कथाकल्पतरू - स्तबक १२ - अध्याय ६

'कथा कल्पतरू' या ग्रंथात चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, तसेच रामायण, महाभारत व श्रीमद्‍भागवत हे हिंदू धर्मिय वाङमय ओवीरूपाने वर्णिलेले आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥

संजयो धृतराष्ट्रासि ह्मणे ॥ निवर्तले कौरव रायराणे ॥ त्याचें प्रेतकर्म करणें ॥ धर्मशास्त्रोक ॥१॥

येरू मागुता मूर्छे पडिला ॥ पुनरपि विदुरें उठविला ॥ पुर्वप्रकारें बोधिला ॥ ह्मणे शोक न कीजे ॥२॥

अगा न झुंजे तो कैंतरी मरे ॥ आणि झुंजीं मरे त्याची कीर्ती उरे ॥ ह्मणोनि स्वर्ग गांधारें ॥ संपादिला रणयज्ञीं ॥३॥

तरी आतां शोक सांडोन ॥ सकळस्त्रियांसि बोलावोन ॥ करीं तयांचें सांत्वन ॥ धृतराष्ट्रा गा ॥४॥

मग त्या सकळ बोलाविल्या ॥ शोकाक्रांत असती जाहल्या ॥ धृतराष्ट्राजवळी पातल्या ॥ कोल्हाळ करित ॥५॥

नगरामाजी घरोघरीं ॥ रुदन करिती नरनारी ॥ दासी दास परिवारीं ॥ परमाल्हादें ॥६॥

एकी गुणधर्म आठवोनी ॥ आळविती करुणावचनीं ॥ एकी लोळताती धरणीं ॥ निर्भ्रतारा ॥७॥

त्यांसी अंध नानायुक्तीं ॥ समजावीतसे दृष्टांतीं ॥ परि लज्जा सांडोनि रडती ॥ कौरवपत्‍न्या ॥८॥

परस्परें आक्रोश करोनी ॥ सासुर्‍यापुढें नितंबिनी ॥ गोळा जालिया सांडोनी ॥ लज्जावरण ॥९॥

तये स्त्रियांसहवर्तमान ॥ धृतराष्ट्रासी पुढें करोन ॥ नगराबाहेर सर्वजन ॥ निघते जाहले ॥१०॥

स्नानें कराया गंगानीरीं ॥ रावो स्त्रिया नरनारी ॥ जाताति नगराबाहेरी ॥ तंव अपूर्व वर्तलें ॥११॥

पांडवीं द्रौणीचा मणी हरिला ॥ तें तो वनांतरीं होता गेला ॥ कृपकृतवर्म्यातें भेटला ॥ मागुता येवोनी ॥१२॥

तिघे बैसोनि रहंवरी ॥ वृत्तांत सांगाया झडकरी ॥ येत होते हस्तनापुरीं धृतराष्ट्रापें ॥१३॥

कोसा एकाचेनि अंतरें ॥ अंध भेटला सपरिवारें ॥ तंव तिघे बोलिले उत्तरें ॥ रायाप्रती ॥१४॥

कीं गांधारें पुरुषार्थ केला ॥ अंतीं स्वर्गलोका पावला ॥ सर्व सैन्या नाश जाहला ॥ आह्मी तिघे वांचलों ॥१५॥

धन्य दुर्योधनाचें जीवित ॥ ऐसें वानित वाखाणित ॥ गांधारी होती स्नुषाआंत ॥ तेथ जावोनि बोलिले ॥१६॥

कीं तवपुत्र बळाद्धुत ॥ वैरी मारोनि असंख्यात ॥ देवरूपी सैन्यासहित ॥ जाहले इंद्रलोकीं ॥१७॥

तरी शोक न कीजे तुह्मीं ॥ अश्वत्थामा आणि आह्मी ॥ काय केलें पराक्रमीं ॥ तें ऐकें कृप ह्मणे ॥१८॥

भीमें मारिलें दुर्योधनातें ॥ अधर्में कपटेम तवपुत्रातें ॥ यावरी शिबिरीं निजेले होते ॥ पांडव पांचाळ ॥१९॥

त्यावरी घाला घालोनि रात्रीं ॥ धृष्टद्युम्नादि सपरिवारीं ॥ आह्मीं मारिले सर्व वैरी ॥ तिघांजणांहीं ॥२०॥

कां जे तवपुत्रांचे वैरी ॥ ह्मणोनि मारिले सर्वोपरी ॥ परि पांडव वांचविले मुरारीं ॥ पळवोनियां ॥२१॥

त्यांहीं कोप थोर केला ॥ द्रौणीचा मणी हिरोन घेतला ॥ असो दुर्योधन तोषविला ॥ शेवटीं आह्मीं ॥२२॥

ऐसें बोलोनि नानापरी ॥ नमन केलें तिहीं वीरीं ॥ गेले हस्तनापुरामाझारी ॥ रथीं आरुढोन ॥२३॥

स्वगृही राहिले दोनी ॥ व्यासाश्रमा गेला द्रौणी ॥ इकडे पांडव चक्रपाणी ॥ गेले भीष्माजवळी ॥२४॥

तेथे धर्म बंधूसहित ॥ जाहला असे शोकाक्रांत ॥ ह्मणे जाहला सकळघात ॥ देवव्रता ॥२५॥

येरें तया आश्वासिलें ॥ सुखशब्दीं संतोषविलें ॥ ह्मणे आतां जावोनि वहिलें ॥ करीं वीरांचें उत्तरकार्य ॥२६॥

ऐसी आज्ञा होतां निघाला ॥ शोकदुःखें असे पीडला ॥ नम्रमुखें धर्म चालिला ॥ धृतराष्ट्रापें ॥२७॥

सवें द्रौपदीं दुःखपीडित ॥ पांचाळाचिये स्त्रियंसहित ॥ हस्तनापुराप्रति जात ॥ समस्तेंसीं ॥२८॥

तंव धृतराष्ट्र सकळ स्त्रिया ॥ शोक करितां देखोनियं ॥ स्वयें कोल्हाळ करोनियां ॥ धर्म गेला ते ठायीं ॥२९॥

नदीतीरीं तिये वेळीं ॥ बैसला धृतराष्ट्राजवळी ॥ तंव स्त्रिया निंदिती सकळीं ॥ कौरवांच्या ॥३०॥

राया धर्म नाहीं तूतें ॥ वृथा मिरविसी नामातें ॥ अरे ज्ञातिवृद्धां गुरुबंधूंतें ॥ मारविलें जांव‍इयां ॥३१॥

तुज कायसा राज्यसोस ॥ जाहला पुत्रबंधूनाश ॥ आतां राज्यभोगीं संतोष ॥ कैंचा तूतें ॥३२॥

हें साहोनि युधिष्ठिर ॥ पूर्वजां करोनि नमस्कार ॥ सर्व कथिला समाचार ॥ धृतराष्ट्रासी ॥३३॥

ह्मणे तवपदीं जाहलों शरण ॥ तरी देई गा अभयदान ॥ येरू ह्मणे भीमसेन ॥ कोठें आहे ॥३४॥

तो मज भेटवावा आधीं ॥ भीम भेटों ह्मणे ते संधीं ॥ परि त्या वारोनि कृपांनिधी ॥ ह्मणे ऐकें विचार ॥३५॥

हा क्रोधें तुज आकळील ॥ तेव्हां तुज मृत्यु होईल ॥ याचा क्रोध जैं उपशमेल ॥ तैचि भेटावें ॥३६॥

मग श्रीकृष्ण ह्मणे धृतराष्ट्रा ॥ भीम राहिलासे माघारा ॥ तो आतांचि येवोनि सत्वरा ॥ भेटेल तुह्मां ॥३७॥

सवें लोहपुतळा तत्क्षणीं ॥ भीमायेवढा घडवोनी ॥ आणविला नगरांतुनी ॥ श्रीकृष्णानाथें ॥३८॥

आणि ह्मणितलें धृतराष्ट्रासी ॥ कीं भीम आला भेटावयासी ॥ ह्मणोनि भेटविला त्यापाशीं ॥ लोहप्रतिमा ॥३९॥

येरें भीमभावें करीं धरोनी ॥ बळीं दडपिला हृदयस्थानीं ॥ तंव जाळिन्नला क्रोधाग्नीं ॥ शकलें होवोनि पडियेला ॥४०॥

कृपास्नेहो उपजले ॥ अधें धरणिये अंग घातलें ॥ ह्मणे म्यां नागायुतबळें ॥ मारिलें बाळक ॥४१॥

हायहाय नीळकंठा ॥ मज प्रमाद घडला मोठा ॥ जळो हा संसार वोखटा ॥ क्रोधरूप ॥४२॥

तंव संजय सांत्वन करी ॥ उठवोनि बैसविला आसनावरी ॥ मग क्रोध गेलियावरी ॥ बोले श्रीहरी तयासी ॥४३॥

अगा धृतराष्ट्रा निर्धारू ॥ बृथा शोक नको करूं ॥ तुवां मारिला वृकोदरु ॥ नाहीं जाण ॥४४॥

तूं मनीं आणोनि पाहें ॥ लोहप्रतिमा जाळिली आहे ॥ हा तुझे क्रोधार्थ उपाय ॥ रचिला आह्मीं ॥४५॥

तुझें हस्तबळ जाणोनि थोर ॥ करिसील क्रोधाचा प्रतिकार ॥ ह्मणोनि रचिला वृकोदर ॥ लोखंडाचा ॥४६॥

तवक्रोध शांत कराया ॥ उपाय गा निर्मिला राया ॥ आतां कृपाळु होवोनियां ॥ क्षेम देई पांडवां ॥४७॥

आतां दुर्योधनस्थानीं ॥ तूं भीमातें मानोनी ॥ कृपाशांती स्वीकारोनी ॥ न करीं शोक ॥ ४८॥

वैशंपायन ह्मणती राया ॥ ऐसा प्रबोध ऐकोनियां ॥ धृतराष्ट्रा स्नान करावया ॥ जाताजाहला ॥४९॥

स्नान करोनियां आला ॥ त्यासी कृष्ण बोलता जाहला ॥ कीं त्वां अध्यांत्ममार्ग परिसिला ॥ असे विदुरापासाव ॥५०॥

तेणें तूं अससी विद्वांस ॥ परि पुत्रस्नेहें भ्रांतिपाश ॥ तुज लागलासे दोष ॥ ह्मणोनि शिकविलें नायकसी ॥५१॥

विदुर संजय भीष्म द्रोण ॥ यांचें अवगणिलें वचन ॥ ह्मणोनि जाहलें संहनंन ॥ समस्तांचें ॥५२॥

दुर्योधन साभिमानें ॥ मेला दुष्टकर्माचरणें ॥ अगा जो तरी हित न जाणे ॥ तो विद्वांस होय केवीं ॥५३॥

गांधाराचे सर्व दोष ॥ तूं जाणतोसि सविशेष ॥ तरी मग कां करिसी रोष ॥ भीमावरी ॥५४॥

आतां स्वपुत्रांच्यापरीं ॥ पांडवां मानीं अभ्यतरीं ॥ पंडुऐसा भीमावरी ॥ करीं लोभ ॥५५॥

अंध ह्मणे जी श्रीपती ॥ माझी पुत्रांवरी प्रीती ॥ परि जाहली होणारगती ॥ आतां क्रोध कायसा ॥५६॥

तरी भीम केलासे गुप्त ॥ तो मजसी दावा त्वरित ॥ क्रोध जाहला उपशांत ॥ तुमचिये वाक्यें ॥५७॥

माझा पांडवांच्या ठायीं ॥ पुत्रस्नेह उपजला पाहीं ॥ मग देवें दाविले तत्समयीं ॥ पांचहीं पांडव ॥५८॥

येरू त्यांतेम स्पर्शोनि ह्मणे ॥ कल्याण होवो तुह्मांकारणें ॥ ऐसा वर देवोनि तेणें ॥ आलिंगलें सकळांसी ॥५९॥

वैशंपायन ह्मणती राया ॥ मग तदाज्ञा घेवोनियां ॥ गेले कृष्णासह भेटावया ॥ गांधारीसी ॥६०॥

तेथें व्यास बोधिती तिये ॥ करीं पांडवांवरी स्नेह ॥ आतां विचारोनि पाहें ॥ गेला शापकाळ ॥६१॥

कां जे राजधर्में वर्ततां ॥ अजेय आलें तुझिये सुतां ॥ तरी अधर्में जय सर्वथा ॥ नपवे प्राणी ॥६२॥

मागील पुढील सर्वकृत ॥ तुज सकळांचें असे विदित ॥ आतां शोक सांडोनि समस्त ॥ राहें मद्दचनीं ॥६३॥

यावरी ह्मणे गांधारे ॥ शोक नवंचे सर्वोपरी ॥ माझे पुत्र क्षात्रसमरीं ॥ पांडवीं मारिले ॥६४॥

दोघें झुंजतां एक मरे ॥ याचें नवल नाहीं खरें ॥ परि येक दुःख थोरें ॥ जाहलें मज ॥६५॥

भीमादुर्योधना झुंजतां ॥ वासुदेव पाहत होता ॥ तेव्हां गदा जानूसि अवचिता ॥ हाणविली कापट्यें ॥६६॥

तें माझें दुःख न सरे ॥ तंव बोलिलें वृकोदरें ॥ मातें ऐक साचोकारें ॥ माझें वचन ॥६७॥

नानाउपाय करोनी ॥ आह्मां वांचवाया निर्वाणीं ॥ प्रवृत्त असे चक्रपाणी ॥ तरी न गणीं हा अपराध ॥६८॥

छत्तीसदंडायुधीं मातें ॥ उपाय अभ्यासितां बहुतें ॥ साह्य केलें देवकीसुतें ॥ तथा सकळप्रसंगीं ॥६९॥

माते दुरात्मा दुर्योधन ॥ केलें द्रौपदीवस्त्राहरण ॥ तेरावरुषें कष्टविलें दारूण ॥ आह्मां वनांतरीं ॥७०॥

तेणें दुःखें म्यां कौरवबंधू ॥ मारोनि केला अपराधु ॥ तरी क्षमा करीं क्रोधु ॥ माते मज ॥७१॥

तुझिये पुत्रांचें दुष्कृत ॥ तुज सर्व असे विदित ॥ आह्मीं स्वधर्म केला सत्य ॥ संतोष येथ मानावा ॥७२॥

तंव गांधारीसती बोले ॥ भीमा तुवां बरवें केलें ॥ परि येक ओखटें जाहलें ॥ तुजपासोनी ॥७३॥

तूं मारोंनि दुःशासनासी ॥ त्याचें रक्त रणीं प्यालासी ॥ मग भीम ह्मणे परियेंसीं ॥ वृत्तांत हा ॥७४॥

म्यां बंधूचें रक्तपान ॥ सर्वथा करूं नये जाण ॥ परि येथें वर्तलें कारण ॥ तें ऐकें माते ॥७५॥

माझी हेडंबा स्त्री राक्षसी ॥ ते पती जाहली अशुद्धासी ॥ हा बोल वीरश्रियेसी ॥ तरी न कोपें मजवरी ॥७६॥

दुर्योधनें स्वाबिमानें ॥ आमुतें घेवों ह्मणे प्राणें ॥ परि साह्य करोनि नारायणें ॥ वांचविलें आह्मांसी ॥७७॥

हें ऐकोनि सती ह्मणे ॥ आह्मी अंधें दोघें जणें ॥ आतां द्दतराज्य मरणें ॥ समयो हाची ॥७८॥

होणार तें जाहलें जाण ॥ आंता शोक निष्कारण ॥ मग धर्मासि ह्मणे वचन ॥ बोलरे काहीं ॥७९॥

तंव जोडोनियां हात ॥ धर्म बोले सकंपित ॥ ह्मणे म्यां मारिले तवसुत ॥ शापा योग्य मी असें ॥८०॥

मज राज्य जीविताची ॥ इच्छा नाहीं सर्वथा कशाची ॥ हिंसा बैसली सुहृदांची ॥ शिरीं माझिये ॥८१॥

मग गांधारियें मौन धरिलें ॥ तंव समस्तं कुंतीपें गेले ॥ कुंती द्रौपदी पांडवीं केलें ॥ शोक नानाविध ॥८२॥

तेव्हां कुंती ह्मणे मज ॥ कौरवांविण नको राज्य ॥ मग पुढां करोनि यदुराज ॥ गेली गांधारीप्रती ॥८३॥

नानापरी विलाप केले ॥ तंव गांधारी सती बोले ॥ विदुरवचन फळासि आलें ॥ कीं वैरें पुत्र नाशती ॥८४॥

यावरी ह्मणे श्रीपती ॥ मेले ते पावले उत्तमगती ॥ आणि संबोखोनि ह्मणे कुंती ॥ न करीं शोक बाइये ॥८५॥

जैसीं तूं माता कौरवांसी ॥ तैसीच मीही परियेसीं ॥ आतां शोक कां करिसी ॥ जाहलें होणार तें ॥८६॥

आणिक ह्मणे पांडवांसी ॥ मी जैसी तूंहीचि तैसी ॥ हा कृतापराधें सर्वासी ॥ जाहला क्षयो ॥८७॥

ऐसें दोघी बोललिया ॥ गांधारी दीन पाहोनियां ॥ व्यास वरदान देवोनियां ॥ ह्मणती पाहें पुत्रयुद्ध ॥८८॥

मग ते पतिव्रता माता ॥ आपुले उत्संगीं समस्तां ॥ देखतीं जाहली झुंजतां ॥ कौरवपांडवांसी ॥८९॥

अश्व गज पायद रथ ॥ सृगाल काक राक्षस भूत ॥ पिशाच्यादिकीं सेवित ॥ देखिले विज्ञानें ॥९०॥

मग व्यास धर्मादिपांडव ॥ पुढां करोनि वासुदेव ॥ कौरवस्त्रियांसहित सर्व ॥ गेले कुरुक्षेत्रीं ॥९१॥

तेथें देखोनि रणासी ॥ शोक उपनला समस्तांसी ॥ मग बोलिले श्रीकृष्णासी ॥ करोनि विलाप ॥९२॥

हा सर्व क्रोधोपशम ॥ भेटला अंधादिकां धर्म ॥ आतां पुढील प्रसंग उत्तम ॥ श्रोतेजन आइका ॥९३॥

जे मूळ संस्कृत भारतीं ॥ व्यासें कथिली पुण्योक्ती ॥ तेथ दोष न ठेवावा श्रोतीं ॥ ह्मणे कवि मधुकर ॥९४॥

इति श्रीकथाकल्पतरू ॥ द्वादशस्तबक मनोहरू ॥ क्रोधोपशमनप्रकारू ॥ षष्ठाध्यायीं कथियेला ॥९५॥

॥ इति श्रीकथाकल्पतरौ द्वादशस्तबके षष्ठोऽध्यायः समाप्तः ॥

N/A


References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.