती, ही सर्व प्रतिक्षणी अन्यकर्मरहित दैवज्ञाने चिंतन करावी. (यांचा विचार करावा)

रात्रंदिवस निमित्ते पाहणे एकटयाच्याने होत नाही. यास्तवराजाने सुपोषितदैवज्ञाने दुसरे ज्योति:शास्त्रज्ञ चार दैवज्ञ ठेवावे. त्यामध्ये एकाने पूर्व व आग्नेयी पाहावी. दुसर्‍याने दक्षिण व नैऋति प., तिसर्‍याने पश्चिम व वायव्य प., चवथ्याने उत्तर व ईशानी पाहावी. उल्कापातादि निमित्ते अल्पकालिक होत. यास्तव त्या उल्कादिकांचे आकार, वर्ण, स्निग्धता, हस्तादिप्रमाणे, उत्तरादि दिक, ग्रह, नक्षत्र, यांचा अभिघात (अभिहनन) इत्यादिकांनी शुभाशुभ फले होतात. ॥६॥

सर्व ज्योति:शास्त्राची अंग व उपांगे (पुरुष लक्षणादिक) यांचा जाणणारा, जातक व गणित यांमध्ये निष्णात (तत्पर) अशा दैवज्ञाची जो राजा पूजा (सत्कार) करीत नाही. तो नाशाला प्राप्त होतो ॥७॥

जे वनात राहिलेले, अहंकाररहित, स्त्रियादिपरिग्रहरहित असे तेही ग्रहनक्षत्रादिज्योतींची गतिजाणणार्‍या दैवज्ञाप्रत विचारतात. (त्यांसही शुभाशुभ समजण्याची इच्छा असते) ॥८॥

जशी रात्रि दीपावाचून शोभत नाही व आकाश सूर्यावाचून शोभत नाही तसा राजा दैवज्ञांवाचून शोभत नाही. इतकेच नाही, जसा मार्गामध्ये आंधळा फिरतो त्या सारखा राजा सर्वत्र संशयाने फिरतो ॥९॥

आर्द्रादिमुहूर्त, प्रतिपदादि तिथि, अश्विन्यादिनक्षत्रे, शिशिरादिऋतु, दक्षिणोत्तर अयने, ही सर्व सांवत्सर (दैवज्ञ) नाहीतर निष्फळ होतात ॥१०॥

पूर्वोक्तकारणास्तवजय, यश, लक्ष्मी, उपभोग, आणि आरोग्य याते इच्छिणार्‍या राजाने पंडित व श्रेष्ठ असा दैवज्ञ ठेवावा ॥११॥

संपत्तिइच्छिणार्‍यापुरुषाने दैवज्ञरहित देशामध्ये राहू नये. सर्व शुभाशुभादिकांचा प्रकाशक हा दैवज्ञ आहे. तो जेथे राहतो, तेथे पाप राहात नाही ॥१२॥

ज्योति:शास्त्र पठन करणारा नरकाप्रत जात नाही. तो ब्रम्हालोकामध्ये प्रतिष्ठेला प्राप्त होतो ॥१३॥

या ज्योति:शास्त्राला पाठाने व अर्थाने जो ब्राम्हाण संपूर्णत्वेकरून जाणतो, तो श्राद्धाचेठाई पूज्य व प्रथमभोज्य होतो, आणि तो पूज्यब्राम्हण ज्या पंक्तीमध्ये बसतो, त्या पंक्तीला पवित्र करितो ॥१४॥

यवन हे म्लेच्छ (रानटी) आहेत तरी त्यामध्ये हे ज्योति:शास्त्र उत्तमप्रकारे राहिले आहे (त्यांनी ते पूर्वाचार्यांपासूनच संपादिले) यास्तव ते यवनही ऋषीसारखे पूजिले जातात. मग दैवज्ञ ब्राम्हण पूज्य होतील, यात काय सांगावयाचे आहे ॥१५॥

कुहक (गारूड वगैरे जाणण्याने) जादुगिरीने, प्रवेशाने, आच्छादित राहण्याने, अथवा कर्णपिशाचसाधनाने ज्याने आदेश केला. (प्रश्नादि सांगितले) त्यास सर्वत्र कधीही विचारू नये. कारण तो दैवज्ञ नव्हे ॥१६॥

जो ज्योति:शास्त्र न जाणता जोशी म्हणवितो तो त्या पंक्तीच्या लोकांना अपवित्र करणारा, पापी, व नक्षत्रसूचक म्ह. ज्योतिष न जाणणारा होय ॥१७॥

नक्षत्रसूचकाने सांगितलेला जो उपहास, त्याते जो करितो. तो त्या नक्षत्रसूचकासहवर्तमान अंधतामिस्र नरकाप्रत जातो ॥१८॥

नगरद्वारस्थित मृत्पिंडाचे प्रार्थित काकतालीय न्यायाने जसे सत्य होते तसा मूर्खांचा आदेश (प्रश्नकथन) सत्यासारखा भासतो ॥१९॥

द्रव्यदानाने योजित आहे आदेश ज्याने असा, (जसे पूर्वी मी अमुकाला हे सांगितले त्याला द्रव्य मिळाले) व कोणी ज्योति:शास्त्रातील गोष्ट काढिली म्हणजे याने दुसरीच बोलावी. असा व शास्त्राचे एखादाच भाग (प्रकरण) जाणून उत्मत्त झालेला, असा ज्योतिषी राजाने सोडावा (त्यास बाळगू नये) ॥२०॥

जो होरा, गणित, संहिता असे त्रिस्कंध ज्योति:शास्त्र उत्तमप्रकारे जाणतो. तो ज्योतिषी जयेच्छु राजाने पूज्य व स्वीकार करण्यास (बाळगण्यास) योग्य होय. ॥२१॥

देश काल जाणणारा एकटा दैवज्ञ जे कार्य करितो. ते कार्य एक हजार गजांनी किंवा चार हजार अश्वांनीही होणार नाही ॥२२॥

दुष्टस्वप्न, अप्रियाचे ध्यान, अमंगलदर्शन, केलेली दुष्टकर्मे ही सर्व, चंद्राचा नक्षत्रांसहवर्तमान जो संवाद, त्याचे श्रवण केले असता, शीघ्र नाशाप्रत पावतात. म्ह. तिथि नक्षत्र श्रवण केले असता सर्व पापे जातात ॥२३॥

ससैन्य राजाच्या कीर्तिवृद्धयर्थ जसा आप्त (यथार्थ) वक्त दैवज्ञ हित इच्छितो, तसे पिता, किंवा आई, अथवा बंधु, किंवा मित्र हित इच्छित नाहीत ॥२४॥

॥ इतिश्रीवराहमिहिरकृतौबृहत्संहितायां सांवत्सरसूत्रंनाम द्वितीयोध्याय: ॥२॥

N/A

References : N/A
Last Updated : February 18, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP