सती हृदय - श्लोक ८१ ते ९०

दुःशासनाकरवी अमानुष रीतीने छळली जात असलेली, भीषण संकटापन्न स्थितीतील द्रौपदी करूणरवाने भगवान श्रीकृष्णाचा धावा करते, तो प्रसंग यात वर्णिलेला आहे.


८१.

बुडूं लागली अर्णवीं शील-नौका

तुला आज मारुं किती सांग हाका

महासागरीं या उडी घालुनीया

स्वसा काढ बाहेर ही बंधुराया.

८२.

तुला रक्षका आण माझ्या गळ्याची

झणी लाज राखी तुझ्या या स्वसेची

तुझ्या अंबरें ही तनू झांकुनीया

मला उद्धरावें तुवां येउनीयां.

८३.

उतावीळ हा भीम शत्‍रु विधाता

परी पार्थ हा आडवी त्या जयंता

ह्मणूनी तुला प्रार्थितें मी मुरारे

मला शीघ्र दे रुक्मिणीचें जुनेरें.

८४.

पहा संकटाचा कडेलोट झाला

दया कां न माझी तुला ये दयाळा

तुला आज पाहूं कुठें सांग आतां

कधीं येथ येणार तूं पुण्यवंता ?

८५.

अमर्याद ही जाहली मानहानी

तुझ्या अंबरें झांक ही याज्ञसेनी

त्वरें देवकीनंदना धांव आतां

नको रे नको व्यर्थ पाहूं मदंता.

८६.

तुला वाटतें काय मी सांग दोषी

तुला जाहले काय कृष्णा नकोशी

तदा तूंच ही मान खंडून टाकी

अनायास जाईन वैकुंठ-लोकीं.

८७.

कुडींतून या प्राण जाणार आतां

नमस्कार घे द्रौपदीचा अनंता

शवा केशवा माझिया अग्नि दे तूं

करी हा तरी पूर्ण अंतस्थ हेतू.

८८.

पट माझें नेसलेलें खल घेतां ओढुनी

कवणें हा देह माझा टाकियला झांकुनी

अवचित ही पैठणी ये तनुवरती कोठुनी ?

गिरिधर कां कृष्ण आला पटरुपें धाउनीं ?

अहाहा अकस्मात हें काय झालें ?

नवें वस्त्र अंगास कोठून आलें ?

नव्हे भास हा चीर हें रुक्मिणीचें

नसे स्वप्न हें कृत्य हें श्रीहरीचें.

८९.

अहा केवढा ढीग हा अंबरांचा !

चमत्कार हा द्वारकेच्या प्रभूचा

ऋणी मी तुझी सर्वथा वासुदेवा

फलद्रूप तात्काळ केलास धावा.

९०.

अहा संकटीं धांवलासी मुरारे !

ऋणी मी तुझी जन्मजन्मांतरीं रे

हितैषी खरा तूंच या द्रौपदीचा

सदा वाहसी भार माझ्या हिताचा.

N/A

References : N/A
Last Updated : April 25, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP