मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|उपदेश|
जनांस उपदेश १८ ते २०

उपदेश - जनांस उपदेश १८ ते २०

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.


१८.
धीर धरीं सत्य हें तो नारायणा । शुद्ध आचरणां न सांडावें ॥१॥
लैकिकाची कांहीं न धरावी लाज । हेंचि निज काज साधावें तें ॥२॥
दंभ अभिमान सर्व त्यजोनियां । शरण त्या स-खीया जावें आतां ॥३॥
निंदा करिती तो मानावा आदर । स्तुति तें उत्तर नायकावें ॥४॥
न धरावी चाड मानासन्मानाची । आवडी भक्तीची रूढवावी ॥५॥
नामा ह्मणे हेंचि रूढवावें मानसीं । क्षण एक नामासी विसंबूं नये ॥६॥

१९.
अंतींचा लाभु आधींच साधिजे । देह असता कीजे हरिभक्ती ॥१॥
आदि मध्य अंतु तोचि हा व्यापकु । विश्वप्रतिपा-ळकु नारायण ॥२॥
विषय महापुरीं पतीत जीव भारी । तैशापरीहि हरिनाम ध्यावें ॥३॥
नामा ह्मणे हा दुर्लभ नरजन्मु । केशव मे-घश्यामु अनुसरा वेगीं ॥४॥

२०.
जंव हंस काया नव जाय सांडोनी । तंव घेईं ठाकोनि रामनाम ॥१॥
अंत काळवेळीं तुझें नव्हे कोण्ही । मी माझें ह्मणवूनि भु-ललासी ॥२॥
राहें निरंतर राघवाचे द्वारीं । तेणें भवसागरीं तरसी बापा ॥३॥
नवमास मायें वाहिलसि उदरीं । आस केली थोरी होशी ह्मणोनी ॥४॥
स्तनपान देऊनि मोहें प्रतिपाळीं । तेहि अंतकाळीं दूर ठाके ॥५॥
सर्वस्व स्वामिणी ह्मणवीतसे कांता । तेहि केश देतां रडतसे ॥६॥
ह्मणे म्यां मेल्याचें सुख नाहीं देखिलें । तेणे तंव पाळिलें अर्थें प्राणें ॥७॥
गाई घोडे ह्मैसी आणिक त्या दासी । धन त्वां सा-यासीं मेळविलें ॥८॥
तुझिया धनाला नाही पार लेखा । एकलचि मूर्खा जासी अंतीं ॥९॥
हातींच्या मुद्रिका कानींचे ते नग । करोनि लगबग काढिती वेगीं ॥१०॥
अंगींचीं लुगडीं फेडोनियां घेतीं । तुज बांधोनियां नेती यमदूत ॥११॥
भूमिभार झाला ह्मणती वेग करा । नातळती श-रीरा इष्ट मित्र ॥१२॥
स्मशाना नेऊनि भडाग्नि देऊनि । येती परतोनी सकळ जन ॥१३॥
एकलेंचि येणें एकलेंचि जाणें । पहा दृढ ज्ञानें विचारोनी ॥१४॥
पापपुण्य दोन्ही अंतींचीं सांगाती । येरें तीं राहती जेथिंचीं तेथें ॥१५॥
ऐसा हा संसार माया वेष्टियला । ह्मणोनि दुर्‍हाविला योगीजनीं ॥१६॥
विष्णुदास नामा विनवीतसे तुह्मां । झणीं परब्रह्मा विसरूं नका ॥१७॥

N/A

References : N/A
Last Updated : December 22, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP