एकनाथी भागवत - श्लोक ३३ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


अवधूतवचः श्रुत्वा पूर्वेषां नः स पूर्वजः ।

सर्वसङ्गविनिर्मुक्तः समचित्तो बभूव ह ॥३३॥

इति श्रीमद्‍भागवते महापुराणे पारमहंस्यां एकादशस्कन्धे नवमोऽध्यायः ॥९॥

पाहोनि उद्धवा उजू । बोलता जाला अधोक्षजू ।

म्हणे आमचे पूर्वजांचा पूर्वज्जू । राजध्वजू यदुवीरु ॥७६॥

म्हणसी मी नेणें त्याचें नांव । तूं सांगतोसी हें अपूर्व ।

परी ज्याचेनि नामें आम्ही सर्व । वीर 'यादव' म्हणवितों ॥७७॥

हरिखें म्हणे नंदनंदू । तो आमचा पूर्वज यदू ।

ब्रह्मज्ञानाचा संवादू । दत्तात्रेयेंसीं पैं केला ॥७८॥

श्रीदत्तात्रेयाच्या वचनार्था । विश्वासोनि जाहला घेता ।

तेणें सर्वसंगविनिर्मुक्तता । आली हाता यदूच्या ॥७९॥

जो संगू सांडूनि दूर गेला । तेणें संगत्यागूचि केला ।

संगीं असोनि स्नेह सांडिला । संगमुक्त जाला तो जाण ॥४८०॥

आकाश सर्व पदार्थासी । मिळालें असे सर्व देशीं ।

परी नातळेचि सर्वसंगासी । संगमुक्तता त्यासी बोलिजे ॥८१॥

याहूनि विशेष संगमुक्तता । आली यदूचिया हाता ।

तेही सांगेन कथा । परिसें तत्त्वतां उद्धवा ॥८२॥

दत्तात्रेयबोधें तत्त्वतां । सर्वसंगामाजी असतां ।

न देखे संगाची कथावार्ता । 'विशेषमुक्तता' या नांव ॥८३॥

'मज पूर्वी द्वैतसंगू होता । तो जाऊनि निःसंग जालों आतां' ।

या दोनी समूळ मिथ्या वार्ता । विनिर्मुक्तता पावलों ॥८४॥

दोर सापु नाहीं जाला । परी सापुपणाचा आळ आला ।

तोही दोरें नाहींसा केला । भ्रांतीं कल्पिला निजभ्रमु ॥८५॥

दोरु दोरपणें असे । सर्पु तो भ्रांतामनीं वसे ।

ऐसें सांडूनि द्वैतपिसें । रायासी सावकाशें समाधी ॥८६॥

समसाम्यें समानबुद्धी । ते बोलिजे 'निजसमाधी' ।

ते समाधी पावोनि त्रिशुद्धी । राजा निजपदीं पावला ॥८७॥

कृष्ण म्हणे उद्धवासी । 'तुं जन्मूनि ऐशिये वंशीं ।

जरी ब्रह्मज्ञान न साधिशी । तरी उणें पूर्वजांसी येईल ' ॥८८॥

यापरी हृषीकेशी । तिरस्कारोनि उद्धवासी ।

झोंबावया अद्वैतासी । पुट बुद्धीसी देतुसे ॥८९॥

आधींचि विखारू काळियाणा । त्याचेंही पुच्छ रगडिल्या जाणा ।

मग झोंबिन्नल्या सत्राणा । नावरे कोणा सर्वथा ॥४९०॥

आधींचि अनुताप उद्धवासी । वरी तिरस्कारिला हृषीकेशीं ।

तो गिळावया चिद्‍ब्रह्मासी । निजमानसी खवळला ॥९१॥

पुढिले अध्यायीं निरूपण । कृष्ण‍उद्धवसंवाद जाण ।

सांगेल गुरुशिष्यलक्षण । श्रोते विचक्षण परिसतू ॥९२॥

एका जनार्दनु म्हणे । अगाध कृष्णमुखींचें बोलणें ।

तें मी जरी निरोपूं नेणें । परी तें गोडपणें निववित ॥९३॥

साखरेचा बोळू केला । परी कडूपणा नाहीं आला ।

तैसा ग्रंथु प्राकृतभाषा झाला । असे संचला स्वानंदु ॥९४॥

जरी सोन्याचें पेंडुकें केलें । परी तें दगडमोला नाहीं आलें ।

तैसें भागवत प्राकृत जालें । परी नाहीं चुकलें निजज्ञाना ॥९५॥

मुक्ताफळालागीं सागरीं । बुड्या देती नानापरी ।

तें सांपडलिया घरीं विहिरीं । जो अव्हेरी तो मूर्ख ॥९६॥

तैशी संस्कृतव्याख्यानआटाटी । अतिकष्टें परमार्थीं भेटी ।

तें जोडिल्या मराठीसाठीं । उपेक्षादृष्टि न करावी ॥९७॥

धनवंतु रत्‍नपारखी पुरा । तेणें धुळीमाजीं देखिल्या हिरा ।

गांठीं बांधोनि आणी घरा । पारखी खरा निजज्ञानें ॥९८॥

तैसें ज्ञाते विद्वज्जन । ग्रंथु मराठी देखोन ।

उपेक्षा न करितां करावा यत्‍न । पारखोनि चिद्‍रत्‍न साधावया ॥९९॥

क्षुद्रदृष्टीं पाहणें पाहतां । बोलु लागेल व्यासाचे ग्रंथा ।

मा हे तरी मराठी कविता । सांडूनि कुटिलता पाहावी ॥५००॥

ज्यांसी निजसुखाची आवडी । ते प्राकृतीं न काढिती खोडी ।

घेतील ज्ञानगर्भाची गोडी । अवस्था गाढी परमार्थी ॥५००॥

जे साचार परमार्थी । ते अधिकारी ये ग्रंथीं ।

ज्यांसी भागवतीं भक्ती । ते पावती निजसुख ॥२॥

ज्यासी भागवतीं नाहीं भक्ती । कोरडी व्युत्पत्ती मिरविती ।

तेही जरी निंदा न करिती । तरी पुढें पावती भक्तीतें ॥३॥

निंदा वसे ज्याचे चित्ता । त्यास गति नाहीं सर्वथा ।

निंदा सकळ पापांचे माथां । दोष ईपरता असेना ॥४॥

निंदकाचें नांव घेतां । दोष वाचेसी होय लागता ।

तिशीं द्यावया प्रायश्चित्ता । 'रामराम' सर्वथा म्हणावें ॥५॥

निंदेमाजीं देखिलें स्वार्था । निंदक प्रवर्तले भक्तहिता ।

बुडवूनि आपुले स्वार्था । परदोष सर्वथा क्षाळिले ॥६॥

सांडूनियां गुणदोष । श्रोतां होआवें सावकाश ।

जेथ वक्ता हृषीकेश । अतिसुरस तें ज्ञान ॥७॥

कृष्णउद्धवांचे ज्ञान । तत्काळ निरसी अज्ञान ।

एका विनवी जनार्दन । सावधान परियेसा ॥५०८॥

इति श्रीमद्‍भागवते महापुराणे एकादशस्कंधे श्रीकृष्णोद्धवसंवादे एकाकारटीकायां नवमोऽध्यायः ॥९॥

॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ मूळश्लोक ॥३३॥ ओव्या ॥५०८॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP